सम – विषम भाग १ मकरंद कापरे ,पुणे ४११०४१
सम – विषम
भाग १
“पत्रिका चांगली आहे तुमची तसे काही काळजी चे कारण नाही, गुरू सातव्या स्थानात आहे, मंगळ शुक्र युती आहे, थोडे विलासी वृत्तीत त्यामुळे वाढ झाली आहे, पण जास्त वाहवून जाऊ नका, संयम ठेवा …” पंडितजी काहीशी आकडेमोड करत समोर बसलेल्या रेखा आणि श्रेयस ला म्हणाले. “पंडितजी, नोकरी बद्दल सांगा ना, सहा महिने झाले त्याला जॉब नाहीये, आर्थिक परिस्तिथी कधी सुधारेल?”. “काळजी नको ताई दोन जॉब ऑफर येतील त्यांना, लवकरच, त्यातली जो पगार विषम आहे म्हणजे ऑड नंबर बरं का, ऑड नंबर वाली नोकरी ला होकार द्यायचा”. “हो का, दोन जॉब ऑफर, पण अजून माझा एकही इंटरव्ह्यू झाला नाही सहा महिन्यात”, श्रेयस म्हणाला. “येईल हो, गुरू स्वगृही आहे, त्यामुळे काही काळजी करू नका, ही परिस्थिती तात्पुरती आहे, आणि कुलदैवत कोणते तुमचे?”. “तुळजा भवानी आहे, माझ्या सासरचे” रेखा म्हणाली. “तुळजा भवानी, वा, पण चार वर्षात तुम्ही गेला नाही, खरे की नाही” पंडितजी म्हणाले. “हो, माझे सासरे म्हणजे श्रेयस चे वडील गेल्यानंतर जाणे झालेच नाही” रेखा अगतिकतेने म्हणाली. “आणि तुमचे कुलदैवत कोणते ताई?” पंडितजी नी विचारले, “आमच्या कडचे कोल्हापूरची महालक्ष्मी” ती म्हणाली. “काय सांगता, झकास की ओ, कोल्हापूर आणि तुळजापूर वारी करून टाका की लगेच, म्हणजे लगेच काम सुरू होईल बघा, आणि घराची वास्तुशांती, यांना नोकरी मिळाली की उरकून घ्या, वास्तू पुरुषाचे आशिर्वाद पाहिजेत हो, आपण जिथे राहतो, तिथे शांती आणि प्रगती होण्यासाठी”. “हो गुरुजी, जरा नीट करायची होती म्हणून थांबलो, सगळ्या नातेवाईकांना बोलवायचे आहे ना, म्हणून जरा…” “काही हरकत नाही पण आता यांना नोकरी लागली की पहिले तेच काम करायचे”. “हो, गुरुजी नक्की, आशिर्वाद द्या”. दोघेही गुरुजींच्या पाया पडून दक्षिणा देऊन निघाले.
गाडीत बसल्यावर रेखा ने विचारले,”कधी जायचे तुळजापूर, कोल्हापूर ला?”. “येत्या शनिवारी, रविवारी जाऊ या, आणि अक्कलकोट ला पण जाऊ या” श्रेयस म्हणाला. “माझ्या मनातले बोललास तू, मी पण तेच म्हणणार होते” रेखा म्हणाली. “बघ बायकोच्या मनातले ओळखणे एव्हढे सोपे नाही, आहे की नाही मी मनकवडा”. “गप रे, नको भाव खाऊस लगेच, छान वाटेल सासूबाई ना पण”.
दोघेही घरी आले. फ्रेश होऊन रेखा किचन मध्ये आली, सासूबाई कुकर लावत होत्या. “काय म्हणाले ग पंडितजी” त्यांनी विचारले. “काही नाही, पत्रिका चांगली आहे, लवकर काम होईल म्हणाले”. “बरे होईल बाई, लवकर मार्गी लागेल तर” त्या म्हणाल्या. “आणि, तुळजापूर, कोल्हापूर दोन्ही ठिकाणी दर्शन घेऊन या म्हणाले” रेखा म्हणाली. “हो का, मी म्हटले होते मागेच तुम्हाला, आता जाऊन येऊ या” आई म्हणाली.
जेवण करताना प्रोग्रॅम ठरला,”अक्कल कोट आणि तुळजापूर शनिवारी करू या, आणि रात्री सोलापूर ला राहू, सकाळी ७ वाजता निघू कोल्हापूर साठी ” श्रेयस ने म्हटले. “चालेल, हॉटेल बुक करून घे, आणि ड्रायव्हर घेऊ या का, म्हणजे तुला दमायला नाही होणार” रेखा म्हणाली. “हो रे बाबा, ड्रायव्हर घेऊ या, तो मागे दापोली ला गेलो होतो तेव्हा कोण होता ग तो, त्याला विचार ना, चांगला होता तो” आई म्हणाली. “तो अण्णा ना” विचारतो त्याला फोन करून. फोन करून श्रेयस ने अण्णा ला फिक्स केले.
शनिवारी सकाळी 6 वाजता निघायचे ठरले. शनिवारी सकाळी 6 वाजता अण्णा ने बेल वाजवली. “नमस्कार, कधी निघायचे” दार उघडल्यावर समोर दिसलेल्या रेखा ला पहात अण्णा म्हणाला. “बसा ना, आई तयार होत आहेत, अर्ध्या तासात निघू या”. “असू द्या, काही हरकत नाही, मी खाली बसतो गाडीत, गाडीची चावी द्या”. आपल्या झुपकेदार मिशिवरून हात फिरवत अण्णा म्हणाला. रेखा ने त्याला चावी दिली. अण्णा , पन्नास च्या आसपास वय, पांढरी टोपी आणि पांढऱ्या सफारी मध्ये एखाद्या नेत्या सारखा दिसत होता. एकदम दिलदार माणूस, आपल्या कामात एकदम चोख, बडबड्या आणि काळजीवाहू, त्यामुळे तो नेहमी बुक असायचा.
साडे सहा ला तिघेही खाली आले, त्यांना पाहून अण्णा गाडीतून खाली उतरला. “नमस्कार आई, कशी आहे तुमची तब्येत”. “चांगली आहे, तुम्ही कसे आहात, कस चालू आहे काम तुमचं” आई म्हणाली. “कामाचं काही विचारू नका, फुल्ल बुकिंग आहे”. श्रेयस आणि रेखा ची हातातली सूटकेस मागे डिकीत ठेवत अण्णा म्हणाला.
“तुमचे बुकिंग च्या आधी मला एक बुकिंग आले होते, त्यांना गोव्याला जायचं होते, पण त्यांना नाही म्हणून सांगितले”, अण्णा म्हणाला. “का हो, असे का केले”, श्रेयस ने विचारले. “तुम्ही अक्कलकोट ला जाणार म्हणून मनात विचार आला, स्वामीच बोलावत आहेत, मग नाही कसं म्हणणार, म्हणून हो” अण्णा हसतमुखाने म्हणाला. सगळे गाडीत बसल्यावर अण्णाने समोरच्या गणपतीला नमस्कार केला,”श्री स्वामी समर्थ, निघू या का”. “हो चला” रेखा म्हणाली.
सोसायटी च्या बाहेर पडल्यावर अण्णा म्हणाला,”सोलापूर ला कोणत्या हॉटेल मध्ये बुकिंग आहे”. “लक्ष्मी पॅलेस” श्रेयस ने सांगितले. “बेस्ट हाय मग, जेवण नाश्ता एक नंबर” अण्णा म्हणाला. “आई तुमच्या साठी मी निर्गुडीच तेल आणलं हाये बरं का”. “काय सांगतां, कसे लक्षात राहिले तुमच्या”आईंनी विचारले. “दापोली ला तुमचे गुढघे दुखत होते, ते माझ्या लक्षात होते, आणि हे तेल आपले घरी बनवलेले हाये बरं का, एक नंबर”, अण्णा ने पुढे सांगितले.
“बरं नाश्ता कुठे करायचा, की घरी केला” अण्णाने विचारले. “नाही हो, तुम्ही सांगा तुमचे ओळखीचे कुठले हॉटेल असेल तिथे करू” रेखा म्हणाली. “असं म्हणता, मग यवतच्या आधी एक आहे बघा, थालिपीठ एकदम नंबर वन बघा, आणि पराठे पण भारी अस्त्यात तिथले” अण्णा ने सांगितले. “काय करायचे श्रेयस?” रेखा ने विचारले. “हो चालेल” श्रेयस म्हणाला.
“साहेब ती पिशवी आहे ना मागे त्यात पेपर आहे, आई तुम्हाला वाचायचा असेल तर वाचा, तुमच्यासाठीच घेतला मी आणि एक मासिक पण आहे”. रेखा आणि सासूबाई मासिक आणि पेपर वाचण्यात दंग झाल्या. “बरं का श्रेयस साहेब, तो पुढं बोर्ड आहे बघा, पिंपळवाडी, डाव्या बाजूला फाटा आहे, आपलं गाव आहे बरं का ते”. “वा छान, तुमची शेती आहे का गावाला” श्रेयस ने विचारले. “हाये ना, 6 एकर, भाऊ बघतो”. “मग तुम्ही नाही शेती बघत का” रेखा म्हणाली. “मी जाऊन येऊन असतो, शेती वर नाही भागत, म्हणून हे काम करतो, रहातो पुण्यातच, पण हे आपलं गांव आहे” अण्णा मिशिवरून हात फिरवत आणि वाऱ्याने तिरपी झालेली टोपी सरळ करत म्हणाला. “मग सध्या शेतीत काय लावले आहे?” श्रेयस ने विचारले. “आता मका लावला आहे, एक एकरातआणि बाकीचा ऊस आहे”. “वा, हुरडा पार्टी ला यायला पाहिजे एकदा तुमच्या कडे” रेखा म्हणाली. “हो या ना ताई, कधीही सांगा” अण्णा म्हणाला. “पाऊस पडतो का नीट?” श्रेयस ने विचारले. “पिंपळवाडी गावाला पावसाची काही कमी नाही भरपूर पडतो, आणि नावाप्रमाणेच भरपूर पिंपळाचे झाडे आहेत”. “वा एकदम हिरवे गार असेल”, आई म्हणाली. “एकदम हिरवे आहे, गारेगार आणि तीन मोठे बंधारे आहेत वरच्या बाजूला, एक मोठे धरण आहे, पाण्याचा प्रश्न नाही बघा”. “वा, छान वाटले ऐकून, भारतातली सगळी गावं अशीच पाहिजेत” रेखा म्हणाली.
अण्णा बरोबर गप्पांच्या ओघात वेळ कसा गेला ते समजले नाही. “हॉटेल अन्नपूर्णा, ती पाटी दिसते आहे ना, तिथेच थांबणार आपण नाश्त्याला”, अण्णाने सांगितले. “यवत आले पण” रेखा म्हणाली. अण्णाने हॉटेल च्या पार्किंग मध्ये गाडी पार्क केली. रेखा आणि आई वॉश रुम ला जाऊन टेबलापाशी येऊन बसल्या. प्रत्येकाने आपली ऑर्डर दिली. श्रेयस ने थालीपीठ ची ऑर्डर दिली. थोड्याच वेळात टेबलावर ऑर्डर आली सुद्धा. अण्णा ला पण त्यांनी आपल्याबरोबर बसवले. “लसणाची चटणी घ्या त्याच्या बरोबर,” अण्णा श्रेयस ला म्हणाला. “छान आहे थालीपीठ” श्रेयस म्हणाला. “बघू रे टेस्ट,” रेखा ने अर्धे तोडत आपल्या प्लेट मध्ये घेतले. “वा, छानच” ती टेस्ट करत म्हणाली. थोडे पोहे त्याच्या डिश मध्ये वाढत ती म्हणाली,”किती वाजतील तुळजापूर ला पोहोचे पर्यंत” तिने अण्णा ला विचारले. “एक – दिड पर्यंत पोहोचू” अण्णा म्हणाला. “अण्णा तुम्ही अजून काहीतरी घ्या नुसता उपमा खाताय तुम्ही” आई अण्णा ला म्हणाल्या. “बस, पुष्कळ आहे, सकाळी घरी न्याहारी केली होती थोडी”, अण्णा म्हणाला.
“आधी अक्कल कोट करू या, तिथेच दुपारचे जेवण आणि संध्याकाळी तुळजापूर, रात्री सोलापूर ला जेवण करू, बाकी तुम्ही म्हणाल तसे”, अण्णा म्हणाला. “कसे करायचे श्रेयस?” रेखाने विचारले. “चालेल, आधी अक्कलकोट करू या”.
अक्कलकोट ला स्वामींच्या दर्शनाने सर्वच जण खूप सुखावले, तिथेच प्रसादाचे जेवण पण केले. “स्वामी श्रेयस चे सगळे नीट होऊ द्या हो” श्रेयस च्या आई ने स्वामींना गळ घातली. चार च्या सुमारास तुळजापूर ला पोहोचून अण्णा ने स्पेशल दर्शन घडवून आणले. आई तुळजा भवानीची ओटी भरून रेखा आणि आई खूपच खुष झाल्या, श्रेयस ला पण खूप छान वाटले. “अण्णा, खूपच छान दर्शन झाले, ” श्रेयस म्हणाला. यथावकाश, ठरल्याप्रमाणे श्रेयस आणि कुटुंब कोल्हापूरला महालक्ष्मीचे दर्शन घेऊन पुण्यात परतले. Part 1 … Part 2 coming up on 29th June
सम – विषम भाग १ मकरंद कापरे ,पुणे ४११०४१