लुप्त होत असलेल्या व्यक्ती – शेजार ……. विभावरी कुलकर्णी,पुणे. २७/५/२०२४
लुप्त होत असलेल्या व्यक्ती – शेजार
जाता जाता सहज एक संवाद कानावर पडला. बागेत फिरायला आलेल्या व्यक्तींची ओळख झाली आणि बोलता बोलता त्यांना समजले आपण शेजारी आहोत. त्या दोन शेजारी राहणाऱ्या शेजाऱ्यांची ओळख बागेत झाली. किती जग पुढे गेले आहे ना (?)
त्या मानाने आमची पिढी फारच मागास म्हणावी लागेल. कारण आम्ही म्हणजे घरातली भाजी आवडली नाही म्हणून हक्काने शेजारी जाऊन जेवत होतो. आपल्या घरात काय चालले आहे याची माहिती शेजाऱ्यांना असायची. लग्नाच्या मुलीला बघायला पाहुणे येणार असतील तर तिचे आवरणे (मेकअप) शेजारच्या घरात होत होता. आणि जास्त पाहुणे आले तर शेजारी त्यातील काही पाहुणे स्वतःच्या घरी नेत होते.आणि त्यांचा व्यवस्थित पाहुणचार करत होते. हे सर्व वाडा किंवा चाळ संस्कृतीत होत होते. अगदी वाटीभर साखर,चार लसूण पाकळ्या,दोन मिरच्या,दोन कोथिंबीरीच्या काड्या यांची हक्काने देवाण घेवाण चालायची आणि गरम पोहे,भाजी आपुलकीने घरात यायची. सगळी मुले सगळी घरे आपलीच असल्या प्रमाणे वावरत होते. आणि शेजारी हक्काने प्रेम व शिक्षा दोन्ही करत होते. आणि त्यावर कोणाची काहीच हरकत नव्हती. ठराविक वेळेत घराचे दार उघडले नाही तर शेजारी चौकशी करत होते. जर उशिरा उठायचे असेल तर आदल्या दिवशी शेजारी सांगावे लागत होते.
सामान आणायला गेल्यावर दुकानदार हक्काने कोणताही पाढा किंवा कविता म्हणायला लावायचा. आणि काही चुकले तर घरी रिपोर्ट जायचा. आमच्या घरा जवळचे एक दुकानदार दुकानात येणाऱ्या मुलांना पाढे म्हणायला लावायचे आणि पाढा आला नाही तर वस्तू द्यायचे नाहीत. मग त्यांच्याकडे तो पाढा पाठ करून जावे लागत होते. अशी समाजाकडून प्रगती होत होती.
त्यामुळे बाहेर वावरताना एक धाक होता. आपले काम सोडून कोणी मूल इतरत्र दिसले तर शेजारी हक्काने कान पकडून घरी आणत होते. आणि घरातील व्यक्ती म्हणायच्या असेच लक्ष असू द्या. त्यामुळे मुले बिघडण्याचे प्रमाण खूप कमी होते. प्रत्येक घरात संध्यादीप लागले की शुभंकरोती म्हंटले जात होते. सर्व मुले एकत्रित पाढे,कविता म्हणत होते. आणि एखाद्या मुलाला घरी यायला उशीर झाला तर सगळे शेजारी त्याला शोधायला बाहेर पडत होते.
अगदी लग्न ठरवताना वधू किंवा वर यांची चौकशी समाजातील किराणा दुकानदार, न्हावी, शिंपी यांच्याकडे केली जात होती. कारण ती चर्चेची ठिकाणे होती. आणि त्यांनी वधू किंवा वर यांची वर्तणूक चांगली आहे असे सांगितले की, ते लग्न निश्चित ठरायचे. अशा खूप आठवणी आहेत.
पण माणसे प्रगत झाली. शेजारचे जवळचे नेबर झाले. घरे फ्लॅट झाली. शेजारचे काका अंकल झाले. ज्यांची ओळख आपोआप होत होती त्यांची ओळख बागेत होऊ लागली. शेजाऱ्यांच्या घरातील वावर कमी झाला. शेजारी फोन करून घरी आहात का? येऊ का? असे विचारु लागले. दोन घरात एकच भिंत असून मनात दुरावा वाढला. तुम्हाला काय करायचे आहे? किंवा आपल्याला काय करायचे? अशी भूमिका दोन शेजाऱ्यांच्या मनात निर्माण झाली. आणि सर्वांनाच अपेक्षित पण घातक स्वातंत्र्य मिळाले. सध्याच्या काही मुलांच्या बाबतीतल्या घटना बघितल्या की वाईट वाटते. आणि कुठेतरी हे ओढवून घेतलेले स्वातंत्र्य याला कारण असावे असे वाटते. आपुलकीचा शेजार असेल तर नकळत संस्कार होतात. मुलांना थोडा धाक असतो. हल्ली पालक वारेमाप पैसा मिळवतात. आणि मुलांना पुरवतात. कोणाचाच धाक नाही. आम्ही काहीही करु तुम्ही कोण विचारणारे? असे विचार वाढत आहेत. याला कोणते स्वातंत्र्य म्हणायचे हेच कळत नाही.
माझ्या सारख्या शेजाऱ्यांच्या प्रेमात व धाकात वाढलेल्या ( सध्या याला मागासलेले म्हणतील ) व्यक्तीला हे अती स्वातंत्र्य खुपते आणि चिंता वाटते. सगळे माझ्या मताशी सहमत असतील असे नाही.पण मला लुप्त होत असलेले शेजारी आठवतात. आणि आवश्यक वाटतात.
✍️ विभावरी कुलकर्णी,पुणे.
२७/५/२०२४
📱८०८७८१०१९७