Classified

झुंजुमुंजू महाराष्ट्र टाईम्स मधल्या शब्दकळा या सदरातून साभार

झुंजुमुंजू

मराठी भाषेत काही काही अतिशय सुंदर, नादानुकारी शब्द आहेत. हे शब्द त्या शब्दांना मिळालेल्या अर्थासाठी एवढे अचूक आहेत, की त्या जागी अन्य कुठल्या शब्दाचा विचारही करता येत नाही. शिवाय हे शब्द मराठी लोकसंस्कृतीशी एवढे समरस झाले आहेत, की मराठीव्यतिरिक्त अन्य भाषांमध्ये त्यांचे नेमके भाषांतर होणे अगदी कठीण असते. ‘झुंजुमुंजू’ हा असाच एक शब्द. पहाट होण्याआधीची जी किंचित अंधार, थोडा थोडा उजेड अशी जी वेळ असते, तिला आपण मराठीत ‘झुंजुमुंजू’ झालं, असं म्हणतो. हा शब्द उच्चारताच, ती वेळ अगदी आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. अशी कल्पना करा गावाकडचं धाव्याचं घर आहे. उन्हाळ्याची सुरुवात आहे. पानगळ संपून, झाडांना पालवी फुटायचे दिवस आहेत. उकडत असल्याने आपण घराच्या माळवदावर अंथरूण टाकून झोपलो आहोत. अशा वेळी पहाटे हवेत किंचित थंडी पसरते. रात्री उकडत असल्यानं पायाशीच पडलेली गोधडी तेव्हा आपण नकळत अंगाशी ओढून घेतो. तरी हलका वारा, पक्ष्यांची किलबिल, गाई-गुरांचं हंबरणं, नव्या पानांचा गोडसर वास, दूरवरून देवळातून ऐकू येणारी काकड आरती आणि त्या जोडीला समोर अंगणात तापवायला ठेवलेल्या बंबातील सरपणाचा येणारा खरपूस वास या सगळ्यांमुळे आपल्याला हलकेच जाग यायला लागते. आपण डोळे किलकिले करून सगळीकडे पाहतो, तेव्हा आकाशात अजून एक कोपऱ्यात चंद्राची कोर तरीही दिसत असते. थोडा अंधार असला तरी आसमंत जागा व्हायला लागलेला असतो. हीच ती ‘झुंजुमुंजू’ची वेळ! नुसता तो एक शब्द उच्चारला, तरी एवढ सगळं चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं. ही त्या एका ‘झुंजुमुंजू’ शब्दाची ताकद. आता या शब्दाला दुसऱ्या भाषेत एखादा प्रतिशब्द मिळेलही; पण या शब्दचित्राचं कसं भाषांतर करणार? मध्यरात्री ट्रेकिंग सुरू करून एखाद्या गडावर माचीवर पोहोचायच्या वेळी झुंजुमुंजू होत असताना, उरात जे काही दाटतं, त्याचं भाषांतर कसं करणार? आपण परराज्यांत किंवा परदेशांत जरी गेलो, तरी ‘झुंजुमुंजू’ झालं असं कुणी म्हटलं, तर आपल्याला आपली माती, आपली मातृभाषा आणि आपली संस्कृतीच आठवते. हीच आपल्या अस्सल मराठमोळ्या शब्दांची महती… (महाराष्ट्र टाईम्स मधल्या शब्दकळा या सदरातून साभार )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}