मनोरंजन

व्हॅलेंटाईन @suchi एक सत्य अनुभव

व्हॅलेंटाईन

डान्स टीचर म्हणून या संस्थेशी अनेक वर्ष जोडली होते मी. दर वर्षी गॅदरिंग ला वेगवेगळ्या थीम्स वर कोरिओग्राफी करणं, वेगवेगळी स्किट्स तयार करणं, ड्रेपरी वगैरे ठरवण्यातही माझा सहभाग असायचा. पण मुख्यत: वर्ष भर चालणारे नृत्य वर्ग ही माझी जबाबदारी असायची.
दरवर्षी हाताखालून जाणारी जनता नवी असायची. आणि जुन्यांना सतत काही नवीन देत राहणं हे आव्हान असायचच.
सतत दंगा, खूप बडबड, हिरीरीने मलाच कसं नवं काही सुचलं हे सांगण्याची चढाओढ.. नुसती धमाल असायची. खूप एन्जॉय करते मी हे, कायमच.
मी जरी कथक शिकले आणि शिकवत असले तरी खूप जास्त क्लासिकल शिकायला नको असायचं त्यांना. अर्थात यात त्यांची चूक नाही कारण वयच तसं असतं ते. कॉन्ट्रॅम्परेरी ते माईम पर्यंत आणि क्लासिकल ते फोक पर्यंत सगळे नृत्य प्रकार माहित करून देणं हे खूप आवडायच मला.
माझ्या क्लास मध्ये कायमच मस्ती आणि ऊर्जा भारीत वातावरण असायच.
अशा वातावरणात तो मात्र कधीच सामिल व्हायचा नाही.
सावळा, तरतरीत नाकेला, बारीकसा पण डोळ्यात चमक असलेला ‘तो’. क्लास मधल्या कोणत्याच ऍक्टिव्हिटी मध्ये सहभाग नसायचा त्याचा. पण तरी सतत माझ्या नजरेच्या टप्प्यात राहील असा मात्र वावर असायचा त्याचा.
नकळत माझी ही नजर आता त्याचा पाठपुरावा करू लागली होती. वर्गाच्या कोपऱ्यात किंवा दाराजवळ असा अस्तित्व टाळता येईल अशा जागी मला मात्र ठळक पणे जाणवायचा.
क्लास मधल्या गमती जमती बघताना कधी तरी हलकी स्मित रेषा त्याच्या ही डोळ्यात दिसायची. आमची नजरा नजर होताच गोंधळून भांबावणारा तो बघताना मलाही मजा यायची.
एकदा अशीच थट्टा मस्करी चालू असताना कुणी तरी म्हणालं, मॅम आज एकाच कानात घातलंय का? त्यावर दुसरं कुणी उत्तरलं, त्यांची फॅशन आहे ती..
आणि मग त्यावरच चर्चा सुरु..
एक छानसा विषय मिळाला आम्हाला डान्स आणि संबंधित गोष्टी साठी म्हणून मी पण खूष..
खरच एकच कानातलं घातलं होतं मी की पडलं कुठे तरी येताना की इथेच कुठे नाचताना हरवलं ते शोधावं हेच माझ्या डोक्यातून गेलं पार..

असेच दिवस पुढे जात होते. परीक्षा जवळ आल्या. गंभीर अभ्यासाचा आव सुरु झालेला. पण काही विरंगुळा म्हणून काही बाही चालू होतं.
मी नेहमी प्रमाणे माझा क्लास घ्यायला गेले तर सगळे जण काही ना काही क्रिएटीव्ह करण्यात गुंतलेला.
मग लक्षात आलं, अरेच्या आज तर 14 फेब्रुवारी..
कोण कोण काय काय करतय हे बघत असताना
अचानक मला
मागून हलकासा स्पर्श झाला आणि पटकन मी वळून बघते तर काय..
तोच सावळासा..
गूढग्यावर बसून, ऐटीत एक हात स्वतःच्या पाठीवर आणि दुसऱ्या हाताची मूठ माझ्या समोर धरून मला म्हणत होता (की प्रपोज करत होता म्हणू?), विल्यूबी मायी व्ह्यालेंटाईन?
असं म्हणून हलकेच मूठ उघडून त्याने मला गिफ्ट दिलं..
माझं कानातलं..
हो..
तेच..
जे खूप दिवसापूर्वी कदाचित इथेच हरवलं होतं..
खूप आश्चर्य वाटलं मला त्याचं. किती सांभाळून ठेवलं होतं त्याने.
आज देण्यासाठी??
आज?
त्याला खरच कळत असेल या दिवसाचा अर्थ?
आपण कोणाला तरी आवडतोय
किंवा कुणी आपल्या वर प्रेम करतय
ही जाणीव खरतर खूप छानच असते,
पण
पण ती अशी अनपेक्षित ठिकाणी अनपेक्षित रित्या समोर आल्यावर काही क्षण विचलित मी ही झालेच.
त्याला आधी एक छानशी मिठी मारली.
त्याला समजून घेणं आणि त्याची समजूत घालणं हे दोन्ही पण गरजेचं होतं. माझ्या वरचा किंवा एकंदरीतच प्रेम किंवा तत्सम भावने वरचा त्याचा विश्वास न मोडू देता ते कर्तव्य मी लगेच पार ही पाडलंच.
हे सगळं मला अचंबित करणारं होतं.
अवघं पाच – साडे पाच वर्षाच्या वयात,आपल्या लाडक्या टीचरला प्रपोज करण्याची त्याची ही निरागसता मला आवडून गेली
पण त्याच वेळेस
आपणच आपल्या समाजाला नक्की कुठे घेऊन जातोय याची जाणीव अंतर्मुख ही करून गेली..
तिथे डान्स शिकवता शिकवता
त्या डे केअर नर्सरी स्कुल मधले असे अनेक अनुभव मलाच खूप काही शिकवून गेले…

@suchi

एक सत्य अनुभव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}