वय वाढतयं. यशश्री यशोधरा शकुंतला श्रीकृष्ण
वय वाढतयं.
आज सकाळपासून तिचं मन भूतकाळात धावतयं.तिच्याच आयुष्याचा मागोवा घेतयं.खूप वर्षांपूर्वी तिने घेतलेला एक ‘हटके’निर्णय आणि त्यानंतरचा तिचा जीवन प्रवास आज तिला उलगडून लोकांसमोर ठेवायचाय. आज गावातल्याच एका संस्थेने ‘प्रमुख वक्त्या’ म्हणून तिला बोलावलय.विषय आहे ‘ अविवाहित राहण्याचा निर्णय:किती सोपा, किती कठीण?’
अविवाहित राहण्याचा निर्णय घेऊन तिला आता ३५ वर्षे झालीत. ती आता ६५ वर्षांची. ऐन तिशीत तिने अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला होता.
खरंतर,तिच्या घराने तिच्यासाठी वरसंशोधन तिच्या बावीसाव्या वर्षीपासूनच चालू केले होते. पण तरीही काही ठोस कारण नसूनही,तिशी ओलांडून गेली तरी तिचे लग्न जमले नवते. त्या आठ वर्षात तिने खूप नकार पचवलेही होते आणि काही नकार दिलेही होते. पण प्रत्येक वेळी दोष मात्र तिलाच दिला गेला होता. नकार मिळाला की तिचं रूप, रंग, वजन, उंची असं काहीतरी दोषी असायचं आणि नकार दिला की तिच्या ‘अपेक्षा’ दोषी असायच्या. तिच्या अपेक्षा ‘अवाजवी’ असून तिने तडजोड केलीच पाहीजे,या बाबतीत पूर्ण घराचे एकमत होते. शेवटी कंटाळून तिने लग्नच न करण्याचा निर्णय घेतला. थोडे दिवस सगळ्या घराने त्रागा केला पण ती ठाम राहिली. घरातले ‘कांदेपोहे ‘कार्यक्रम तिने बंद करून टाकले. हळूहळू घर नॉर्मल झाले.
एकदा हा निर्णय घेतल्यावर मात्र तिने सर्व प्रथम तिच्या ऑफिसच्या प्रगतीवर लक्ष केंद्रीत केले. आपण भक्कम पणे स्वतःच्या पायावर उभे असायला पाहीजे, हे तिने ठरवून टाकले. डिपार्टमेंटच्या परीक्षा दिल्या. ती हुशार आणि कष्टाळू होतीच. सगळी कामे तिने शिकून घेतली,घरी जायची खूप घाई नसल्यामुळे तिला ते सहज शक्यही होत होते.प्रमोशन मिळवत ती खूप लहान वयात खूप मोठ्या पोस्टवर पोचली. त्यामुळे तिला आर्थिक स्थैर्य मिळाले. तिचे राहणीमान सुधारले.
करीअर सांभाळत असतानाच तिने तिचा भ्रमंतिचा छंद जोपासायला सुरवात केली. फिरण्याची आवड असलेल्या काही ग्रुपची ती मेंबर झाली.पर्यटनामुळे तिचे अनुभव विश्व समृद्ध होत गेले. त्या अनुभवांचे शब्दांकन करताना तिलाच तिच्यातली लेखिका सापडली. तिच्या नावावर सहा सात पुस्तकेही प्रसिद्ध झाली. तिला लेखिका म्हणून ओळख मिळाली. त्यामुळे तिला सामाजिक कार्यक्रमाची बोलावणी येऊ लागली. अशाच एका कार्यक्रमासाठी ती एका अनाथाश्रमात पोहोचली आणि त्यानंतर ती प्रत्येक आठवड्याच्या सुट्टीला तिथे जातच राहीली.
हळूहळू तिचा सामाजिक कार्याचा उत्साह आणि कार्यपद्धती यामुळे तिची तिथे विश्वस्त म्हणून नेमणूक झाली. एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून ती ओळखली जायला लागली. अनेक वैविध्यपूर्ण उपक्रम तिने तिथे राबवले.त्या उपक्रमांना प्रसिद्धी मिळाली. तिच्या विचारांना महत्व आले. बर्याच संस्था तिला निमंत्रित करू लागल्या.आजचे निमंत्रणही
त्यातलेच.
विचारांच्या तंद्रीतच ती कार्यक्रमाला पोचली. आपला निर्णय आणि त्यानंतरचा प्रवास उलगडून सांगून समारोप करताना ती म्हणाली, “ वय वाढतय म्हणून, समाजाच्या भीतीने, मनाविरुद्ध ,लग्न फक्त करायचं म्हणून करण्यापेक्षा, स्वतंत्र आयुष्य काढण्याचा निर्णय मी घेतला,त्याचा मला अजिबात पश्चाताप होत नाहीयं.कारण मी एक वेगळ्या प्रकारे समृद्ध,अनुभवसंपन्नच आयुष्य काढले. माझ्या भ्रमंतीतून खूप जग पाहिले, जीवाभावाची माणसे जोडली, लिखाणातून निर्मितीचा आनंद मिळाला. सामाजिक कार्यातून काही दुःखी चेहर्यांवर हास्य फुलवता आले.मुख्य म्हणजे लग्न न करताही मी प्रत्येक क्षण समरसून जगले. कठीण प्रसंग आले नाहीत, असे नाही, पण त्यावर मात करू शकले.
मनासारखा जोडीदार मिळाला तर लग्न हा आयुष्य समृद्ध करणारा अनुभव असेलच. पण मनासारखा जोडीदार मिळाला नाही तर मात्र लग्न हा शाप ठरू शकतो.मनाविरुद्ध केलेले लग्न निभावणेही सोपे नसतेच आणि तडजोडीला मर्यादा असतात. त्यामुळे स्वतःचा स्वभाव,स्वतःच्या क्षमता
ओळखा आणि निर्णय घ्या. मी तो घेतलाय.
लग्न हा अनुभव महत्त्वाचा आहेच, पण फक्त लग्न हाच अनुभव महत्त्वाचा नाहीये. त्याशिवाय सुद्धा एक परिपूर्ण आयुष्य मी काढलंय,प्रत्येक जण काढू शकेल.
त्यामुळे मी एवढंच सांगेन की मनाविरुद्ध लग्न करू नका. ते निभावणेही सोपे नाहीच आहे.आयुष्याच्या वाटचालीत ज्या टप्प्यावर मनासारखा जोडीदार मिळेल,तेंव्हा तोही अनुभव घ्याच,पण लग्नाची वाट पाहण्यात अडकून पडू नका.”
तिला जे सांगायचंय ते लोकांपर्यंत पोहोचलयं हे तिला टाळ्यांच्या कडकडाटाने कळून चुकले.
यशश्री
यशोधरा शकुंतला श्रीकृष्ण