वैशिष्ट्यपूर्ण / फिचर

शिरापुरी ©® गीता गरुड

■■ शिरापुरी ■■
°°°°°°°°°°°°°°°°°°°°
अन्नपुर्णा उपहारगृहात नेहमीसारखीच वर्दळ चालू होती. हे उपहारगृह बसस्टँडच्या जवळ असल्याकारणाने लांबच्या पल्ल्याचे प्रवासी, बस ड्रायव्हर, कंडक्टर तसेच बाजारात घरची माळवं विकायला आलेल्या बाया, मासे विकायला आलेल्या बाया सगळ्यांचं पेटपूजेचं ते हक्काचं ठिकाण होतं.

दुकानाचे मालक रघुनाथराव यांना आतासं वयोमानापरत्वे गल्ल्यावर बसणं जमत नसल्याने एरवी फक्त मार्केटिंग सांभाळणारा व नोकरांवर जातीने लक्ष ठेवणारा त्यांचा मुलगा राजू आता गल्ल्यावर बसू लागला होता. सगळीकडे लक्ष ठेवताना त्याची दमछाक व्हायची.

रघुनाथरावही काठी टेकत टेकत दुकानातील एखाद्या खुर्चीवर येऊन पेपर वाचत बसायचे.

आजही भटारखान्यात भल्या मोठ्या कढईत तूप ओतलं होतं नं त्यात पिशवीतला रवा ओतून भल्या मोठ्या जाडजूड पितळी काविलत्याने आचारी तो रवा परतत होता. एकीकडे टोपात दूध उकळत होतं तर एका पितळी टोपात चहा उकळत होता. एक आचारी कांदाभजी तळून काढत होता.

भूक लागली नसली तरी शिरापुरी,भजी,उसळपाव,चहा अशा विविध पदार्थांच्या गंधाने प्रत्येक व्यक्तीची पावलं अन्नपुर्णा उपहारगृहाकडे आपसूक वळत होती.

गावातली बडी धेंड तिथेच बाकावर बसून नाश्ता करीत राजकारणावर चर्चा आळवीत बसायची. अगदी गल्लीपासनं ते दिल्लीपर्यंतचे विषय असायचे त्यांच्या संभाषणात. सोबतीला चहा नि गरमागरम कांदाभजी म्हणजे चर्चेचा जीव असायची. ठराविक वेळच बसायचं,खाणं झालं की उठून जायचं हा नियम नव्हता या उपहारगृहाचा. भाजीवाल्या बाया तर बाहेरच कपबशी मागवून घ्यायच्या फुर्रकन चहा पिऊन आपापल्या धंद्याकडे वळायच्या.

नऊवाजेपर्यंत शिरापुरीच्या ऑर्डरी मग उन्हं वर येऊ लागली की उसळपुरीच्या नि सोबतीला वाफाळता भात, वरण, लोणचं,पापड असा छान मेन्यू असायचा. गुरुवारी जेवणाच्या जोडीला अळूवडी, कोथिंबीरवडीही असायची.

शनिवारी गावातली बरीचजणं बाजुच्या मारुतीच्या देवळात यायची. त्यादिवशी व संकष्टी चतुर्थीदिवशी साबुदाणा खिचडी, ओल्या नारळाची चटणी, लस्सी, ताक बनवलं जायचं. ऑर्डरनुसार जायफळ लावलेली कॉफी मिळायची.

दुपारचे तीन वाजून गेले असावेत, बाजाराचा दिवस होता असल्याने बनवलेले सर्व पदार्थ जवळजवळ संपल्यात जमा होते. आचारी, वेटर यांनी आपलं जेवण वाढून घेतलं होत नि तेही गप्पा मारत जेवायला बसले होते. रघुनाथराव हलक्या चालीने काठी टेकीत टेकीत घरी जेवायला गेले. राजू मात्र तिथेच नोकरमाणसांसोबत जेवायचा.

साडेतीनाच्या सुमारास एक वयोवृध्द जोडपं हॉटेलात आलं. म्हातारी मुळची गोरीपान पण वार्धक्याने वाकली होती. गोऱ्या कपाळावर लाल कुंकवाची चिरी उठून दिसत होती. ती जांभळ्या रंगाचं नि हिरव्या किनारीचं लुगडं नेसली होती. लुगड्यावर सफेद फुलांची नक्षी होती.

घंटेला हात लावावा नं नंतरही ती बराच वेळ हलत रहावी तशी तिच्या नवऱ्याची मान हलत होती, हातही हलत होते.
सदरालेंग्यातला म्हातारा अगदी सज्जन वाटत होता. म्हातारीचं सारं लक्ष म्हाताऱ्यावर होतं.

म्हातारीने म्हाताऱ्याला पाणी पाजलं नं वेटरला साद घालू लागली तसं वेटर जेवणावरनं उठणार इतक्यात राजू स्वतः उठला. “आजये, इतक्या दोपारची खडे गेललस?” त्याने आजीला विचारलं.

तशी आजी म्हणाली,”काय सांगा पुता तुका, हयातीचो पुरावो देव्चो लागता. तेचेसाठी बेंकेत घिऊन गेललय तडेसून डाक्टराकडे.थयसर मरनाची गर्दी. कसली जुलाबाची साथ इली हा तेकारनान ह्यो मेळो भरललो हा थय. म्हनान उशीर झालो. गाडीव चुकली,कट्ट्याहारी जानारी. भुकेन कावळे आरडाक लागले पोटात म्हनान इलव. हेंका तिखटाचा जमाचा नाय. तोंड इलाहा. तू आपली शिरापुरी घेऊन ये दोन पलेटी.”

खरंतर पुऱ्या संपल्या होत्या नि शिरा तर सकाळीच संपला होता. नुकतेच येऊन बाजुच्या बाकावर बसलेल्या रघुनाथरावांनी हे संभाषण ऐकलं होतं तरी ते बाहेरच्या पिंपळाकडे एकटक पहात बसले होते.

“वायच धा पंधरा मिनटाचो टाइम दे आजये. मस्तपैकी येलची घालून शिरो करतय,” असं सांगत तो भटारखान्याकडे वळला. नोकरांचा हा खरंतर पाठ टेकायचा वेळ. पुन्हा चारनंतर ते रात्री अकरापर्यंत त्यांना कामाला उभं रहायचं होतं.

राजूने एका बाजुला मंद आचेवर रवा भाजायला घेतला. पटापटा पीठ मळलं. तो शिरा करेस्तोवर नको नको म्हणतानाही एक आचारी मदतीला आलाच. त्याने तेल तापवून पुऱ्या तळून काढल्या.

शिरापुरीच्या प्लेटी राजूने स्वतः टेबलावर मांडल्या. तसं आजीने आजोबांच्या शर्टाला नेपकीन लावला.त्यांची प्लेट आपल्याकडे सरकवून घेत ती त्यांना शिरापुरीचा घास भरवू लागली.

हॉटेलातील नोकरही ते द्रुश्य पाहू लागले. बायको ही क्षणाची पत्नी व अनंत काळाची माता असते असं मनातल्या मनात पुटपुटत रघुनाथराव समोरच्या पिंपळाच्या सळसळत्या पानांकडे पाहू लागले.

इतक्यात राजू स्वत: येऊन आजीच्या शेजारी बसला. त्याने आजोबांची प्लेट आपल्याकडे ओढून घेतली. आजी गोंधळली. पुरीचा तुकडा तोडून त्यात लुसलुशीत शिरा घेत तो आजीला म्हणाला,”आजये, तू तुझी शिरापुरी खाव्क लाग. आज्यांका मिया भरवतय.” आणि त्याने शिरापुरीचा घास आजोबांच्या तोंडाकडे न्हेला. आजोबांनीही तो आनंदाने स्वीकारला.

आजी संकोचली,”अरे पण..”

“आजये, तू येकटीच काय सगळा पुण्य लाटतलीस! आमकाव वायच सेवा करूक गावांदेत. चलात मा!”

राजूच्या बोलण्यावर आजी खुदकन हसली. तिची क्रुत्रिम दंतपक्ती छान चमकली.

रघुनाथराव लेकाच्या या उत्तराने खूष झाले. त्यांनी मग चहा मागवून घेतला व पित बसले.

संध्याकाळी रघुनाथराव जरा लवकरच घरी गेले व बायकोला घेऊन मस्तपैकी नदीकाठी फिरायला गेले. रात्री जेवणाच्या टेबलावर राजूने विचारलं,”दादा, आज लवकर परतलासा घराकडे. तब्येत बरी असा मा! काय दुखतखूपत असात तर अंगार काढू नका. दवाखान्यात जावया.”

यावर मनमोकळं हसत रघुनाथराव म्हणाले,”अरे झिला, माका काय धाड भरलीहा . आज तुया हाटलात नोकरांचो इसरांतीचो येळ लक्षात घेऊन स्वत: रवो बनवलस.

आजयेनव तुझ्या हातची गरमागरम शिरापुरी खाव्क व्हयी. शिरो न्हिवलो मगे खाण्यातली तिची मजा जातली ह्या लक्षात घेव्न तू स्वतः आज्यांका येयेक घास भरवलस, अगदी तुझ्या न्हानपनी मिया तुका भरवी तेच दिस आठावले. मन म्हनला..चला लेक नुसतोच सुंभासारो वाढलो नाय. राजू, तुया येक कर्तव्य म्हनान हाटील चालवतहस असा नाय तर गिरायकांची सोय पयली बघतस. हॉटेलमालकाचो व्यवहारिक द्रुष्टिकोन सांभाळीत असताना त्याचेवांगडाक गिरायकांवांगडा
मानुसकीचा नाताव जपतस, गिरायकांचे अडीअडचणी समजून घेतस ह्या बघान मोप बरा वाटला. आज मिया खऱ्या अर्थान सेवानिवृत्त झालय बघ.”

वडलांच्या या बोलण्यावर राजूने वाकून त्यांच्या पायांना स्पर्श केला. रघुनाथरावांनीही मायेचा, आशीर्वादाचा हात लेकाच्या पाठीवरून फिरवला.
—- ©® गीता गरुड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}