मंथन (विचार)वैशिष्ट्यपूर्ण / फिचर

रंगांचा उत्सव : होळी ते रंगपंचमी विश्वास देशपांडे, चाळीसगाव

रंगांचा उत्सव : होळी ते रंगपंचमी

आपण भारतीय सण, उत्सव साजरे करण्यात आघाडीवर आहोत. आपल्या सगळ्या सणांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते सगळे निसर्गाशी आणि पर्यावरणाशी जोडले आहेत. आपले आरोग्य, जीवनशैली आणि अध्यात्म यांच्याशी त्यांची एक अतूट अशी नाळ जुळलेली आहे. होळी येते तेव्हा भोवतालचा निसर्ग आपले रूप बदलत असतो. पानगळ होऊन झाडांना नवी पालवी येत असते. वृक्षांना बहर येतो. आंब्याच्या मोहराने भोवतालचा परिसर धुंद सुगंधी होऊन गेलेला असतो. अशातच कडक थंडी नाहीशी होऊन उन्हाळ्याची चाहूल लागलेली असते आणि अशातच फाल्गुन पौर्णिमेला होळीचा सण येतो. या पौर्णिमेलाच हुताशनी पौर्णिमा असेही म्हटले जाते. आपल्या इतर अनेक सणांप्रमाणेच हा सण अमंगलातून मंगलाकडे, वाईटाकडून चांगल्याकडे जाण्याची प्रेरणा देतो.

भक्त प्रल्हादाची कथा आपण सगळे जाणतो. प्रल्हाद हा विष्णूचा भक्त होता. त्यामुळे त्याचा पिता हिरण्यकश्यपू याने त्याला मारण्याचे अनेक प्रयत्न केले. ते सगळे अयशस्वी ठरले. शेवटी आपल्या बहिणीला म्हणजे होलिकेला प्रल्हादाला मांडीवर घेऊन जाळण्यासाठी हिरण्यकश्यपुने सांगितले. होलिकेला अग्नी जाळू शकणार नाही असे वरदान होते. त्यामुळे तिच्या मांडीवर फक्त प्रल्हादाचा जळून मृत्यू होईल असा हिरण्यकश्यपू आणि होलिका यांचा अंदाज होता. पण होलिकेने आपल्याला मिळालेल्या वरदानाचा वाईट हेतूसाठी वापर केल्याने तिचे वरदान तिच्यासाठी शापच ठरले आणि ती स्वतःच अग्नीत जळून भस्म झाली. या होलिकेचा नाश झाला म्हणून त्याप्रीत्यर्थ होलिकादहन केले जाते. आसुरी प्रवृत्तींवर सत्प्रवृत्तीच्या विजयाचे हे प्रतीक आहे.

हा सण भारताच्या विविध भागात वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. उत्तरेत होरी, फुलोंकी होली, लाठमार होली, दोलायात्रा तर महाराष्ट्र आणि गोव्यात होळी, शिमगा, होळी पौर्णिमा, हुताशनी पौर्णिमा या नावाने, दक्षिणेत कामदहन म्हणून साजरा केला जातो. कुठे पाच दिवस तर कुठे आठ दिवस हा सण साजरा केला जातो. कामदेवाने मदनाच्या रूपात भगवान शंकरांच्या साधनेत विघ्न आणले होते. त्यामुळे शंकरांनी आपला तृतीय नेत्र उघडून कामदेवाला भस्म केले. होळी सण प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. त्यामागे वेगवेगळ्या आख्यायिकाही आहेत. ढुंढा नावाची एक राक्षसी होती. ती लहान मुलांना त्रास देत असे. तिच्यामुळे मुले भयग्रस्त झाली होती. तिच्यामुळे रोगराई पसरत होती. तिला हाकलून लावण्याचे अनेक प्रयत्न केले गेले. शेवटी लोकांनी गावात ठिकठिकाणी अग्नी प्रज्वलित करून आणि तिला बीभत्स शिव्या शाप देऊन पळवून लावले असे म्हटले जाते. म्हणूनही होळी साजरी केली जाते.

होळीचा दुसरा दिवस धुळवड किंवा धूलिवंदन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी होळीतील रक्षा एकमेकांच्या अंगावर उधळली जाते. राख किंवा रक्षा म्हणजेच धूळ. पण होळीतील ही राख अतिशय पवित्र समजली जाते. ती अनिष्ट गोष्टींचा नाश करते. वातावरणातील सकारात्मक शक्तीचे प्राबल्य वाढवते म्हणून आपण धूलिवंदन साजरा करतो. पण आजकाल धुळवड किंवा धूलिवंदन या शब्दाचा अर्थच आपण विसरलो आहोत. उत्तर भारतीय लोकांचे अनुकरण करून त्या दिवशीच आपण रंगपंचमीचा आनंद घेतो. पण आपल्याकडे रंगपंचीमीचे सुद्धा एक आगळेवेगळे महत्व आहे.

फाल्गुन कृष्ण पंचमी म्हणजे रंगपंचमी. या दिवशी वृंदावनात राधा आणि कृष्ण रंग खेळले अशी आख्यायिका आहे. एका आख्यायिकेनुसार बरेच दिवस भगवान श्रीकृष्ण वृंदावनात गेले नाहीत. राधा आणि गोपिका यांना कृष्णाचा विरह सहन करावा लागला. राधा तर त्या विरहात जणू कोमेजून गेली. तिचा आनंदच जणू हरवला. राधेच्या दुःखी होण्याने वृन्दावनातील झाडे फुले सुद्धा कोमेजली. सृष्टीतील चैतन्य जणू हरवले. भगवान कृष्णांनी मग पुन्हा सगळी सृष्टी चैतन्यमय केली. झाडे, फुले पुन्हा बहरून आली. राधेचा रुसवा दूर करण्यासाठी श्रीकृष्णांनी तिच्या अंगावर फुले उधळली. वृन्दावनातील मंदिरात भगवान श्रीकृष्णांवर देखील फुलांची किंवा पाकळ्यांची उधळण केली जाते.

असेही सांगितले जाते की फाल्गुन कृष्ण पंचमीला श्रीकृष्णांनी राधा, गोपिका आणि गोकुळातील समस्त स्त्रीपुरुषांना एकत्र आणून त्यांच्यासोबत रंग आणि रासक्रीडा केली. जीवन हे इंद्रधनुष्यातील सप्तरंगांप्रमाणे मोहक आणि सुंदर आहे. जीवनात संगीत, नृत्य आणि रंगांचा आनंद घ्या हेच जणू श्रीकृष्णांनी आपल्या या कृतीतून सांगितले. आपले जीवन रंगांनी, संगीताने समृद्ध व्हावे, आळस, सुस्तपणा यांचा त्याग करावा आणि उत्साहाने भरलेले रसरशीत जीवन जगावे हाच यानिमित्ताने त्यांचा आणि होळी या सणाचा संदेश आहे. त्याचबरोबर आपले पर्यावरण जपण्याचा संदेश देणारा पण हा सण आहे.

आजच्या काळात आपल्याला होळीचा असाही अर्थ घेता येईल. समाजातील जातीभेद, उच्चनीचता, वाईट चालीरीती, प्रथा यांचा त्याग आपण करावा असाही संदेश हा सण नकळतपणे आपल्याला देतो. केशवसुतांच्या शब्दांत सांगायचे तर –

जुने जाऊ द्या मरणालागुनी

जाळून किंवा पुरुनी टाका

सडत न एक्या ठायी ठाका

सावध ! ऐका पुढल्या हाका.

हाच खरा या सणामागील अर्थ आहे.

खरी होळी साजरी केली ती आपल्या देशभक्तांनी आणि क्रांतिकारकांनी. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वदेशीचा पुरस्कार आणि परदेशी वस्तूंवर बहिष्कार असा नारा लोकमान्य टिळक, महात्मा गांधींनी दिला आणि विदेशी कपड्यांची, वस्तूंची होळी करण्यात आली. अनेक देशभक्त आपल्या घरादाराची, आयुष्याची होळी करून देशासाठी हसत हसत फासावर चढले. आपणही त्यांच्या या त्यागाची जाणीव ठेवू या. आणि त्यांनी जे स्वातंत्र्य आपणास मिळवून दिले आहे ते जपण्यासाठी ज्या ज्या काही वाईट गोष्टी त्याच्या आड येत असतील अशा सर्व गोष्टींची होळी करून त्यांना श्रद्धांजली वाहू या.

आणि सर्वात शेवटी सांगायचे तर ‘ श्याम पिया मोरी रंग दे चुनरिया ‘ असे म्हणत त्या श्यामसुंदराला आवाहन करावे कारण ‘ रंगात रंग तो श्यामरंग ‘ हेच खरे !

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव

२४/०३/२०२४

प्रतिक्रियेसाठी ९४०३७९४९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}