मंथन (विचार)

बंदिस्त © विश्वास देशपांडे, चाळीसगाव

बंदिस्त

मानव जोपर्यंत प्राथमिक अवस्थेत होता, तोपर्यंत तो निसर्गाच्या जवळ होता. त्याच्यासाठी हे विश्व अफाट, अनादी आणि अनंत होते. पण तो जसजसा प्रगत होऊ लागला, तसतसा निसर्गापासून दूर जाऊ लागला. त्याच्यासाठी मग हे विश्व अनादी आणि अनंत राहिले नाही. ते मर्यादित झाले. किती विरोधाभास आहे बघा ! जेव्हा प्रगती नव्हती, मानव प्राथमिक अवस्थेत होता, तेव्हा हे विश्व विराट होते. पण जसजशी प्रगती होत गेली, निरनिराळे शोध लागत गेले, तसतसे हे विश्व जवळ आले, मर्यादित झाले. मानवाच्या प्रगतीला आकाश खुले झाले. दाहीदिशा मोकळ्या झाल्या. विश्वाला प्रदक्षिणा करायची तर वेळ लागणार. पण आईवडिलांनाच प्रदक्षिणा घातली तर विश्वप्रदक्षिणेचे पुण्य लाभेल. आईवडील म्हणजे विश्वच ! म्हणून गणपतीने विश्वाऐवजी आईवडिलांना प्रदक्षिणा घालून आपल्या बुद्धिमत्तेचा आणि मातापित्यांवरील आपल्या श्रद्धेचा प्रत्यय आणून दिला. मानवाने मात्र आपल्या बुद्धिचातुर्याने आणि वैज्ञानिक प्रगतीच्या जोरावर जणू या विश्वालाही प्रदक्षिणा घातली.

पण या गोष्टीला खरोखरंच प्रगती म्हणावं तर अनेक गोष्टींचा संकोच झालेला दिसतो. वैज्ञानिक प्रगतीच्या जोरावर जग कवेत घेणारा माणूस निसर्गापासून मात्र दूर जाताना दिसतो आहे. खरं तर वनस्पती आणि इतर प्राणी यांच्याप्रमाणेच माणूस सुद्धा निसर्गाचाच एक भाग ! पण तो आपली मूळ ओळखच जणू हरवून चालला आहे. त्याची ही प्रगती त्याला खरोखरीच पुढे नेणार की दिवसेंदिवस त्याच्या मूलभूत क्षमता, जाणिवा आणि संवेदशीलता यांचा ऱ्हास करण्यासाठी कारणीभूत ठरणार हा मोठा प्रश्न आहे.

मला या ठिकाणी पूर्वी वाचलेली एक गोष्ट आठवते. एक अत्यंत श्रीमंत जमीनदार असतो. त्याला एकुलता एक मुलगा असतो. त्या मुलाचे तो सगळे लाड पुरवतो. त्याला हव्या त्या गोष्टी लगेच उपलब्ध करून देतो. पैसा, ऐश्वर्य, नोकरचाकर कशाकशाचीही ददात नसते. त्या मुलाला गरिबी, उपासमार, दुःख, दारिद्र्य, दैन्य काहीकाही माहित नसते. त्या जमीनदाराला एक दिवस वाटते की जगात किती गरिबी, दारिद्र्य आहे हे आपल्या मुलाला दाखवावे आणि त्याला याची जाणीव करून द्यावी की इतरांच्या तुलनेत आपण किती श्रीमंत आहोत, भाग्यवान आहोत.

मग तो जमीनदार आपल्या मुलाला आपल्या शेतावर काम करणाऱ्या मजुराच्या घरी राहण्यासाठी काही दिवस पाठवतो. त्यासाठी तो मुलगा आपले शहर सोडून खेडेगावात राहण्यास येतो. तेथील सगळे वातावरण त्याला खूप आवडते. छोटंसं घर, मोकळं शेतशिवार, मोकळी आणि स्वच्छ हवा, झुळझुळ वाहणारी नदी, खाण्यासाठी साधे पण ताजे आणि चवदार अन्न. रात्री खाटेवर पडल्यावर दिसणारे आकाशातील चंद्रतारे. या सगळ्या गोष्टी त्याच्या मनाला खूप भावतात. त्या शेतमजुराची लहान मुले त्याचे सवंगडी होतात. त्यांच्याकडून तो बऱ्याच नवीन गोष्टी शिकतो. काही दिवसांनी तो जमीनदार आपल्या मुलाला परत बोलावतो. तो त्या मुलाची खरं तर आता तिथून निघण्याची इच्छा होत नाही पण वडिलांनी बोलावले म्हणून तो जातो.

वडील त्याला विचारतात, ‘ पाहिलेस ना, गरीब लोक कसे जगतात ? आपण त्यांच्यापेक्षा किती श्रीमंत आणि श्रेष्ठ आहोत ! तू भाग्यवान आहेस की अशा या घरात तुझा जन्म झाला. ‘ यावर तो मुलगा उत्तरतो, ‘ बाबा, ते कसले गरीब ? मला तर वाटते की खरे गरीब तर आपण आहोत. आपला एवढा मोठा बंगला ! पण त्या बंगल्यातच आपण बंदिस्त राहतो. त्या खेडेगावी घर छोटे पण त्यासमोर असणारे हिरवेगार शिवार, डोलणारी पिके, दाट सावली देणारे वृक्ष. आपल्या बंगल्यासमोर बाग असली तरी त्या बागेला त्या शेताची सर नाही. आपल्याकडील पंचपक्वान्ने त्यांच्याकडील ताज्या चवदार जेवणापुढे फिकी आहेत. रात्री सगळे आकाश तिथे डोळ्यांपुढे खुले होते. त्या शेतावर काम करणाऱ्या काकांची मुले शेतातच राहतात. तिथे त्यांना काम शिकायला मिळते. आपल्या भावंडांसोबत खेळायला, राहायला मिळते. जवळच्याच शाळेत ते पायी जातात. मला तर तीच माणसे आपल्यापेक्षा श्रीमंत आणि भाग्यवान वाटतात. ‘ ही छोटीशी गोष्ट खूप काही सांगून जाणारी आहे. आपण आपल्या मुलांना खरंच अशा वास्तवाशी परिचित करून देतो का ? आपण त्यांना सगळ्या सुखसुविधा पुरवून भविष्यातील आयुष्याच्या होणाऱ्या संघर्षासाठी कमजोर तर बनवत नाही ? आपल्या मुलांना उत्तम शिक्षण मिळावे म्हणून आपण चांगल्या शाळेत पाठवतो. पण त्यापेक्षाही बाहेरचं जग, निसर्ग म्हणजे अनौपचारिक शिक्षण देणारी मोठी शाळा आहे. कुतूहल हा ज्यांच्या जीवनाचा स्थायीभाव आहे, अशा लहानग्यांचं कुतूहल शमवणाऱ्या कितीशा शाळा आहेत ? बऱ्याच शाळांमध्ये कुतूहल, नैसर्गिक प्रेरणा, भावना दमन करण्याचेच काम शिक्षण देण्याच्या नावाखाली केले जाते.

आपण स्वतःला आणि इतरांना बंदिस्त करण्यात पटाईत आहोत. चैतन्यरुपी परमेश्वर चराचरात भरून राहिला आहे. त्याला आपण मंदिर, मशीद, चर्च इ. त बंदिस्त केले. त्याच्या अनंतरूपाचा अनुभव आपण घेतो आणि देतो कुठे ? चराचराला प्रकाश देणाऱ्या सूर्यदेवांना आपण खोलीत बंदिस्त केलं. वाहत्या पाण्याला स्विमिंग पूल, आणि बाथरूममधील नळात बंदिस्त केलं, त्यात धन्यता मानू लागलो. जीवन हाच एक मोठा चित्रपट आहे. त्याचा अनुभव आम्ही थिएटर, टीव्ही आणि मोबाईलमध्ये घ्यायला लागलो. आमच्या जाणिवा विशाल होण्याऐवजी संकुचित करायला लागलो.

पुण्यामध्ये उन्हाळी सुटीमध्ये मुलांसाठी शिबिरे घेणारे, मुलांना काहीतरी नवीन शिकवण्याचा प्रयत्न करणारे मयुरेशजी डंके यांचा एक लेख नुकताच वाचनात आला. मयुरेशजी मुलांना गडकिल्ले दाखवायला घेऊन जातात. भोवतालच्या निसर्गाची आणि पर्यावरणाची माहिती करून देतात. त्यांच्या ‘ अनुभूती ‘ या शिबिरात अनेक पालक निरनिराळ्या कारणांसाठी आपल्या मुलांना पाठवतात. पण त्यांच्या आपल्या मुलांसाठीच्या इतक्या अपेक्षा असतात की त्याचा विचार केला तर मुलं नवीन गोष्टी कशा काय शिकू शकतील हा प्रश्नच आहे ! काही पालकांना वाटते की तेथील अन्न आरोग्यासाठी चांगले असेल का ? तिथे स्वयंपाक करणारी लोकं तेल कुठलं वापरत असतील, भांडी अल्युमिनियमची वापरत असतील का , ते सॅनिटायझर तरी वापरत असतील का ? मुलं नेमकी कुठं आहेत त्यांचं तासातासानं लोकेशन कळेल का ? मुलांना मोबाईल वापरण्याची परवानगी दिली जाईल का ? तिथे कमोडची सोय असेल का ? वगैरे वगैरे . एवढ्या अपेक्षा जर पालक करत असतील तर त्यांनी असल्या शिबिराला मुलांना पाठवायचेच कशाला ? वरील गोष्टीतील आपल्या मुलाला सुखाने आपल्या घरी लाडाने वाढवणाऱ्या जमीनदारासारखे आपल्या घरीच ठेवून सर्व सुखसुविधा उपलब्ध करून द्याव्या.

या लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेल्या मूळ मुद्द्याकडे मी पुन्हा येतो. आपण जेवढे स्वतःला बंदिस्त करून घेऊ, जेवढे निसर्गापासून दूर जाऊ, तेवढी स्वतःची हानी आपण करून घेऊ. आपल्या नैसर्गिक क्षमता, जाणिवा हरवून बसू. प्रगती आणि विकास होताना जर आपल्या नैसर्गिक क्षमता, संवेदना यांच्यापासून दूर जाणार असू, निसर्गापासून फारकत घेऊन कृत्रिम जीवनातच धन्यता मानायला शिकणार असू तर खरोखरच आपण विकासाच्या मार्गावर जात आहोत का याचा विचार नक्की व्हायला हवा.

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव

२८/०४/२०२४

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}