कर्माचा सिद्धांत…… विश्वास घाणेकर.
कर्माचा सिद्धांत सांगतो की प्रत्येकाला आपल्या कर्माची फळे याच किंवा पुढील जन्मात भोगावी लागतात. यासंबंधी संचित प्रारब्ध व क्रियमाण हे सर्वांना माहीत आहेच. आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे. ब्रह्मांडाची सर्वात पहिल्यांदा जेव्हा निर्मिती झाली तेव्हा हे अनंत आत्मे परमात्म्यानेच निर्माण केले असणार. अर्थात हे आत्मे ब्रह्मांडात प्रथमच अवतरीत झाले असणार. म्हणजेच त्यांच्याकडून काहीही कर्म (पापकर्म अथवा पुण्यकर्म) त्यापूर्वी झाले नसणार. तर मग, जेव्हा ह्या ब्रह्मांडाचे सृजन झाले तेव्हा परमेश्वराने विविध योनी कुठल्या निकषांवर आधारित निर्माण केल्या? हा माझा पहिला प्रश्न.
ब्रह्मांडाची सर्वप्रथम निर्मिती झाल्यावर सर्वप्रथम कोणीतरी काहीतरी पापकर्म केले असेल तेव्हा त्याचा त्रास कोणाला तरी भोगावा लागला असणारच, कारण पापकर्म हे कायम स्वार्थापोटीच केले जाते. एकाने केलेल्या पापकर्माचा परिणाम दुसऱ्याला भोगावा लागतोच.
तर मग माझ्या मनात दुसरा प्रश्न असा निर्माण झाला “की ज्याला एखाद्याने केलेल्या पापकर्माचा त्रास सहन करावा लागला त्याने तर पूर्वी काहीच पापकर्म केलेले नसणार, कारण हे ब्रह्मांड प्रथमच व नुकतेच निर्माण झाले आहे, असा त्रास ज्याला सहन करावा लागला त्याचा ह्या ब्रह्मांडातला पहिलाच जन्म आहे ना? त्याने पूर्वी काही पाप-पुण्यकर्मे केल्याचा प्रश्नच निर्माण होत नाही व म्हणूनच पूर्वकर्माचे फल भोगण्याचा प्रश्नच येत नाही. तर मग त्याला पापकर्मफलाचा जो त्रास सहन करावा लागतो, त्यासारखा त्रास का भोगावा लागला? आणि म्हणूनच कर्माचा सिद्धांत तरी नक्की काय आहे असा प्रश्न मनात आला”
आता एक साधा विचार करुया. मांसाहारासाठी विविध जनावरांची कत्तल केली जाते. तर अशा कत्तल झालेल्या जनावरांनी पूर्वजन्मात असेच काही पाप केले असेल का? किंवा ह्या जन्मी अशी हत्या करणारा माणूस, त्याच्या आयुष्यभर हजारो जनावरांची हत्या करत असावा. बरोबर? तर मग त्याला हे पाप फेडण्यासाठी जनावरांच्या रुपात पुढे अनेक जन्म घ्यावे लागणार का? आणि असे जर असेल तर जनावरांच्या हत्येचे चक्र, कितीही युगे आली/गेली तरी चालूच रहाणार ना?
मानवयोनी ही एकमेव कर्मयोनी आहे, बाकी पशू पक्षी जलचर वनस्पती वगैरे सर्व भोगयोनी आहेत, कारण परमेश्वराने फक्त माणसालाच बुद्धी तत्त्वाची देणगी दिली आहे व त्यामुळे बुद्धीचा वापर करुन मानवयोनी कर्म करु शकते, बाकीच्या योनींमधील जीव फक्त भोग भोगू शकतात, कर्म करु शकत नाहीत. म्हणूनच मानवयोनी कर्मयोनी आहे व बाकी सर्व भोगयोनी आहेत. आणि असं जर आहे तर मग जे कर्म करु शकत नाहीत त्यांना कर्माचा सिद्धांत लागू होतो का?
जेव्हा सर्वप्रथम सृष्टीचे सृजन झाले तेव्हा विविध योनीतील विविध जीव परमेश्वरानेच निर्माण केले. मग काही जीवांना मानवयोनी, काही जीवांना पशुयोनी वगैरे भेदभाव का निर्माण केला? कारण सृष्टी सृजन होतांना विविध योनीत जे जीव निर्माण झाले त्यांना पूर्वजन्मच नव्हता, त्यामुळे पापकर्म किंवा पुण्यकर्म त्यांच्या प्रारब्धात नसणारच. मग तेव्हा कर्माचा सिद्धांत होता का?
द्वापार युगापर्यंत फक्त सनातन धर्म होता. सनातन धर्म, जो कोणी निर्माण केला नाही अथवा तो कधीच नष्ट होणार नाही असा धर्म. पण कलियुगात विविध धर्मांची जी निर्मिती झाली, ती का झाली? विविध धर्मातील लोकांचे आचरण कसे असते ते सनातन धर्माच्या समाजाला माहित आहे. सनातन धर्मी माणसांनी तसे आचरण पूर्वी केले नसणार, तरीही त्या आचरणाचा त्रास सनातन धर्मीयांना का भोगावा लागत आहे?
मी स्वामीभक्त आहे.
परब्रह्म परमेश्वराला मी मानतो. मी पूर्णपणे आस्तिक आहे. माझी परब्रह्म परमेश्वरावर नितांत श्रध्दा निष्ठा आहे. परमेश्वर दिसत नसला तरी त्याचे अस्तित्त्व मी मानतो. त्यामुळे नास्तिक भावनेने मी माझे विचार मांडत आहे असे समजू नका.
कर्माचा सिद्धांत ह्या विषयावर अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत, त्यातली एक दोन पुस्तके मी वाचली आहेत. पण असे विचार कुठल्याही पुस्तकात मला दिसले नाहीत.
मला असे वाटते की कर्माचा सिद्धांत असे आपण ज्याला म्हणतो, ती परमेश्वराने सृष्टी सृजन झाल्यानंतर कालांतराने निर्माण केलेली न्यायव्यवस्था असावी. माणसाने निस्वार्थ व निष्काम भावनेने, कर्तव्य भावनेने आचरण ठेवून, कोणालाही न दुखवता “सर्वभूत हिते रत:” ह्या भावनेने, सर्वांच्या हिताच्या हेतूने, जीव जगताची सेवा करावी, ह्याचसाठी ही न्यायव्यवस्था असावी.
मी फक्त माझे विचार मांडले आहेत. वाद-विवाद करण्यासाठी हे लिखाण केलेले नाही.
|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||
विश्वास घाणेकर.