★★सांगू कशी कुणाला★★(४) ९ भागांची सुरेख , आश्चर्यकारक आणि गुंतवून ठेवणारी कथा . ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे
★★सांगू कशी कुणाला★★(४) ९ भागांची सुरेख , आश्चर्यकारक आणि गुंतवून ठेवणारी कथा . भाग चौथा
((२४ मे २०२४ पासून रोज unityexpression.in वर वाचा ))
कथाकार ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे
★★सांगू कशी कुणाला★★(४)
पंकज….
व्हाईस प्रेसिडेंटची अपेक्षा असताना असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट झालो. जरा नर्व्हस झालो होतो,पण ठीक आहे. माझ्या एफिशिअन्सी वर माझा विश्वास आहे. आय विल प्रुव्ह इट! यु एसचा चान्स आला ते बरेच झाले. इथे त्या मेहराचा चेहरा रोज डोक्यात जात होता. सामान्य माणसं केवळ नशिबाच्या जोरावर पुढे जातात.
यु एसला गेलो की तिथे नोकरीसाठी प्रयत्न करणार. भारतात मला परत यायचंच नाही. तिथे कामाचं चीज होतं. मुबलक पैसा मिळतो. शिवाय नातेवाईकांपासून लांब! हल्ली तो गोतावळा,त्या गप्पा सुद्धा मला नको वाटतात. तिथे फक्त मी आणि रागिणी. माझं तिथे राहायचं नक्की झालं की रागिणीला घेऊन जाईन. तोपर्यंत तिचा कोर्सही पण पूर्ण होईल.
लग्नाला इतके दिवस झाले तरीही रागिणी माझ्याशी समरस होत नाहीय. डोन्ट नो व्हाय !…..
रागिणी…
कॉलेज सोडून चार वर्ष होऊन गेली होती. आज परत त्या वातावरणात जाताना अगदी फ्रेश वाटलं. ते चैतन्य,हास्याचे धबधबे,मित्र मैत्रिणींचा घोळका! किती छान असतात ना ते दिवस! पुढच्या आयुष्यात कुठल्या समस्यांना तोंड द्यायचं आहे ह्या बाबतीत आपण पूर्ण अनभिज्ञ असतो. फक्त अभ्यास, भविष्याची स्वप्न आणि मित्र मैत्रिणींचे निर्व्याज प्रेम!
माझा शॉर्ट कोर्स होता. माझ्यापेक्षा वयाने सगळे लहानच वाटत होते. सानिकाशी माझी छान ओळख झाली. तिने नुकतंच फाईन आर्टस् केलं होतं. मला एक दिशा मिळाली होती. आता रोज कॉलेज,नोट्स काढणे,साईट्सवर जाऊन प्रत्यक्षात अनुभव घेणे,ह्या सगळ्यात मी व्यस्त झाले.
पंकजचे यु इस चे नक्की झाले. सहा महिन्यांसाठी तो जाणार होता. ते ऐकून आई जरा खजील झाली.
“नुकतंच लग्न झालं आणि नवरा इतका लांब निघाला. भारतात कुठेही असता तर तू जाऊ शकली असती. तिथे तुला नाही का ग जाता येणार?”
“आई,तो कंपनीच्या कामासाठी चालला आहे. कायमचा नाही. आणि तिथे मी जाऊन काय करू? इथला एकटेपणा तिथल्यापेक्षा बरा!”
“तरुण वयात शक्यतोवर नवऱ्याबरोबरच राहावं ग. आमची आपली जुनी मतं.”
“आई,फार विचार करू नकोस. आणि माझंही नुकतंच कॉलेज सुरू झालंय. आता मी कशी जाणार?”
आईने विषय वाढवला नाही,पण ती नाराजच होती. मी सुद्धा पंकजचं यु एसला जाणं इतकं सहज कसं काय स्वीकारलं? काहीतरी चुकतंय! एक अपराधीपणाची भावना आली. पण मग विचार केला,आता मी पंकजची बायको आहे. त्याच्यासारखं प्रॅक्टिकल होणं मला आवश्यक आहे, जे त्याला देखील अपेक्षित आहे.
पंकजची जाण्याची तयारी सुरू झाली. सहा महिन्यांसाठी जाणार म्हणून कपड्यांची खरेदी,इतर खरेदी ह्यात दिवस सरकत होते. त्याच्या जायच्या दिवशी त्याला ओवाळताना माझे डोळे वाहायला लागले.
“ओह ! कमॉन रागिणी,हसून निरोप दे.”
मी डोळ्यातलं पाणी पुसत हसले. त्याचा आणि माझा स्वभाव कुठेच जुळला नव्हता पण तो नवरा होता माझा! आमचं लग्न होऊन फक्त सहा महिने झाले होते. पण पंकजला माझी उणीव भासणार होती का?
पंकजला सोडायला आम्ही सगळेच मुंबई विमानतळावर गेलो होतो. तो आत जायला लागला आणि मला कसलीतरी हुरहूर दाटून आली.
पंकजला ओरडून सांगावंसं वाटलं,
“पंकज,मागे फिर! माझं एकटेपण मला अजूनच खायला उठेल. ह्या विरहात मी आणखीनच पोळून निघेल. पण पंकज दूर दूर चालला होता. पोटात खड्डा पडल्यासारखं झालं. एक अनावर हुंदका आला…
कॉलेज,मित्र मैत्रिणी ह्यात रमायचा प्रयत्न करत होते. दिवस जात होता पण रात्र नको वाटायची. मन अशांत झालं होतं. सुरुचीशी,सुगंधाशी फोनवर बोलून मोकळी होत होते. चित्रकलेवर लक्ष केंद्रित केलं. पेंटिंग सुरू केलं. आता मला देखील करिअरच्या दृष्टीने विचार करायला हवा होता. एकटेपण वाट्याला आलं होतं,ते मलाच निभावून न्यायचं होतं.
कॉलेजतर्फे आज आम्हाला लँडस्केपिंगचे पिक्चर्स,पेंटिंग्ज, पोर्ट्रेटस दाखवण्यासाठी एका प्रदर्शनात नेणार होते. आमच्या इंटिरिअर कोर्सचा अविभाज्य भाग! त्यातून सौंदर्यदृष्टी निर्माण होते. नवीन कल्पना सुचतात. लँडस्केप्सच्या आयडियाज मिळतात.
प्रचंड मोठं प्रदर्शन होतं. पूर्ण बघण्यासाठी दोन तास तर सहज जाणार होते. मला यायला उशीर होईल,हे मी घरी कळवून टाकलं. एक एक फ्रेम इतकी सुंदर होती की बघत रहावी अशी! एका पोर्ट्रेटपाशी मी थबकले. एका ललनेचं मंत्रमुग्ध करणारं स्केच होतं. मी टक लावून बघत होते. इतक्यात मागून कोणीतरी बोललं,
“सुंदर, ब्युटीफुल,…”
मी मागे न बघताच म्हणाले, “रिअली ब्युटीफुल.”
“मी तुम्हाला सुंदर म्हणालो.”
मी दचकून मागे बघितलं. एक स्वप्नाळू डोळ्यांचा,रेखीव चेहरा,सावळा,उंच पुरुष माझ्या मागे उभा होता. साधारण माझ्याच वयाचा असावा.
मी जरा त्वेषाने म्हणाले, “प्लिज माईंड युअर वर्ड्स.”
“नो,आय डोन्ट! मी एक कलाकार आहे. एखाद्या कलाकाराच्या निर्मितीचं मी नेहमीच कौतुक करतो. तुमच्याकडे बघून विधात्याच्या कलाकारीचे आश्चर्य वाटले. इतकं सुंदर शिल्प घडवलं आहे.”
“माफ करा. हे जरा जास्तच होतंय असं नाही का वाटत तुम्हाला?”
“नाही,आणि तुम्हाला जर ते आवडलं नसतं, तर तुम्ही इथून झटकन निघून गेला असता. पण तुम्ही इथेच आहात. कदाचित आजपर्यंत तुमच्या सौंदर्याची अशी तारीफ कोणी केली नसेल.”
“आय एम मॅरीड.”
“सो व्हॉट? एखाद्या स्त्रीच्या सौंदर्याची तारीफ करायला ती अविवाहितच हवी असं कुठे आहे?”
मी तिथून जायला निघाले,तेवढ्यात त्याने मला थांबवलं.
“एक मिनिट, हे जे पोर्ट्रेट तुम्ही बघत होता,ते मीच काढलं आहे. हे माझं कार्ड! राजस कुलकर्णी, प्रोफेशनल आर्टिस्ट. माझा मोबाईल नंबर ह्यात आहेच. कार्ड घरी जाईपर्यंत फाडु नका. कदाचित परत भेटू आपण! मला तुमचं पोर्ट्रेट काढायला आवडेल. डोळे फार आवडले तुमचे! अथांग सागर रात्री जसा गहिरा दिसतो तसेच तुमचे डोळे दिसतात. गहिरे!”
त्याच्या शब्दाने मी भारावल्या अवस्थेतच त्याच्या हातातून कार्ड घेतलं आणि धडधडत्या मनाने घरी निघाले. घरी पोहोचल्यावर रूममध्ये जाऊन आरशासमोर उभी राहिले. माझेच डोळे मी आज निरखून बघितले. त्याचे शब्द कानात घुमत होते,”सुंदर,ब्युटीफुल,गहिरे डोळे………..”
क्रमशः
★★सांगू कशी कुणाला★★(४) ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे