★★सांगू कशी कुणाला★★(९) ९ भागांची सुरेख , आश्चर्यकारक आणि गुंतवून ठेवणारी कथा . ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे
★★सांगू कशी कुणाला★★(९) ९ भागांची सुरेख , आश्चर्यकारक आणि गुंतवून ठेवणारी कथा . भाग नववा शेवटचा
((२४ मे २०२४ पासून रोज unityexpression.in वर वाचा ))
कथाकार ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे
★★सांगू कशी कुणाला★★(९)
राजस….
रागिणी घरी आली तेव्हाच तिचा चेहरा बघून मी ओळखलं की काहीतरी घडलंय, ज्याने ती डिस्टर्ब झालीय. मी तिला प्रश्न विचारताच तिने रडत मला घट्ट मिठी मारली, जे मला अगदीच अनपेक्षित होतं. ज्या उत्कटपणे ती मला बिलगली,त्यावरून तिचे माझ्याबद्दलचे फिलिंग्ज मला समजून चुकले. ज्या विश्वासाने ती मला बिलगली होती,तो विश्वास मला सार्थ ठरवायचा होता. त्या क्षणी ती उन्मळून पडली होती. तिला आधाराची गरज होती. तिला जाणीव झाल्यावर ती झटकन बाजूला झाली आणि म्हणाली, “राजस,सॉरी.”
“कशासाठी सॉरी?” मी तिला रोखून बघत म्हणालो.
“चुकलं माझं! भान राहिलं नाही.” रागिणी मान खाली करत म्हणाली.
“इट्स ओके रागिणी! एका जवळच्या मित्राला मिठी मारून रडलं तर त्यात इतकं गिल्टी का वाटतंय तुला? आपण दोघेही प्रत्यक्ष जरी कमी भेटलो असलो तरी व्हाट्स अप चॅट मुळे जवळ आलो. खूप बोललो एकमेकांशी पण स्वतःच्या मनातलं तू कधीच उघड केलं नाहीस. माझ्याकडे तुला सांगण्यासारखे काही नव्हतेच. आज तुला अशी बघितली आणि जाणवलं,तू खूप काहीतरी मनात साठवून ठेवलं आहेस. हवं तर माझ्याजवळ बोलू शकतेस.”
रागिणी अश्रू पुसतच सगळं सांगत होती. म्हणजे सुखं दाराशी असुनही रागिणी खुश नव्हती. पण केवळ नवरा व्यवहारी आहे,भावनाप्रधान नाही म्हणून पंकज वाईट कसा होऊ शकतो? त्याने कधीही रागिणीचा मानसिक किंवा शारीरिक छळ केला नव्हता. रागिणी स्वप्नाळू,हळुवार आहे. माझ्या प्रोफेशनमुळे मला बायकांची ही बाजू बरीच कळली होती. कधीतरी त्या इतक्या हळव्या होतात की टोकाचा निर्णय घेऊ शकतात. रागिणीने चुकीचा निर्णय घ्यायला नको. मला पोर्ट्रेट लवकर पूर्ण कर म्हणाली, ह्याचा अर्थ ती यु एसला जायची मानसिक तयारी करतच होती. तसंच तर ती माझ्याशी बोलली.
” रागिणी, यु एसला जायची तयारी कर.”
“राजस” रागिणीचे डोळे परत भरले.
ती माझ्यात फार गुंतली होती. तिला त्यातून बाहेर काढणं आता माझंच काम होतं. रागिणी भावनिक आंदोलनात सापडली होती पण तिचं भविष्य पंकजशी बांधलं गेलं होतं. आम्ही दोघे एकत्र येणं अशक्य होतं कारण रागिणी द्विधा मनस्थितीत होती. रागिणीला ह्यातून बाहेर पडावं लागेल. मला माहितीय, तिला खूप त्रास होणार आहे,पण तिच्यासाठी तेच योग्य आहे.
रागिणी काही न बोलता फक्त अश्रू गाळत होती.
” रागिणी,मला एका प्रश्नाचं खरं उत्तर दे. तुझ्या मनात माझ्याबद्दल काय भावना आहेत?”
रागिणीने हताश नजरेने माझ्याकडे बघितलं. “मी नाही सांगू शकत राजस! तुझा सहवास हवासा वाटतो,तुझ्याशी सतत बोलावंसं वाटतं.”
“प्रेम करतेस माझ्यावर?”
माझा हा प्रश्न ऐकून रागिणी कावरीबावरी झाली.
“रागिणी, पंकजला सोडून तू माझी झालीस तर अपराधीपणाची भावना घेऊन तू जगशील. मला तर सुख मिळणार नाहीच पण तुझं काय? तू अजूनही पंकजचाच विचार करते आहेस. ह्यातून शक्य तितक्या लवकर बाहेर पड.”
“राजस, मला नाही विसरायचं तुला! मला तुझ्याशी बोलताना खूप आनंद मिळतो,तो हिरावून घेऊ नकोस. माझ्यापासून दूर जाऊ नकोस.” रागिणीचे हुंदके ऐकून त्या क्षणी वाटलं,जग एकीकडे आणि मी आणि रागिणी एकीकडे,असं व्हावं पण ते इतकं सोपं नव्हतं. आमचं नातं एका विचित्र परिस्थितीत अडकलं होतं. काहीतरी मनाशी निर्णय घेऊन मी रागिणीला म्हणालो,” रागिणी, उरलेलं पोर्ट्रेट मी पूर्ण करेन. आता तू नाही आलीस तरी चालेल.” माझा घशातला आवंढा मी गिळला. “चल,तुला घरी सोडतो. आता तुझी मनस्थिती ठीक नाही.”
गाडीत रागिणी एकही शब्द बोलली नाही. गाडीच्या सीटवर मान टाकून अखंड रडत होती. ती गाडीतून उतरताना मी तिच्यापुढे माझा हात केला आणि म्हणालो,”मला प्रॉमिस कर की तू मला विसरशील.”
लालबुंद सुजलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे बघत रागिणी म्हणाली, “प्रॉमिस नाही करत! प्रयत्न जरूर करेन.” ती मागे न बघता चालायला लागली.
पुरुषांनी रडायचं नसतं म्हणतात,पण आज रागिणीसाठी रडलो. आतून काहीतरी तुटल्यासारखं वाटलं. मला कितीही त्रास झाला तरी मलाच कठोर होऊन रागिणीला ह्यातून बाहेर काढायचं होतं…..
रागिणी…..
आज राजसकडे माझा बांध फुटला. मी स्वतःवर ताबा ठेवू शकले नाही. मी सतत राजसचा विचार करते पण तो माझा करतो का? का फक्त एक मैत्रीण म्हणून माझ्याकडे बघतो? मी राजसशी फोनवर रोज चॅटिंग करते पण मला असं कधीच जाणवलं नाही की तो माझ्यावर प्रेम करतो. मी मात्र चार दिवस तो बोलला नाही की अस्वस्थ होते. प्रेम करतेय का मी राजसवर? विचारांनी डोकं सुन्न झालंय. आज राजसने मी त्याला विसरावं म्हणून मला प्रॉमिस मागितलं पण मी नाही दिलं. मला राजसला विसरायचं नाहीय. माझ्या आयुष्यात येऊन त्याने मला खूप आनंद दिला आहे. तो मला जपायचा आहे. ह्यापुढे तो कदाचित माझ्याशी बोलणार देखील नाही. पण माझ्या मनात राजस सतत राहील. त्याच्याबरोबरचं माझं नातं खूप सुंदर,पवित्र आहे,अगदी राधाकृष्णासारखं! काहीतरी दैवी!
*
पंकज यु एसवरून आला होता. दोघांमधला दुरावा त्याने त्याच्या पद्धतीने संपवला पण मी कोरडी,शुष्क होते. तो आहे म्हणून कॉलेजला पण जात नव्हते. तसंही आता कॉलेजमध्ये जाऊन उपयोग काय होता? शिक्षण अर्धवट सोडून मला बायकोचं कर्तव्य करायचं होतं.
पंकज आणि मी बाहेर निघणार इतक्यात दारावरची बेल वाजली. मी दार उघडलं तर समोर राजस! माझ्या चेहऱ्यावरचे भाव सर्रकन बदलले. माझे डोळे आनंदाने भरून आले.
“कोण आहे रागिणी?”
पंकजला दिसू नये म्हणून मी पटकन डोळे पुसले. राजसला आत घेतलं.
राजसने माझं पोर्ट्रेट आणलं होतं. मी नंतर सिटिंगला गेलेच नव्हते. त्याने कल्पनेने ते चितारलं होतं.
“हॅलो सर, मी राजस कुलकर्णी. माझी आणि रागिणीची एका प्रदर्शनात भेट झाली होती. आय एम अन आर्टिस्ट बाय प्रोफेशन. मला रागिणीचं पोर्ट्रेट काढायची इच्छा होती. त्यांनी परमिशन दिली. काल हे पोर्ट्रेट पूर्ण झालं म्हणून मी द्यायला आलो आहे.”
मी ते पोर्ट्रेट बघितलं. हुबेहूब रेखाटलं होतं. माझ्या चेहऱ्यावरचे त्या दिवशीचे व्याकुळ भाव राजसने अप्रतिम चितारले होते.
पंकजने ते पोर्ट्रेट हातात घेतलं.
“बट व्हाय इज रागिणी लुकिंग सो सॅड?”
“सर,कदाचित त्या दिवशी रागिणी अस्वस्थ, डिस्टर्ब असेल म्हणून असे भाव होते.” राजस माझ्याकडे बघत म्हणाला.
“ओह! बी हॅपी रागिणी. आता यु एसला तुला कशाचीच कमी नसणार. पैसाच पैसा!”
मी राजसकडे बघितलं. त्याला माझं दुःख काय ते कळलं.
“येतो मी सर. आय विश यु द बेस्ट इन लाईफ.”
राजस अजिबात थांबला नाही. लगेच निघून गेला.
*
रात्री व्हाट्स अपवर त्याचा मेसेज आला.
—रागिणी,तुझ्या नैराश्याचं कारण कळलं. पण ह्यातून तुलाच मार्ग काढायचा आहे—
—हो,मी मार्ग काढायचं ठरवलं आहे राजस. तुझ्याकडे फक्त एकच मागणं आहे—
—काय?—
—मला तोडू नकोस. नको बोलुस सतत माझ्याशी पण माझ्या मनाला हा दिलासा असू दे की तू माझ्यासाठी आहेस. उद्या तुझं लग्न होईल,तू संसार,मुलांमध्ये रमशील पण तुझ्या मनातला एक कोपरा माझ्यासाठी ठेव. मला तेवढंच पुरेसं आहे—
डोळ्यातून पाणी वाहायला लागलं. पंकजची हाक आली तशी मी उठले…
रागिणी…..
पंकजला यु एसला जाऊन दोन महिने होऊन गेले होते. माझंही जाणं ठरलं होतं. तिकीट बुक झालं होतं. आठ दिवसांनी निघणार होते.
ह्या दोन महिन्यात राजस माझ्याशी एकदाही बोलला नव्हता. मी यु एसला जायची तारीख त्याला कळवली.
—-राजस,मी …दिवशी… च्या फ्लाईटने मुंबईहून निघणार आहे. तू मला सहज दूर केलंस. ह्या दोन महिन्यात माझ्याशी एकदाही तुला बोलावसं वाटलं नाही. इतका कठोर तू कसा काय होऊ शकतोस? मला यु एसला गेल्यावर तुझी सतत आठवण येईल. प्लिज माझ्याशी बोलत जा,नाहीतर मी एकटी पडेन. तू तुझी काळजी घे. बाय—-
राजसने मला काहीच रिप्लाय दिला नाही. मी समजून चुकले.
*
एअरपोर्टवर सोडायला सासू-सासरे आणि आई-बाबा आले होते. आईच्या डोळ्यातलं पाणी जणू थांबतच नव्हतं. माझे डोळे मात्र कोरडेच झाले होते. पंकजला मी फक्त लाईफ पार्टनर म्हणून हवे होते आणि राजसने मला प्रेमाची भाषा शिकवली पण तो जाणूनबुजून माझ्यापासून दूर झाला होता. मला रडायलाच येत नव्हतं. जे पुढ्यात येईल ते स्वीकारायचं ह्याच तयारीने निघाले होते.
माझी जायची वेळ झाली. आईचा हात हातात घेतला. ती मला जवळ घेऊन रडायला लागली. मी तिच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि…आणि मागे लांब राजस उभा असलेला दिसला. इतका वेळ माझे कोरडे असलेले डोळे क्षणात अनावर होऊन वाहू लागले. मी मनसोक्त रडत होते. राजसने त्याचा हात ओठाजवळ नेऊन, मला खुणेने सांगितलं, “हसून दाखव.” त्याही परिस्थितीत मी त्याच्याकडे बघून नकळत हसले. राजस माझ्यासाठी आला होता. बस! ह्या एका प्रसंगावर मी माझं अख्ख आयुष्य काढायला तयार होते. मनात देवाला विनवणी केली,पुढच्या जन्मी माझी आणि राजसची ताटातूट करू नकोस. पुढचा जन्म? हो! ही प्रीत अधुरी राहिली होती.
पासपोर्ट दाखवत मी आत निघाले. वळून बघितलं, सासू-सासरे,
आई-बाबांना हात हलवून निरोप दिला. आणि राजसला…त्याला भरल्या डोळ्यांनी निरोप दिला.
मी यु एसला निघाले होते. पंकजसह संसार करण्यासाठी, त्याला सुख देण्यासाठी! पण मनात राजससाठी एक हळवा कोपरा घेऊनच!……
आणि आज हे मी माझ्या मनाला सांगितलं…..
★समाप्त★
©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे