#गजरा © ज्योत्स्ना गाडगीळ.
#गजरा
मुली वडिलांवर एवढा जीव का टाकतात माहितीय? कारण बाबा हे त्यांचं पहिलं प्रेम असतं. लेकीने काही मागण्याआधीच हा जिनी त्यांच्या सेवेत हजर असतो. ‘लग्न करेन तर तुमच्याशीच’ अशी लडिवाळ कबुली नकळत्या वयात दिलेली असते. बाबा हे त्यांचं सर्वस्व असतात. एकवेळ त्या बाबांशी भांडतील, पण दुसरं कोणी बाबांविरुद्ध बोललेलं खपवून घेणार नाहीत. कमी जास्त फरकाने हे चित्र तुम्हाला घरोघरी बघायला मिळेल. मधुरा आणि तिचे बाबा या गोष्टीला अपवाद नव्हते…
सगळे म्हणायचे, मधुराचं लग्न झालं की या बाप-बेटीचं कसं व्हायचं, काय माहित! नवीन नाती जोडल्याने जुनी नाती थोडीच दुरावतात? मधुराच्या लग्नानंतर उलट हे नातं अधिक दृढ झालं होतं. नुसत्या नजरेने शब्दांपलीकडचे भाव दोघांना वाचता येऊ लागले होते.
एकदा मधुराचा कथ्थकचा कार्यक्रम होता. घाईगडबडीत ती गजरे आणायला विसरली. तिने कार्यक्रमासाठी येणाऱ्या नवऱ्याला आणि बाबांना एकाच वेळी ‘गजरे आणा आणि थेट ग्रीन रूममध्ये या’ असा मेसेज धाडला. त्याक्षणी गजरा मिळणं ही तिची निकड होती. नवरा ऑन द वे होता तर बाबांनी नुकतीच थेटरखाली गाडी पार्किंगला लावली होती. मधुराचा मेसेज पुढच्याच मिनिटांत दोन्हीकडे डबल ब्लू टिक झाला. रिप्लाय द्यायची तसदी दोघांनी घेतली नाही. मिशन गजरा पार पाडण्यासाठी दोन्ही चक्रधर सज्ज झाले.
बाबांनी एका बटणासरशी गाडी अनलॉक केली आणि रिव्हर्स टाकली. जवळच्या बाजारपेठेत गजरे उपलब्ध नसल्याने दूरची रपेट करत गजरे मोहीम फत्ते केली. एव्हाना बराच उशीर झाला होता. लगबगीने गाडी पार्किंगला लावत ते ग्रीन रुमकडे धावले. दारावर नॉक करत आत गेले, तर जावई आधी पोहोचला होता. पिवळ्या बल्बच्या झगमगाटात आरशासमोर असलेल्या डेस्कवर त्याने आणलेले गजरे बाबांना वाकुल्या दाखवत होते. बाबांनी आपल्या हातातली गजऱ्याची पिशवी पाठी सरकवली. गजऱ्यांपेक्षा तेच जास्त कोमेजले. मधुराने त्यांना पाहताच बालपणीसारखी अलवार मिठी मारली आणि त्यांनी पाठीशी नेलेली गजऱ्यांची पिशवी हातून सोडवत कानात पुटपुटली, ‘नवऱ्याने मोगरा समजून तगरीच्या कळ्यांचे गजरे आणलेत, त्यामुळे मी खऱ्या मोगऱ्याचीच वाट पाहत होते.’
मधुराच्या बोलण्याने बाबांचा मोगरा जास्तच टवटवीत झाला. त्यांनी गजऱ्यांची पिशवी मधुराला देत ‘चौथ्या रांगेत जाऊन बसतो’ म्हणून सांगितलं आणि नजरेनेच कार्यक्रमाच्या शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद दिले. बाबांच्यातला खोडकर स्पर्धक जावयाकडे पाहून मिस्कील हसला. ते भाव मधुराने अचूक टिपले. बाबांच्या हसण्याचा अर्थबोध न झाल्याने मधुराचा नवरा गोंधळला, मात्र त्याक्षणी बाप-लेकीच्या गोड नात्याचा परिमळ अधिकच दरवळू लागला…!
© ज्योत्स्ना गाडगीळ.