★★सांगू कशी कुणाला★★ (६) ९ भागांची सुरेख , आश्चर्यकारक आणि गुंतवून ठेवणारी कथा . भाग सहावा
((२४ मे २०२४ पासून रोज unityexpression.in वर वाचा ))
कथाकार ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे
★★सांगू कशी कुणाला★★ (६)
राजस…
मी आणि रागिणी एकमेकांच्या आयुष्यात येणं हे विधिलिखित आहे. काल भेट व्हावी आणि रागिणीने पुढाकार घेऊन मैत्रीचा हात पुढे करावा,हे माझ्यासाठी सरप्राईज होतं. आमच्या दोघांमध्ये पूर्वजन्मातील काहीतरी कनेक्शन असावं,त्याशिवाय इतक्या कमी वेळात आम्ही जवळ आलो नसतो. तिला एकदाच बघितलं असलं तरी तिच्या मनाच्या तळाशी बराच गाळ साठलेला असावा असं वाटतंय. मी देखील घाई करणं योग्य नाही. तिला माझ्याबद्दल विश्वास वाटायला हवा. ज्या निर्धास्तपणे तिने मैत्री केली आहे,तो विश्वास मी सार्थ ठरवायला हवा. तिला परत भेटावसं वाटतंय पण मी उतावीळ होणं योग्य नाही. माझ्या प्रोफेशनमध्ये सतत मॉडर्न, प्रसिद्धीला हपापलेल्या,नाटकी,मेकअपचे थर असलेल्या मॉडेल्सशी माझा संपर्क येतो. कधी कधी ते आभासी जग नको वाटतं, पण प्रोफेशन असल्यामुळे मला माझं शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करावाच लागतो. कधीतरी वाईट अनुभव देखील आले,पण माझ्यावर आईबाबांनी केलेले संस्कार आहेत. ह्या मोहमयी दुनियेत सुद्धा मी माझा संयम जपला आहे. चित्रकार व्हावं हे लहानपणापासूनच ध्येय होतं. माझ्या मेहनतीने मला आज थोडीफार प्रसिद्धी मिळत होती. अनेक दिवसांपासून एक भारतीय स्त्रीचे सुंदर पोर्ट्रेट काढायची इच्छा होती आणि अचानक रागिणी भेटली. एखाद्या परफ्युमच्या दुकानात आत गेल्यावर उग्र वास घेत उभं रहावं आणि इतक्यात कोणीतरी चंदनाचं अत्तर हाताला लावावं, तशी रागिणी माझ्या आयुष्यात आली आहे. पण रागिणी,तू माझ्या आयुष्यात यायला इतका उशीर का केलास? तू सतत डोळ्यासमोर येते आहेस, पण तुझ्या गळ्यातले काळे मणी मला भानावर आणतात…तू माझी होऊ शकत नाहीस…..
रागिणी….
कित्ती दिवसांनी आज सकाळ प्रसन्न वाटत होती. फ्रेश होऊन किचनमध्ये आले तर आजी म्हणाल्या,
“आज कळी फारच खुललेली दिसतेय. पंकजचा फोन येऊन गेला ना रात्री?”
आजींचं वाक्य ऐकून मी कावरीबावरी झाले. माझ्या चेहऱ्यात इतका फरक पडावा? मी झटपट आवरलं आणि कॉलेजला निघाले. आज लक्षच लागत नव्हतं. मी दोन लेक्चर्स बंक करून निघाले. मला राजसला भेटावसं वाटत होतं. मॅग्नेट सारखी मी त्याच्याकडे खेचल्या जात होते. मला तो मित्र म्हणून हवाहवासा वाटायला लागला. मी राजसला व्हाट्स अपवर मेसेज टाकला.
—राजस,आत्ता भेटू शकशील?–
पंधरा मिनिटं झाली तरी राजसचा काहीच मेसेज आला नाही. मी निराश झाले. लेक्चर्स बंक केले होते. आता घरीच जायला हवं होतं. इतक्यात सानिका येताना दिसली.
“रागिणी,उद्या दिवसभर आपण साईटवरच आहे. उद्या कॉलेजला येताना घरी सांगून ये, की परतायला रात्र होईल.”
घरी आले तर आईंनी आल्याबरोबर सांगितले, “पंकजचा फोन येऊन गेला ग. तू कॉलेजमध्ये असशील म्हणून त्याने निरोप दिला आहे. त्याला फोन कर.”
मी रूममध्ये आले. पंकजला व्हाट्स अप कॉल लावायचा म्हणून मोबाईल घेतला तर राजसचा मेसेज दिसला. मी घाईघाईने तो बघितला.
—रागिणी सॉरी, तुझा मेसेज बघितला. बिझी होतो. मिटिंग सुरू होती. एका जाहिरातीच्या कॅम्पेनसाठी मला दोन दिवसांनी दिल्लीला जावं लागेल. मी आल्यावर भेटायचं?—
—तिथून माझ्याशी बोलशील न व्हाट्स अप वर?—
—-न बोलायला काय झालं? अगदी छान गप्पा मारुया. पण तू सहजच भेटणार होतीस न? का काही काम होतं?—-
—-कामाशिवाय तू माझ्याशी बोलणार नाहीस?—-
—काहीतरी काय बोलतेस रागिणी! रिलॅक्स! केव्हाही बोल. मी कामात नसेल तर लगेच रिप्लाय देईन.—
—हं, तुझ्याशी खूप खूप बोलावसं वाटतंय. तू हिप्नॉटाईज करतोस का? मला केलं आहेस. इतक्या अल्प परिचयात मी तुझ्याशी इतकी बोलतेय. उत्सुकता वाटतेय म्हणून विचारतेय,लग्न झालंय तुझं?—-
—-नाही,शोध की तूच! तुझ्यासारखी सुंदर!—-
—नको,सौंदर्य कधी कधी शाप ठरतो. तुझं मन जिच्याशी जुळेल तिला तुझी सहचारिणी कर—
पंकजचा व्हॉइस कॉल आला म्हणून मी राजसशी बोलणं थांबवलं.
“रागिणी,तुला आईने निरोप दिला ना? मी किती वेळ झाला तुझ्या फोनची वाट बघतोय. कुठे होतीस? मला यु एस मध्ये जॉब मिळायचे खूप चान्सेस आहेत. माझे प्रयत्न चालू आहेत. एक दोन महिन्यात कळेल. फायनल झालं की तुला इकडे येता येईल. टेक केअर,बाय.”
पंकज यु एसला सेटल व्हायचा विचार करतोय? माझ्याशी ह्या विषयावर काहीच बोलला नाही. कालची रात्र शांत झोप,आनंद घेऊन आली होती. आज परत अश्रूंनी उशी ओली करायची.
त्यादिवशी पंकज यु एसला जाऊ नये म्हणून ओरडावसं वाटलं. आता तो बोलावतोय तर मला जायची इच्छा होत नाहीय. का? राजस भेटला म्हणून? आत्ता कुठे मला माझा आनंद गवसत होता. जगणं सुंदर वाटायला लागलं होतं.
मन आक्रंदून उठलं.तडजोड करण्यासाठीच मी जन्मले होते का? मला मुक्तपणे जगता येणारच नाही का? मला नाही जायचं…..
क्रमशः
©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे
★★सांगू कशी कुणाला★★(६) ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे