जगावेगळी ‘संजीवन’ शाळा-
लेखक- संदीप काळे.
विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आय. पी. एस. अधिकारी मनोजकुमार शर्माजी यांची वाट बघत थांबलो होतो. गेटच्या समोर असणाऱ्या गाडीकडे माझी सहज नजर गेली. पाहतो तर काय ? माझ्या समोरच्या गाडीमध्ये सन्माननीय मंत्री महोदय शिवेंद्रराजे भोसले महाराज एकटेच कुणाची तरी वाट पाहत थांबले होते. महाराजांचे लक्ष मोबाईलमध्ये होते. मी जाऊन जोरात ‘नमस्कार महाराज’ म्हणेपर्यंत महाराज मोबाईलमध्येच पाहत होते. आमच्या गप्पा झाल्यावर मी महाराजांना नम्रपणे म्हणालो, ‘महाराज, तुम्हाला व्हॉटसॲप पाहायला वेळ मिळतो का ?’
त्यावर महाराज हसून म्हणाले, ‘नाही, अजिबात नाही. आता एक आमदार माझ्यासोबत येत आहेत. त्यांची वाट बघत थांबलो होतो. व्हॉटसॲपमध्ये काही ग्रूप आहेत, ते मी पाहतो. त्यात मी शिकलेल्या पाचगणीच्या संजीवन शाळेचाही एक ग्रूप आहे, त्या ग्रूपमध्ये गेलो की, शाळेची आठवण येते. नवीन माहिती, फोटो मी पाहत असतो.’
महाराज अधिक उत्साहाने मला संजीवन शाळेविषयी सांगत होते, ‘मी ज्या संजीवन शाळेत शिकलो, त्या शाळेच्या खूप आठवणी आहेत.’ महाराज एक-एक करून त्या शाळेच्या आठवणी सांगत होते आणि मी ऐकत होतो. महाराजांकडून पाचगणीच्या संजीवन शाळेचे कौतुक सुरू होते. महाराज ज्यांची वाट पाहत थांबले होते, ते आमदार आले आणि महाराज निघून गेले. शर्माजी आले, त्यांची भेट झाली, तेही निघून गेले.
त्या दिवशी विधान भवनामध्ये अनेकांच्या भेटी झाल्या. अनेकांशी बोलणे झाले, पण त्या सर्वांमध्ये बोलण्याची आठवण राहिली ती महाराजांच्या संजीवनी शाळेच्या प्रेमाविषयी.
मी माझ्या नरिमन पॉईंट येथील आंबेसी सेंटर मधील कार्यालयात पोहोचलो. कार्यालयात गेल्यावर पहिल्यांदा पाचगणीची संजीवन शाळा नेमकी आहे तरी कशी, हे गुगलवर सर्च केले. शाळेची माहिती मिळाल्यावर त्याच दिवशी मनोमन ठरवले की, शक्य तितक्या लवकर संजीवन शाळेला भेट देण्यासाठी जायचे.
पुढच्या आठवड्यात त्या शाळेला भेट देण्याचा दिवस उजाडला. पाचगणीमध्ये प्रवेश केल्यावर महाबळेश्वर रोडवर भीमनगरमध्ये संजीवन चौक आहे, तिथेच संजीवन विद्यालय ट्रस्टची संजीवन शाळा आहे. पाचगणी आणि संजीवन शाळेभोवती असणारे नैसर्गिक सौंदर्य जगाच्या पाठीवर फार कमी ठिकाणी असेल.
मी शाळेत पोहोचलो. ‘संजीवन’चे प्राचार्य धनंजय शिरूर सर यांच्याशी माझे आधीच फोनवर बोलणे झाले होते. त्यांना भेटण्यासाठी मी शाळेतल्या शिपायाला निरोप दिला. शिपाई मला म्हणाला, ‘सरांची बैठक सुरू आहे. आपण थोडा वेळ बसा.’ मी ‘हो’ म्हणून बाहेर बसलो.
माझ्या लक्षात आले, शिरूर सर यांना वेळ लागणार आहे, म्हणून मी फेरफटका मारावा या उद्देशाने बाहेर पडलो. शाळेच्या परिसरात जे सौंदर्य होते, ते फारच मोहक होते. मला माहित होते की, याच भागात ‘तारे जमींन पर’ हा चित्रपट तयार झाला होता.
एका मोठ्या वडाच्या झाडाखाली, शाळेतल्या काही मुली एका ज्येष्ठ महिलेसोबत कसली तरी तयारी करत होत्या. एक मोठा केक आणला होता. टाळ्यांच्या गजरात तो केक कापला गेला. त्या मुली अगदी भावूक होऊन तो केक त्या महिलेला भरवत होत्या. त्या महिला तिथे असणाऱ्या मुलींना म्हणत होत्या, ‘काय गं, घरी गेल्यावर मला विसरणार तर नाही ना..?’ काही बोलण्याच्या आधी त्या मुली भावनिक होऊन त्या महिलेच्या गळ्यात पडल्या. ते सारे भावनिक चित्र मन हेलावून सोडणारे होते.
माझ्या बाजूला बसून संगणक गेम खेळणाऱ्या मुलाला मी विचारले, ‘या महिला कोण आहेत.?’
त्यावर तो मुलगा म्हणाला, ‘त्या आमच्या शशी मॅम आहेत.’
मी पुन्हा त्यांना विचारले, ‘तुमच्या शिक्षिका आहेत काय ?’
त्याने कपाळावर हात मारत मला सांगितले, ‘अहो, या शाळेच्या प्रमुख आहेत.’
मी म्हणालो, ‘अरे, मला नव्हते माहीत.’
मी त्यांच्या जवळ जाऊन माझा परिचय देत त्यांना वाकून नमस्कार केला. आमचे बोलणे सुरू झाले आणि गप्पांमधून त्या मॅमनी त्या शाळेविषयी मला जे काही सांगितले, त्यातून मी अवाक् तर झालोच, शिवाय शशी मॅमची शाळा अवघ्या ‘जगात’ वेगळी कशी आहे हेही मी पाहिले. जे मंत्री महोदयांनी मला विधान भवनाच्या गेटवर सांगितले होते, ते माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांसमोर होते.
मूळचे बडोदा येथील असणारे कृष्णराव पंडित आणि रावसाहेब पंडित या दोघांनी १९२२ ला भारतीय संस्कृती जपणारी शाळा उभी करायची, असे स्वप्न पाहिले होते. पाचगणी आणि परिसरात ख्रिश्चन धर्माशी निगडित अनेक शाळा सुरू झाल्या होत्या. हिंदू संस्कृती प्रामुख्याने जपली जावी, खेळाला प्राधान्य देऊन प्रशासकीय सेवेतील अधिकारी घडावेत, या हेतूने संजीवन संस्थेची निर्मिती झाली.
पाच विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली शाळा आज शशी मॅम ज्या मुलींना निरोप देत होत्या, त्या मुली पन्नास हजारावा आकडा पार करीत होत्या. प्रगतीचे हे शिखर गाठत असताना या संस्थेने मागे वळून कधी पाहिलेच नाही.
प्राचार्य धनंजय शिरूर सर (7798881662) हे संजीवनचे ११ वे प्राचार्य आहेत. शिरूर सर आधीपासून याच संजीवन शाळेत शिक्षक होते. मग ते व्यवस्थापनाच्या भूमिकेत आले, आणि नंतर प्राचार्य झाले. २००३पासून आजपर्यंत शिरूर सर यांनी शाळेसाठी दिलेले योगदान खूप मोठे आहे.
मी शशीताई यांच्याकडून जे काही शाळेविषयी ऐकत होतो, ते सारे काही अद्भुत असेच होते. पण मी जेव्हा शशीताईकडून शाळेशी संबंधित असलेला विषय ऐकला, तेव्हा मी शशीताई यांच्यापुढे अधिकच नतमस्तक झालो.
शशीताई ठकार शिक्षणासाठी ८वीला असताना ग्वालियरमधून पाचगणीला आल्या. सर्व विषयांत त्या अतिशय हुशार. राज्य आणि देशपातळीवर त्यांनी खेळात शाळेचे नाव केले. एखाद्या तरुणाच्या प्रेमात पडायच्या वयात शशीताई संजीवन शाळेच्या प्रेमात पडल्या. शशीताई संजीवनमध्ये शिक्षक झाल्या, प्राचार्य झाल्या, संचालक झाल्या आणि आता त्या शाळेच्या चेअरमन आहेत. वय वर्ष ९३च्या शशीताई आजही या वयात शाळेसाठी सर्व कामे अगदी नेटाने करतात. संजीवन शाळा, कॉलेजचे रूपांतर स्किल आणि स्पोर्ट विद्यापीठात करायचे खूप मोठे स्वप्न शशीताईंनी उराशी बाळगले आहे.
शशीताई यांनी ना लग्न केले, ना कुणासोबत संसार, ना कुण्या नातेवाईकांसोबत नाते ठेवले. शाळा हेच त्यांच्यासाठी ‘जग’ ठरले आणि त्या शाळेला जागतिक असा अमूल्य दागिना बनवण्याचे काम शशीताईनी केले. शाळेच्या भिंती आणि मोठे मस्टर लिहिण्यासाठी कमी पडतील इतके मोठे विद्यार्थी घडवण्याचे काम झाले आहे. फोर्स मोटर्सचे सीईओ प्रसन्न फिरोदिया, संगीतकार ललित पंडित, मृण्मयी लागू, अमित देशमुख, रीतेश देशमुख, विद्यमान मंत्री शिवेंद्रराजे भोसले महाराज अशी कितीतरी नावे घेता येतील. किती आयपीएस झाले, किती आयएएस झाले, किती वैज्ञानिक झाले, कित्येकांनी मोठ्या पदांवर जात सामाजिक कीर्ती मिळवली, याचा आकडा फार मोठा होता. ही शाळा नाही तर उज्ज्वल इतिहास घडवणारे चालते बोलते विद्यापीठ आहे.
मी शशीताईंना विचारले, ‘जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता तेव्हा तुम्हाला काय वाटते?’
शशीताई शांतपणे म्हणाल्या, ‘मी आयुष्यभर पिढ्या घडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. अजून पुढे करतच राहणार.’ थोड्या काळजीच्या स्वरात ताई म्हणाल्या, ‘कोविडमुळे आम्ही खूप अडचणीत सापडलो. आमच्या शाळेविषयी शासन स्तरावर सतत अनास्था असते. पूर्वी मदत करणारी माणसे खूप होती, पण आता फारसे लोक पुढे येत नाहीत. त्यामुळे हा एवढा मोठा जगन्नाथाचा रथ ओढायचा कसा, हा प्रश्न आहे.’
आमचे बोलणे चालू होते, तेव्हढ्यात मला शोधत प्राचार्य शिरूर सर तिथे आले. शशीताई म्हणाल्या, ‘तुम्ही संपूर्ण शाळा फिरून या. मी तुमची घरी वाट पहाते.’ ताई निघाल्या. रस्त्याने जाताना प्रत्येक मुलगा ताईला जणू त्या त्यांच्या आईच आहेत, असेच बोलत होत्या.
मी शिरूर सर यांना म्हणालो, ‘या वयात काय उत्साह! काय काम करण्याची ताकद ! बापरे ! किती कमाल आहे!’
शिरूर सर म्हणाले, ‘ताई म्हणजे अजब आणि अद्भुत रसायन आहेत. वय वर्ष ४० असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची त्यांना नावे तोंडपाठ आहेत. शिरूर सर जे जे बोलत होते, ते सारेच कमालीचे होते. शिरूर सरांनी मला त्या शाळेत जे जे दाखवले ते सारे शिक्षण आणि सामाजिकता दृढ करणारे होते. सर्व प्रकारचे खेळ, संगीत, चित्रकला, सर्व प्रकारच्या अकादमींची पूर्व तयारी, या सर्व क्षेत्रांत जागतिक पातळीपर्यंत सहभागी झालेली मुले तिथे होती. पहिली ते बारावीपर्यंत कुणालाच नव्वद टक्केच्या खाली मार्क्स वाले कुणी आहेत का ? नाही, असा प्रश्न मला त्या शाळेच्या यशाचा आलेख पाहून बघायला मिळत होता. स्कीलिंगवर संस्थेचा खूप भर होता. केवळ नोकरी नाही तर स्कीलिंगच्या माध्यमातून मुले उभी राहिली पाहिजे, स्वत:चा व्यवसाय त्यांनी सुरू केला पाहिजे, यासाठी वीसपेक्षा जास्त स्कीलिंगचे कोर्स येथे चालवले जातात.
शिरूर सर म्हणाले, ‘संस्थेने अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. आसपासच्या सर्व गावांत मोबाईल वाचनालय सुरू केले आहेत. पाच हजारांहून अधिक महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रशिक्षण दिले आहे. अनेक भागांतून गरिबांची मुले शासनाच्या माध्यमातून येथे मोफत शिकण्यासाठी येतात. ही शाळा म्हणजे दुसरं घर आहे. शैक्षणिक जडणघडणी सोबत मानसिक आधार, जीवनाची पायाभरणी हे इथले वैशिष्ट्य आहे.
मुलांकडून इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर टाळणे, सतत फास्ट फूड खाणे टाळणे, बेशिस्तपणा दूर करणे, आयुष्याकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टिकोन थांबवणे. आमच्या शाळेत या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात. म्हणून भारत भरातून आमच्याकडे प्रवेश असतात. आमच्याकडच्या माजी विद्यार्थांनी अनेक गरीब विद्यार्थी येथे घडावेत यासाठी त्यांच्याकडून शिष्यवृत्ती देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यातून अनेक विद्यार्थी शिकतात.’
शिरूर सर जे जे सांगत होते त्याचा डेमोही दाखवत होते. एकीकडे आमचे बोलणे सुरू होते, तर दुसरीकडे वाटेत भेटणाऱ्या प्रत्येक मुलाला शिरूर सर काहीतरी सांगत होते. कुणी पोहत होते, कुणी क्रिकेट खेळत होते, तर कुणी अनेक वैज्ञानिक प्रयोग करीत होते. जसे ‘तारे जमींन पर’, ‘थ्री इडियट’ या चित्रपटांत लहान मुले जे जे प्रयोग करीत होते, ते ते सारे प्रयोग या ‘जगा’वेगळ्या संजीवन शाळेत मी माझ्या डोळ्याने पाहत होतो.
खेळाच्या एका शिक्षकाची ओळख करून देताना शिरूर सर म्हणाले, “हे सचिन कांबळे सर, सर्व देशी, विदेशी खेळात विशेषतः क्रिकेट आणि फुटबॉलमध्ये यांनी संजीवन शाळेचे नाव सातासमुद्रापार नेले आहे”.
हसतमुख, अत्यंत उत्साही कांबळे सर यांच्याशी खेळाचे सारे यश समजून घेताना कधी वेळ गेला ते कळलेच नाही. आख्खा दिवस त्या शाळेत गेला.
मला निघायचे होते. आम्ही शशीताईंकडे गेलो. त्यांनी त्यांच्या हाताने बनवलेले जेवण वाढले होते. जेवल्यावर त्यांनी स्वतः तयार केलेले ग्रीटिंग मला दिले. त्यांच्या सोबत असणाऱ्या त्यांच्या बहिणीच्या कन्या, संस्थेच्या संचालक अनघा देवी (9049919912) यांची मला त्यांनी ओळख करून दिली. तेव्हढ्या मोठाल्या पायऱ्या उतरून ताई मला निरोप देण्यासाठी खाली आल्या. ताईंच्या पायावर डोके ठेवून मी गाडीत बसलो.
आपल्या राज्यात शाळा या विषयाला घेऊन असाही प्रयोग होऊ शकतो, यावर माझा विश्वास बसत नव्हता. गाडी बरीच पुढे गेल्यावर मी मागे नजर टाकली. शशीताईंचा हात अनघादेवी ताईंच्या हातात होता. अनघादेवी ताईंच्या मागे प्राचार्य शिरूर सर जात होते, आणि शिरूर सरांच्या मागे सचिन कांबळे सर होते. शशी ताईने पुढे शाळेचा कारभार सुवर्ण अक्षराने लिहिण्यासाठी कार्यक्षम माणसे तयार केली होती. शाळेच्या भविष्याला पुढे नेणारी दुसरी पिढी शशी ताईंनी तयार केली होती.
मला या शाळेला भेट देऊन आल्यावर अवघे ‘जग’ फिरून आलो असे वाटत होते. आज याच ‘जगात’ वेगळ्या असणाऱ्या ‘संजीवन’ आणि तुमच्या आसपास असणाऱ्या त्या प्रत्येक चांगल्या शाळेला तुमची गरज आहे, ती तुमच्या आमच्या मदतीची. या शाळा टिकल्या तर आमची संस्कृती, आमचा भारत देश टिकेल ? बरोबर ना. करणार मग अशा शाळेला मदत ? नक्कीकरा.……….
फोटो ओळ : ‘संजीवन’ शाळेत अनोखे उपक्रम राबवले जातात. सोबतच्या फोटोमध्ये मुली झाडाला राखी बांधत असल्याचा संग्रहित फोटो. फोटोत शशीताई ठकार, अनघादेवी, प्राचार्य धनंजय शिरूर आदी.
©® संदीप काळे,
व्हाइस ऑफ मिडिया, मुंबई,
9890098868
आजचा हा लघुलेख स्वतः लेखक, संपादक श्री संदीप काळे, मुंबई, यांच्या सौजन्याने.
C/P.