राजे असेही असतात..
राजे असेही असतात….!!
१३ एप्रिलला सातारा जिल्ह्यातील नामांकित म्हणून गणल्या जाणार्या औंध संस्थानाचे पंतप्रतिनिधी भवानराव पंत प्रतिनिधी यांची पुण्यतिथी आहे. ब्रिटीशांचे राज्य आल्यावर देशातील राजेशाही नष्ट झाली असली तरी ब्रिटीशांची गरज म्हणून असेल अगर त्या त्या राजघराण्यातील लोकप्रियता म्हणून असेल काही संस्थाने स्वातंत्र्य मिळेपर्यंत आपली राजेशाही उपभोगत होते. पण आपल्या व्यक्तीगत सुखाबरोबरच ज्यांना समाजाचीही पूर्णांशाने जाणीव होती आणि राजा हा जनतेचा उपभोगशुन्यस्वामी आहे, ही कल्पना ज्यांच्या डोक्यात पक्की बसलेली होती, अशा दोन संस्थानिकांत कोल्हापूरचे छ. शाहू महाराज आणि औंधचे भवानराव पंत प्रतिनिधी यांची नावे प्राधान्याने घ्यावी लागतील. राजाने समाजाची समाजाची काळजी घ्यायची असते आणि म्हणूनच शिवरायांच्या मुद्रेवर ‘मुद्रा भद्राय राजते’ म्हणजे राज्य हे जनसामान्यांच्या भल्यासाठी असते, ही ओळ जाणीवपूर्वक नोंदली होती आणि त्यांनी आपला कारभारही त्याच पद्धतीने केला होता. आता हा इतिहास झाला असला तरी कोल्हापूरचे शाहू महाराज आणि औंधचे प्रतिनिधी हे वर्तमानाच्या अगदी अलिकडच्या काळात इतिहासात गेले असले तरी त्यांनी केलेले कार्य मात्र जनसामान्यांच्या मनात पक्के रुतलेले आहे म्हणून आजही त्यांची आठवण होत नाही असा दिवस सहजपणे उगवत नाही. शाहू महाराजांनी संस्थान सांभाळताना जनतेचीही मनापासून काळजी घेतली. अस्पृश्यता निवारणासाठी कोल्हापूरातीलच एका तत्कालिन दलिताला चहाचे दुकान उघडून देवून स्वत: सकाळी तेथे चहा घेण्याचा पायंडा पाडून त्यांनी अस्पृश्यतेची कल्पना मुळापासून उघडून काढण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबरच शेतीप्रधान संस्थानासाठी शेतकर्यांना पाणी मिळाले पाहिजे यासाठी स्वत:च्या खर्चातून राधानगरीसारख्या धरणाची उभारणी केली आणि त्याचवेळी उद्योग आणि तंत्रकौशल्याला प्रोत्साहन देवून सबंध कोल्हापूर संस्थान प्रगतीच्या मार्गावर नेवून ठेवले. आजच्या कोल्हापूराचा पाया शाहू महाराजांच्या कर्तृत्वातूनच उभा राहिला ही बाब नाकारण्याचे कारण नाही. आज पुण्यतिथी असलेले भवानराव पंतप्रतिनिधी हे धार्मिक असले तरी नशिबवादी नव्हते. माणसाच्या सामर्थ्यावर त्यांचा विश्वास होता. उद्योगाचे महत्व त्यांनीही जाणले होते आणि म्हणूनच औंध समाजात समाविष्ट असलेल्या किर्लोस्करवाडी आणि ओगले ग्लासवर्क्स या दोन उद्योगांची त्यांनी त्या काळात स्थापना केली. याच्यामागे स्वदेशी वस्तूंचा जिव्हाळा कारणीभूत होता आणि म्हणून औंध परिसरातील विणकार्यांनी विणलेल्या वस्त्राचेच कपडे ते स्वत:च्या अंगावर वापरत होते. त्याचबरोबर सुर्यनमस्कारासारख्या व्यायामप्रकाराचीही कल्पना जनसामान्यांच्या डोक्यात ठसवत होते. तुरुंगात चहा पिण्याची कल्पना त्यांना मान्य नसल्याने गुन्हेगारांसाठी स्वतंत्रपूर या नावाची वसाहत त्यांनी उभी केली आणि ‘दो आँखे बारा हात’ सारख्या’ जगप्रसिद्ध चित्रपटाची कल्पना त्यांनीच व्ही.शांताराम यांच्या डोक्यात भिनवली ही बाबही नाकारता येणार नाही. याबरोबरच साहित्य, संगीत, शिल्पकला आणि चित्रकला यांची त्यांना विशेष आवड होती आणि अशा कलाकारांचे ते आश्रयदाते होते. औंधमध्ये कलाप्रदर्शन भरवण्यापासून ते विद्यार्थ्यांसाठी जातीविरहीत वसतीगृह उभारण्याची कल्पनाही त्यांनी प्रत्यक्षात आणली होती. ग.दी.माडगूळकर आणि शंकरराव खरात यांसारखे दिग्गज व्यक्तीमत्वे त्यांच्या आश्रयातूनच उभी राहिली. हे त्यांच्या यशाचे एक उदाहरण म्हणून देता येईल. याबरोबरच जगाच्या नकाशावर ज्याचे नाव नोंदवले गेले असे औंध वस्तू कला संग्रहालयही त्यांनी त्याकाळात उभे केले. एवढेच नाही तर तेथे दिग्गज कलाकारांनी निर्मिलेल्या कलाकृती एकत्रित करुन जनसामान्यांना त्याचा आनंद घेण्याचे सुखही त्यांनी प्राप्त करुन दिले. राजे कसे असावेत याची ही अगदी अलिकडच्या काळातील दोन जिवंत उदाहरणे आहेत. अन्यथा संस्थानचे धन हे आपल्या उपयोगासाठी असून त्याचा मनमुराद वापर आपण करावा. जनसामान्यांनी रोजचा दिवस कसा काढावा हे ज्याचे त्याने ठरवावे अशी कल्पना मनात रुजलेल्या राजघराण्यांचीही कमतरता देशात नाही. पण असा खर्या अर्थाने जाणता राजा आमच्या भागाला मिळाला हे आमचे नशिबच मानावे लागेल आणि म्हणूनच त्यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांच्यापुढे नतमस्तक होताना भक्तीबरोबरच भावनांचेही उदात्तीकरण होते ही बाब नाकारता येणार नाही.
संजय कोल्हटकर