मनोरंजन

★फुलले रे क्षण माझे★ (3)   कथाकार ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे

★फुलले रे क्षण माझे★ (३)

सायलीला पहाटे जाग आली ती सतारीच्या मंजुळ,सुरेल स्वरांनीच! तिने घड्याळात बघितलं. पहाटेचे साडे पाच वाजले होते. काल डॉक्टर येऊन व्हिजिट देऊन गेले होते. त्यांनी दिलेल्या गोळ्यांनी ग्लानी आल्यामुळे ती रात्री नऊ वाजताच झोपली. ती कॉटवरून उठली. अजून थंडीची शिरशिरी जाणवत होती आणि थकवा चांगलाच होता. स्वराजने दिलेली शॉल तिने अंगाभोवती लपेटली. सायली खोलीच्या बाहेर आली आणि स्वरांचा मागोवा घेत एका खोलीपाशी थांबली. खोलीचं दार अर्धवट उघडं होतं. तिने हळूच लोटून बघितलं. म्युझिक रूमच होती. स्वराज डोळे मिटून सतार वाजवत होता. कपाळावर उभं गंध,अंगावर शॉल आणि तल्लीन होऊन सतारवादन! एखाद्या संगीत देवतेसारखा तो भासत होता. त्याचं पिळदार शरीर,देखणी मुद्रा सायली टक लावून बघत होती. वाजवता वाजवता स्वराजने डोळे उघडले आणि समोर सायली दिसली. तो झटकन वाजवायचं थांबला.    “गुड मॉर्निंग सायली! तुझी झोपमोड झाली का?”

“का थांबलास? वाजव की! किती दिवसांनी इतकी प्रसन्न सकाळ अनुभवली.” सायलीच्या डोळ्यात पाणी तरळलं.

स्वराजने सतार खाली ठेवली. सायलीच्या मनाची घालमेल त्याला चांगलीच कळली पण तिच्यासमोर तसं दाखवायचं नव्हतं. तिचं लग्न मोडलं आहे, हे त्याला ठाऊक असलं तरी ती अनभिज्ञ होती.

“रोज पहाटे रियाज करतोस?” सायलीने डोळ्यातलं पाणी डोळ्यातच जिरवलं.

“हो, पहाटे चार वाजता उठतो. फिरायला जातो. घरी आल्यावर योगासनं,नंतर आंघोळ करून रियाज! पण तू का इतक्या पहाटे उठलीस? आराम कर. ताप आहे का अजून?” स्वराजने सायलीच्या कपाळावर हात ठेवला. “अजून थोडा वाटतोय. आज सकाळी तुझं ब्लड सॅम्पल घ्यायला येतील. संध्याकाळी रिपोर्ट मिळेल. प्रशांतकाका आणि काकू उद्या येताहेत ना तुला घ्यायला?”

“नाही,बाबांचा टूर एक दिवस लांबलाय. परवा येतील.”

सायलीचं ते वाक्य ऐकून स्वराज सुखावला. अजून एक दिवस सायलीचा सहवास मिळणार होता.

“तू आराम कर. मी सुमाताईंना तुझ्या खोलीत चहा पाठवायला सांगतो.”

“नको,आराम करून आता कंटाळा आलाय. काका उठले का?”

“हो,बाबा पण लवकरच उठतात. बागेत झोपाळ्यावर असतील बघ चहा घेत! त्यांची ती आवडती जागा आहे. उठल्यावर तासभर ते तिथेच असतात. चहा,पेपर वाचन सगळं झालं की मग आत येतात. पहाटे अंधार असतो म्हणून बागेत मोठा लाईट लावून घेतलाय.”

“अरे वा! मी फ्रेश होऊन बागेत जाते.” सायली खोलीकडे जायला वळली.

स्वराजच्या मनात आलं,सायलीशी बोलावं, तिला ह्या परिस्थितीतून बाहेर यायला मदत करावी पण एक दिवसाच्या ओळखीवर सायलीला हे रुचेल का अशी त्याला शंका आली.

सायली फ्रेश होऊन बागेत आली. विविध फुलांची झाडं बघून ती हरखून गेली. एक एक झाड न्याहाळत ती झोपाळ्यापाशी आली. दिलीप पेपर वाचनात दंग होते.

“काका!”

“सायली तू इथे? अग थंडीची बागेत का आलीस? काल केवढी तापली होतीस. बस इथे.”

“काका,आज स्वराजच्या सतार वादनाने पहाटे जाग आली. किती सुंदर वाजवतो.”

“हो,ते त्याचं पॅशन आहे. तो जाहीर कार्यक्रम पण करतो. फार लहान असल्यापासून शिकत आलाय. त्याची ही आवड जोपासण्यासाठी मी त्याला पूर्ण सहकार्य केलं त्यामुळे त्याचं शिक्षण फार नाही.”

“शिक्षणाने माणसं सुज्ञ होत नाहीत काका.” सायली सुस्कारा सोडत म्हणाली.

दिलीपने लगेच विषय बदलवला.

“सायली, मला प्रशांतचा फोन येऊन गेला. परवा येतोय ना? बरं झालं,तुला जरा विश्रांती मिळेल.”

“काका,मी तुम्हाला फार तर दोनतीनदा भेटले असेल पण मला तुमच्या घरात अजिबात परकं वाटत नाहीय. इथे पाऊल ठेवल्यापासून आपलेपणा जाणवतोय.”

“तू परकी आहेसच कुठे? तू मला मुलीसारखीच ग! तू आता आत जा, थंडी बाधेल. आज पूर्ण दिवस अजिबात उठू नकोस. माझ्या घरी अनेक पुस्तकं आहेत. तुला वाचायला देतो.”

“काका, स्वयंपाक कोण करतं?”

“सुमाताई,सकाळी सहा वाजताच येतात,त्या संध्याकाळी सहा पर्यंत असतात. दोन्ही वेळेचा स्वयंपाक, सगळी कामं करतात. जवळच राहतात. कधीही वाटलं तर त्यांना बोलावता येतं.

” काका,आज मी त्यांना मदत करू?”

“अजिबात नाही. तू आज फक्त आराम करायचा.”

सायली हसली. “तुमच्याबरोबर एक कप चहा घेते आणि मग आराम करते.”

“अवश्य!” दिलीपने सुमताईंना हाक मारली.

 

सकाळी आठ वाजता सायलीचं ब्लड सॅम्पल घ्यायला लॅब मधला माणूस येऊन गेला. ब्रेकफास्ट करून सायली खोलीत आली. तिने वर्षाला फोन लावला.

“आई, आज मला खूप बरं वाटतंय.इथे अजिबात परकं वाटत नाहीय ग! काका आणि स्वराज माझी खूप काळजी घेताहेत.”

“माझी काळजी मिटली ग! तिथे रेस्ट हाऊसमध्ये एकटी असतीस तर मला इथे चैन पडली नसती.”

“पण तुम्ही परवा नक्की या हं! असं इथे इतकं राहणं मला योग्य वाटत नाही.

“हो हो,परवा येतोच.”

 

संध्याकाळी सायलीला घेऊन स्वराज क्लीनिकमध्ये गेला. तिच्या ब्लड सॅम्पलचा रिपोर्ट आला होता. हिमोग्लोबिन खूपच कमी झालं होतं.

“हॅलो यंग गर्ल! हिमोग्लोबिन फारच कमी झालंय. आर यु अंडर एनी स्ट्रेस? डोळ्याखाली सर्कल पण आली आहेत. रिलॅक्स अँड एन्जॉय लाईफ! तुमच्या पिढीला जॉब स्ट्रेस खूप असतो, मान्य आहे मला! पण एखादा छंद जोपास. त्यातून पिस ऑफ माईंड मिळतो. मी गोळ्या लिहून देतोय. महिनाभर घे आणि पुण्याला गेल्यावर एकदा परत ब्लड टेस्ट करून घे.”

घरी आल्यावर विसरू पाहणारं नको ते सायलीच्या डोक्यात परत यायला लागलं. डॉक्टर खरंच तर बोलले होते. आर्यनने जे काही केलं होतं, ते विसरून जाणं तिला शक्य होत नव्हतं. ती कॉटवर आडवी झाली परत डोक्यात विचारांनी कल्लोळ माजला. डोळ्यात पाणी जमा झालं. कानातून गरम वाफा यायला लागल्या. सायलीने तोंडावर पांघरूण घेऊन अश्रूंना वाट मोकळी केली. स्वराजची हाक आली तसे तिने पटकन डोळे पुसले आणि पांघरूण चेहऱ्यावरून खाली केलं.

“सायली, गरम गरम सूप घे. घशाला बरं वाटेल आणि सुमाताईंनी तुझ्यासाठी मऊ खिचडी केली आहे,ती खाऊन औषध घेऊन झोप. ताप उतरला तरी तुझा थकवा काही दिवस राहीलच.”

“स्वराज,तू कशाला आणलं? मी आले असते डायनींग टेबलवर.”

“ओह! कमॉन सायली,त्यात काय! मी मावशीकडे वाढलो ना ग! तिला अशीच सवय आहे. ती सगळ्यांना हातात नेऊन देते. तीच सवय मला आहे.”

“तुझी बायको फारच लकी मग!” सायली हसत म्हणाली.

स्वराजने सायलीकडे बघितलं. तिचा तो मलूल पण गोड चेहरा बघून मनात म्हणाला…”सायली,तू होशील माझी बायको?”…..

क्रमशः

©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}