दुर्गाशक्तीमनोरंजन

कॅलेंडर —सचिन श. देशपांडे

कॅलेंडर

बर्‍याच दिवसांनी आला होता तो आज, त्याच्या आईकडे. पुण्याहून मुंबईला येणं हल्लीच्या दिवसांत, हे एखाद्या फाॅरेन कंट्रीहून येण्यासारखंच झालं होतं. पण तरीही तो आला होता… एकटाच. आतून अगदी खोलातून त्याला वाटलं होतं की, आईला ताबडतोब भेटायला हवं. मग वर्क फ्राॅम होम चं मानगुटीवरचं भुत… दोनेक दिवसांकरता उतरवून, त्याने मुंबई गाठली होती. आई अर्थातच खुश झाली होती प्रचंड, लेकाला जवळपास आठेक महिन्यांनी बघून. आणि लगोलग थोडीशी नाराजही झाली होती… सुन, नातवंडं नं आलेली पाहून. अर्थात ह्या अशा दिवसांत… लहानग्यांना घेऊन प्रवास शक्यतो टाळावाच, हे समजून घेतलं होतं आईने.

तर अशाच इकडच्या तिकडच्या गप्पा, चौकशा, हालहवाल झाल्यावर… आई उठली स्वैपाक करायला. लेकाला आवडते म्हणून… डाळींबी भिजवून अगदी स्वतः सोलून ठेवली होती तिने, तिचीच उसळ करणार होती आई आज. जोडीला अर्थातच आमरसही होता. तो मस्त पहुडला होता, बेडरुमच्या खिडकीखाली असलेल्या पलंगावर. इथे पडल्या पडल्या खिडकीतून बाहेर बघत बसणं, हा त्याचा छंद असे कोणे काळचा. त्यावेळी खिडकीतून तो दूरवरचा डोंगर दिसत असे… पण आता झालेल्या दोन – तीन बिल्डिंग्जमुळे, तो डोंगर पार अडला होता. पुर्वी सुर्योदय दिसणार्‍या ह्या खिडकीतून आता, थेट मध्यान्हीलाच त्याचं दर्शन घडत असे. आज डोक्यावरचा सुर्य पाहून हळहळला होता तो.

तेवढ्यात मस्त हापुस आंब्याचा, सुवास दरवळला घरभर… आंबे पिळायला घेतले गेले होते म्हणजे. पाठोपाठ वाजलेल्या कुकरच्या शिट्टीने, शिजलेल्या डाळींबीचा गंध घरभर पसरवला. पोळीवाल्या काकूंनी तव्यावर उपडी केलेली पोळीही मग, मागे न राहता खरपूस घमघमून गेली. पाठोपाठ ‘घर्रर्र’ करुन वाजलेल्या मिक्सरच्या भांड्याचं झाकण… आईने उघडायचीच खोटी होती की, लसूण चटणीचा चटका आसमंतात दर्वळला. तोपर्यंत गॅसवरील पातेल्यातून उकळी फुटलेली आमटीही, हळूवारपणे येऊन नाकाशी हुळहुळली. त्याच्या मनात विचार आला की… “सुख म्हणजे आणिक काय असतं?”. आणि तेवढ्यात त्याचं लक्ष गेलं, समोरच्या भिंतीवरच फडफडणार्‍या मराठी कॅलेंडरकडे. पुर्णपणे कोरं – करकरीत दिसत होतं ते. त्याच्या आईला कॅलेंडरच्या प्रत्येक तारखेवर, काही ना काही लिहायची सवय होती. त्याला आश्चर्य वाटलं की… “अरे हे असं इतकं रिकामं कसं?”.

ह्या विचारांतच त्याने उठून… ते कॅलेंडर हूकवरुन काढून हातात घेतलं, नी अगदी जानेवारीपर्यंत मागे गेला तो. पण एकाही तारखेवर, अगदी काहीही लिहिलेलं नव्हतं. तेवढ्यात त्याला दिसलं मागल्या वर्षाचं कॅलेंडरही, त्याच हूकवर टांगलेलं… ज्याच्या वरच हे नवं कॅलेंडर लावलेलं आईने. त्याने ते जुनं कॅलेंडरही काढलं, नी चाळू लागला तो. तर ते ही कोरच होतं. डिसेंबर, नोव्हेंबर, आॅक्टोबर असं एकेक महिना मागे जात जात… तो जुलैवर गेला नी थबकला. जुलै २०२० च्या १ ते १५ तारखा, आईच्या अक्षराने भरलेल्या होत्या. १ तारखेवर लिहिलेलं… ‘ह्यांची अमूक एक गोळी सुरु, पुढील दोन महिन्यांकरीता’. ४ तारखेवर लिहिलं होतं… ‘ह्यांच्यासाठी नवी छत्री नी पावसाळी बुट आणले’. ६ तारखेवर लिहिलेलं… ‘ह्यांच्यासाठी कंबरदुखीच्या डाॅक्टरची अपाॅईंटमेन्ट घेतली ९ तारखेची’. अशा त्या १ ते १५ तारखांपैकी… आठ – नऊ तारखांवर आईने लिहिलं होतं, पण फक्त त्याच्या बाबांबद्दल. त्याने मागे जात आणिक दहा – बारा तारखा चेक केल्या वेगवेगळ्या महिन्यांच्या, तर त्यांवरही बाबांबद्दलच काही ना काही लिहिलेलं दिसलं त्याला आईने. तो पुन्हा जुलै महिन्यावर आला… आणि त्याने १४ तारीख पाहिली, तर ती वर लिहिलं होतं… ‘ह्यांच्या जिभेची चव गेली आज’. लगेच त्याने १५ तारीख बघितली, जी शेवटची तारीख होती काहीतरी लिहिलेली. आणि त्यावर आईने लिहिलेलं… ‘आज ह्यांना कुठलाच वासही येईनासा झाला’.

मघापासून इतके वेगवेगळे सुगंध छातीत भरुन घेणार्‍या त्याच्या, ते वाचून छातीतच चर्रर्र झालं. पुढल्या तीनच दिवसांत… म्हणजे १८ जुलै २०२० ला, त्याचे बाबा गेले होते. आणि कॅलेंडरवरच्या १८ तारखेला होता, एक मोठ्ठा काळा टिंब… अर्थातच फुलस्टाॅप. “म्हणजे बाबा गेले त्या दिवसापासूनच, आपल्या आईचं आयुष्यही थांबलं?… तिला आता फरकच पडेनासा झालाय की, आज काय तारीख आहे?… इतकी रिकामी झालीये ती अंतरातून, ह्या कॅलेंडर्स सारखीच?” ह्या विचारांनीच गलबलून आलं त्याला. पण त्याने आईकडे मात्र, काहीच विषय काढला नाही ह्या बाबत. दुपारचं आईच्या हातचं मनसोक्त जेवण करुन, तिच्या हातून काही घास भरवून घेऊन… तो तृप्त होऊन झोपी गेला. संध्याकाळी पाचच्या सुमारास, चहाच्या आधणाच्या वासानेच त्याला जाग आली. आणि पुन्हा त्याला ती मागल्या वर्षीची… १५ जुलै तारीख आठवली, नी आठवलं आईने लिहिलेलं… ‘आज ह्यांना वासही येईनासा झाला’. त्याला पुन्हा कसंनूसं झालं, आणि तेवढ्यात त्याचं लक्ष गेलं कॅलेंडरकडे आजच्या तारखेवर.

तो चमकलाच… घाईत पलंगावरुन उतरत, तो भिंतीशी गेला. आणि त्याला दिसलं… त्याच्या आईने लिहिलेलं काहीतरी, आजच्या तारखेवर… ‘आज लेकाला हातचं करुन जेऊ घातलं… अचानक पुन्हा जगावसं वाटू लागलं’. हे वाचलं मात्र… एक हुंदका त्याला न जुमानता, जोराने बाहेर निघालाच. आजच्या तारखेवरुन हळूवार बोट फिरवत राहिला तो. तेवढ्यात आईचा आवाज आला स्वैपाकघरातून… “चहा झालाय रे… जागा झालास का?”. तो रडतच ओरडून म्हणाला… “हो… आजच, अगदी आत्ताच जागा झालोय”. उपड्या हातांनी दोन्ही डोळे पुसत उठला तो जागचा, मनोमन निर्धार करुनच की… “आता ह्यापुढे आईला आणि कॅलेंडरातील ह्या तारखांनाही, कधी एकटं पडू द्यायचं नाही”.

—सचिन श. देशपांडे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}