दुर्गाशक्तीमनोरंजन

★★सांगू कशी कुणाला★★(३) ९ भागांची सुरेख , आश्चर्यकारक आणि गुंतवून ठेवणारी कथा . ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे

★★सांगू कशी कुणाला★★(३) ९ भागांची सुरेख , आश्चर्यकारक आणि गुंतवून ठेवणारी कथा . भाग तिसरा
कथाकार ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे

★★सांगू कशी कुणाला★★(३)

पंकज….

मी सिंगापूर कॅन्सल केलंय हे सांगितल्यावर घरी जरा गहजब झाला.
ताई मला मोठ्या बहिणीच्या हक्काने चांगलीच बोलली.
“पंकज,काय हे? अरे, नवरा बायको जवळ येण्यासाठी हेच दिवस महत्वाचे असतात. नवी नवरी सासरी चार माणसात संकोचलेली असते. जरा बाहेर कुठे गेलं की एकांतात ती मनाने आपल्या जोडीदाराच्या जवळ येते. मला तुझा हा निर्णय अजिबात आवडलेला नाही. परत विचार कर.”
“ताई,तुला चांगलंच माहिती आहे,मी किती महत्वाकांक्षी आहे. बायको आयुष्यभर माझ्याच जवळ असणार आहे. पण अशी संधी मला परत मिळणार नाही.आय डोन्ट वॉन्ट टु स्पॉईल माय करिअर. ह्यावर परत चर्चा नको.”

लग्न म्हणजे ही बंधनं कशाला? मी माझ्या बायकोला पैशाने सुखात ठेवेनच की! मला ते भावनिक गुंतणं जमणार नाही. मला माझ्या सगळ्या गरजा पुरवण्यासाठी लाईफ पार्टनर हवी होती. हुशार,स्मार्ट,मॉडर्न,भरपूर कमावणाऱ्या, चिक्कार मुली माझ्या मागे होत्या पण त्यांचे इगो आणि नखरे कोण सहन करणार? रागिणी इज अ सिम्पल गर्ल. माझ्या कुठल्याही निर्णयाला ती आडकाठी करेल असं मला वाटत नाही. आईबाबा मला विरोध करणं शक्यच नाही.

आज मिटिंगमध्ये मेहरा बॉसच्या फार पुढेपुढे करत होता. मठ्ठ माणूस! कॅलीबर शून्य पण बॉससमोर सतत लाळघोटेपणा. बॉस त्याला इग्नोअरच करत होता म्हणा! माझ्या बोलण्यावर,माझ्या नॉलेजवर आज बॉस प्रचंड खुश होता. आय एम ऑन द राईट पाथ. वाट बघतोय,माझ्या टेबलवर व्हाईस प्रेसिडेंट पंकज देशपांडे कधी येतंय!

रागिणी…

पंकज असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट झाला. त्याला व्हाईस प्रेसिडेंटची अपेक्षा होती. माणूस अति महत्वाकांक्षी झाला की सगळं वेगाने मिळावं असं वाटायला लागतं. महत्वाकांक्षा साध्या, सुंदर गोष्टींचा आनंद सुद्धा घेऊ देत नाही. घरात सगळे पंकजच्या हुशारीचे कौतुक करत होते. मला देखील आनंद झालाच होता. इतक्या लहान वयात त्याने इतकी मोठी झेप घेतली होती. सासऱ्यांनी लेकाचं कौतुक करण्यासाठी किलोभर पेढे आणले. लग्नानंतर दोन महिन्यातच इतकी मोठी पोस्ट मिळाली म्हणून माझे आईवडील,सासूसासरे म्हणताहेत की रागिणीचा पायगुण चांगला आहे. लक्ष्मीच्या पावलांनी घरात आली. पण मला लक्ष्मी नाही,लंकेची पार्वती व्हायला आवडलं असतं. जिच्यावर तो भोळा सांब प्रसन्न झाला होता. तिच्या असीम प्रेमापायी स्वतःची तपश्चर्या सोडून तिच्यापुढे उभा होता. मी कुठे कमी पडतेय का?

लग्नाआधी मी नोकरी सोडली होती. पंकजला कामाचं आणि पैशाचं व्यसनच लागलं होतं. सकाळी आठ वाजता गेला की रात्री नऊ वाजता यायचा. मी फक्त बायकोची सगळी कर्तव्य करत होते. घरात एकटेपणा मला नकोसा व्हायला लागला. आई होण्याची ओढ लागली. पंकजला बोलले, “पंकज,मला आई व्हायचं आहे. माझं विश्व व्यापून टाकणारा,तुझा आणि माझा अंश मला हवा आहे.”
“नॉट नाऊ रागिणी! काही वर्ष तू ह्याचा विचारही करू नकोस. मला तुझ्याकडे लक्ष देता येणार नाही. मला आता महिन्यानंतर कदाचित यु इस ला प्रोजेक्टसाठी सहा महिने जावं लागेल. मे बी,माझा स्टे वाढू शकतो. सो प्लिज.”
माझ्या उदरात पंकजचा अंश वाढत असताना, तो इथे नसणं, शरीराने तर नाहीच पण मनाने सुद्धा हे नको वाटलं. इथेही मी हार मानली.

सुरुचीला भेटायचं ठरवलं. तिच्याशी खूप बोलावसं वाटलं. तिची नगरला बदली झाल्यामुळे माझ्या लग्नानंतर आम्ही भेटलोच नव्हतो.
“सुरू,आज भेटूया.”
“ये की मग घरी. आईला तुझ्या आवडीच्या तिखट मिठाच्या पुऱ्या करायला सांगते.”
“नको,बाहेर भेटू.डेक्कनला ये.”

सुरुचीला बघितल्यावर मला रडूच आलं. तिला माझी अवस्था कळली.
“रागिणी, खुश का नाहीस तू?”
“मलाच कळत नाहीय ग. सगळी सुखं आहेत पण मी आनंदी नाही. बंगला आहे पण घराची ओढ नाही. सगळं यंत्रवत झालं आहे. आमच्या घरी प्रत्येक गोष्टीची वेळ,मर्यादा ठरलेली असते. उधळून जगणं हा प्रकारच नाही. लग्न होऊन दोन महिने होत आले पण एकही क्षण मी स्वतःसाठी,स्वतःच्या मर्जीने जगले नाही.”
“इंटिरिअरचा कोर्स जॉईन कर. नाहीतरी तुझी इच्छा होतीच. शॉर्ट कोर्सेस असतात. मी माहिती काढून तुला सांगते. एंगेज युअरसेल्फ.”

पंकजला मी सांगितलं की मी कोर्स जॉईन करतेय. त्याने लगेच उत्तर दिलं,
“असेल ती फी भरून जॉईन कर. तू बिझी राहशील. मला सतत तुझ्याभोवती घुटमळत राहणं जमणार नाही. बी प्रॅक्टिकल.”

सुरुचीने एका इन्स्टिट्यूटची माहिती काढली. तिच्याचबरोबर मी ऍडमिशन घ्यायला गेले. इंटिरिअर,लँडस्केपिंगचा एक वर्षाच्या शॉर्ट कोर्ससाठी!

माझं जग आता मलाच तयार करायचं होतं. जिथे मी,माझा छंद, माझ्या भावना,माझी कलाकुसर आणि माझं त्यात झोकून देणं असणार होतं……

क्रमशः

★★सांगू कशी कुणाला★★(3) ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}