आपली आवडती लेखिका – सौ मधुर कुलकर्णी यांच्या लेखणीतून साकारलेली ★ही वाट वळणाची (१)★

युनिटी एक्स्प्रेशन ची अत्यंत प्रसिद्ध आणि आपली आवडती लेखिका – सौ मधुर कुलकर्णी यांच्या लेखणीतून साकारलेली
★ही वाट वळणाची (१)★
★स्वप्ना★
तुफान पावसात उलटी झालेली छत्री सावरत मी बसमध्ये चढले. आज कॅब सुद्धा मिळत नव्हती. ओव्हरटाईममुळे मला निघायला उशीर झाला होता. छत्रीचा काहीही उपयोग होत नव्हता. तिरपा पाऊस,सुसाट वारं सगळं शरीर ओलचिंबं करून गेलं.बसमध्ये बसायला पण जागा नव्हती. थंडीने शहारत तशीच नको ते स्पर्श घेत उभी राहिले. इतक्यात माझ्या बाजूच्या सीटवरून एकजण उठला आणि मला बसायला जागा दिली. मी त्याच्याकडे बघत थँक्स म्हणत सीटवर बसले. त्याचे डोळे नकळत मनात भरले. काळ्याला निळी किनार असावी असे,स्वप्नाळू,गहिरे! माझा स्टॉप आला आणि मी उठले,त्या तरुणाला नजरेनेच ‘बसा’ म्हणून सांगितले. त्याला एक स्माईल देऊन मी बसमधून उतरले.
घरी आल्यावर आलं घालून गरम चहा घेतला तेव्हा कुठे थंडी कमी झाली. टॉवेलने केस पुसताना मला अचानक ते बसमधले डोळे आठवले. म्हणजे इतका वेळ ते डोळे माझा पाठलाग करतच होते. काहीतरी आतून दुःख असावं असे ते डोळे! मी विचार झटकले. खरं तर रस्त्यावर रोज हजारोने माणसं बघत होते पण आजवर असं झालं नव्हतं.
“स्वप्ना,आज भांडीवाली पगार मागत होती.” आईचं हे वाक्य ऐकलं आणि मी दचकले. तिची ती आशाळभूत नजर बघून मला त्या क्षणी चीडच आली.
“स्वरा कुठे गेलीय? तिची परीक्षा जवळ आलीय ना? अभ्यास करायचं सोडून कुठे भटकत बसलीय?” मी आईवर उगाचच चिडले.
“स्वरा तिच्या खोलीत अभ्यासच करतेय ग! तुला दिसली नाही का?” आईने आश्चर्याने विचारलं.
“असेल,माझं लक्ष नव्हतं. बाईंना सांग पगार झाला की देते. आज पगार झाला नाही. आणि आम्ही कुठे पळून जात नाहीय सांग त्यांना! तुमचे पैसे तुम्हाला मिळतील.”
ही अशी चिडचिड हल्ली माझी हल्ली फार होत होती. आईशी उद्धटपणे बोलणं वाढलं होतं. माझ्या जीवावर सगळं घर चाललंय ही भावना माझा अहंकार वाढवत होती. आईचा चेहरा बघून एकदम गलबलून आलं. जी परिस्थिती आलीय त्यात तिचा काय दोष होता? बाबा किरकोळ आजाराचं निमित्त होऊन आम्हाला अकाली सोडून गेले. त्यांच्या कंपनीमध्ये मला त्यांच्या जागी घेतलं होतं. माझं कॉमर्स ग्रॅज्युएट झालं होतं. पुढे शिकायचं माझं स्वप्न पूर्ण होणार होतं का माहिती नव्हतं. स्वरा बीएससीच्या पहिल्या वर्षाला होती. माझ्या तरुण वयात माझ्यावर ही अचानक जबाबदारी आल्यामुळे कधीतरी चिडचिड व्हायची.
जरा वेळाने शांत झाले आणि आईवर उगाच ओरडले ह्याची जाणीव झाली. स्वराशी थोडावेळ बोलले आणि जेवून झोपायला गेले. उद्या ऑफिसमध्ये ऑडिट,म्हणजे दिवसभर मी व्यस्त! कॉटवर आडवी झाले आणि डोळे मिटले तर तेच गहिरे डोळे माझ्या डोळ्यासमोर आले. मी त्या डोळ्यांच्या इतकी का प्रेमात पडले होते? बाबा गेल्यावर आई आणि स्वराची जबाबदारी माझ्यावर आहे ही पूर्ण जाणीव ठेवून मी ह्या तारुण्यसुलभ भावनांपासून लांब राहिले होते. पण आज असं का होतंय? का माझं मन असं विचलित होतंय? नाही,नाही…माझ्या मनावर मला संयम ठेवायलाच हवा. ह्यापेक्षा चांगली नोकरी मिळावी ह्यासाठी मला पुढे शिकायचं होतं. माझ्या मनावर माझ्या हृदयाने कब्जा घेऊ नये हा निश्चय करतच मी झोपायचा प्रयत्न करू लागले.
**
आज बसमध्ये बऱ्याच सीट्स रिकाम्या होत्या. मी खिडकीची जागा धरून बसले. इतक्यात माझ्या बाजूला कोणीतरी येऊन बसलं. मी वळून बघितलं तर…तेच डोळे गहिरे पण दुःख लपवणारे! मी त्याच्याकडे बघून हसले.
“रोज उभं राहून जावं लागतं, आज जागा मिळाली.” तो बोलला.
“म्हणजे? तुम्ही रोज ह्या पावणे नऊच्या बसमध्ये असता का?”
“हो,रोज बघतो तुम्हाला! माझंही ऑफिस ह्याच मार्गावर आहे. तुमच्या पुढचा एक स्टॉप!”
मी जास्त संवाद वाढवलाच नाही. पण त्याचं असं जवळ येऊन बसणं मला आवडलं. कुठल्याही पुरुषाला सहज दाद न देणारी मी,पण ह्याचं बोलणं हवंहवंसं वाटत होतं. माझा स्टॉप आला आणि उतरण्यासाठी उभी राहिले. तो देखील माझ्याबरोबर बसच्या दाराकडे चालायला लागला.
“तुमचा स्टॉप पुढचा आहे ना?” मी विचारलं.
“हो,तिथून चालत जाईन,फार लांब नाही.तुमच्याशी तेवढ्याच गप्पा होतील. आपण सहप्रवासी आहोत.”
“तुम्ही घरी परतताना पण माझ्याच बसमध्ये असता?” मी धीटपणे विचारलं.
“कधीतरी! पण सकाळी निघताना मात्र मी तुमची बस चुकवत नाही. तुम्ही येईपर्यंत स्टॉपवर उभा असतो. गैरसमज करून घेऊ नका. पण मैत्रीचा हात पुढे करावासा वाटला,म्हणून काल हिम्मत केली.”
माझ्यासाठी हा एक स्टॉप आधी उतरला होता? मी भांबावले. जे घडतंय ते चुकीचं आहे पण मी त्याला अजिबात विरोध केला नाही. का? ते मला पण कळलं नव्हतं….!
**
ऑडिट व्हायच्या आधीचे पंधरा दिवस आणि ऑडिटचे हे दोन दिवस फार दमणूक झाली होती. मला दोन दिवस चेंज हवा होता. ऑफिसमधून बाहेर पडताना श्रुती भेटली. माझी सगळ्यात जवळची सहकारी! माझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठी होती. माझी जिवलग मैत्रीण तर होतीच पण त्याहून जास्त मोठ्या बहिणीची माया करत होती. घरच्या प्रोब्लेम्समुळे मी कधी कधी वैतागून जायचे. श्रुती मला शांत करायची. “स्वप्ना, हे दिवसही जातील. प्रत्येकाच्या आयुष्यात एक वाईट काळ असतोच,तुझा आत्ता आहे असं समज. पुढे सगळं चांगलं होणार आहे.” तिच्या ह्या शब्दांनीच मला खूप धीर यायचा.
“श्रुती,उद्या सिनेमाला जाऊया का ऑफिस संपल्यावर?चेंज हवाय ग! तुझ्या नवऱ्याची परमिशन काढ ना!”
“नवऱ्याची काय परमिशन काढायची? तो मला कुठल्याच गोष्टीला नाही म्हणत नाही. विश्वास आहे ग आमचा एकमेकांवर! मी काही चुकीचं करणार नाही आणि तो देखील करणार नाही,ह्याची आम्हा दोघांनाही खात्री आहे. पण ते जाऊ दे! मीच तुला विचारणार होते की दोन दिवस चेंज म्हणून माझ्याकडे येतेस का? नवरोबा गेलेय टूरवर!”
“आजच रात्री येते. दोन दिवस मज्जा करू. घरी जाऊन दोन ड्रेसेस घेऊन येते.”
श्रुतीला बसमधल्या त्या तरुणाबद्दल सांगू का? पण काय सांगू? असं घडलंच काय आहे? फक्त चार शब्दांची देवाण घेवाण,ह्यापलीकडे काहीच तर नाही. नको,इतक्यात काहीच बोलायला नको. मी श्रुतीला बाय करून स्टॉपवर आले. तेच दोन डोळे माझी प्रतीक्षा करत होते. मी तिथेच थबकले. हे इथेच थांबवायला हवं. माझ्यावर स्वराची जबाबदारी आहे. पण तो माझ्या जवळ आला आणि म्हणाला,
“आज थोडं चालत जाऊया का? ओळख होईल!”
मी काहीच बोलले नाही. फक्त त्याच्या नजरेत नजर मिळवली. माझ्या नजरेत त्याला काय दिसलं माहिती नाही,तो म्हणाला, “चल!”
मी काही न बोलता चालायला लागले. ह्याने मला संमोहित केलंय का? का मी अशी वागतेय?
“कोण कोण असतं घरी?” त्याने विचारलं.
मी भानावर येऊन त्याच्याकडे बघत म्हणले,”मी,आई आणि छोटी बहीण! वडील वर्षापूर्वी गेले. नोकरीत त्यांच्या जागेवर मी लागले.”
“नाव?”
“स्वप्ना!”
“मी रितेश! एकटाच असतो. आईवडील गावी असतात. तुला पहिल्यांदा बघितलं तेव्हा खूप मोठं दुःख घेऊन तू जगतेय असं वाटलं. त्याक्षणी तुझ्याशी मैत्री करावी वाटली. तुझं दुःख तू शेअर करू शकतेस. विश्वास ठेव माझ्यावर!”
त्याच्याकडे बघतानाच माझे डोळे भरून आले. ह्याच्यासमोर मी इतकी हतबल का झाले? त्याचं हळुवार बोलणं मला घायाळ करत होतं. गालावर ओघळणारे अश्रू तसेच वाहू दिले. त्याक्षणी वाटलं,हे अश्रू पुसण्यासाठी देवाने रितेशला माझ्या आयुष्यात पाठवलंय. इतक्या कमी वेळात एखाद्या व्यक्तीबद्दल इतकी ओढ वाटू शकते? अगदी जन्मांतरीचं नातं असल्यासारखं! मी त्याला सगळं सांगत गेले. मोकळं मोकळं वाटलं! कितीतरी दिवसांनी मला आधार मिळाला असं वाटलं. माहिती नव्हतं, हे माझ्याकडून घडतंय, ते चूक का बरोबर?…पण मी रितेशकडे ओढल्या जात होते. मला त्याचं आकर्षण नाही पण जबरदस्त ओढ वाटायला लागली होती. आणि ती हवीशी वाटत होती.
मला पुरुषी आधार हवा होता,हे मला प्रकर्षाने जाणवलं आणि मी रितेशला जवळ करायचं ठरवलं. माझा हा निर्णय मी भावनेच्या भरात घेतला होता हे मला देखील कळत होतं पण आता मी स्वतःला थांबवू शकत नव्हते. मला रितेशचा आधार हवा होता. मन मोकळं करायला एक खांदा हवा होता…!
घरी आले तर दार उघडच दिसलं आणि भेदरलेली आई डोळे पुसत बसली होती. मला धस्स झालं. आता कुठलंही भयानक दुःख सोसायची माझी हिम्मतच नव्हती. बाबा गेले तेव्हा खूप रडले पण दोन दिवसांनी जाणीव झाली की आता मीच ह्या घराचा आधार आहे. मला खंबीर व्हायलाच हवं होतं. आईच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला विचारलं,”काय झालं?”
“स्वप्ना, आपली स्वरा…!”
“काय झालं स्वराला? अग बोल ना!”मी जोरात ओरडले.
आईने माझ्या हातात एक चिठ्ठी ठेवली. थरथरत्या हाताने मी ती चिठ्ठी उघडली..
आई, स्वप्नाताई!
माझं एका मुलावर प्रेम आहे. तो माझ्या कॉलेजमध्ये मला सिनिअर होता. तो भोपाळचा आहे. त्याचे आईवडील त्याच्या लग्नाच्या मागे लागले होते. पण त्याला माझ्याशी लग्न करायचं होतं. मला देखील तोच माझा लाईफ पार्टनर म्हणून हवा होता. आम्ही दोघांनी लग्न केलंय आणि भोपाळला त्याच्या काकांकडे सध्या राहणार आहोत. त्यांचा मोठा कौटुंबिक व्यवसाय आहे. त्याचे आईवडील मला स्वीकारतील अशी मला खात्री आहे. माझी काळजी करू नका,मला संपर्क करू नका कारण मी आता बिपीनशिवाय राहू शकत नाही. मी सज्ञान आहे,ही माझी जबाबदारी आहे. ताई,माफ कर! तुला सांगायचं माझं धाडस झालं नाही आणि तुला न सांगता मी हे पाऊल उचललं. पण बिपीन चांगला मुलगा आहे. मला सुखात ठेवेल. परत एकदा माफ कर …
तुझीच,
स्वरा!
मी पत्र फेकलं आणि स्वराला फोन लावला….!
—हा नंबर अस्तित्वात नाही–
हे ऐकलं आणि खचून सोफ्यावर बसले. कुठे शोधू हिला?तो बिपीन खरा असेल ना? हिच्या आयुष्याची वाताहात तर होणार नाही ना? मला दरदरून घाम फुटला! श्रुतीला फोन लावला.
“स्वप्ना,मी जिममध्ये आहे,घरी गेल्यावर फोन करते. तू नऊ वाजेपर्यंत ये,वाट बघतेय.”
श्रुतीने फोन बंद केला आणि पुढच्याच क्षणी रितेश डोळ्यासमोर आला. त्याच्याशी तीव्रतेने बोलावसं वाटलं पण त्याचा नंबर? नव्हता माझ्याकडे! रितेश…मला नाही माहिती रे,…पण तू ह्या क्षणी माझ्या जवळ असावा असं वाटतंय…!
मी हुंदके देत आईला बिलगले…!
पण मला रडून चालणारच नव्हतं. आईला आधार देऊन उठवलं आणि तिला कॉटवर झोपवलं. उद्यापासून सगळ्या नातेवाईकांच्या प्रश्नांना मला सामोरं जायचं होतं. त्यात आत्याच्या तोंडाची सरबत्ती सहन करावी लागणार होती. बाबा गेल्यावर तिचं सतत घालून पाडून बोलणं,आम्ही तिघी आजवर सहन करत आलो होतो. दुर्लक्ष केलं म्हणून माझा भाऊ गेला,हे ती आईला सतत ऐकवायची. आई मुळातच स्वभावाने गरीब,ती सगळं ऐकून घ्यायची. एक दिवस माझाच तोल गेला आणि मी बोलून गेले, “आत्या,जाणारा गेला आहे. तू घेतेस आमच्या तिघींची जबाबदारी? मग तू जे बोलशील ते आम्ही सहन करू,अगदी लाचार होऊन!”
त्या दिवसापासून तिचं बोलणं बंद झालं.
पुन्हा एकदा खंबीर झाले.पोलिसांना फोन करावा वाटला पण तक्रार काय करू? स्वरा सज्ञान होती. तिने स्वतः हे पाऊल उचललं होतं. विचार करून डोकं फुटायची वेळ आली. श्रुतीला फोन लावला.
“श्रुती,मी उद्या ऑफिसमध्ये येत नाहीय. सिक लिव्ह टाकतेय.”
“हे काय आता नवीन? तू माझ्याकडे राहायला येणार होतीस ना? आणि काय होतंय तुला? अचानक काय झालं?”
“तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी उद्या देईन,बाय!” मी मोबाईल बंद केला. माझं आयुष्य साधं सरळ का नाहीय? मी डोळे पुसले आणि कुकर लावायला घेतला. उपाशी राहून प्रश्न सुटणार नव्हते.
***
“स्वप्ना, माझी स्वरा कशी असेल ग? तिला तो मुलगा फसवणार तर नाही ना?” आईचं ती केविलवाणी अवस्था! रात्रभर आम्ही दोघीही कूस बदलत जाग्या होतो.
“मी त्या मुलाला बघितलं सुद्धा नाहीय आई! काय उत्तर देऊ मी तुला? आणि जर तिला फसवलंच,तर मी आहे. माझा जन्मच बहुतेक त्यासाठी आहे. मन मारून जगण्यासाठी!” घशात आलेला आवंढा मी गिळला.
आज ऑफिसला जाणार नव्हते पण मला रितेशला खूप भेटावसं वाटत होतं. मी तयार होऊन सव्वा आठलाच स्टॉपवर आले. मनात देवाचा धावा करू लागले…देवा, रितेश आज नक्की येऊ दे!
मला आता आधार हवा होता. कायमस्वरूपी! ज्याच्यावर विसंबून मी ह्यापुढची वाटचाल करू शकेन असा आधार! आणि रितेशच्या डोळ्यात मला ते दिसलं होतं. साडे आठला रितेश दुरून येताना दिसला आणि मला धडधडायला लागलं. तो जसा जवळ येत गेला तसे माझे हातपाय गार पडले. तो मला बघून धावत आला आणि विचारलं,”आज लवकर आलात तुम्ही?”
“रितेश,मला कसंतरी होतंय, कुठेतरी कॉफी पिऊया?”
“हो,पण मला ऑफिसमध्ये उशीरा येतो हे कळवावं लागेल.” रितेशने फोन करून कळवले.
जवळच्याच एका हॉटेलमध्ये आम्ही गेलो. त्याने कॉफी ऑर्डर केली. “आज ऑफिस नाही का तुम्हाला?”
त्याचा तो प्रश्न ऐकला आणि मी हातात तोंड खुपसून हुंदके देऊ लागले.
“स्वप्ना,काय झालं?” तो दोन मिनिटं काहीच बोलला नाही आणि मग सरळ माझे हात चेहऱ्यावरून बाजूला केले. माझे ते गच्च भरलेले डोळे बघून तो अस्वस्थ झाला. “स्वप्ना, आज तू नीट सगळं सांगितल्याशिवाय मी ऑफिसमध्ये जाणार नाही. तो सहजपणे एकेरीवर आला आणि मी पण सुखावले.
त्याला बाबा गेल्यापासून ते काल जे घडलं ते सगळं रडत सांगितलं.
“तुझे डोळे मला कायम दुःखी वाटायचे. तुझं दुःख हलकं करावं असंच नेहमी वाटायचं. काहीतरी ओझं घेऊन तू जगतेय हे तुझा चेहरा बघून कळायचं. प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख असतंच स्वप्ना, फक्त त्याचं स्वरूप वेगळं असतं! ह्यापुढे मी आहे. तुला जे काही शेअर करायचं असेल ते माझ्याजवळ कर. पण तू आनंदी रहा.”
मी ठरवलं,रितेश मला माझ्या आयुष्यात हवा आहे. आता मी फक्त माझा विचार करणार होते,आईची जबाबदारी न टाळता! मी रितेशचा हात हातात घेतला. एक आश्वासक,पुरुषी स्पर्श प्रथमच अनुभवत होते. अंगावर रोमांचं आलं. हा आधार मला कायमस्वरूपी मिळाला आहे ही खात्री झाली आणि स्वरा घर सोडून पळून गेलीय,हे दुःख,भीती पण मी त्या क्षणी विसरले. माझ्या तक्रारी,माझं दुःख हलकं करण्यासाठी मला सोलमेट मिळाला होता. ह्यापुढे मला हे उभारी देणारं नातं जपायचं होतं……!
**
रितेश आणि मी रोज लवकर स्टॉपवर यायला लागलो, तिथे अर्धा तास गप्पा करून एकत्र ऑफिसमध्ये जायला लागलो. संध्याकाळी पण ऑफिस सुटल्यावर थोडं चालत,गप्पा करत बसने येऊ लागलो. रितेशला जे आवडतं ते सगळं मी नकळत करू लागले होते. त्याला निळा रंग आवडतो हे कळल्यावर निळ्या रंगाचे ड्रेस खरेदी करून आणले. मी त्याच्यात पार गुंतत चालले होते. ऑफिसमध्ये, घरी आल्यावर सतत त्याचे मेसेज आले का ते बघत होते. तो पण मला खूप स्पेशल फीलिंग देत होता. माझ्या घरच्या तक्रारी, ऑफीसमधलं टेन्शन हे सतत मी त्याच्याजवळ बोलून रडायचे पण ह्याचा परिणाम असा झाला की त्याने एक दिवस जरी मला मेसेज केला नाही तरी माझी चिडचिड व्हायला लागली होती.
लागोपाठ दोन दिवस तो मला स्टॉपवर भेटला नाही,काही मेसेज पण नाही, हे बघून मी अस्वस्थ झाले. त्याच्यावर फक्त माझा हक्क असल्यासारखा त्याला फोन केला.
“कुठे आहेस तू? दोन दिवस झाले तुझा मेसेज नाहीय. का छळतोस मला?”
“मी गावी आलोय,काम आहे जरा!”
“मला न सांगण्यासारखं कुठलं इतकं महत्वाचं काम आहे तुझं? एक साधा मेसेज तुला करता आला नाही! तुला मी नको असेल तर तसं स्पष्ट सांग. ह्यापुढे तुला त्रास देणार नाही.” माझा संताप अनावर झाला.
त्याने काही न बोलता फोन बंद केल्यावर मी अपमानाने व्यथित झाले. ह्या माणसाशी ह्यापुढे एक शब्दही बोलायचा नाही हे मनात ठरवलं….!
क्रमशः!
©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे
