मनोरंजन

★फुलले रे क्षण माझे★ (२)   कथाकार ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे

★फुलले रे क्षण माझे★ (२)

 

स्वराजने गाडीचं लॉक काढलं. सायली आत बसली. ती सीटबेल्ट लावताना स्वराजने तिला विचारलं,”हीटर ऑन करू का? तुला थंडी वाजतेय असं वाटतंय.”

“नको,तुला गरम होईल.”

स्वराजने त्याच्या अंगातले जीन्सचे जॅकेट काढून सायलीला दिले.

“प्लिज घाल. थंडी भरून आली तर ताप वाढेल.”

सायलीने ते जॅकेट घातलं आणि तिने सीटवर डोकं टेकवलं.

“सायली,तू झोप. कोल्हापूर यायला अर्धा तास तरी लागेल. ट्रॅफिक असला तर जास्त. तुझी एक छान झोप होईल.”

 

सायलीने डोळे मिटले. दहा मिनिटातच ती गाढ झोपली. स्वराजने तिच्याकडे बघितलं. त्याच्या मनात विचार सुरू झाले. काही दिवसांपूर्वी बाबा त्याच्याशी बोलले ते आठवलं.

 

“स्वराज,सायली कशी वाटली तुला?”

“कोण सायली बाबा?” स्वराजने दिलीपकडे प्रश्नार्थक नजरेने बघितलं.

“प्रशांतकाकांची मुलगी! त्याच्या घरी गेलो होतो तेव्हा तू तिला बघितलं होतंस.”

“ओह! सायली सुंदरच आहे. शिवाय शिकलेली.”

“माझी सून म्हणून कशी वाटली तुला?”

“बाबा,का चेष्टा करताय? सरळ विचारा की तुला बायको म्हणून आवडेल का?” स्वराज हसत म्हणाला.

“सायलीत न आवडण्यासारखं काय आहे बाबा? पण तुमच्या मनात हा विचार आलाच कसा? ती इंजिनिअर आहे माहितीय ना तुम्हाला? ती मला होकार देणं शक्यच नाही.”

“मी आणि प्रशांत बालमित्र आहोत. दोघेही एकमेकांना चांगलेच ओळखतो. तुझी आई अचानक हे जग सोडून गेली तेव्हा प्रशांत माझ्याजवळ आठवडाभर राहिला होता. वहिनी देखील भेटून गेल्या होत्या. तुझ्या संगोपनाची जबाबदारी तुझ्या मावशीने घेतली,नाहीतर प्रशांत मला तेव्हा म्हणाला होता की स्वराज जाणता होईपर्यंत मी त्याची जबाबदारी घेतो. असा मित्र विरळाच! तू सांगलीला मावशीकडे गेलास आणि मी स्वतःला कामात झोकून दिलं. इतकं की मनात कुठल्या विचारांना यायला वावच दिला नाही. त्यावेळी प्रशांतने मला मानसिक आधार खूप दिला. वेळोवेळी फोन करून माझी आणि तुझी चौकशी करायचा. तुझं संगोपन मावशीने उत्तम केलं. बारावीनंतर तुला तुझ्या मनाप्रमाणे कुठला मार्ग निवडायचा ह्याची तुला मी पूर्ण मुभा दिली होती. वयाच्या आठव्या वर्षांपासून तू सतार शिकत होतास. तुझं कलेचं वेड मला माहिती आहे. बारावीनंतर मी तुला कोल्हापूरला आणलं. तू कॉमर्सकडे जायचं म्हणल्यावर मी आनंदाने परवानगी दिली. हळूहळू तू आपल्या व्यवसायात लक्ष घालायला लागला. तुझं शिक्षण, तुझं सतारचं वेड आणि आपला व्यवसाय ह्याचा समन्वय छान साधलास. आय एम प्रौड ऑफ यु माय सन! एक उत्तम व्यक्ती म्हणून तू घडला आहेस. सायलीला बघितलं आणि मनात आलं,प्रशांतला विचारावं!”

“बाबा,तिची हरकत नसेल तर सायली लाईफ पार्टनर म्हणून मला आवडेल. पण तिच्यावर कुठलीही सक्ती नको. मनापासून तिची इच्छा असेल तरच! तुमच्या दोघांची मैत्री ह्यात येता कामा नये. आमच्या दोघांच्याही आयुष्याचा तो महत्वाचा निर्णय आहे.”

“छे छे,सक्ती अजिबात नाही रे! पण सायली आवडली मला. साधी वाटली.”

“गो अहेड बाबा!”

 

सायलीच्या कण्हण्याचा आवाज स्वराजला आला. त्याने तिच्या कपाळावर हात ठेवला. ताप चढत होता. त्याने हळूच गाडीतलं हीटर ऑन केलं. कोल्हापूर आलं होतं. घरी पोहोचायला पंधरा मिनिटं तरी लागणार होती. स्वराजने दिलीपला फोन लावला.

“बाबा,पंधरा मिनिटात पोहोचतोय.”

कारची स्पीड वाढवत स्वराज कोल्हापुरात शिरला.

 

गेटच्या आत स्वराजने गाडी घेतली. सायली दचकून जागी झाली

“रिलॅक्स सायली! घर आलं आहे. तू आता लगेच रूममध्ये जाऊन विश्रांती घे. मी डॉक्टरांना फोन करतो. स्वराज गाडीतून उतरला. त्याने सायलीला हात देऊन गाडीतून उतरवलं.

“शिवा, गाडी आत लाव आणि मॅडमचं सामान आत घेऊन ये.”

“जी मालक.” शिवाने गाडीची किल्ली घेतली.

 

सायलीचा हात धरत स्वराजने हळुवार तिला घरात आणलं. सायलीला प्रचंड थकल्यासारखं झालं होतं. चार पावलं सुद्धा चालायला नको वाटत होतं. दिलीप दारातच उभे होते.

“सायली वेलकम बेटा! तू सरळ गेस्ट रूममध्ये जाऊन आराम कर. आपण नंतर निवांत बोलू. स्वराज,तिला घेऊन जा.”

 

सायलीने एकवार घरावर नजर फिरवली. एवढं ऐश्वर्य तिच्या बघण्यात आलं नव्हतं. अतिशय सुंदर,सुबक बंगला आणि तितकंच सुंदर इंटिरिअर! कलासक्त नजर जाणवत होती. इतकी श्रीमंती असून दिलीपकाका आणि स्वराज दोघेही किती साधे होते. अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले तिने अनेक बघितले होते. सायलीला स्वराजने रूममध्ये आणलं. तिच्यासाठी कपाटातून रजई काढली.

“सायली,मी डॉक्टरांना फोन करतो. तू निवांत आराम कर.”

स्वराज रूमच्या बाहेर गेला आणि सायली कॉटवर आडवी झाली. नाकातून आणि कानातून उष्ण वाफ येत होती. डोकं ठणकत होतं. अस्वस्थ वाटत होतं. इतका थकवा का यावा? आईला फोन करावा असं तिला वाटलं पण जरा वेळाने करू म्हणून ती रजई घेऊन झोपली.

 

स्वराज डॉक्टरांना फोन करून सायलीच्या रूममध्ये आला तर ती गाढ झोपली होती. तिचा तो निरागस चेहरा बघून त्याला तिच्याबद्दल सहानुभूती वाटली. सायलीला मागणी घातल्यानंतर बाबांचं आणि त्याचं बोलणं आठवलं.

 

“स्वराज, आज प्रशांतशी फोनवर बोललो. सायलीला सून करून घ्यायला आवडेल असं सांगितल्यावर,त्याने जे सांगितलं ते ऐकून मला धक्काच बसला आहे.”

“काय झालं बाबा?”

“सायलीचं लग्न ठरलं होतं. साखरपुडा देखील झाला होता. पण त्या मुलाने आता नकार दिला आहे.”

स्वराजचा राग उफाळून आला, “एक कोल्हापुरी शिवी तोंडात आली बाबा,पण आवरलं स्वतःला! कारण काय?”

“त्या मुलाचं एका परजातीच्या मुलीवर प्रेम होतं पण वडिलांचा अतिशय धाक म्हणून घरी सांगायची हिंमत झाली नाही. त्या मुलीने आत्महत्येची धमकी दिल्यावर ह्याने घरी सांगितलं. घरच्यांना नाईलाजाने होकार द्यावा लागला. आणि सायलीला नकार दिला.”

“च्या…माझं तोंड आवरतो. असल्या पुळचट माणसाशी सायलीचं लग्न झालं नाही ते बरंच आहे. इतकी देखणी,हुशार मुलगी. शी डीझर्वज् द बेस्ट!”

“हो,पण हे सगळं ऐकल्यावर देखील मी तुझ्यासाठी सायलीला मागणी घातलीच. पण वहिनी आणि प्रशांत तिच्याशी ह्या विषयावर सध्या बोलू इच्छित नाहीत. ती ह्यातून बाहेर पडायला वेळ लागेल.”

“बाबा,तुम्ही माझ्यासाठी सायलीला मागणी घातली,हे सायलीला माहिती आहे?”

“नाही! तिला काहीच कल्पना नाही.”

“तिला कळू पण देऊ नका. आपण तिच्यावर उपकार करतोय अशी तिची भावना होईल. फरगेट इट. ”

 

सायलीने कुस बदलली आणि ती परत कण्हली. स्वराज तिच्याजवळ आला. तिला हाक मारली. सायलीने डोळे उघडून बघितलं.

“सायली, ही डोलो ची गोळी डॉक्टरांनी आत्ता घ्यायला सांगितली आहे. रात्री ते व्हिजिटला येतील.”

 

सायलीला गोळी देऊन स्वराज तिच्या रूमच्या बाहेर पडला. सायलीबद्दल इतकी आपुलकी का वाटतेय हे त्याचं त्यालाच कळत नव्हतं…..

क्रमशः

©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे

 

Related Articles

3 Comments

  1. सौ. मधूर यांच्या कथा लेखन अप्रतिम, आवडल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}