☸️फिटे अंधाराचे जाळे…!☸️ 🍁भाग पाच 🍁
☸️फिटे अंधाराचे जाळे…!☸️
🍁भाग पाच 🍁
हार मानेल तो दादा कसला .. माझ्या मागे तो आलाच .स्वयंपाक घराला लागून जेवणाची खोली होती आणि त्या खोलीला लागून देवघर .मी देवघरात जाऊन शांतपणे नमस्कार करत होते . मी नमस्कार करून बाहेर येण्याची पण त्याने वाट पाहिली . आत येऊन माझा दंड इतक्या जोरात पकडला की मी जवळ जवळ ओरडलेच ..माझा आवाज ऐकून सत्या तिथे आला आणि दादाच्या हातातून माझा हात सोडवत म्हणाला ..’ हे वागणं शोभत नाही तुला दादा ..’
दादा उसळून म्हणाला
‘ आणि ती .. ती वागतेय ते शोभतं का तिला ..माझ्या प्रश्नाचं उत्तर न देण्याचा उर्मटपणा आला कुठून ? वाटलं होतं सुधारली असेल ..पण नाही ..अजूनही यांचे घाणेरडे धंदे चालूच आहेत ..’
आता मात्र माझा संयम संपला ..’ घाणेरडे धंदे ?? तू काय बोलतोयस ते कळतंय का तुला .. तुझ्या धाकट्या बहिणीवर तू आरोप करतोयस ..काय बरोबर काय चूक हे समजून घेता ..मी तीन वर्ष घराबाहेर एकटी कशी राहिले ..याची काळजी नाही तुला .पण मला रघू अजून भेटतो अशी फक्त शंका आली तर तू एवढं चिडलास .. हे कसलं प्रेम तुझं ..’
माई आत येत म्हणाली ‘ मनू .. तू तरी शांत बस ना गं ..आताच आलीयेस आणि आल्या आल्या हे सगळं कशाला ? ‘
‘ तू फक्त मलाच सांग शांत बस म्हणून ..सुरुवात मी केली नाहीच ..’
‘ बास .. मला काहीही ऐकायचं नाही ..चला सगळे जेवायला .. विश्वा ..अरे दमून आलीय रे ती ..उद्या बोलू ना आपण तिच्याशी .. चला बरं ..बास ..आता कोणीही या विषयावर काहीही बोलणार नाही ‘
‘ म्हणजे माई .. उद्या बोलू म्हणजे काय ..उद्या पुन्हा हाच विषय काढून तुम्ही मला छळणार का ? ‘
माझ्या बोलण्यावर हतबल झाल्यागत माई ने हात जोडले आणि म्हणाली ‘ माफ करा मला .. मी तुम्हाला जन्माला घातलं .. वडील आजारी आहेत याची तर काही चाड नाही .. ते मात्र सगळं नीट होईल या आशेवर जगत आहेत . आम्ही आयुष्यभर फक्त मुलांचं कसं चांगलं होईल याचाच विचार केला .तुम्ही मात्र चांगले पांग फेडताय ..वेळ काय प्रसंग काय .. प्रत्येकाला स्वतः चं पडलं आहे .आईला काय कळतं , अडाणी ती .. तुम्ही शिकलेले ..मग वाटेल तसं बोलण्याचा तुमचा अधिकार आहे ..मग ती आई का असेना ..आज सकाळपासून तू येणार म्हणून अन्नाचा घास उतरला नव्हता ..पण तुमचं चालू द्या .. बहिण भाऊ कमी आणि हाडवैरी असल्यागत वागताय दोघेही ..मोठे झालात ..’
बोलता बोलता माई धडपडल्या सारखी झाली .. मी , सत्या , दादा तिला सावरण्यासाठी गेलो तसं तिने हातानेच नको असं खुणवलं आणि दाराचा आधार घेत उभी राहिली. तिचा हात थरथरत होता .
सत्या वहिनी ला म्हणाला ‘ साखर आण पटकन .. बी पी लो झालं असणार तिचं ‘
दोन मिनिटं शांततेत गेले . माई कडे बघून खूप अपराध्यासारखं वाटलं .. दादा ठीक आहे पण मी सुध्दा माझ्या वागण्याने माई ला त्रास होईल असं वागावं याचं वाईट वाटलं . माईने देवाकडे बघत हात जोडले आणि म्हणाली ..
‘ नाही रे आता ताकद .. पांडुरंगा उचल मला आता .. ‘
‘ माई नको ना बोलू असं .. सॉरी माई .. मी पुन्हा नाही असं वागणार .. तुला त्रास होईल असं नाही बोलणार ‘ मी माईचा हात हातात घेऊन म्हणाले . दादा रागातच निघून गेला . माई अंगातलं त्राण गेल्यासारखं बसून होती . सत्या तिला उठवत म्हणाला ‘ चल माई .. जेवण करून घेऊ आपण ..तू असं हताश होऊन कसं चालेल . दादाचा स्वभाव तुला नवीन आहे का ..हे सगळं रोजचंच तर आहे ..चल बरं’
‘ पण आता नाही होत रे सहन ..’ माईचा आवाज भरून आला . तिच्या कडे बघून पोटात तुटलं .मी तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले ..’ माई ..आजपर्यंत जे झालं ते झालं पण इथून पुढे माझ्यामुळे तुला काही त्रास होऊ देणार नाही ..’
माईने मला जवळ घेतलं ..आम्ही जेवणाच्या खोलीत आलो . वहिनीने वाढायला घेतलं .. ती खूप घाबरल्यासारखी वाटत होती .तिच्याकडे बघत माई म्हणाली ‘ सूनबाई ..तू विश्वाचं जेवण घेऊन जा खोलीत .. त्याचं झालं की तू ये जेवायला ..’
जमिनीकडे नजर लावूनच वहिनी म्हणाली ‘ त्यांचं जेवण दिलं आहे खोलीत ..’
‘ बरं .. मग तू पण बसून घे ..’
जेवताना खूप शांतता होती . प्रत्येकजण काहीतरी विचार करत असल्यासारखा जेवत होता . मी येणार म्हणून एवढं गोड धोडाचं केलेलं पण घशाखाली उतरत नव्हतं . ती आधी पाहिलेली बाई दादाच्या खोलीतून ताट घेऊन बाहेर आली आणि मला आश्चर्य वाटलं . दादाच्या खोलीत हिला थेट प्रवेश कसा ? ते ही वहिनी इथे असताना ..पण मी माझे सगळे प्रश्न घासाबरोबर गिळून टाकले . माझा प्रश्न लक्षात घेऊन सत्या म्हणाला ‘ ही मालन .. आपल्या बरोबर दादाच्या कानात खुसपुसला तो टग्या हीचा नवरा. तो आपलं शेत बघतो त्याच्यापेक्षा जास्त दादाची काळजी घेतो . तुला समजेलच हळू हळू ‘
तिच्याकडे पहात माई रुक्षपणे म्हणाली ‘ मालन .. झालीत ना तुझी कामं .. बराच उशीर झाला आहे जा तू घरी ..ताट वाढून ठेवलं आहे तुझं ते घेऊन जा ‘
ती तिथेच चुळबुळत उभी राहिली तशी माई म्हणाली ‘ मी काय म्हणाले ते ऐकलं नाहीस का ?’
‘ न्हाई .. ते थोरल्या मालकांनी वाईच थांबाय सांगिटलंय ..’ ती नजर चोरत म्हणाली .
‘ त्याची आई तुला सांगते आहे .. तू जा ..’
माई च्या आवाजाला धार होती . खरं तर हा माईचा स्वभाव नाही .तरी ती इतक्या कडकपणे तिच्याशी बोलत होती . मी वहिनी कडे पाहिलं ..ती अन्न चिवडत होती ..जेवणात लक्षच नव्हतं .
जेवणं पार पडली तसं वहिनी तिच्या खोलीत निघून गेली . सत्याही गेला .. मी आणि माई माझ्या खोलीत आलो . माझी खोली जशी होती तशीच होती .. जणू मधे तीन वर्ष गेलीच नाहीत . माझ्या खोलीतल्या खिडकीतून मागची जागा दिसते .. कितीतरी झाडं लावली आहेत तिथे ..विहीर आहे ..मी अगदी हौसेने खिडकीच्या खाली जाईचा वेळ लावला होता . तो वाढून खिडकीवर आला होता .माझं पुस्तकांचं कपाट ,खिडकीजवळ टेबल ठेवलेला त्यावरचा रेडिओ ..पलांगवरची शांत आकाशी रंगाची चादर .. काहीच बदललं नव्हतं ..बदलण्याचा शाप फक्त माणसांना ! मी हळवी झाले . माई ने विचारलं ‘ दमलीस ..’
‘ अं .. नाही ..’
‘ ये ..मी तेल लावून देते जरा ..’
‘ नको माई .. तू पण तर किती दमलेली वाटते आहेस .. आज नको ..’
‘ ये गं ..मला बरं वाटेल .. मला माहितेय तुला तेल लावलेलं आवडत नाही .. थोडं च लावते ..’
मी काय म्हणते हे न ऐकताच माई ने वाटीत तेल काढलं .. मी तिच्या पुढ्यात बसले . माझ्या वेणीचा एक एक पेड हळुवार पणे माई सोडवत होती .खिडकीतला जाईचा वेल अजूनच सुगंधित झाल्याचा भास झाला . तिचा हात केसांतून हळुवारपणे फिरत होता आणि रखमाई आठवली . मी स्वतः ला बजावलं ..आताच आपण माई ला शब्द दिला आहे ..तिला त्रास होईल असं काही वागायचं नाही.माझा त्रास फक्त रघू या विषयामुळेच आहे .. तो विषय च संपवून टाकू .माझ्या मनातले विचार तिला कळतील की काय अशी भीती वाटली मग मी उगाचच मुंबईत मी कुठे रहाते .. काय करते .. कशी जगते .. हे सगळं तिला सांगत राहिले . उगाचच हसत राहिले ..मधेच माई चा हात फिरताना थांबला .. थोडा वेळ मी तशीच बसून राहिले .. मग न राहवून विचारलं
‘ काय झालं माई .. बांधून दे केस आता .. बास झालं ‘
माई ने केस रबरबँड मधे गुंतवून टाकले . हात धुवून येऊन बसली तसं मी तिच्या मांडीवर डोकं ठेवलं .. माझ्या डोक्यावर शांतपणे हात फिरवत म्हणाली ‘ रखमा आठवली असेल ना ..’
मी दचकलेच ..माझ्या डोक्यातले विचार हिला कळले की काय असं वाटून घाबरले .. पटकन मंडीवरून उठून बसत म्हणाले ‘ माई .. नको ना तो विषय .. मी तुला शब्द दिला आहे ..तुला त्रास होईल असं काही वागणार नाही .. रघू चा विषय संपला आहे ..’
हळवी होत माई म्हणाली ‘ हा विषय रघू किंवा तुझा नाहीच .. हा विषय माझा आणि रखमाचा आहे .माझ्या आधी दोन तीन वर्ष तिचं लग्न झालं होतं .. मी या वाड्यात लग्न होऊन जसं आले तेंव्हापासून ती माझ्याबरोबर होती .. ती माझ्यासाठी फक्त कामकरी नव्हती .. माझ्या सगळ्या सुख दुःखाची ती साक्षीदार होती .माझी सखी होती .. ती गेली .. शेवटंच बघणं सुध्दा व्यवहार म्हणून झालं ..त्यांच्या समाजाला खुश ठेवायचं म्हणून गेलेली एका नेत्याची आई होते मी .. सखी म्हणून नाही ..शेवटची भेट सुध्दा नाही झाली ..खूप आठवण येते गं तिची .. माणसं अशी आयुष्यात वजा होत नाहीत .. ना मेल्याने ,ना भांडणाने , ना वादाने ! भांडणाने , वादाने तुटतं काहीतरी ..पण जोडताच येऊ नये असं .. माणसापेक्षा ही महत्वाचं काय असतं ? दोन पाच रुपयाची वस्तू सुध्दा किती जपतो आपण ..तुटली , फुटली तर हळहळतो पण आख्खं माणूस आपल्या आयुष्यातून वजा होतं त्याचं आपल्याला काहीच वाटत नाही .. आणि वाटलं तरी ते दुःख व्यक्त करण्याचा अधिकार ही आपल्याला असू नये . माझं असं काय होतं ..फक्त तिच्याशी असलेला जिव्हाळा माझा होता .. मग तिच्याबाबतीतलं दुःख माझं खाजगी असू शकत नाही का ? त्या दुःखाला सुध्दा व्यवहाराची पुटं का चढवावीत.. ती दिसत नाही पण भासतेच गं सारखी .. उद्या चौदावा तिचा .. आता तू आलीस म्हणजे मला नाही जाता येणार ..आणि तसं ही जीवंतपणी भेटली असती तर खरं ..आता तिच्या नावाचा लावलेला दिवा पाहून काय करू ..विठ्ठला .. पांडुरंगा ..’
माई बोलत होती आणि मी तिच्याकडे अवाक होऊन पहात होते . एकाच माणसाचं प्रत्येका बरोबर वेगळं पण तितकंच नितळ , निष्ठेय नातं असूच शकतं . मी फक्त माझा विचार करत होते ..माईच्या आत चाललेली खळबळ मला समजलीच नाही . अगदी मी तिची मुलगी असून ही ! अगदी आपल्याच असणाऱ्या माणसांच्या भावविश्वात काय चालू आहे हे आपल्याला समजत नाही कारण आपण ‘ मी ‘ च्याच परिघात फिरत असतो . त्या परिघाचा केंद्र बिंदू मी असतो .
माई म्हणाली ‘ चल .. खूप उशीर झाला आहे .. झोप तू ‘
‘ माई .. एक विचारू .. तू इतकं समजतेस ,समजून घेतेस मग माझं आणि रघूचं प्रेम का नाही समजुन घेतलंस ..’
माईने मला जवळ घेतलं ..म्हणाली ‘ समजणं आणि उमजणं यात फरक असतो .. समजण्याकडे मी तटस्थ पणे पाहू शकते पण उमजणं आतून असतं ..उमजण्याच्या प्रक्रियेत गुंततो आपण ..पण आता उमजतंय मला .. जात किंवा इतर कुठल्याही निकशावर जीव गुंतणं नसतं अवलंबून ..’
तिच्या कुशीत शिरण्या ऐवजी मी तिला कुशीत घेतलं . त्यावेळी तिला कोणीतरी जवळ घेण्याची गरज आहे हे समजून उमजून ! आता माझा विषय वाढवायला च नको .. मी सगळं विसरायला तयार झाले होते माई साठी ! पण माई वेगळं च बोलत होती .. बोलू तिच्याशी ..पण ही वेळ नक्कीच नाही .मी तिच्या डोक्यावरून हात फिरवत राहिले .. सहवेदनेनं !
कितीतरी वेळ झोप लागलीच नाही . पहाटे जाग आली ती कसल्या तरी आवाजनं .. मी कानोसा घेत होते .. नेमका कसला आणि कुठून आवाज येतोय ..मग लक्षात आलं बाहेर काहीतरी सू सू असा आवाज येतोय .. मी माई ला जाग येणार नाही अशा बेतानं हळूच उठले .. सावकाश दरवाजा उघडला .. समोरच दादाच्या रूम बाहेर वहिनी उभी दिसली ..ती रडत होती ..! मला धक्काच बसला .. ही रात्रभर अशी उभी आहे की काय ? मी घाईने तिच्याजवळ गेले ..
क्रमशः
©अपर्णा कुलकर्णी