मंथन (विचार)वैशिष्ट्यपूर्ण / फिचर

चिरंजीव अश्वत्थामा आजवर कोणाकोणाला दिसला ?

चिरंजीव अश्वत्थामा आजवर कोणाकोणाला दिसला ?
ही आगळीवेगळी माहिती तुम्ही कदाचित वाचलीही नसेल.
अश्वत्थामा सत्यकथा की दंतकथा.?

अश्वत्थामा हा कृपाचार्यांची बहीण कृपी आणि द्रोणाचार्यांचा मुलगा. तो कपाली, पिंगल, भीम, विरूपाक्ष, विलोहित, शास्ता, अजपाद, अहिर्बुधन्य, शंभु, चण्ड आणि भव या 11 रूद्रांपैकी एकाचा अवतार आहे आणि बळी, व्यास, कृपाचार्य, हनुमंत, बिभीषण, परशुराम व अश्वत्थामा ह्या चिरंजीवांपैकी एक आहे.
ह्या कलियुगातही अश्वत्थामा कपाळावर कधीच भरून न येणारी जखम घेऊन सर्वसामान्य लोकांना दर्शन देतो असा अनेकांचा विश्वास आहे. ह्या विषयी संशोधन केल्यावर मला पुढीलप्रमाणे माहीती मिळाली.
महाभारतानंतर अश्वत्थाम्याने सामान्य मानवाला दर्शन दिल्याचा पहिला उल्लेख 12 व्या शतकात लिहिलेल्या ‘पृथ्वीराज रसो’ ह्या पुस्तकात आढळतो. 1192 साली पृथ्वीराज चौहानचा महम्मद घोरीकडून पराभव झाल्यावर तो जंगलात लपून बसला. तिथे त्याला कपाळावर जखम असलेला एक खूपच उंच माणूस भेटला. पृथ्वीराज स्वतः उत्तम वैद्य असल्यामुळे त्याने पुढील आठ दिवस त्या जखमेची मलमपट्टी केली. पण जखमेत जेव्हा कणभरही फरक पडला नाही तेव्हा पृथ्वीराजच्या लक्षात सगळा प्रकार आला आणि त्याने त्या व्यक्तीला ‘आपण अश्वत्थामा आहात का?’ असं विचारलं. होकार देऊन तो झटकन निघून गेला.
त्यानंतरचा उल्लेख 15 व्या शतकात केलेला आढळतो. 15 व्या शतकाच्या सुरूवातीला कर्नाटकात ‘गदग’ येथे ‘नारायणाप्पा’ नावाचा गरीब ब्राह्मण राहत होता. त्याने कन्नड भाषेत लिहिलेल्या ‘कर्नाट भारत कथामंजिरी’ या ग्रंथामुळे तो ‘कुमारव्यास’ या नावाने प्रसिद्ध झाला. त्याला महाभारत ‘जसं घडलं तसं’ लिहिण्याची इच्छा होती. त्यासाठी ज्याच्या डोळ्यादेखत महाभारत घडलं त्याची भेट घेण्याची इच्छा आपल्या ‘वीर नारायण ‘ या देवासमोर त्याने अनेक वर्षे सतत व्यक्त केली. देवाने त्याला स्वप्नात येऊन म्हटले की ‘माझ्या देवळात होणाऱ्या येत्या ‘द्वादशी पारणं’ उत्सवाला तू कसंही करून हजर राहा. उत्सवातून सगळ्यात पहिले उठून जाणाऱ्या ब्राह्मणाच्या पायांवर डोके ठेवून त्याला ‘महाभारत जसं घडलं तसं मला सांगा’ अशी विनंती कर. तो प्रत्यक्ष अश्वत्थामा आहे. तो सांगेल ते लिहून घे.’
ठरल्याप्रमाणे कुमारव्यासाने त्या ब्राह्मणाच्या पायांवर डोके ठेवून तशी विनंती केली. ब्राह्मणाने त्याला पहिली अट अशी घातली की आंघोळ करून नेसत्या ओल्या वस्त्रांनिशी बंद खोलीत रोज लिहायला बसायचं आणि अश्वत्थामा जसं सांगेल तसं लिहून घ्यायचं. वस्त्रं सुकली की लेखणीतील शाई संपेल आणि त्या दिवसाचं काम थांबेल. दुसरी अट अशी घातली की महाभारत कोणी सांगितलं हे गुप्त ठेवायचं.
दोन्ही अटी मान्य करून कुमारव्यासा लिहू लागला. तो दुर्योधन आणि भीम यांचं गदायुध्द असलेल्या ‘गदापर्वा’ पर्यंत आला. इथे भीमाने ‘अधार्मिक ‘ पद्धतीने केलेल्या आपल्या मित्र दुर्योधनाच्या हत्येचा प्रसंग सांगताना अश्वत्थामा रडू लागला. कुमारव्यासही रडू लागला आणि त्याने भावनेच्या भरात हे गुपित आपल्या बायकोला सांगितलं. त्याबरोबर त्याची लेखणी कायमची थांबली. त्यामुळे कुमारव्यासाने लिहिलेलं ‘आँखों देखा हाल’ असलेलं महाभारत ‘गदापर्व’ येथे येऊन थांबतं. महाभारत अनेक वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेलं असलं तरी ह्या महाभारताला सगळ्यात ‘खरं’ महाभारत समजलं जातं; कारण ते सांगणारा स्वतः अश्वत्थामा होता.
त्यानंतरचा उल्लेख अंदाजे 200 वर्षांपूर्वी ‘शतानंद मुनीं’नी लिहीलेल्या ‘सत्संगी जीवन’ ह्या ग्रंथात आढळतो. भगवान ‘स्वामीनारायण’ यांची आई ‘भक्तीमाता’ आणि वडील ‘धर्मदेव’ हे त्यांच्या कुलदैवताची म्हणजे ‘हनुमंता’ची 3 महीने साधना करायला अयोध्या येथल्या ‘हनुमान गढी’ येथे गेले होते तेव्हा हनुमंताने त्यांना असा दृष्टांत दिला की वृंदावन येथे जाऊन पूर्णावतार श्रीकृष्णाची भक्ती करावी. त्यांनी असं केल्यावर श्रीकृष्णाने त्यांना दृष्टांत दिला की आता त्यांनी ‘शरयू’ नदीकाठी असलेल्या ‘चपैय्या’ या गावी परत जावं कारण लवकरच त्यांच्या पोटी श्रीकृष्ण जन्म घेणार आहे. पती-पत्नी घरी यायला निघाले. एका रात्री ते जंगलात रस्ता चुकले तेव्हा त्यांची एका उंच, तगड्या, भगवी वस्त्रं घातलेल्या ब्राह्मणाशी भेट झाली. त्याचे डोळे रागावल्यासारखे लालबुंद होते आणि त्याने कपाळावर भुवयांच्या वरती वस्त्रं बांधलं होतं. त्याने पती-पत्नींची चौकशी केली तेव्हा भोळेपणाने त्यांनी काय घडलं आहे ते सांगितलं आणि लवकरच श्रीकृष्ण त्यांच्या घरात जन्म घेणार आहे असं सांगितलं. हे ऐकलं मात्र, तो ब्राह्मण रागाने लालबुंद झाला आणि त्याने विचारलं, ‘कृष्ण, म्हणजे माझा शत्रू? तुमच्या पोटी जन्म घेणार आहे? त्याच्यामुळे मला या यातना भोगाव्या लागत आहेत. त्यामुळे मी तुम्हाला शाप देत आहे की तुमच्या पोटी जन्मणारा मुलगा कधीच हातात कुठलंही शस्त्रं धरू शकणार नाही आणि कधीही कुठल्याही लढाईत त्याचा जय होणार नाही’. एवढं म्हणून धर्मदेव यांना बाजूला ढकलून तो झपाझप पावलं टाकत निघून गेला. पती-पत्नी दोघेही भीतीने थरथर कापू लागले आणि रडू लागले. त्या रात्री मारूतीराया त्यांच्या स्वप्नात आले आणि म्हणाले, ‘देवाच्या अवताराला हातात शस्त्र धरण्याची आणि कुठलीही लढाई जिंकण्याची गरज नसते. श्रीकृष्णाने तरी स्वतः कुठे हातात शस्त्र धरलं होतं?’ मारूतीरायाने त्यांना जंगलाबाहेर पडण्याचा मार्ग दाखवला. त्यांच्या पोटी जन्मलेल्या भगवान स्वामीनारायण यांनी संपूर्ण जगात श्रीकृष्णाचा प्रचार केला.
त्यानंतर चा अश्वत्थाम्याचा उल्लेख वासुदेवानंद सरस्वती उर्फ ‘टेंबे स्वामी’ यांच्या जीवनचरित्रात केलेला आढळतो. 1912 साली ते ‘शूलपाणीश्वर’च्या जंगलात रस्ता चुकले होते. तेव्हा कपाळावर जखम असलेल्या एका उंच माणसाने त्यांना रस्ता दाखवला होता. गावाच्या वेशीवर आणून सोडल्यावर स्वामींनी त्याला विचारलं, ‘आपला देह, चाल आणि वागणूक ही कोणत्याही मानवासारखी दिसत नाही. आपण भूत, यक्ष किंवा देवदूत आहात का? आपण कोण हे मला खरं सांगा’. त्यावर तो माणूस म्हणाला, ‘तुमचं म्हणणं खरं आहे. कारण मी या युगातला नाही. मी द्वापारयुगातला आहे. माझं नाव अश्वत्थामा’.
त्यानंतर चा उल्लेख ‘पायलटबाबा’ने लिहीलेल्या ‘हिमालय कह रहा है’ या पुस्तकाच्या 9 व्या प्रकरणात आढळतो. तिथे असा उल्लेख आहे की त्यांच्या झोपडीत पाणी शिरल्यामुळे त्यांना जंगलात जाऊन राहावं लागलं. तिथे त्यांना अश्वत्थामा भेटला होता.
त्यानंतरचा उल्लेख 2005 साली ‘प्राजक्ता प्रकाशन ‘ने प्रकाशित केलेल्या ‘जगन्नाथ कुंटे’ यांनी लिहिलेल्या ‘नर्मदे हर हर ‘ या पुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक 230 वर आढळतो. ते नर्मदा परिक्रमा करताना शूलपाणीच्या जंगलात पाय घसरून पडले आणि दरीत अडकले होते तेव्हा अश्वत्थाम्यानेच त्यांना हात देऊन वर खेचून घेतलं होतं.
गुजरातमधील ‘नवसारी’ च्या जंगलात एका रेल्वेत नोकरी करणाऱ्या अधिकाऱ्यालाही 12 फूट उंची असलेला अश्वत्थामा दिसला होता आणि मध्य प्रदेशातील एका डाॅक्टरनेही एका अति उंच माणसाच्या कपाळावरील जखमेवर अनेक दिवस उपचार करूनही जेव्हा ती बरी झाली नाही तेव्हा तो रूग्ण अश्वत्थामा असल्याचे ओळखले होते असेही उल्लेख आंतरजालावर (इंटरनेट) आढळतात. पण त्या घटनांबद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही.
सगळ्यात अलिकडचा उल्लेख 2015 साली प्रकाशित झालेल्या ‘नमामि नर्मदे ‘ या सतीश अनंत चुरी यांनी लिहिलेल्या पुस्तकात आढळतो. अश्वत्थामा त्यांच्याशी हिंदीत फक्त बोललाच नाही तर जेवणाच्या पंगतीत त्यांच्या बाजूलाही बसला होता. त्याने डोक्याला प्लास्टिक ची पिशवी गुंडाळली होती आणि त्याच्या कपाळावरच्या कुजलेल्या जखमेवर माशा घोंघावत होत्या. आजूबाजूच्या लोकांना दुर्गंध सहन न झाल्याने त्यांनी नाकाला रुमाल लावला होता. पंगत सुरू होण्याच्या आधी तो अश्वत्थामा असल्याचं सतीश चुरी साहेबांनी ओळखलं व ‘बाबा राम ‘ नावाच्या त्यांच्या मित्राला त्यांनी त्यांच्याजवळ असलेला कॅमेरा काढून फोटो काढायला सांगितलं. पण तेवढ्यात पंगत सुरू झाल्याची घंटा वाजली आणि अश्वत्थामा झटकन पंगतीत जाऊन पोहोचला. ताटं वाढून सगळे जेवायला बसल्यावर अश्वत्थामा चुरी साहेबांच्या बाजूलाच येऊन बसला आणि सगळ्यांच्या आधी जेवण संपवून ताट फेकून बाहेर निघूनही गेला. सगळ्या गोष्टी इतक्या झटकन घडल्या की चुरी साहेबांना त्याचा फोटो काही काढता आला नाही.
अश्वत्थाम्याने पूर्णावतार श्रीकृष्णाच्या शत्रूंना युध्दात मदत केल्यामुळे सगळे त्याला वाईट समजतात. पण ज्यांनी त्याला प्रत्यक्ष पाहिले आहे व त्याच्याशी बोलणं केलं आहे त्या सतीश चुरी यांच्या पुस्तकात पृष्ठ क्रमांक 213/14 वर त्याच्याविषयी असं म्हटलं आहे, उत्तर प्रदेशातील कानपूरजवळ आज जेथे खैरेश्वर मंदिर आहे, तेथे पूर्वी द्रोणाचार्य राहत असत. या साधारण गावात जन्मलेला असाधारण असा हा अश्वत्थामा शस्त्रास्त्रांच्या नियोग- विनियोगाच्या बाबतीत कर्णाच्या तोडीचा होता. वेदविद्येच्या ज्ञानात तो साक्षात वेदरचयीत्या व्यासांसम विद्वान, किंबहुना व्यासांनी वेद रचले ते अश्वत्थाम्याच्या सहयोगानेच. उर्जेने परिप्लुत असण्याच्या बाबतीत जणू कार्तवीर्य. भीष्मासम भीषण, परशुरामासम तेजस्वी, द्रोणासम अस्त्रविद्याविशारद, अर्जुनासम धनुर्धर, भीमासम गदाधर, यमासम भयाण, अग्नीसम ज्वलंत, सागरासम बलशाली, दुर्वासांसारखा कोपिष्ट, बृहस्पतीसम तज्ज्ञ असा हा अश्वत्थामा भार्गवराम परशुरामांचा शिष्य आहे. दुर्वास मुनींचा विद्यार्थी आहे, कृष्ण द्वैपायन व्यासांचा सहयोगी सेवक, भीष्मांचा लाडका, कृपाचार्यांचा भाचा, द्रोणाचार्यांचा पुत्र, शिष्य व सरतेशेवटी शिवाचा अंश आहे. त्यामुळे हा वाईट कसा असू शकेल?
. एकूण काय तर अश्वत्थामा अजूनही जिवंत आहे आणि तो अनेकांना दर्शन देतो हे जरी शपथेवर अनेक आदरणीय व्यक्ती म्हणत असल्या तरी आजपर्यंत कोणीही त्याचा फोटो काढू शकलेला नाही किंवा त्याचं शूटिंग करू शकलेलं नाही. त्यामुळे अश्वत्थामा हे अजूनही एक न सुटलेलं कोडं आहे.

(संकलित)

लेखक संकलक माहीत नाही।

Related Articles

One Comment

  1. अश्वत्थामा या कोड्याबद्दल नवी माहिती!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}