आपली आवडती लेखिका – सौ मधुर कुलकर्णी यांच्या लेखणीतून साकारलेली ★ही वाट वळणाची (3)★

युनिटी एक्स्प्रेशन ची अत्यंत प्रसिद्ध आणि आपली आवडती लेखिका – सौ मधुर कुलकर्णी यांच्या लेखणीतून साकारलेली
★ही वाट वळणाची (३)★
★श्रुती★
बसटॉपवर स्वप्ना आणि रितेश दिसले आणि त्याच्याशी काय बोलावं, सुरवात कशी करावी हेच मला सुचेनासं झालं. मी त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ तर करत नव्हते ना? पण स्वप्नासाठी माझा जीव तुटत होता. तिच्या सहवासात आल्यापासून मी तिला चांगलंच ओळखलं होतं. अतिशय साधी,सरळ,हळवी,कोणावरही पटकन विश्वास ठेवणारी होती. ऑफिसमध्ये तिला सगळे पुरूष चांगलेच वाटायचे. तिला मी समजावलं की काहीजण मतलबी,स्वार्थी असतात. वरून फक्त गोड बोलतात. आत्ता कुठे बाहेरचं जग बघायला तिने सुरवात केली होती. तिचं हे पटकन विश्वास ठेवणं, रितेशच्या बाबतीत झालंच! आणि ही अविचारी मुलगी ह्या नात्यात फार पुढे गेली होती. म्हणूनच मी घाबरले होते. मला रितेशची पूर्ण माहिती हवीच होती.
“नमस्कार, मी श्रुती!स्वप्नाची खास मैत्रीण!” मी हात जोडत रितेशशी बोलले. तो एकदम चमकला कारण त्याला हे अनपेक्षित होतं. मी त्याला काल फोन केलाच नव्हता.
“तू येताना दिसलीस तेव्हा रितेशला संगणारच होते पण मग विचार केला त्याला सरप्राईज देऊ.” स्वप्ना माझा हात धरत म्हणाली.
“रितेश,तुमची ओळख करून घ्यायची होती म्हणून मी आज स्टॉपवर आले. होप यू डोन्ट माईंड!”
“श्रुतीताई,उलट मला खूप आनंद झाला. स्वप्ना तुमचं कौतुक करताना थकत नाही.”
“आणि तुमचं सुद्धा!” मी हसत रितेशकडे बघितलं. त्याचे डोळे काहीतरी लपवताहेत हे मला पण जाणवलं पण तो खरा वाटला. स्वप्नावर निर्व्याज प्रेम करणारा!
“कुठल्या कंपनीत जॉब करता?”
स्वप्नाने मला सांगितलं होतं तरी मी विचारलंच!
“भारत ट्रेडर्स ह्या कंपनीत मी जॉब करतो.”
रितेश माझ्याशी अगदी सहज बोलत होता. त्याच्या मनात भीती किंवा अपराधीपणाची भावना असती तर तो इतक्या सहज बोलला नसता. मी उगाचच नाक खुपसत होते का? दोन प्रेमी जीवांच्या सुंदर आयुष्यात मी नको होतं यायला! पण स्वप्नासाठी मी हे सगळं करत होते.
“ताई,तुमची हरकत नसेल तर आपण कॉफी घेऊया?”
“आवडलं असतं पण ऑफिसमध्ये मी आणि स्वप्ना दोघींनीही उशीर होईल असं काही सांगितलं नाहीय. परत कधीतरी!”
“तुमच्या बॉसचं नाव कळेल?”
माझा हा प्रश्न फारच विचित्र होता पण रितेशची माहिती काढण्यासाठी काहीतरी करावंच लागणार होतं.
“मिस्टर अनिल सरदेसाई! माझ्या बॉसचं नाव!” रितेशने उत्तर दिलं आणि मी स्वप्नाकडे बघितलं. तिच्या चेहऱ्यावरची नाराजी स्पष्टपणे दिसत होती. क्षणभर वाटलं, नकोच हे पण दुसरं मन स्वप्नासाठी तळमळत होतं.
“स्वप्ना, माझी गाडी जरा लांब पार्क केलीय. मी निघते,तू ये बसने!”
**
किचनमधलं आवरून कॉटवर आडवी झाले. प्रयाग वाचत होता.
“प्रयाग,’भारत ट्रेडर्स’ ह्या कंपनीत तुझ्या ओळखीचे कुणी आहे का रे?”
“का ग? माझी शाळेतली मैत्रीण रितू आहे ना,तिचा नवरा अनिल सरदेसाई त्याच कंपनीत आहे.”
“काय सांगतोस? अनिल सरदेसाई?”
“हो पण तुला काय काम होतं?”
“माझं नाही रे,स्वप्नाचं जरा काम होतं. तिच्या मामे भावाला जॉबच मिळत नाहीय, कोणीतरी भारत ट्रेडर्समध्ये प्रयत्न करा म्हणून सांगितलं म्हणून तुला विचारलं. रितूकडून अनिल सरदेसाईंचा मोबाईल नंबर घे ना.”
“ओके,उद्या विचारतो. पण श्रुती तुला माहितीय,हे असलं फोन करून वगैरे जॉब मिळत नसतो. त्याला योग्यता लागते.”
“हो माहितीय रे,पण बोलायला काय हरकत आहे?” माझ्या मनात काय आहे हे आत्ता तरी मी प्रयागला सांगणार नव्हते. पण अनिल सरदेसाई रितेशचे बॉस होते. त्यांना त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कसं माहिती असणार? रितेश शिरूरला राहतो असं म्हणला होता. तिथलं कोणी ओळखीचं मला भेटलं तर? शिरूर छोटं गाव आहे. रितेशची माहिती मिळणं अवघड नव्हतं.
***
स्वप्ना आज पण ऑफिसमध्ये दिसली नाही. तिला फोन लावला,
“कुठे आहेस? ऑफिसला का आली नाहीस?”
“आईला जरा ताप आहे. तिला घेऊन क्लिनिकमध्ये आलेय.”
“स्वप्ना, खरं बोलते आहेस ना?
“फोटो काढून पाठवू का?”
स्वप्ना चिडली होती.
मी सखारामला बोलावलं. “सखाराम, एक कप चहा घेऊन ये.” सखाराम चार पावलं गेला नसेल तशी मी त्याला परत हाक दिली,”तू नगरचा ना रे?”
“हो मॅडम.” सखाराम उत्तरला.
“शिरूर किती लांब आहे नगरपासून?”
“जवळच आहे मॅडम,फार लांब नाही!”
“तुझ्यावर एक काम सोपवायचं आहे,करशील?”
“नक्कीच! काय काम आहे?”
“उद्या सांगते सखाराम!”
स्वप्नाला कळू न देता मला हे सगळं करायचं होतं. माझ्या मैत्रीसाठी, तिच्या भल्यासाठी,आणि तिच्या चांगल्या भविष्यासाठी…..!
***
रितूकडून प्रयागने अनिल सरदेसाईंचा नंबर तर घेतला पण मी त्यांच्याशी काय बोलणार होते? मी जे काही करणार होते,ते प्रयागला मला इतक्यात कळू द्यायचे नव्हते. पण सुरवात कुठूनतरी करावीच लागणार होती. मी सरदेसाईंना फोन लावला.
एंगेज आला. इतक्या मोठ्या पोस्टवर असलेला माणूस बिझीच असणार. करू का नको फोन? विचारणार तरी काय होते मी त्यांना? रितेशची माहिती कशी काढावी ह्याचा विचार करून डोकं गरगरायला लागलं. मी हे का आणि कशासाठी करतेय हे कोणाला कळलं तर मला कुणीही वेड्यातच काढलं असतं. सखारामला तरी मी शिरूरचा पत्ता कुठला देऊ शकले असते? रितेशने कंपनीत पुण्याचाच पत्ता दिला असेल. रितेशलाच डायरेक्ट विचारावं का? हेच ठीक होईल. आता त्यात पडलेच होते तर तर ह्याचा छडा मी लावणारच होते. रितेशलाच फोन लावला.
“रितेश,आज भेटू शकाल? बोलायचं होतं.”
“काही महत्वाचं काम आहे का?” रितेशने विचारलं
“हो,खूप महत्वाचं! आणि मी एकटी येतेय. स्वप्ना माझ्याबरोबर नसणार!”
पलीकडून काहीवेळ शांतता होती. मग रितेश बोलला,” संध्याकाळी सात वाजता चालेल?”
“चालेल, समृद्धी किचनमध्ये भेटू!”
ऑफिस सुटल्यावर डायरेक्ट रितेशला भेटायला जायचं ठरवलं.प्रयागला घरी यायला उशीर होईल म्हणून फोन केला.
सात वाजता रितेश आला. मी सरळ विषयालाच हात घातला.
“रितेश,तुमच्या आणि स्वप्नाच्या नाजूक नात्याविषयी मला सगळं कळलं आहे. स्वप्नावर लहान वयात फार मोठी जबाबदारी येऊन पडलीय. आणि स्वराबद्दल तुम्हाला कळलंच असेल. तुम्ही ह्या नात्याचा सिरिअसली विचार करावा असं मला वाटतं. दोघांनी मिळून, तुमच्या आईवडिलांची आणि स्वप्नाच्या आईची जबाबदारी घ्यावी असं मला वाटतं. मी तिची फक्त मैत्रीणच नाही तर तिची मोठी बहीण म्हणून तुम्हाला सांगतेय.”
“आम्ही अजून लग्नाचा विचार केलाच नाहीय.”
“मग करा! हे सतत भेटणं,सहवास हे काही काळ तुम्हाला रोमँटिक वाटेल मग ती तीव्रता कमी होत जाईल. विवाह हे असं बंधन आहे जिथे तडजोड असली तरी ते तुम्हाला बांधून ठेवतं. तुम्ही आता ह्याचा विचार करावा असं मला वाटतंय.”
“हाय श्रुती!”
मी वळून बघितलं. नंदिनी माझ्या जवळ येत माझ्या गळ्यात हात टाकत म्हणाली, “श्रुती,कित्ती वर्षांनी भेटते आहेस. आणि रितेशला तू कशी काय ओळखतेस?”
नंदिनी आणि मी!… दहावी ते बारावी आम्ही शेजारी राहायचो. तिच्या वडिलांची तेव्हा पुण्याला बदली झाली होती.
“ओह,हाय नंदिनी! व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज!” मी नंदिनीचा हात धरत म्हणाले. “रितेशला तू कशी ओळ्खतेस ते आधी सांग!”
“रितेश, तूच सांग की!” नंदिनी हसत रितेशला म्हणाली.
“नंदू माझी मानलेली बहीण आहे. तिचे वडील आणि माझी आई पुण्यात एका वाड्यात अनेक वर्षे भाडेकरू होते. आम्ही कधीतरी भेटतो. मी निघू का? मला एका ठिकाणी जायचं आहे.” रितेश कावराबावरा झालेला मला दिसलाच. काहीतरी नक्कीच लपवतोय हे जाणवलं. मी उचलेलं पाऊल देवालाही मान्य होतं म्हणून हे असं अचानक नंदिनीचं भेटणं,तिचं रितेशला पण ओळखणं हे सगळं घडून आलं. आता माझा मार्ग सोपा झाला होता.
“हा का असा अचानक उठून गेला? मला पण खूप दिवसांनी भेटला होता खरं तर! श्रुती,तू आम्हाला जॉईन कर ना! माझ्या मैत्रिणीचा गृप तिकडे बसलाय.आज भिशी आहे आमची!”
“नको,आत्ता नको! 984..हा माझा नंबर,मला मिस्ड कॉल दे,मी तुझा नंबर सेव्ह करते,परत भेटू! एक सांग,रितेशला किती ओळ्खतेस?”
“तू काय जासूसी करते आहेस का?” नंदिनी हसत म्हणाली.”त्याला मी पूर्ण ओळखते, व्हेरी वॉर्म पर्सन, पण कमनशिबी!”
“म्हणजे?” मी विचारलं.
“नंतर बोलू,मैत्रिणी वाट बघताहेत तिकडे,बाय, फोन कर!”
नंदिनी गेली पण मला एक हुरहूर देऊन! कमनशिबी? काय घडलं असेल असं रितेशच्या आयुष्यात?
मी मनात हात जोडले,”देवा, इथपर्यंत आणलंस,ह्यापुढचा मार्ग दाखव. स्वप्नाची एक हितचिंतक म्हणून…!
***
सकाळचा चहा झाला आणि मोबाईलची रिंग वाजली. स्वप्नाचा फोन होता,जे मला अपेक्षितच होतं.
“बोल स्वप्ना!”
“का तू आमच्या दोघांच्या मागे लागली आहेस? आमचं एकमेकांवर नितांत प्रेम आहे,शरीरापलीकडे! हे आयुष्य जगण्यासाठी पुरेसं नाहीय का? का तू त्याची माहिती काढतेय इतकी! अग लाखो प्रेमी आहेत जगात! तुझ्यासारखं असं हेरगिरी कोणी करत नाही. श्रुती,तुझे आणि माझे संबंध बिघडू नये असं वाटत असेल तर हे थांबव! काहीही झालं तरी मी रितेशला माझ्यापासून दूर करणार नाही.”
“स्वप्ना,पहिली गोष्ट…त्या लाखो प्रेमींशी मला काही देणं घेणं नाही. तुझ्याबद्दल काहीतरी आतून वाटतंय म्हणूनच हे सगळं करतेय. आणि हो,करतेय मी हेरगिरी! ती देखील तुझ्या भल्यासाठी! माझं मन मला सांगतंय,काहीतरी प्रॉब्लेम आहे स्वप्ना! तुझं चांगलं झालं तर मला आनंद नाहीय का ग?”
“तुझ्या मनात जे चाललंय ना,ते तुझ्याजवळ ठेव. आणि शेवटलं सांगते, रितेश माझ्यापासून दूर गेला तर मी आत्महत्या करेन.”
“स्वप्ना!” मी किंचाळले.
“ठीक आहे तुझी मर्जी!” मी मोबाईल बंद केला आणि घशात आवंढा आला. स्वप्नाचं ते बोलणं ऐकलं आणि मी अस्वस्थ झाले. इतक्या पराकोटीची ती रितेशमध्ये गुंतली होती. तिच्यावर जी परिस्थिती आली होती,ती निभावताना ती बंडखोर झाली होती. तिच्या वाट्याला आलेलं हे सुख तिने घट्ट धरून ठेवलं होतं. त्यात तिची तरी काय चूक होती. परिस्थितीचे सतत हादरे बसले की माणूस एका क्षणी बेडर होतो. त्याला जे हवं तेच करतो. स्वप्नाचं तेच झालं होतं. पण नंदिनीने माझ्या मनात जी शंका उठवली होती,त्याचं निरसन मला करायचंच होतं. नंदिनीला फोन करून सांगितलं की मी संध्याकाळी तिच्या घरी येतेय.
आज ऑफिसमध्ये स्वप्ना माझ्याशी एक शब्दही बोलली नाही. मी पण तिला स्पेस दिली. बोलूनही फक्त वादच होणार होते. सखाराम चहा घेऊन आला,”मॅडम,तुम्ही मला काहीतरी काम सांगणार होता ना?”
“सखाराम,सध्या नको,गरज पडली तर मी परत बोलते तुझ्याशी!”
“जी मॅडम!”
संध्याकाळी नंदिनीकडे गेले. तिने अगदी मनमोकळं स्वागत केलं. तिचे मिस्टर सरकारी नोकरीत मोठ्या हुद्द्यावर होते. एक गोड मुलगी होती…रिया!
“श्रुती, रितेशची माहिती तुला कशासाठी हवी आहे?”
“नंदिनी,उगाच नाही ते खोटं मी बोलणार नाही. माझी अगदी जवळची मैत्रीण त्याच्या प्रेमात पडलीय. प्रेमात पडणं ही काय नवीन गोष्ट आहे का? पण काहीतरी चुकीच घडतंय हे असं मला का वाटतंय?”
“काय बोलते आहेस? रितेश आणि प्रेमात? ही इज मॅरिड श्रुती! कसं शक्य आहे हे? तुझी काहीतरी गफलत झालीय. आणि रितेश खूप चांगला आहे ग,तो असं करणार नाही.”
नंदिनीचं ते वाक्य ऐकलं आणि पोटात गोळा आला. रितेशचं लग्न झालंय? का करतोय तो हे सगळं?
“नंदिनी,काय बोलतेय तू?”
“हो,रितेशचं लग्न झालंय पण लग्नानंतर एक वर्षाने त्याच्या बायकोला अर्धांगवायू झाला आणि ती बेडरीडन आहे. तिचा कमरेखालचा भाग पॅरॅलिटिक आहे. वाचा पण गेलीय. शिरूरला ती रितेशच्या आई-वडिलांजवळ राहते. तिच्या आई-वडिलांनी तिची जबाबदारी पूर्णपणे झटकली. रितेशने मोठ्या मनाने ती उचलली आहे. तो असं कसं करेल ग? माझा विश्वास बसत नाही.”
“तुझा विश्वास बसत नसला तरी हे घडलंय आणि ते दोघे खूप पुढे गेले आहेत नंदिनी! फार भयंकर आहे. काहीही झालं तरी स्वप्नाला आता ह्यातून मला बाहेर काढायलाच हवं.”
नंदिनी पुढे काय बोलत होती,माझ्या काहीही डोक्यात शिरत नव्हतं. मी घरी आले आणि रितेशला फोन लावला. तो उचलतच नव्हता. संतापाने त्याला मेसेज टाकला.
—मिस्टर रितेश, कशी आहे तुमची बायको? लग्न झालेलं असताना,एका निष्पाप मुलीला फसवताना लाज नाही वाटली तुम्हाला? तुमची मी पोलिसांकडे मी तक्रार करू शकते पण दुर्दैवाने स्वप्ना तुमच्यात खूप जास्त गुंतली आहे. तिच्यावर जर तुमचं खरंच प्रेम असेल तर ह्यानंतर तुम्ही तिला भेटणार नाही. अन्यथा,मला काहीतरी पाऊल उचलावे लागेल—-
रात्री नीट झोप लागलीच नाही. सकाळी बघितलं तर रितेशचा मेसेज होता.
—–श्रुतीताई,माफी मागतो पण माझ्या प्रेमाची विटंबना करू नका. मी चुकलोय हे मान्य करतो पण मी स्वप्नावर जीवापाड प्रेम करतो. खूप दिवस तिला लांबूनच बघत होतो पण नाही राहवलं. भावना व्यक्त कराव्या वाटल्या. कदाचित आम्ही दोघेही आसरा शोधत होतो आणि म्हणून आम्ही जवळ आलो. आम्ही जरी खूप पुढे गेलो असलो तरी मी स्वप्नाशी लग्न करेन. तिला वाऱ्यावर सोडणार नाही. फक्त टाईमपास म्हणून मी तिच्यावर प्रेम केलं नाही. मी घेईन तिची जबाबदारी! हा शब्द आहे माझा!—
रितेशचा शब्द नी शब्द खरा वाटत होता. त्याच्या दृष्टीने मी विचार करायला लागले. खरंच, असं घडू शकतं. त्याला वैवाहिक सुख काही मिळालंच नव्हतं. तारुण्य मनातल्या भावना जागवत होतं. आणि अशात त्याला स्वप्ना भेटली. नैसर्गिक होतं हे सगळं! कुठल्याही भावनेने मन व्यापलं की माणूस सारासार बुद्धी विसरतो. त्या दोघांनाही प्रेम करण्याचा हक्क होता. पण हे सफल होणं अवघड होतं. आता कुठल्याही परिस्थितीत मी रितेशला साथ देईन असं म्हणणारी स्वप्ना,सत्य परिस्थितीत टिकून राहणं फार कठीण होतं. द्विभार्या प्रतिबंधक कायदा रितेश विसरला होता का?त्याला तुरुंगवास सुद्धा होऊ शकतो,हे कसं विसरला? ह्या एका चुकीमुळे कोणीही सुखी होणार नव्हतं…ना रितेश,ना स्वप्ना……!
क्रमशः!
©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे
