वाईची कृष्णा खास आहे © लौकिका रास्ते
वाईची कृष्णा खास आहे कारण इथे नदीला माणसांचा आणि माणसाला नदीचा लळा आहे. माणसं नदीशी बोलतात, सुख दुख: सांगतात. नदीवर अपार माया करतात. तिच्यापाशी हट्ट सुद्धा करतात. पावसाळ्यात गावात आली तर माहेराला लेक आली म्हणून तिची साडीचोळी देऊन ओटी भरतात. स्वराज्यावरचं संकट टळू दे आणि माझा शिवबा सुखरूप परत येऊ दे हे साकडं, हा हट्ट गणपती, शंकर, दुर्गा, अशा हमखास नवसाला पावणाऱ्या नेहमीच्या देवदेवतांपाशी करायचा सोडून वाईकरांना कृष्णाबाईपाशी करावासा वाटला ही एकच गोष्ट वाईकरांच्या मनातलं कृष्णेचं स्थान किती उच्च आहे हे दाखवून द्यायला पुरेशी आहे.
वासुदेवानंद सरस्वतींनी कृष्णा लहरी ग्रंथात वाई हे कृष्णेचं मुख नरसोबाची वाडी हे कृष्णेचं हृदयस्थान, कुरुंगडडी म्हणजे कुरवपूर कृष्णेचं नाभिस्थान, आणि समुद्र संगमाला दोन वेगवेगळ्या प्रवाहांनी ती समुद्रात विलीन होते म्हणून ते स्थान तिचे चरण अशी कल्पना केली आहे.
स्कंद पुराणातल्या, सह्याद्री खंडात कृष्णेचं महात्म्य वर्णन करणारे 60 अध्याय आहेत, पैकी पहिल्या 15 अध्यायांमध्ये क्षेत्र महाबळेश्वरपासून भुईंजपर्यंतच्या तीर्थांची माहिती आहे. वाईतल्या प्रत्येक शिव मंदिराच्या तीर्थाचे महत्त्व यामध्ये आहे. या ग्रंथातली कृष्णेच्या उत्पत्तीची कथा, ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेवरून भगवान विष्णूंनी आपल्या हृदयापासून कृष्णा निर्माण केल्याचं सांगते. अशी ही विष्णुकन्या कृष्णा, गंगेसारखी विष्णू पद पावना नाही तर साक्षात विष्णु स्वरूपिणी आहे. विष्णूपुत्री, आणि सह्याद्रीत उगम पावली म्हणून सह्यजा.
म्हणूनच मूर्ती रुपात जेंव्हा कृष्णा साकार होते ती कशी? बरोब्बर! अगदी विष्णुसारखी. शंख, चक्र, गदा, पदम हातात घेतलेली, चतुर्भुज, मेघवर्णा, अतिलावंण्यवती, गळ्यात वैजयंती माळा, पितांबर नेसलेली like father like daughter. गरूडवाहना. पण एक गोष्ट विष्णूने लेकीला जाणीवपुर्वक दिलेली नाही ती गोष्ट म्हणजे उरीचे श्रीवत्सलांछन. दूर्वासांच्या संतापाचं प्रतीक!
बाप आपल्या लेकीला नाव देतो, त्या नावाला मानाचं, प्रतिष्ठेचं वलय देतो, आयुष्यभर ते वलय जपण्याचा, वाढवण्याचा प्रयत्न करतो, उत्तमोत्तम संस्कार देतो, कष्टांनी कमावलेली संपत्ती लेकी सुनांच्या अंगावर अलंकारांच्या रूपाने रुळताना बघितली की त्याला केलेले कष्ट सार्थकी लागल्यासारखे वाटतात. तो एकच गोष्ट आपल्या लेकींना देत नाही, किंबहूना दाखवतही नाही ती म्हणजे त्याच्या वाट्याला आलेलं दुःख, उपेक्षा, अवहेलना. एकवेळ याचा उल्लेख बाप मुलासमोर करेल, पण लेकीपुढे मुळीच नाही. मग जगाचा बाप रखुमादेवीवर त्याला अपवाद कसा असेल! …आणि म्हणूनच कृष्णेला श्रीवत्सलांछन नाही!
अशा कितीतरी छान माहितीपूर्ण गोष्टी निरनिराळ्या पुस्तकातून उलगडत आहेत, काही प्रत्यक्ष पाहताना नव्याने समजायला लागल्या आहेत, कृष्णा जाणून घ्यायचा प्रवास आत्ता कुठे सुरू झाला आहे. आतापर्यंत जितकं फिरले त्यातून जे कृष्णेचं दर्शन झालं ते मांडण्याचा प्रयत्न करते आहे.
क्षेत्र महाबळेश्वरच्या पठारावर पंचगंगा मंदिर आहेच पण पठाराच्या टोकावर कृष्णेचं स्वतंत्र देऊळ आहे. या नद्यांच्या देवळांची खास गंमत आहे. इथे गाभाऱ्यातल्या मूर्तीपेक्षा गोमुखातलं पाणी पडणाऱ्या कुंडाचं महत्व अधिक! कृष्णाबाई मंदिराच्या मुख्य देवळासमोर एक कुंड आहे. कृष्णा त्या कुंडात गुप्त होते आणि काही वेळ भूगर्भातून प्रवास करत वाईच्या आग्नेय दिशेला जमिनीवर प्रकट होते.
या प्रवासात धोमच्या थोडं अलीकडे कृष्णेला ‘कमंडली’ भेटते . भीमा, पंचगंगा, कोयना, तुंगभद्रा सारख्या मोठमोठ्या नद्या, स्वतःला कृष्णेत समर्पित करतात पण कृष्णेची उपनदी होण्याचा पहिला मान मात्र या कमंडलीचा.नदी किती छान असावी याचं कमंडली हे वाईच्या पंचक्रोशीतलं उत्तम उदाहरण आहे. माणसांच्या जंगलासून थोडं दूर प्राण्यापक्षांसाठी, खऱ्याखुऱ्या झाडांच्या जंगलासाठी, रानफुलांसाठी वाहणाऱ्या या कमंडलीने नदीच्या निर्मलतेची, शुद्धतेची पावित्र्याची व्याख्या मला उलगडून दाखवली. आयुष्यात पहिल्यांदा नदीच्या काठाला तोंड लावून पोटभर पाणी प्यायले. धोम धरण बांधल्यानंतर नेमक स्थान कळत नाही पण धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कुठेतरी ती कृष्णेला मिळते. नुकत्याच जन्मलेल्या बाळाला हात लावताना जे मनात वाटतं, तसं काहीसं कमंडलीला स्पर्श करताना वाटतं, एकाच वेळी अतीव माया आणि अतीव काळजी! याच भागात कमंडली पासून थोड्या अंतरावरून वाहणाऱ्या नवजात कृष्णेबद्दलही तसंच वाटत राहतं. पुढे जाऊन हिचं कसं होणार असा टिपिकल बायकी विचार मनात येतो. थोड्याच अंतरावर ही काळजी खरी ठरते! असो.
पुढचं महत्त्वाचं स्थान म्हणजे धोम. धोमला काय नाही, इतिहासाच्या प्रत्येक काल खंडातल्या पाऊल खुणा या क्षेत्रावर उमटलेल्या आहेत. कृष्णाकाठ जसा दत्ताला प्रिय तसाच नरसिंहालाही प्रिय आहे. कृष्णेच्या काठावर जशी अनेक महत्त्वाची दत्त स्थाने आहेत तशीच नरसिंहांची महत्त्वाची स्थानंही कृष्णेच्या काठावर आहेत. त्यातलं पहिलं महत्त्वाचं स्थान, धोमचं नरसिंह मंदिर. त्याला नुसतं नरसिंह मंदिर कसं म्हणू? इथे स्थापन केलेली प्रत्येक देवता विशेष आहे. हिंदू धर्मांतल्या निरानराळ्या धर्मसंकल्पनांचा, आख्यायिकांचा, उपासना पंथांचा ठसा या परिसरावर उमटलेला दिसतो. इथे काय नाही, कन्यागताच्या पर्व काळात या संगम तीर्थावर स्नान करण्याचं विशेष महत्त्व आहे. तीर्थापासून दगडी पायवाटेने मंदिराकडे जाताना सहा मुखं असलेली देवीची(गायत्री?) मूर्ती आहे. देवळात भल्याथोरल्या दगडी खांबांत स्थापन केलेला नरसिंह आहे, त्याच्या समोर शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेली कमळाच्या आकाराची पुष्करणी, त्याच्या मध्यभागी कासावाने पाठीवर तोललेला नंदी मंडप. पुढे धोमेश्वर, सिद्धेश्वर शंकर आहे. सिद्धेश्वराच्या खाली धौम्य ऋषींची समाधी आहे. महाभारताच्या आदीपर्वात या धौम्य ऋषी आणि त्यांच्या 3 शिष्याची गोष्ट येते. या तीनही शिष्याची त्यांनी आधी कठोर परीक्षा घेतली आणि मगच त्यांना ज्ञान दिलं. पैकी अरुणीची गोष्ट तर माहितीच आहे. धो धो पाऊस कोसळत असताना शेतात पाणी शिरू नये म्हणून शेताभोवती बांध घालून पाणी आडवायचं काम त्याला दिलं. कसंही करून गुरूंनी सांगितलेलं काम व्यवस्थित झालंच पाहिजे या प्रयत्नात एका बाजूचा बांध जमला नाही म्हणून त्या बांधाच्या जागी अरुणी स्वतःच आडवा झाला, आणि रात्रभर तसंच आडवं पडून राहत महत्प्रयासाने त्याने पाण्याचा प्रवाह थोपवून धरला. रात्रभर शिष्य घरी आला नाही म्हणून व्याकूळ होऊन त्याच्या शोधात बाहेर पडलेले ध्ौम्य ऋषी हे दृश्य बघून हेलावून गेले. प्रसन्न झालेल्या गुरूने आपल्याकडची सगळी ज्ञानसंपदा या शिष्योत्तमाकडे सूपूर्त केली. अशा गुरूच्या समाधीपाशी स्थानांजवळ कृष्णेवरचं पहिलं धरण बांधलं जावं हा योगायोग विलक्षण आहे. हे धरण मला अरुणीचं प्रतीक वाटतं. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला नाथ संप्रदायचा मठ आहे. मंदिराच्या आवारातलं पंचमुख शिल्प (सदाशिव?), भग्नावस्थेतले वीरगळ,या आवारात मुख्य मंदिराच्या भोवताली इतर चार देवळं आहेत, इथे महिषासूरमर्दिनी तर आहेच शिवाय मुख्य देवळाकडे तोंड करून उभं राहिलं की उजव्या हाताला असलेल्या छोट्या देवळात आणखी एक पार्वतीची अष्टभुजा मूर्ती आहे, जी जास्त खास आहे. ही मूर्ती किती वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होते. अष्टभुजा पार्वती उभी आहे, सगळ्यात पुढच्या दोन हातांमध्ये उजवीकडे बाल गणेश आणि डावीकडे छोटासा षडानन कार्तिकेय दोघांच्या बाजूला ध्वज घेऊन चालणारे शृंगी भृंगी (?) या सगळ्यांच्या पुढे दोन बाजूला सिंह. मध्यभागी असलेली पार्वती सौन्दर्यवती आहे हे तिच्या चेहऱ्यावरून, खांद्यावरून पुढे आलेल्या, दोन बटांवरून कळतंच, चेहऱ्यावर खिळलेली नजर थोडी व्यापक केली की विविध आयुधानी युक्त असलेले आठ हात तिच्या शक्तीची यथार्थ जाणीव करून देतात. गणपती, आणि कर्तिकेयाजवळ असलेले पुढचे दोन हात तीचं मातृस्वरूप व्यक्त करतात.तिच्या पुढे असणारे दोन गण ती कैलास सम्राज्ञी असल्याची जाणीव करून देतात, या सगळ्या भूमिका निभावतानाही तिने तिचं स्वतंत्र अस्तित्व जपल्याची साक्ष सगळ्यात पुढचे दोन सिंह देतात. जगदंबेचं इतकी परिपूर्ण वर्णन करणारी मूर्ती मी तरी पहिल्यांदाच पाहिली. या मूर्तीबद्दल मला अद्याप काहीच वाचायला मिळालेल नाही. मी ज्या ज्या गोष्टी ओळखण्याचा प्रयत्न केला त्या त्याच आहेत का हेही मला माहीत नाही. या मूर्तीचा मूर्तीशास्त्राच्या भाषेत काय अर्थ होतो हे मी शोधलेलं नाही, त्यामागचा कार्यकारण भाव काय असेल हेही मला ठावूक नाही. कधीकधी काहीही माहिती नसताना एखादी नावीन्यपूर्ण गोष्ट आपल्यासमोर आली की आपल्या मनाच्या आणि बुद्धीच्या कसोटीवर आपण त्या गोष्टीला जाणून घ्यायचा प्रयत्न करतो, तसं काहीसं या मूर्तीच्या बाबत झालं आहे. ही मूर्ती माझ्यासमोर तरी अशी व्यक्त झाली… तुम्हाला काय वाटतं ही मूर्ती बघून?
© लौकिका रास्ते