अनिलांची रुसलेली ‘प्रिया’ डॉ. गीता भागवत
अनिलांची रुसलेली ‘प्रिया’
डॉ. गीता भागवत
कवी अनिल यांच्या लेखणीतून उतरत ‘रुसवा’ या कवितेचं कुमार गंधर्वाच्या आवाजात ‘अजूनी रुसुन आहे’ हे गाणं झालं. आणि त्याचे विविध अर्थ लावले गेले. त्याचं स्वत: अनिलांनी खंडन करूनही गैरसमज पसरतच गेले. मात्र अगदी अलीकडे अनिलांच्या कुटुंबीयांच्या लक्षात आलं की त्या कवितेचा चुकीचा संदर्भ देऊन आणि बऱ्याच विपर्यस्त माहितीसह एक ‘मेसेज’ व्हॉट्सअॅपवर फिरतोय. कवितेचा रचना-काळ कुसुमावतींच्या निधनापूर्वी चौदा वर्ष अगोदरचा हे मूलभूत सत्य नजरेआड केलं गेलेलं होतंच, पण इतर तपशीलही चुकीचा, गैरसमज पसरवणारा. काय आहे, मूळ कविता आणि तिचा खरा अर्थ..
एखादी कविता त्या कवीच्या जगण्यातून आलेली असते तर ती वाचणाऱ्याला जाणवते ती त्याच्या अनुभवातून. कवी कविता करून मोकळा होतो, पण अनेक रसिक त्या कवितेचे विविध अर्थ लावत ती पुन्हा पुन्हा अनुभवतात. कवी अनिलांची ‘रुसवा’ ही कविता कुमार गंधर्वाच्या आर्जवी आणि गहिऱ्या आवाजात ‘अजूनी रुसुन आहे’ गात अवतरली आणि पुन्हा एकदा त्या कवितेला वेगवेगळे अर्थ लावले गेले.. पण एखाद्या चांगल्या कवितेचा विपर्यास केला जात असेल तर?
कवी अनिल म्हणजे गेल्या शतकात होऊन गेलेले विदर्भामधले एक नामवंत प्रतिभाशाली कवी. आत्माराम रावजी देशपांडे. त्यांच्या प्रेयसीचं नाव कुसुम. कुसुमाभोवती किंवा फुलाभोवती रुंजी घालणारा वारा म्हणजे ‘अनिल.’ म्हणून त्यांनी कवितेपुरतं ‘अनिल’ हे टोपणनाव घेतलं होतं. सुरुवातीच्या काळातल्या त्यांच्या सगळ्याच कविता ‘कुसुमप्रेरित’ होत्या. कवी अनिल आणि कुसुमावतीबाई, दोघंही शिक्षणासाठी विदर्भातून पुण्यात आलेली होती. फग्र्युसन महाविद्यालयातला कविता करणारा, वक्तृत्वात तरबेज, साहित्य, संगीत, मूर्तिकला, चित्रकला या सगळ्यात रस नि प्रावीण्य असलेला आणि मित्रांमध्ये फारच प्रिय असलेला
‘ए. आर.’ (आत्माराम रावजी ऊर्फ आप्पा) आणि त्याच महाविद्यालयातली रूपसुंदर, बुद्धिमान, शिष्यवृत्ती पटकावून आलेली कुसुम जयवंत यांचं प्रथमदर्शनीच प्रेम जुळलं.
‘ए. आर.’ ब्राह्मण समाजातला तर कुसुम चांद्रसेनीय कायस्थ प्रभू (सी. के. पी.) नि धनाढय़ कुटुंबातली. दोघांच्या आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा कडवा विरोध होता. पण त्याला न जुमानता दोघांनी जिद्दीनं लग्न केलं. ते वर्ष होतं १९२९. लग्नानंतर दोघांचंही आयुष्य लौकिक नि साहित्यिक अंगानं बहरत गेलं. आधी न्याय खात्यात मोठमोठय़ा मानाच्या पदांवर काम केल्यानंतर अनिलांची शिक्षण खात्यात समाजशिक्षणतज्ज्ञ म्हणून दिल्लीला नेमणूक झाली. कुसुमनं सुरुवातीला नागपूरला मॉरिस कॉलेजात इंग्रजीची प्राध्यापक म्हणून काम केलं आणि नंतर दिल्लीला आकाशवाणीमध्ये मुख्य निर्माता पद स्वीकारलं.
या सगळ्या काळात अनिलांच्या कवितांचे संग्रह एकापाठोपाठ एक प्रसिद्ध होत होते. त्यांच्या कवितांच्या ध्वनिमुद्रिका लोकप्रिय होत होत्या. कुसुमावतीबाईंचीही समीक्षणात्मक नि लघुनिबंधांची पुस्तकं प्रसिद्ध होत होती. रसिक आणि समीक्षकांकडूनही वाखाणली जात होती. १९५८ ला मालवण येथे झालेल्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद अनिलांनी भूषवलं. पाठोपाठ १९६१ ला ग्वाल्हेर येथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान कुसुमावतींना मिळाला. त्या संमेलनानंतर महिन्याभरातच १७ नोव्हेंबर १९६१ या दिवशी कुसुमावतीबाईंचं हृदयक्रिया बंद पडून निधन झालं. बत्तीस वर्षांच्या सुखी-आनंदी वैवाहिक जीवनानंतर अनिल एकटे पडले. अंतर्यामी खचले पण बाह्य़त: हसतमुख नि आनंदी राहिले. मुलांबाळांत-नातवंडांत रमले.
कुसुमावतींच्या निधनानंतर अकरा वर्षांनी म्हणजे १९७२ मध्ये ‘कुसुमानिल’ हे पुस्तक प्रसिद्ध झालं. त्यात अनिल नि कुसुमावती यांचा प्रणयराधनाच्या काळामधला १९२२ ते १९२७ या पाच वर्षांतला निवडक पत्रव्यवहार होता. ‘कुसुमानिल’च्या पाठोपाठच अनिलांच्या ‘रुसवा’ आणि ‘गाठ’ या दोन कवितांच्या कुमार गंधर्वाच्या आवाजातल्या ध्वनिमुद्रिका बाजारात आल्या, गानरसिकांच्या मनात जाऊन रुतल्या, अजरामर झाल्या. अनिल स्वत: तर म्हणायचे, ‘या कविता इतक्या सुंदर आहेत हे मला त्या कुमारांच्या आवाजात ऐकल्यानंतरच समजलं.’
त्या ‘रुसवा’ कवितेचे शब्द होते,
अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुलेना
मिटले तसेच ओठ की पाकळी हलेना!
समजूत मी करावी, म्हणुनीच तूं रुसावें
मी हास सांगताच रडतांही तूं हसावे
ते आज का नसावे, समजावणी पटेना
धरिला असा अबोला, की बोल बोलवेना!
की गूढ काही भाव, वरचा न हा तरंग
घेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग?
रुसवा असा कसा हा, ज्या आपुले कळेना
अजुनी रुसून आहे, खुलतां कळी खुलेना!’
कुमार गंधर्वानी गायलेल्या या कवितेचं गाणं झालं, ती ध्वनिमुद्रिका १९७३ च्या सुमारास बाजारात उपलब्ध झाली. खूप लोकप्रिय झाली आणि त्याच काळात या कवितेबद्दलची एक सुरस, हृदयस्पर्शी अशी हकिगत लोकांच्या चर्चेत आली. कुसुमावतींच्या आकस्मिक मृत्यूनंतर, त्यांच्या मृतदेहाकडे बघून, ही कविता अनिलांना सुचली असं त्या चर्चेचं सार. अनिलांचे भावविव्हळ मन:स्थितीत उमटलेले शब्द नि कुमार गंधर्वाचा आर्जवी, गहिरा आवाज यांच्या मिलाफामुळे रसिकांच्या मनाचा ठाव घेतला जात होता. ध्वनिमुद्रिका प्रचंड प्रमाणात विकली गेली. पण आपल्याला या कवितेच्या जन्मकथेचं रहस्य समजलं की, आश्चर्याचा धक्काच बसतो. कारण, ती सगळीच चर्चा बिनबुडाची होती. तसं काहीही घडलेलं नव्हतं.
कुसुमावतींचं निधन झालं दिल्लीमध्ये १७ नोव्हेंबर १९६१ ला आणि अनिलांनी आपली ही ‘रुसवा’ कविता लिहिली होती यवतमाळमध्ये ५ ऑगस्ट १९४७ या दिवशी. कुसुमावतींच्या निधनापूर्वी तब्बल चौदा वर्ष आधी. कुसुमावतींच्या निधनापूर्वी काही दिवस अगोदर प्रसिद्ध झालेल्या ‘सांगाती’ या अनिलांच्या कवितासंग्रहामध्ये ती समाविष्ट आहे. अनिल आपल्या कवितेखाली रचना-स्थळ नि तारीखही नमूद करीत असत म्हणूनच हा खुलासा आपल्याला निर्विवादपणे ठाऊक होतो. परंतु असं असलं तरीदेखील आजवर अनेकांनी, अगदी मोठमोठय़ा व्यक्तींनी, अभ्यासकांनीसुद्धा आपली खातरजमा करून न घेता बेधडक विधान केल्याचं दिसतं की अनिलांनी ही ‘रुसवा’ कविता आपल्या प्रिय पत्नीच्या मृतदेहाकडे बघून केली आहे. ध्वनिमुद्रिका लोकप्रिय झाली, एक नितांतसुंदर कविता पण तिच्या जन्मकथेबद्दलच्या विपरीत चुकीच्या समजामुळेच अधिक चर्चेत राहिली. कवी अनिलांनी जमेल तेवढं त्यांचं खंडनही केलं. शेवटी मात्र आपल्या दिलदार, खिलाडू स्वभावानुसार सगळं हसण्यावारी नेलं नि सोडून दिलं. अनिलांच्या सूनबाई आशावतीबाई सांगतात, ‘‘आप्पा म्हणायचे, ‘कशामुळे का होईना, वाचताहेत ना कविता? ऐकताहेत ना ध्वनिमुद्रिका? खूप झालं!’’
पण काहीही असो, ‘अनिलांची रुसवा ही कविता त्यांना आपल्या प्रिय पत्नीच्या मृतदेहाकडे बघून सुचली आहे’ ही अचाट कल्पना ज्याच्या कोणाच्या मेंदूतून निघाली असेल त्याच्या ‘प्रतिभे’चं (?) मात्र कौतुकच करायला हवं, इतकी ती कल्पना खरी वाटते. कारण ती कल्पना मनात ठेवून ‘अजूनी रुसुन आहे..’ ही ध्वनिमुद्रिका ऐकली की कवितेचे शब्द नि कुमारांचा आवाज यांच्या मिलाफामुळे ऐकणाऱ्याच्या मनात कालवाकालव झाल्याशिवाय राहात नाही. फुरंगटून बसलेल्या प्रियेला प्रियकरानं समजावणं वेगळं आणि मृत पत्नीच्या कलेवराकडे बघून शोकमग्न पतीनं तिला विनवणं-आळवणं वेगळं! पण दोन्ही प्रसंगांत चपखल बसतील असेच शब्द आहेत खरे त्या कवितेचे.
काहीही असो, त्या काल्पनिक जन्मकथेमुळे ध्वनिमुद्रिकेची लोकप्रियता वाढली असेल हे नक्की. असो! खरं तर कवीच्या शब्दांना मुळात अभिप्रेत नसलेला असा काल्पनिक संदर्भ चिकटवणं हा कवीचा एकप्रकारे अवमानच म्हणायला हवा पण स्वत: कवीनंच मोठय़ा मनानं त्याला माफ करून टाकल्यावर आपण रसिक बापडे काय करणार? या संदर्भात मला अनिलांचं ‘कुसुमानिल’ मधलं एक पत्र आठवतं (‘कुसुमानिल’ची नवी आवृत्ती प्रकाशित झालीय – जुलै २०१७ मध्ये.) त्यात अनिलांनी कुसुमला लिहिलंय, ‘मी माझ्या कवितांना ‘अनिलकूजन’ – रसलिंग ऑफ वाइंड’ असं का म्हणतो माहित्येय? कारण मी म्हणतो, वाऱ्याच्या शब्दासारखे माझे गाणे निर्थक आहे, जो अर्थ काढाल तो तुमचाच! ऐकणाऱ्यांनो, मला तो माहीत नाही.’ अनिलांचा हा विचार या कवितेला अगदी पूर्णार्थानं लागू होतो.
मग प्रत्यक्षात या कवितेचं जन्मरहस्य काय? खरंच का १९४७ च्या ऑगस्ट महिन्यात अनिलांची प्रिया, कुसुमावती, त्यांच्यावर रुसली होती आणि प्रियकराच्या समजावणीनंही तिचा राग-रुसवा विरघळत नव्हता? तसंदेखील काहीही नव्हतं. वस्तुस्थिती काय होती ते कळलं की आपल्याला आश्चर्याचा आणखी एक धक्का बसतो. काय झालं होतं नेमकं त्यावेळी? मनातील भावना कवितेत उतरवण्यासाठी नेमके शब्द सुचत नाहीयेत, जणू प्रतिभाशक्ती रुसून बसलीय अशा मनोवस्थेत त्या फुरंगटलेल्या प्रतिभाशक्तीला उद्देशून लिहिलेले शब्द आहेत का ते?
अनिलांच्या सूनबाई आशावतीताई यांच्याशी या संदर्भात बोलणं झालं तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘अहो, प्रतिभेला उद्देशूनच केलीय ती कविता. पण तुम्हाला वाटतंय तशी ती काव्यप्रतिभा नव्हती, आपल्या निर्णयशक्तीला, आंतरिक आवाजाला उद्देशून लिहिलीय ती कविता आप्पांनी.’’ आशावतीताईंनी नंतर सविस्तर जे सांगितलं ते सगळंच थक्क करणारं होतं. त्या काळात अनिल यवतमाळ येथे न्यायाधीश होते, न्यायदानाचं काम करीत होते. त्या कामाच्या ओघात त्यांच्यासमोर एक अतिशय गुंतागुंतीचं, चक्रावून टाकणारं अवघड प्रकरण चालू होतं. खटल्याचा निर्णय देण्यासाठी वादी-प्रतिवादींचे युक्तिवाद नि सर्व साधकबाधक मुद्दे विचारात घेऊन योग्य निवाडा करणं हे मोठं आव्हान अनिलांसमोर होतं. बुद्धी नि भावना यांचं तुंबळ युद्धच त्या काळात अनिलांच्या मनात सुरू होतं. आपली आंतरिक समज त्यांना काहीच प्रतिसाद देत नव्हती. आपला ‘आतला आवाज’ त्यांना नीट ऐकूच येत नव्हता, उमगत नव्हता. अनिल खूप अस्वस्थ होते. आपल्या निर्णयबुद्धीचा, निर्णयशक्तीचा हा रुसवा त्यांना त्रासदायक ठरत होता. त्या घालमेलीतून ही कविता जन्माला आली. कविता जन्मली आणि कविवर्य अनिलांच्या मनावरचं मोठं ओझं उतरलं. प्रश्नाची उकलही गवसली आणि अनिल आनंदित झाले.
ही सगळी जन्मकथा अनिलांच्या सूनबाई आशावतीताई यांनी स्वत: मला दूरध्वनीवरून सांगितली. त्या म्हणाल्या की, त्यांना ही सगळी हकिगत स्वत: आप्पा (कवी अनिल) आणि त्यांचे सुपुत्र शिरीष, आशावतींचे पती या दोघांनी सांगितलीय. हे सगळं समजलं तेव्हा मला मनोमन पटलं की, प्रज्ञावंताची प्रतिभा केवळ साहित्यनिर्मितीसाठीच नाही उपयोगाला येत. सारासार विवेक वापरून योग्य कृती करण्यासाठीदेखील माणसाला एक वेगळीच प्रतिभा, आंतरिक निर्णयशक्ती लागत असते. मग ते क्षेत्र न्यायदानाचं असो, वैज्ञानिक संशोधनाचं असो नाही तर अवघड प्रशासकीय निर्णयाचं असो. प्रतिभेचं हे आगळंवेगळं रूप खरोखरच दुर्मीळ नि दिपवून टाकणारं..
कुसुमावतींच्या निधनाला आता साठ वर्ष होत आली. पण अगदी अलिकडेच, अनिलांच्या ‘रुसवा’ कवितेबद्दलच्या अतिरंजित गप्पांना पुन्हा एकदा उधाण आल्याचं लक्षात आलं. अनिलांच्या कुटुंबीयांच्या लक्षात आलं की त्या कवितेचा चुकीचा संदर्भ देऊन आणि बऱ्याच विपर्यस्त माहितीसह एक मेसेज ‘व्हॉट्सअॅप’वर फिरतोय. ‘कवी अनिलांनी पत्नीच्या मृतदेहाकडे बघून ती कविता लिहिलीय’ असं तर त्यात म्हटलेलं होतंच पण आणखी तपशील देऊन म्हटलं होतं की, कुसुमावती नि अनिल हे वेगवेगळ्या धर्माचे असल्यामुळे त्यांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध होता, कुसुमावतींचं निधन झालं तेव्हा त्या घरी एकटय़ाच होत्या नि अनिलांना दार फोडून आत जावं लागलं वगैरे वगैरे.. सगळंच खोटं, विपर्यस्त! ‘कवितेचा रचना-काळ कुसुमावतींच्या निधनापूर्वी चौदा वर्ष अगोदरचा.’ हे मूलभूत सत्य नजरेआड केलं गेलेलं होतंच, पण इतर तपशीलही चुकीचा, गैरसमज पसरवणारा. दोघांचाही धर्म हिंदू होता, ते भिन्नधर्मीय नव्हते हे सर्वज्ञात सत्य लपवलेलं. त्याखेरीज त्या निधनसमयी एकटय़ा होत्या हे आणखी एक क्रूर असत्य. कवी अनिलांचे नातू उन्मेष यानं या सगळ्याचं तीव्र शब्दांत खंडन केलंय. तो म्हणतो, ‘‘निधनसमयी त्या एकटय़ा नव्हत्या, त्यांचे उल्हास आणि शिरीष हे दोघे सुपुत्र त्यांच्याजवळ होते, एवढेच नव्हे तर दिल्लीतील केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाचे डॉ. चुघ हेदेखील तिथे उपस्थित होते.
‘व्हॉट्सअॅप’वरचा तो धादांत चुकीची माहिती देणारा मेसेज नजरेस पडल्यानंतर साहजिकच अनिलांचे कुटुंबीय मुलगा, सून, नातवंडं अस्वस्थ झाले. जुन्या दु:खावरची खपली पुन्हा निघाली. अनिलांचा नातू उन्मेष यानं व्यथित मनानं उत्तरादाखल ‘व्हॉट्सअॅप’वर एक मेसेज टाकला. त्यामध्ये सर्व खरा तपशील दिला आणि शेवटी चिडून, खास नागपुरी सवयीनं हिंदीमध्ये पोटतिडीकेनं त्या खोटय़ा मेसेजबद्दल म्हटलं, ‘सो, ये सब झूट है।’ नंतर आपला फोन नंबर, पत्ता, ई-मेल देऊन ‘खऱ्या माहितीकरिता संपर्क साधा’ अशी त्यानं विनंती केली. या लेखामुळे या कवितेविषयीचा गैरसमज दूर होईल आणि ती कविता आणि कुमारजींच्या आवाजातलं गाणं रसिकोंना वेगळी अनुभूती देईल, ही आशा!
११ सप्टेंबर ही कवी अनिल यांची जयंती. त्यानिमित्ताने त्या दोघांना आदरांजली!