तारूण्य .. ज्योती रानडे.
हा लेख आपल्या ग्रूपच्या वाचक सूनंदा मधूकर चितळे पूणे .... यांनी पाठवला
तारूण्य …..
देवयानी एका लग्नाला जाण्यासाठी तयार झाली. अवघं २७ वर्षाचं वय आणि ईश्वराने फुरसत से बनवलेले रूप बघून अनेक माना तिच्याकडे वळत. हिरव्या काठाच्या केशरी नारायण पेठेत तिचा सुडौल बांधा अजूनच कमनीय दिसत होता. गळ्यात मोत्याची माळ, कानात टपोरे मोती, हातात मोत्याचे तोडे व लांब मंगळसूत्र घालून तिने आरशात बघितले. स्वत:चे सौंदर्य बघून ती हसली. परीक्षितनं मागणी घातली नसती तरच नवल म्हणत तिने मान कलती करून आरशात बघितलं. एक मूल आहे कुणाला वाटणार पण नाही म्हणत तिनं पोट सपाट दिसतय ना बघितलं व ती बाहेर पडली.
नुकतच एम.बी.ए. केलं होतं व परीक्षितच्या फर्म मधेच देवी मॅडमचं ॲाफीस होतं. उत्तम कथ्थक करणारी देवयानी मला माझ्या रूप गुणांचा अजिबात अहंकार नाही. असे अनेकदा बोलून दाखवत असे. एवढी हूशार व रूपवान असूनही आपण सर्वांशी चांगले वागतो याचा तिला सार्थ अभिमान होता. आपण इतरांना ही खूप आवडतो असं तिला वाटायचं आणि ते काही अंशी खरं होतं.
पण बघता बघता चाळीशी उलटली. वय किती कां असेना आज ही आपण सुरेख दिसतो म्हणत तिनं आरशात बघितलं. अगबाई.. गाल आज काही वेगळेच दिसत आहेत आणि डोळे इतके गळून गेल्यासारखे कां दिसत आहेत ? तिने घाईने काही क्रिम विकत आणली. दोन तीन आठवडे क्रिम लावून झाली. लिंबू, हळद वगैरेचा भरपूर वापर करून घरगुती उपचार सुरू झाले. पार्लरच्या ट्रिप्स झाल्या. पण वर्षांनंतर ही उतरलेले गाल तसेच दिसत होते. दोन सुरकुत्या ठाण मांडून बसल्या होत्या ज्या जाण्याचे नावच घेत नव्हत्या. ती अस्वस्थ झाली.
अनेक बायका हल्ली Botox चे इंजेक्शन घेतात यासाठीच. आपण करून बघायला काय हरकत आहे म्हणत तिनं बोटॅाक्स हा मार्ग पत्करला. काही इंजेक्शन्स घेऊन परत एकदा पंचविशीत जाण्याचा प्रयत्न केला पण निसर्ग निष्ठूर होता. बोटॅाक्स मुळे तिचं मनमेकळं हसणंच हरवलं. चेहरा इस्त्री केल्यासारखा दिसू लागला.. ती तारूण्य जपण्यासाठी लागणाऱ्या प्रयत्नात दमून जात होती. खर्च ही प्रचंड वाढला होता. बोटॅाक्सची एक ट्रीटमेंट करून भागत नाही. दर चार महिन्यांनी ते इंजेक्शन घ्यायला लागायचं.
त्या दिवशी तिच्या ॲाफिसमधे सर्वात सिनिअर असलेल्या नलूताईं चा साठावा वाढदिवस साजरा होत होता. देवयानी नलूताईं कडे बघत होती. रूपेरी केसाचा अंबाडा, चष्मा, चेहऱ्यावरच्या सुरकुत्यात लपलेले आयुष्यातले कडू गोड अनुभव, त्यातून आलेली प्रगल्भता स्पष्ट दिसत होती. वय, वजन, आजार लपवण्याचे काहीही प्रयत्न नव्हते. दासबोध, मनाचे श्लोक यावर पाच पन्नास बायकांसमोर निरूपण करणा-या नलूताई चार चौघींपेक्षा निराळ्या होत्या.
कार्यक्रम संपल्यावर देवयानीने न राहवून विचारलं, ताई, गुडघे दुखतात कां ? त्रास होतो कां साठी आल्याचा ? नलूताई हसली देवयानी, त्रास कसला ? निसर्गाचे काही अलिखित नियम आहेत. बाल्य, तारूण्य, वार्धक्य, मृत्यु हा प्रवास कुणाला चुकलेला नाही. प्रवाहाच्या उलट्या दिशेने जाण्यातच खूप त्रास आहे.. शाळकरी नलू ते आत्ताची नलू यात फक्त बाहेरचं रूप बदललं ग.. पण आतली मी बदललेली नाही. ती मी चिरतरुण आहे, अमर आहे, आनंदी आहे. आता बाहेरच्या रूपाकडे बघत त्रास करून घ्यायचा का जे बदलत नाही ते आतलं स्वरूप शोधायचं हे आपलं आपण ठरवायचं.
आपण नक्की कोण आहेात याचा शोध घ्यायचा. नलूताई तिच्या पाठीवर हात थोपटत दोघी बाहेर पडल्या पण जिन्यावरून उतरताना त्यांच्या गुडघ्यातून कळ आली.. व तोंडून शब्द आले.. आई ग.. नंतर तोंडून आलेले पुढचे शब्द होते ..
देहेदु:ख ते सुख मानीत जावे।
विवेके सदा स्वस्वरूपी भरावे॥
देवी, आय अॅम ओके. होतं असं कधी कधी. जरा बसते दोन मिनिटे.
देवयानीला कमाल वाटली. राग नाही, त्रागा नाही, चिडचिड नाही. डोळ्याखाली काळी वर्तुळं दिसलं की मला केवढी चीड येते आणि ताईची ही प्रतिक्रिया.. लकी आहेस तू नलूताई. ती म्हणाली. कळ कमी होताच दोघी खाली आल्या.. देवी, लक आपल्या प्रयत्नाने आपण निर्माण करायचं असतं. The harder you work, the luckier you get असं असतं.. बरं.. ये उद्या निरूपणाला. आवडेल तुला उद्याचा विषय.
देवीला वाटलं इतके वर्ष नलूताई बरोबर काम केलं पण तिच्या अंतरंगात कधी डोकावून कधी बघितलं नाही. अगदी लहानशी चण असलेल्या नलूताईची अध्यात्मिक उंची कधी जाणवलीच नव्हती.
दुसरे दिवशी ती साशंकतेनच निरूपणाला गेली. तिने आजूबाजूला बघितलं. २५ ते ८० वयातील १५-२० बायका जमल्या होत्या. आयुष्य रेषेवर वेगवेगळ्या ठिकाणी उभ्या असलेल्यांचं जणू एक चित्र साकार झालं होतं. त्या आयुष्य रेषेच्या मध्यावर आपण कुठेतरी धडपडत आहोत असं तिला वाटलं. नलूताईच्या मधूर वाणीतून निरूपण सुरू झालं..
देहेरक्षणाकारणे यत्न केला।
परी शेवटी काळ घेउन गेला॥
करी रे मना भक्ति या राघवाची।
पुढे अंतरी सोडि चिंता भवाची॥
देवी भारावून ऐकत होती. देह नश्वर आहे. ययाती सारखे तारूण्याच्या मागे लागणारे कित्येक लोक आहेत. मौज मजा चैन यासाठी आयुष्य आहे अशी समजूत झाली आहे पण आपण कालचक्रातील प्रवासी आहोत.
त्या बोलत होत्या व देवीचे डोळे भरून आले होते. निरूपण संपवून बायका बाहेर पडल्यावर ताई तिला म्हणाल्या, देवी, तू कायम म्हणायचीस ना की तुला तुझ्या रूप गुणांचा तुला अजिबात अभिमान नाही. पण खरं म्हणजे तुला तुझ्या रूपाचा अभिमान आहे. ते रूप आता बदललं म्हणून तू अस्वस्थ आहेस. अग बोटॉक्सचे हजारो साईड इफेक्ट्स आहेत देवी. बाह्य रूप सजवून ही तू आतमध्ये दु:खी आहेस. याची जरूर नाही गं. तू जशी आहेस तशी परिपूर्ण आहेस.
तू जशी आहेस तशी परिपूर्ण आहेस.. हे वाक्य डोक्यात घोळवत ती घरी आली. रूप गुणांचा अभिमान सोडून दे. तोवर तू कोण आहेस ते तुला कळणार नाही म्हणणाऱ्या नलूताईंकडे दर आठवड्याला तिच्यावर ज्ञानामृताचा वर्षाव होत होता. त्या वर्षावात पोकळ अभिमानाचे एकेक पदर वितळून जात होते. मन शांत होऊ लागलं होतं. रामदास स्वामींच्या अमृत बोलाने आतला कोलाहल तळाला गेला होता. जगाचा उध्दार करणाऱ्या साठी आलेले हे महान संत महंत. त्यांच्या सान्निध्यात मन शांत होणारच.
दुसरे दिवशी सकाळी तयार होताना तिला वाटलं.. आपण हल्ली किती तजेलदार दिसत आहोत. ते सुध्दा क्रिम्स, पार्लर आणि बोटॅाक्स शिवाय. मन ताजतवानं झालं आहे. याच आतल्या परीवर्तनाची मला जास्त गरज होती.. बाहेरच्या नाही.. टीव्ही वर दिसणाऱ्या सिने तारकांचे इस्त्री केलेले चेहरे बघून तिच्या पोटात तुटलं.
तिनं फोन उचलून बोटॅाक्सची पुढची अपॅाईंटमेंट कॅन्सल केली.. आपण कोण आहेत याच्या शोधाचा एक धागा नलूताई मुळे हाती आला होता. त्याला धरून पुढची वाटचाल करायची होती. पुढच्या निरूपणाच्या श्लोकावर ताईनी विचार करायला सांगितलं होतं. तो कागद हातात घेऊन ती त्या श्लोकात बुडून गेली होती…
भये व्यापिले सर्व ब्रम्हांड आहे।
भयातीत ते संत आनंत पाहे॥
जया पाहिता द्वैत कांही दिसेना।
भयो मानसी सर्वथाही असेना॥
जय जय रघुवीर समर्थ॥
ज्योती रानडे.
हा लेख आपल्या ग्रूपच्या वाचक
सूनंदा मधूकर चितळे
पूणे ….
यांनी पाठवला