★★फुलले रे क्षण माझे★★ भाग १ — कथाकार ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे
★★फुलले रे क्षण माझे★★ (१)
सायलीचा टिफिन भरताना वर्षाच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. आज जवळपास पंधरा दिवसांच्या रजेनंतर सायली कंपनीत जात होती. “आई,बस कर आता,इनफ! तो माझ्या लायकीचाच नव्हता म्हणून हे सगळं घडलं.”
“साखरपुडा झाल्यावर हे सगळं घडलं ग…”
“साखरपुडाच झाला होता ना? लग्न नाही. आणि तू अशी सतत आभाळ कोसळल्यासारखी रडू नको. बरं झालं आत्ताच लग्न मोडलं. असल्या नेभळट, हिम्मत नसलेल्या माणसाबरोबर मला संसार करायचाच नव्हता. सायलीने रागातच टिफिन पर्समध्ये टाकला आणि ती कंपनीत जायला निघाली.
कंपनीच्या बसमध्ये सायली बसली. आईला त्वेषाने,रागात ती बोलली तर होती पण आता तिचे डोळे भरून यायला लागले होते. लग्नाला केवळ दीड महिना राहिला असताना आर्यनने लग्न मोडलं होतं. तिचं लग्न मोडलं बसमधले कंपनीच्या तिच्या सगळ्या कलीगना कळलं होतंच. तिला कुणाचीही सहानुभूती नको होती. ती आज बोलायचं टाळतच होती. इतका मोठा अपमान पचवणं तिला जड जात होतं.
“सायली,आज संध्याकाळी मुव्हीला जाऊया का? परस्पर कंपनीतुनच जाऊ. काकूंना कळवून दे.” नेहा तिच्या बाजूच्या सीटवर बसत म्हणाली.
“नको ग,मूड नाहीय.”
“किती दिवस मूड कुरवाळत बसणार आहेस? बाहेर पड त्यातून आता! तो तुझ्यासाठी योग्य नव्हताच. मी ऑनलाइन तिकिटे बुक करतेय. यु हॅव टु कम.”
थिएटरमध्ये सुद्धा सायलीच्या डोक्यात आर्यनबद्दलचा राग उफाळून येत होता. चित्रपटात लक्षच लागत नव्हतं. घरी आल्यावर सरळ झोपेची गोळी घेऊन ती झोपली.
*
वर्षाने टेबलवर चहाचे मग ठेवले आणि काळजीनेच बोलली,” सायली कंपनीत जायला तर लागली आहे पण आतून अस्वस्थ आहे. चिडचिड करतेय.”
“हं! तिला आपणच समजून घ्यायला हवं. वर्षा, मागच्या आठवड्यात आपल्या घरी येऊन गेलेला माझा शाळेचा मित्र दिलीप आणि त्याचा मुलगा स्वराज तुझ्या लक्षात असतीलच. ओळख करून देण्यापुरती मी सायलीला बोलावलं होतं. दिलीपला सायली आवडली आहे. स्वराजसाठी मागणी घातलीय त्याने! आणि त्याला सायलीचं लग्न मोडलं आहे,ही कल्पना मी दिली आहे.” प्रशांत वर्तमानपत्र बाजूला ठेवत म्हणाला.
“मग? त्यांनी तरीही सायलीला मागणी घातली?”
“सायलीचं लग्न मोडलं,ह्यात तिची काहीच चूक नाहीय. आणि ते कळण्याइतका तो समंजस आहे.”
“प्रशांत,आत्ता हा विषय तरी तिच्याजवळ काढू शकतो का आपण? तिची अवस्था तुला दिसतेय ना?”
“सगळं मान्य आहे. पण दिलीपला मी लहानपणापासून ओळखतो. आज जे काही त्याचं ऐश्वर्य आहे,ते त्याने स्वतः कष्ट करून कमावलं आहे. स्वराजने ते वाढवलं. मी कित्येकवेळा कोल्हापूरला त्याच्या घरी जाऊन आलो आहे. स्वराज देखील अतिशय संस्कारित आहे. एकच गोष्ट त्याच्यात कमी आहे,आणि ती म्हणजे तो फक्त बी कॉम आहे. पण आज दिलीपचा व्यवसाय त्याने दुपटीने वाढवला आहे. कोल्हापूरमध्ये त्याला अतिशय मान आहे. एक मोठा इंडस्ट्रीऍलिस्ट म्हणून तर आहेच पण एक उत्तम व्यक्ती म्हणूनही त्याचं कोल्हापूमध्ये नाव आहे. अशा घरात सायलीला आनंदच मिळेल.”
“सायली फक्त ग्रॅज्युएट झालेल्या मुलाशी लग्न करणार? प्रशांत,ती इंजिनिअर आहे. किती कमावते आहे.”
“आर्यन एम बी ए होता. इतका उच्चशिक्षित होता ना? काय झालं?”
“नकोच हा विषय! मला तर काही सुचेना झालंय.” वर्षा टेबलवरून उठून गेली.
*
“आई,मला कंपनीच्या कामासाठी कागलला जावं लागेल आठ दिवस! कंपनीचे रेस्ट हाऊस आहे तिथे मी राहणार.”
आठ दिवस पुरेल इतका चिवडा,लाडू वर्षाने सायलीला पॅक करून दिले.
“सायली,एक सुचवू का? कागलला चाललीच आहेस तर दिलीपकाकांना भेटून ये. त्यांच्यासाठी पण चिवडा,लाडू देते.”
“आई,मला नाही ते सांगू नकोस. मला नाही जमायचं. मी कामाला चालली आहे. मला कुणालाही भेटायची इच्छा नाही.”
सायलीच्या कलानेच थोडे दिवस घ्यायचं असं वर्षाने ठरवलं. तिने मग फार आग्रह केलाच नाही. पण सायली कागलला गेल्यावर प्रशांतने वर्षाला सांगितलं,”सायली कामासाठी कागलला येतेय,हे दिलीपला कळवलं आहे मी. तो तर म्हणाला की त्याच्याच घरी सायलीला राहू दे. कोल्हापूरपासून कागल काही फार लांब नाही. घरची गाडी आणि ड्रायव्हर तिला दिला असता.”
“छे हो,असे कसे उगाच त्यांचे उपकार घेणार? तुमचा बालमित्र असला म्हणून काय झालं? मी देखील त्यांना एकदोनदाच भेटले आहे. सायली तर कोणालाच ओळखत नाही. ती कंपनीच्या रेस्ट हाऊसमध्ये राहणार आहे. तेच ठीक आहे.”
*
कागलच्या कंपनीचे रेस्ट हाऊस छान होते. प्रशस्त,हवेशीर! आर्यनचा राग सायलीच्या डोक्यातून जात नव्हता. निदान आठ दिवस तरी पुण्यापासून लांब! शिवाय रेस्ट हाऊसपासून कंपनी पण फारशी लांब नव्हती आणि सायलीला घ्यायला कंपनीची गाडी येणारच होती. सकाळी आठला सायली बाहेर आली तर गाडी तिला घ्यायला आली होती. कंपनीत गेल्यावर दिवसभर कामात कसा वेळ गेला सायलीला कळलंच नाही. संध्याकाळी थकून ती गाढ झोपली.
कागलला येऊन पाच दिवस होऊन गेले होते. एक दिवसाचं काम बाकी होतं, ते झालं की पुण्याला परतायचं होतं. कंपनीत दुपारचा चहा घेतला आणि सायलीला जरा कणकण वाटली,थकल्यासारखं वाटलं. पुण्याला लगेच परतावं असं तिच्या मनात आलं. ती बॉसच्या केबिनमध्ये गेली.
“सर, आय एम नॉट फीलिंग वेल. माझं काम तसंही झालं आहे. मी पुण्याला परत जाऊ शकते का?”
“येस सायली,यु हॅव डन अ गुड जॉब.पण तुम्ही बरं नसताना प्रवास कसा करणार? आज रेस्ट हाऊसवर विश्रांती घ्या. उद्या जा.”
“थँक्स सर.”
रेस्ट हाऊसवर सायली परतली तेव्हा ताप जास्त वाढला. तिच्या अंगात थंडी भरून आली. डोळ्यावर झापड होती. तिने वर्षाला फोन लावला,”आई,मला जरा ताप चढलाय. तू आणि बाबा कारने मला घ्यायला उद्या कोल्हापूरला येऊ शकता का? मला एकटीला प्रवास नको वाटतोय. आणि तू लगेच काळजी करत बसू नको. औषध घेतलं की होईन मी ठीक.”
“काळजी करू नको म्हणजे काय?काळजी तर वाटणारच ना! बाबा टूरवर गेले आहेत. उद्या रात्री परत येतील. परवा आम्ही लगेच निघतो आणि मी दिलीप भावजींना कळवते आहे. तू एक दिवस त्यांच्या घरी रहा,म्हणजे मला इथे निर्धास्त वाटेल.”
“आई,नको ग! मी तिथे कोणालाही ओळखत नाही. इथेच रेस्ट हाऊसमधेच राहते.”
“ओळखत नाही काय? तुझी भेट तर झालीच आहे. आणि दिलीपकाका आपल्या घरी कितीतरी वेळा येऊन गेले आहेत.”
“हो,पण मला संकोच वाटेल.”
“ते काही नाही. मी काकांना फोन करते आहे.” वर्षाने सायलीला पुढे बोलूच दिलं नाही.
दोन तासाने रेस्ट हाऊसचा अटेंडन्टने सायलीला निरोप दिला,”मॅम, स्वराज देशमुख आपल्याला भेटायला आले आहेत.”
सायलीला आश्चर्य वाटलं. स्वराज? म्हणजे दिलीपकाकांचा मुलगा? एकदा घरी आला होता तेव्हा त्याला बघितलं होतं. सायली बाहेर आली. स्वराज पेपर चाळत होता.
“हाय!मी सायली.”
स्वराजने मान वर करून बघितलं. हातातला पेपर टेबलवर ठेवला.
“हॅलो! मी स्वराज! आपली एकदा भेट झाली आहे पण फारच ओझरती! मी कामासाठी आज दिवसभर कागलमध्येच होतो. बाबांचा फोन आला होता. तुम्ही आजारी आहात म्हणून घरी घेऊन ये म्हणाले.”
“बॅग घेऊन येते.” सायली स्वराजकडे बघत म्हणाली.
“चालतंय की!” स्वराज म्हणाला.
त्याचं टिपिकल कोल्हापुरी ‘चालतंय की’ ऐकून सायली मनातच हसली.
क्रमशः
छान आहे.