मंथन (विचार)

छाती फुगल्यासारखी वाटू लागली. कधी नव्हे तो आज माझाच मला अभिमान वाटत होता ! कधीनव्हे ते माझ्या डोळ्यातून आलेले अश्रू हाताने पुसत घराकडे परतलो !

बुलेट वाशिंग करावं म्हणून घरातून बाहेर पडलो ! दादाच्या पेट्रोल पंपाजवल एक वाशिंग सेंटर आहे तिथे गेलो …बरीच गर्दी होती ! नंबर लावून सौ ने दही आणायला सांगितलं होतं म्हणून दही आणण्यासाठी डेअरी कडे निघालो, सूतगिरणी चा सिग्नल ओलांडला अन एक बावळट गाडीसमोर आलं ! ‘मरायचं का रे !’ मी ओरडलो…!
समोर नाम्या होता ..! मी त्याला ओळखलं होतं पण त्याने मला कदाचित ओळखलं नाही पण मरायचं का म्हणल्यामुळे तो रागावलेला दिसत होता !
‘आरं दमानी हाक की गाडी मग !’ नाम्या
‘पांढरी झालेली वाढलेली दाढी, बसलेली गालफाडं, डोळ्याच्या खोबणीत खोल गेलेली बुबुळ, काळीशार ओठं, रंगाचे शिंतोडे उडालेली पॅन्ट, वर वर्षानुवर्षे गाठोड्यात बंदिस्त असलेल्या कपड्याची नेमकीच सुटका झालेला शर्ट ! क्षणभर त्याची अन माझी नजरानजर झाली, क्षणातच मी त्याला ओळखले होते, गाडी बाजूला घेतली. बंद केली.
आता मात्र तो घाबरला होता, त्याने मला ओळखले नव्हते, तो दुरूनच बोलला,’जावु द्या ना साहेब, गलती झाली !’ अन जवळ आला.
त्याची फिरकी घ्यावी म्हणून मी बोललो, ‘ नाम्या, मरायची घाई झाली का रे ?’
आता मात्र त्याच्या डोळ्यातली भीती गेली अन अनपेक्षितपणे कसला तरी ओळखीचा प्राणी समोर आलाय खरा पण ह्या प्राण्याला आपण कुठे, केंव्हा, कधी भेटलो असन असा भाव त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता !
‘साहेब, म्या ओळखीलं नाय तुम्हास्नी !’ नाम्या
‘साल्या, मी साहेब नाही…..! ओळख पहिले !’ गाडीवरून उतरत मी बोललो.
त्यानं डोक्यावर बराच ट्रेस दिला पण त्याचा प्रश्न काही सुटेना !
‘मायच्यान, नाय ओळीखलं सायेब !’ नाम्या म्हणाला.

नाम्या म्हणटल्यावर त्याच्या चेहऱ्यावरील हावभावावरून त्याचे नाव नाम्याच आहे याची मला खात्री झाली होती !
आता जास्त अंत न पाहता मी त्याला बोललो, ‘अरे मी तुझा क्लासमेट छोट्या !’
त्याचा चेहरा चिंताक्रांत, अभ्यासक्रमात नसलेला प्रश्न वार्षिक परिक्षेत आल्यानंतर उमटणाऱ्या प्रतिक्रियेसारखा त्याचा चेहरा झाला होता !
पण झटक्यात प्रश्नाचे उत्तर सापडावे तसा तो आनंदाने उद्गारला, ” छोट्या, तू ? मायला,आरं ओळखुच आला नाय रं !’
पटकन त्यानं पुढं होऊन आपल्या कळकट अन माझ्या इस्त्रीच्या कपड्याची तमा न बाळगता घट्ट मिठी मारली,

त्याच्या मिठीत मैत्रीचा, प्रेमाचा, जुन्या आठवणींचा अन लहानपणाचा ओलावा स्पष्ट जाणवत होता !

त्याचे डोळे पाणावले.
तब्बल वीस वर्षांनंतर आम्ही भेटलो होतो !
आज मला मनस्वी आनंद झाला होता, क्षणभरातच अनेक स्मृती वर्षानुवर्षे दबून पडलेला ज्वालामुखी फुटावा अन लाव्हारस बाहेर पडून वाट मिळेल तिकडे स्वैरभर पळावा तसे मन आठवणी घेऊन पळत होते,
माझे डोळे सुद्धा पाणावले होते.
रस्त्याने येणारे जाणारे आमचे हे मित्रप्रेमाचे मिलन पहात होते !
पण,
त्याला ,अन मला ,त्यांची अजिबात पर्वा नव्हती !

नाम्या म्हणजे शालेय जीवनातलं मी अनुभवलेलं एक जबरदस्त रांगडं व्यक्तिमत्व ! अभ्यासाकडं नेहमी दुर्लक्ष! आईच्या अन शिक्षकांच्या धाकाने आमच्या वह्या घेऊन त्याचा गृहपाठ पूर्ण व्हायचा त्यामुळं तो आमचा फॅन !!
कर्जामुळं बापानं आत्महत्या केली होती,
आईनं तळहाताच्या फोडाप्रमानं जपून याचा सांभाळ केला !
त्याच्या आईच्या हातच्या बाजरी, ज्वारीच्या भाकरी,आंब्याचं लोणचं अन ठेचा,कारळाची-जवसाची चटणी मी गृहपाठ पूर्ण करण्याच्या मोबतल्यात अनेक वेळा खाल्ली होती,
सध्या आठवलं तरी तोंडाला पाणी सुटावं अशी स्वर्गीय चव !!!

त्याच्या रांगडेपणावर एक वर्गमैत्रीण पण फिदा होती नाम्यावर !……….
पण गेले ते दिवस अन राहिल्या फक्त आठवणी !!

‘चल चहा घेऊ.’ मी म्हटले..

‘मायला ह्यो काय च्या चा टाइम हाय का ?’ नाम्या नेहमीच्या टोनिंग मध्ये बोलला.

‘मग चल काहीतरी खाऊ.’ मी म्हटले….
तसा तो खळखळून हसला, ‘पाजायची तर, काटर पाज !’
त्याच्या या बोलण्यावर कमीतकमी त्याच्यासाठी तरी माझ्याकडे काहीच ऑप्शन नव्हते !
‘चल’… मी बोललो.

अगदी दहा-पंधरा फुटाच्या अंतरावर एका नाल्यावर एक ‘देशी दारूचे दुकान’ अभिमानाने उभे होते !
त्याला पुढे बार मध्ये जाऊ म्हणटलो पण हात झटकून नकार देत तो देशी दारुच्या दुकानाकडे निघाला देखील ..!
शहरातील ५३ व्या दरवाजातून प्रवेश करावा तसा मी आत प्रवेश केला.
माझे रोजच्या प्रतिज्ञेतील काही बांधव आपली मान मुरगळून पडले होते, काही पेंगत होते तर काही तरंगत बाहेर पडत होते ! बऱ्याच दिवसापासून झाडू मारलेला नव्हता, दुर्गंधी पसरलेली अन आतच्या खोलीजवळ आलो की दारूचा उग्र दर्प सुटला होता, पण आज नाम्यामुळे सर्व सहन करणे होते !
नाम्या काउंटर वर गेला, ‘सेठ, काटर द्या !’ म्हणत माझ्याकडे पहात होता.
मी लगोलग खिशात हात घालून पाचशे ची नोट काढली अन त्याच्या जाळीच्या बंदिस्त खिडकीतून आत ढकलली.
‘सुट्टे दे रे !’ आतला मनुष्य तावाने बोलला…
‘किती ?’ मी बोललो,
‘पंचेचाळीस दे !’ तो म्हणाला,
पाचशे ची परत घेत त्याला पन्नास ची दिली.
पाच परत देण्याऐवजी त्याने एक फुटाण्याचे पाकीट फेकले, !
नाम्याने ते परत देत दोन पाणी पाऊच घेतले !
माझ्यासाठी सर्व नवीन होते ! पण त्याची जणू पीएचडी झाली असा तो वावरत होता !
त्याने समोरच्या नळावर एक पडलेला काचेचा ग्लास धुतला अन त्यात ती देशी ची क्वार्टर ओतली …! ….पूर्ण …!!!
अर्धा पाणी पाऊच दाताने फोडून ओतला अन ग्लास तोंडाला लावला !
डोळे बंद, नरड्यातला मणी खालीवर करत अर्धा ग्लास त्याने हापसला …
अर्धा रिचवल्यावर थांबला अन जवळ पडलेल्या मिठाच्या वाटीतून चिमूटभर मीठ घेऊन यज्ञात फेकावे तसे तोंडात फेकले, तोंड कसेतरी करत डोळे उघडून मला बोलला, ‘मग, काय चाललंय तुझं ? काय करतोस ?’
‘आपली नौकरी अन दुसरं काय ?’
‘बरंय मर्दा तुह्यासारखं मोहं नशीब कुठं’ नाम्या उदगरला.
‘बरं म्हातारं, म्हातारी कशी हाइत ?’ लगेच विषय बदलत तोच बोलला.
‘बरे आहेत, आता आम्ही सगळे भाऊ, आई वडील इथेच एकत्र राहतो.’ मी म्हणलो…
मान हलवत त्याने समाधान व्यक्त केले.
‘आई कशी आहे? तू इकडं कधी आला ?’ मी त्याला विचारलं.
उरलेला अर्धा ग्लास त्याने उचलला अन एका झटक्यात रिचवला, मिठाची चिमूट तोंडात टाकली अन माझ्या खांद्यावर हात टाकत,
मला बाहेर घेऊन आला.
खिशातून गायछाप काढली, डाव्या हातावर तंबाखू टाकून पुडी खिशात ठेवली,
चुना डब्बी काढली डब्बीतून अंगठ्याच्या नखाने चुना काढून तंबाखूवर लावला अन तंबाखू चोळू लागला,
तंबाखू चोळता चोळता बोलू लागला.
‘माय गेली !
आठ वरीस झालं !
लगीन झालं अन पणोती लागली,
दोन एकरात पोट कसं भरणार?
इथं साडू राहतू त्येच्या वळखीनं काम धंदा करायसाठी इथं आलो. हाताला मिळण ते काम करतु.’
‘मुलं किती आहेत ?’ मी म्हटलं,
‘मुक्ता अन सोपान दोघंच हाइत.’ नाम्या उत्साहाने बोलला ,…
‘त्यायची माय वरीस झालं, भांडण करून माहिरी गेली.’ नाम्या तंबाखू चघळत बोलला.
‘पण मर्दा, माही मुक्ता लय हुशार हाय, लय समजदार पण हाय, सगळा सैपाक करती, सोपानचं समदं आवरती, त्येचा अभ्यास घेती, अन स्वताचा अभ्यास करून वर्गात नेहमी पयली येती, लय गुणाची हाय माही मुक्ता.’ भावुक होत तो बोलत होता.!
थोडा झिंगल्यासारखा वाटत होता ! पण मुलीचं कौतुक तोंडभरून करत मात्र थकत नव्हता.
‘हाडळणीच्या पोटी जलमली माही मुक्ता पण तिची उलीशिक पण सावली पडली नाय तिच्यावर !’ नाम्या बोलला.
बायकोबद्दल भयंकर राग अन मुलीबद्दल अत्यंत कौतुक असा संगम त्याच्या बोलण्यात होता !
‘कितव्या वर्गात आहे रे ती ?’ मी बोललो.
‘नववीत हाय पण दहावीची पुस्तकं खाडखाड वाचती ती ! तिच्यासाठी म्या कायपण करणं पण तिला लय शिकवण अन मोठी सायब बनविनं !’ बोलतांना त्याचे डोळे थोडे पाणावले.
‘असं दारू पिऊन तिचं भविष्य कसं घडवशील तू ?’ मला न राहवून मी बोललो.
‘त्या अवदसामूळं लागली रं दारुची सवय !’ नाम्या सयमाने बोलला…
‘ती गेली पण तुझी सवय तशीच राहिली ना ! ती गेली ना आता तर तू पण दारू सोडून दे अन ‘मुक्ता-सोपान’ कडे लक्ष दे !
इथलं शिक्षण खूप महाग आहे रे राजा !’ मी बोललो.

तितक्यात त्याला लांबवर त्याची मुलगी शाळेतून परत येतांना चौकात दिसली, ‘मुक्ता आली शाळेतनं!’ मला ये म्हणत तो तिच्याकडे आवाज देत धावला.
मी गाडी वळवून चौक ओलांडून तिच्या जवळ गेलो. अतिशय गोड मुलगी होती.
नाम्याने ओळख करून दिली, मी तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवत तिच्या शाळेबद्दल अन अभ्यासाबद्दल चौकशी केली, बोलण्यात अगदी चुणचुणीत होती, प्रश्नांची पटापट उत्तरे देत होती अन नाम्याच्या चेहऱ्यावर त्याचे समाधान अन तिचे कौतुक दिसत होते !
गरिबी असूनही अगदी टापटीप दिसत होती,
तिच्या पाठीवर अडकवलेल्या दप्तराकडे माझे लक्ष गेले, अनेक ठिकाणी सुईदोऱ्याने शिवलेले अन झिरझिर झालेले दिसत होते, मला राहवले नाही. मी तिला चल म्हणून हाताला धरून बाजूलाच एका स्टेशनरी वर नेले, दुकानदाराला दप्तर दाखवा म्हणटले.
त्याने चार-पाच प्रकारची दप्तरे दाखवली.
एका दप्तरावर तिची नजर खिळली,
‘Sky bag’ लिहलेलं होतं त्यावर !
‘हे आवडलं का तुला ?’ मी दप्तरावर हात ठेवत तिला बोललो.
‘नाही काका, मला काही नको !’
ती नाम्याकडे बघत बोलली.
मी तिला बऱ्याच विनवण्या केल्या पण ती काही सांगेना. मी नाम्याकडे पाहिलं !
‘आपलेच काका आहेत घे !’ नाम्या म्हणाला…
मी ते दप्तर उचललं अन तिच्या हातात दिलं.
‘हे नको काका, हे खूप महाग असतं .’ मुक्ता म्हणाली..
‘असू दे गं, तुझ्या आनंदापुढं खूप स्वस्त आहे.’ ….
‘पण तुला कसं माहित कि हे महाग आहे ? मी म्हटले..

‘आमच्या वर्गात दोन तीन मुलींकडे आहेत अशा बॅग, महाग महाग म्हणून मिरवत्यात त्या !’ मुक्ता काहीश्या द्वेशाने बोलली..
‘आता उद्यापासून तू पण मिरवायचं !’ मी हसून बोललो.

सोपानसाठी अन मुक्तासाठी चॉकलेट घेऊन दुकानदाराला पैसे दिले अन मुक्ताला घरी जाण्यास सांगून मी पुन्हा नाम्याकडे मोर्चा वळवला.
‘ बघ नाम्या, तुझ्या मुक्ताला माहित होतं की ते दप्तर महाग आहे म्हणून जुनं दप्तर शिवून शिवून ती वापरत होती अन तिला मी घेऊन देत होतो तरी ती महाग आहे म्हणून नको म्हणत होती, वर्गातल्या मुली तिच्या फाटक्या दप्तराला पाहून हसत असतील पण तिने तुला कधीच काहीच सांगितलं नसेल. ती एवढी समजदार आहे की स्वतःच्या भावना मनातच दाबून आपल्या मोलमजुरी करणाऱ्या बापाला त्रास होऊ नये म्हणून आपलं मन मारते, सगळं घर सांभाळते,
अन तू असा..?
दारू सोडू शकत नाहीस तू ? दारू पिणाऱ्याला तर कारणच लागते पण तुझ्याकडे दारू सोडण्यासाठी कारण आहे, ‘मुक्ताचं भविष्य’ !!’ मी माझ्यापरीने त्याला ज्ञानबीडी पाजून मोकळा झालो.
नाम्या ढसाढसा रडत होता, मी त्याच्या पाठीवर हात ठेवला.
नाम्याला गोष्ट पटली होती अन त्याने माझ्यासमक्ष निर्धार केला की या क्षणापासून दारू सोडणार !
पण दारुड्याचं काय खरं असत, आज सोडली अन उद्या धरली !
पण बालमित्र असल्याने त्याच्यावर विश्वास टाकत मी त्याचा निरोप घेऊन निघालो.
या घटनेला तब्बल एक वर्ष उलटलं आज !

आज सकाळीच मुक्ता, त्याच चौकात एका ATM जवळ भेटली,
खूप आनंदी होती, कालच तिचा दहावीचा गणिताचा पेपर झाला होता अन ती मोठ्या आत्मविश्वासाने नव्वद टक्के पेक्षा जास्त मार्क मिळतील असे सांगत होती.
कुठेतरी जाणार होती, मैत्रिणीची वाट बघत होती.
“काका , THANK YOU बरं का !
” मुक्ता मला बोलली.

कदाचित दप्तरासाठी म्हणत असावी पण उत्सुकता असल्यानं, “कशाबद्दल गं ?” मी बोललो.
‘तुमच्यामुळं बाबांनी दारू सोडली, आता घरी लवकर येतात, आमच्याबरोबर जेवतात अन आई पण परत आली अन मला अभ्यासासाठी खूप वेळ भेटला त्यामुळं माझा खूप अभ्यास झाला !’ मुक्ताच्या
डोळ्यात खळकन पाणी आलं, एवढ्यात मुक्ताची मैत्रीण तिथे आली,तीने स्वताःला सावरत , माझा निरोप घेऊन निघाली, माझ्या ही पाण्याने भरलेल्या डोळ्यातून तिची पाठमोरी आकृती दूरवर जातांना अस्पष्ट दिसत होती,
तिचा ‘Thank You’ माझ्या हृदयावर कायमचा कोरला गेला,
छाती फुगल्यासारखी वाटू लागली.
कधी नव्हे तो आज माझाच मला अभिमान वाटत होता ! कधीनव्हे ते माझ्या डोळ्यातून आलेले अश्रू हाताने पुसत घराकडे परतलो !
आज ज्ञानबिडीतून खरोखर धूर निघाला होता ….!!!😃

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}