‘जाण’ –सचिन देशपांडे
‘जाण’
एका मिठाईच्या दुकानात गल्ल्यावर बसायचा ‘तो’. त्याच्या शेजारी बसत असे त्याचा सहकारी. आठ – दहा सेल्समनही असत उभे, काऊंटरच्या पलीकडे. दुकानाचा मालक कधी दुकानात येई… तर कधी त्यांची मिठाई जिथे बनत असे, त्या फॅक्टरीत जाई. थोडक्यात मालक दुकानात नसतांना, त्याचीच जबाबदारी असे झालं – गेलं बघण्याची. आणि अर्थातच तो ती जबाबदारी, इमाने इतबारे पार ही पाडत असे. जितके मिठायांचे नमुने होते दुकानात, त्याहूनही जास्त नमुन्याची लोकं बघायला मिळत असत त्याला. कोणी निवांत तर कोणी घाईत… कोणी शांत तर कोणी कोपीष्ट… कोणी अगदी वरची चिल्लरही देणारा तर कोणी वरचे शे – दोनशेचं हक्काने डिस्काऊंट मागणारा. आणि ह्या प्रत्येकाबरोबर त्याला मात्र अतिशय संयतपणे, संयमीतपणे वागावं लागत असे.
तर आजही अशाच विवीध तर्हेच्या लोकांची ये – जा चालू असतांनाच, त्याला दिसल्या दुकानात शिरतांना ‘त्या’. साठीच्या त्या बाईंना बघताच, तो किंचीतसा मोठ्यानेच बोलला… “आल्या.. शंभरच्या आत खरेदी करणार नी दोन हजाराची नोट देणार… सुट्टे द्या म्हंटलं तर आरडाओरडा करणार”. एवढं बोलून त्याने शेजारी बसलेल्या त्याच्या सहकार्याकडे बघत, मान हलवली. प्रत्युत्तरादाखल सहकार्यानेही “नायत्तर काय” ह्या अर्थाची किंचीतशी मान उडवली. तोपर्यंत ऐंशी रुपयांची रसमलाई घेऊन, त्या बाई गल्ल्यावर पैसे द्यायला आल्या. अपेक्षेप्रमाणेच त्यांनी दोन हजाराची नोट काढली, नी त्याला दिली. त्यानेही दरवेळप्रमाणे त्या बाईंकडे सुट्टे मागितले… आणि दरवेळप्रमाणेच त्यांची बडबड ऐकून अखेर, एकोणीसशे विस त्या बाईंना परत केले. चेहर्यावर यत्किंचीतही धन्यवादाची रेघ न उमटवता त्या बाई, निर्विकारपणे बाहेर पडण्याकरता वळल्या.
त्या बाईंच्या मागेच थोड्या अंतरावर उभा असलेला एक इसम मग, गल्ल्याजवळ सरकला. आणि त्याने त्याच्या बिलाचे पैसे देऊ केले. पाठी मान वळवून त्याने त्या दरवाज्यातून बाहेर पडणार्या बाईंकडे पाहिलं, नी गल्ल्यावर बसलेल्या त्याला बोलला… “त्या बाईंबद्दलचं तुमचं मघाचं बोलणं ऐकलं मी… पण तुम्हाला माहितीये का, त्यांचं हे असं करण्यामागचं नेमकं कारण?… नक्कीच माहित नसावं… देन लेट मी टेल यू दॅट… त्या बाई एक्स्ट्रीम डायबेटीक आहेत, आणि तरीही त्या इथून मिठाई घेऊन जातात… ह्याच दुकानातून बरं का… आणि गेली दोन वर्ष खंड न पाडता, हे असं करतायत त्या… जेव्हापासून… जेव्हापासून ते तिघेजण अॅक्सिडेंट होऊन, हे जग सोडून गेले… हो… ते तिघे… त्या बाईंचे विद्यार्थी होते ते… दहावीच्या परीक्षेत तिघेही नव्वदहून जास्त टक्के मिळवून, उत्तिर्ण झाले होते… त्यांनी फोनवरुनच हे त्यांच्या बाईंना कळवलं… आणि त्यांच्या पाया पडायला घरी येतोय, असंही बोलले ते… त्या दिवशी बाईंनी अत्यानंदाने इथूनच मिठाई घेतली… ‘पाचशे एक’ ची तीन पाकीटं तयार केली त्यांनी… आणि आपल्या घरी वाट बघत बसल्या त्या, तिघांच्या येण्याची… पण… पण ते तिघे आलेच नाहीत, तर आली त्यांची बातमीच… त्यांच्या आॅटोला एका ताबा सुटलेल्या ट्रकने उडवलं होतं… आणि… आणि जागीच ते तिघेही… पंचविस तारीख होती ती… तेव्हापासून दर महिन्याच्या पंचविस तारखेलाच त्या बाई, इथे ह्या दुकानात येतात… मिठाई घेतात… पाचशे एक ची तीन पाकीटं तयार करतात, आणि वाट बघत बसतात त्या तिघांची… हे सगळं मला कसं माहीत, असा तुम्हाला अर्थातच प्रश्न पडला असेल… तर ते अशाकरता की मी… मी त्या तिघांपैकी एका मुलाचा बाबा आहे… मी आणि त्या बाकी दोन मुलांचे बाबा असे आम्ही तिघे, दर महिन्याच्या पंचविसला बाईंकडे जातो… त्यांनी आणलेली मिठाई खातो… त्यांच्याकडून ती पैशांची पाकीटं घेतो… आणि गरजू विद्यार्थ्यांना त्या पैशांतून, वह्या – पुस्तकं घेतो… त्या बाईंना ह्यातलं काहीच माहित नाही… त्यांच्या मनावर त्या घटनेचा इतका परिणाम झालाय की, त्या बाई आम्हा तिघांनाच ती तीन मुलं समजतात… गेली दोन वर्ष दर महिन्याच्या पंचविस तारखेला, हे नी अगदी असंच घडतंय… तेव्हा तुम्हाला रिक्वेस्ट आहे यापुढे, म्हणजेच पुढच्या पंचविसला त्या बाईंकडे बघून नाराज होऊ नका… त्यांनी बंदे दिले तर त्याचे सुट्टे देण्यासाठी, जमल्यास का-कू करु नका… चला… आता निघायला हवं मला… बाकी दोघांना भेटून, त्या बाईंच्या घरी ही जायचंय”.
इतकं बोलून तो माणूस निघायला वळला. त्याच्या पाठमोर्या आकृतीकडे बघत बसले गल्ल्यावर बसलेला तो, अन् बाजूला बसलेला त्याचा सहकारीही… अगदी निःशब्दपणे. एकमेकांकडे पाहत मग त्यांनी, उघड्या गल्ल्यातील पैशांकडे पाहीलं. त्या दोघांनाही जणू, आजच खरी ‘जाण’ आली होती… बंदे आणि सुट्टे ह्यांतली.
—सचिन देशपांडे