तसं म्हटलं तर फुल हे आपले मन प्रसन्न करते आणि एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा विकसित करते. फुलांमध्ये एक ताकद आहे ती म्हणजे आपल्या हातातून जरी खाली पडली किंवा परमेश्वरा चरणी रुजू झाली तरी ओंजळ सुगंधित करतात. ही सुगंधित झालेली ओंजळ नकळतपणे चेहऱ्यावर प्रसन्नता आणते. किंवा असेही म्हणता येईल, ही ओंजळ म्हणजेच आनंद. माझ्या मते, परमेश्वराने फुलांना हे वरदानच दिले आहे. म्हणून तर व.पु. देखील लिहितात, ” पारिजातकाचं आयुष्य लाभलं तरी चालेल, पण लयलूट करायची ती सुगंधाचीच..”
जसा फुलांचा सुवास आपण विसरत नाही तसंच काही माणसांचे आपल्या आयुष्यात असणारे स्थान हे देखील दुर्लक्षित होऊ शकत नाही. बघा ना, घरातील कर्त्या पुरुषाला अथवा स्त्रीला अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. घरात साधा छोटासा कार्यक्रम जरी असेल तरी शेवटी सर्व गोष्टी आल्या आहेत ना, पाहुण्यांची सोय झाली आहे ना असे अनेक प्रश्न त्यांना सोडवावे लागतात. पण एक असते, त्यांचे महत्व किंवा अस्तित्व खूप काही सांगून जाते. या वर व.पुं.चा अजून एक विचार अगदी साजेसा आहे, ” आयुष्यात काही व्यक्तींचे स्थान हे हारातील दोऱ्या प्रमाणे असते, दिसणे नाही पण असणे महत्त्वाचे..” असेच अगदी फुलांचे आहे. आज ताजी, टवटवीत असणारी फुलं उद्या निर्माल्य होणार हे माहित असूनही ते दरवळ मात्र पसरवत असतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे चाफ्याचे फुल. हातात घेऊन त्याचा सुवास अक्षरशः वेड लावतो. लग्न समारंभात देखील नुसत्या सुवासाने एक प्रकारचा गोडवा निर्माण होतो. हे आपल्या सुगंधाचे दान करणं म्हणजे खरंच आनंद देणे आहे. म्हणून तर व.पुं. चा हा विचार फार चपखल बसतो, ” गंध दान करुन फुलांना कोमेजण्याचे बळ येते..”
खरं तर आपण फुलां कडून हेच शिकलं पाहिजे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. फुलांचा सुगंध ही त्या फुलांची ओळख असते,तर माणसाचा स्वभाव ही त्याची ओळख असते. फुलां शिवाय ही सृष्टी अपूर्ण आहे तसेच माणसां शिवाय नाती. या लेखाचा शेवट व.पुं. च्याच विचाराने करावासा वाटतो,
” आनंद देणाऱ्या ओंजळी कधीच रिकाम्या राहत नाही, कारण पुन्हा पुन्हा भरण्याचे त्यांना वरदान लाभलेले असते..”
… मानसी देशपांडे