डॉक्टरांच्या कथा आणि व्यथा ——— महती कृतज्ञतेची – डॉ. के. व्ही. चौबळ
डॉक्टरांच्या कथा आणि व्यथा
———————————
महती कृतज्ञतेची
– डॉ. के. व्ही. चौबळ
———————————
एखादा दिवस रोजच्यापेक्षा वेगळा ठरतो ! त्या दिवशी तुम्हाला खूप उशीर झालेला नसतो… फार काम करू नका, अशी सूचना वारंवार मिळाल्याने तुमच्यावर कामाचा ताण पडलेला नसतो. त्या दिवशी तुम्हाला फारसं दमायलाही झालेलं नसतं कारण त्या दिवशी तुम्हाला आलेला एक मजेदार अनुभव इतरांना सांगायला तुम्ही उत्सुक असता. त्या दिवशी मी नेहमीप्रमाणे एका रुग्णाची तपासणी करत होतो. शरीराच्या नेमक्या कोणत्या भागात आपल्याला किती वेदना होत आहे, ते मला नीट दाखवून देण्याचा त्याचा अट्टाहास होता. मला बाजुला वळवून, त्याने आपलं एक बोट माझ्या खवाट्याच्या हाडांमध्ये जोरात खुपसलं… त्याचं समाधान झालेलं दिसताच, मी उद्गारलो नशीब, तुम्हाला मूळव्याधीचा त्रास होत नव्हता… !- आणि एकच हास्यकल्लोळ उडतो. गरम गरम पदार्थ पुढे येतात आणि मजेत जेवण सुरू होतं. आणखी एक दिवस पार पडलेला असतो…
@@@@@
मी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश केला, त्याला आज ४० वर्ष उलटून गेली आहेत. डॉक्टर म्हणून गेली ३० वर्ष मी प्रॅक्टीस करतो आहे. अशा वेळी अधूनमधून मीच स्वतःला एक प्रश्न करतो. पुन्हा संधी मिळाली तर मी डॉक्टरच होईन का? क्षणाचीही उसंत न घेता उत्तर येतं : ‘होय ! निश्चितच!’ तुम्ही कदाचित विश्वासही ठेवणार नाही, पण इतक्या झटकन आणि इतक्या ठामपणानं मी माझ्या वैद्यकीय कारकिर्दीतल्याही कोणत्या परीक्षेत उत्तर देऊ शकलो नव्हतो ! मी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश केला तेव्हा ब्रिटिशांचं राज्य होतं, आणि मी तिथून बाहेर पडलो तेव्हा देश स्वतंत्र झाला होता आणि मी एक भारतीय डॉक्टर म्हणून बाहेर पडलो होतो. अभिमान बाळगावा, अशीच ही बाब होती. ते खरोखरच मंतरलेले दिवस होते. माझ्या शालेय जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात १९४२ च्या ऐतिहासिक ‘भारत छोडो’ आंदोलन सुरू झालं होतं. वर्गावर बहिष्कार घालणं, हे देखील त्या काळात धाष्टर्य समजलं जात होतं आणि त्यातच एलफिन्स्टन हायस्कूल ही माझी शाळा सरकारी होती. माफी मागितल्यानंतर आणि पालकांकडून लेखी हमी आणल्यावरच आम्हाला पुन्हा शाळेत घेतले जात होते. आम्ही तेव्हा त्या ऐतिहासिक गोवालिया टँक मैदानापासून हाकेच्या अंतरावर, गावदेवी येथे रहात होतो. आणि महात्माजींना –
स्वातंत्र्यासाठी सुरू केलेला लढा अगदी जवळून बघत होतो. वैद्यकीय महाविद्यालयातली माझी सुरवातीची वर्षं तशी अगदी शांततेने गेली. तरी मुंबईत नाविकांचं बंड झालं, त्या दिवशी एलफिन्स्टन पुलावर झालेल्या गोळीबाराच्या स्मृती अजूनही माझ्या मनात अगदी घट्ट रुजून बसल्या आहेत. या गोळीबारातल्या जखमींना आमच्याच के. ई. एम. इस्पितळात आणलं जात होतं. आणि ती माझी अगदी सुरवातीचीच वर्षं असल्यानं त्यांच्यावरील उपचारांत माझा कोणताच सहभाग नसायचा. त्यामुळं तेव्हा निराशाही यायची. पण आज त्याचा विचार केला, की लक्षात येतं की त्या दुर्दैवी घटनेतील रुग्णांवर उपचार करणं, ही फारशी रोमहर्षक बाब नव्हती.
वैद्यकीय महाविद्यालयातल्या प्रारंभीच्या काळातल्या आणखी काही आठवणी राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्या भाषणांच्या आहेत. पट्टाभी सीतारामैया, आचार्य जे. बी. कृपलानी आज डोळ्यांपुढे उभे राहतात. त्यांच्या भाषणांनी आमच्या मनात जरूर भावनांची आंदोलनं उसळत. पण आमच्यापैकी एकानंही कसला त्याग मात्र केला नाही. कदाचित, डॉक्टर व्हायचं आहे, ही भावना आमच्या मनात अधिक खोलवर रुतून बसली असणार.
राष्ट्रप्रेमाची भावना तेव्हा आमच्या मनात जरूर होती. पण तरी त्या काळात इंग्लंडमध्ये शिक्षण घेऊन परतलेल्या वैद्यकीय क्षेत्रातल्या बुजुर्गांचा आम्ही कधीही अनादर केला नाही. डॉ. आर. एन. कुपर, डॉ. एम. के. साहियार, डॉ. जी. एम, फडके, डॉ. एन. डी. पटेल, डॉ. ए. व्ही. बालिगा, डॉ. व्ही. एन. शिरोडकर, डॉ. आर. जे. कात्रक अशी दिग्गज मंडळी तेव्हा आदर्श म्हणून आमच्यापुढे होती. त्यांचं वक्तशीर वागणं, थ्री-पीस सूटमधनं सोन्याची घड्याळं काढून वेळ बघणं, हे सारं आमच्या मनावर कुठंतरी परिणाम घडवून जात होतं. पण त्याहीपेक्षा खोलवर परिणाम होत होता, तो त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील व्यासंगामुळे, त्यांच्या अचूक निदानामुळेच. आणि गरीब रुग्णांविषयी ते दाखवीत असलेल्या कळकळीमुळे. अशा स्फूर्तिदायी व्यक्तिमत्त्वांचा सहवास लाभल्यानंतर कोणीही फक्त चांगला डॉक्टरच बनेल, यात शंकाच नव्हती !
स्वतःविषयी रास्त अभिमान आणि गर्व असल्याशिवाय, खरं म्हणजे शल्यविशारद हा उत्कृष्ट शल्यविशारद होऊच शकणार नाही, अशी माझी ठाम समजूत आहे. पण शस्त्रक्रियेसाठी हातमोजे चढविण्यापूर्वी त्यानं तो ‘गर्व’ दूर ठेवायला हवा. वैद्यकीय क्षेत्रात प्रदीर्घ काळ काम करताना नाना प्रकारच्या अनुभवांना सामोरं जावं लागतं. डॉक्टरकडे बघण्याचे पेशंटचे जितके नमुने तेवढेच डॉक्टरांचेही पण यालाच ‘जीवन’ ऐसे नाव आहे!
मँचेस्टरमधल्या माझ्या वॉर्डातलीच ही एक घटना. त्या वॉर्डची सिस्टर एके दिवशी माझ्याकडे आली आणि म्हणाली, “डॉक्टर, आपल्या वॉर्डातल्या त्या पेशंट … श्रीमती अ आज घरी गेल्या. त्यांनी हा पुष्पगुच्छ आपल्यासाठी दिला आहे. त्यांना स्वतःला तो तुम्हाला देण्याचं धाडस होत नव्हतं…”
त्याचं असं झालं होतं की, मँचेस्टरमध्ये मी घराच्या शोधात होतो. वृत्तपत्रातली जाहिरात वाचून मी फोन केला, तेव्हा मालकीणबाईनी मला ताबडतोब यायला सांगितलं. मी वीस मिनिटांत तिथे जाऊनही पोचलो. पण मला बघितल्यावर, एका ‘काळ्या’ भारतीयाला त्यांनी जागा दिली नाही! त्या सांगू लागल्या की, माझ्या उच्चारानं त्यांची फसगत झाली होती … पण नियती किती क्रूर असते बघा! अवघ्या दोनच महिन्यांत त्या मालकीणबाईंवर माझ्याकडून शस्त्रक्रिया करून घेण्याची पाळी आली! आणि म्हणनूच त्यांना आता मला तोंड दाखवायची लाज वाटत होती. इंग्रजी भाषेच्या त्या ‘ब्रिटिश उच्चारांची कला मात्र मी आता पूर्णपणे गमावून बसलो आहे…
@@@@@
एके दिवशी अचानक एक पारशी वृद्धा माझ्यासमोर येऊन उभी राहते. श्रीमती दुभाष !- कशा आहात तुम्ही? तुम्हाला काही त्रास तर होत नाही ना? मी जुजबी चौकश्या सुरू करतो. वृद्धत्वाच्या खुणा तिच्या चेहऱ्यावर जरूर दिसत असतात, तरीही तिचं एकूण प्रसन्न हास्य आपल्याला सुखावत असतं. ‘डॉक्टर, मला काहीच झालेलं नाही, मी फक्त तुम्हाला धन्यवाद देण्यासाठी आले आहे.’ ती बोलू लागली, ‘डॉक्टर, तुम्ही माझ्यावर उत्तम प्रकारे शस्त्रक्रिया केली. पण मी तुम्हाला त्याबद्दल काहीही दिलेलं नाही.’ ‘पण इस्पितळात तर माझ्या फीची संपूर्ण रक्कम भरण्यात आली होती,’ या माझ्या विधानावर ती वृद्धा उद्गारली ‘डॉक्टर, ते पैसे माझ्या मुलीनं दिले होते. मी नाही. त्यामुळेच मी आता तुम्हाला एक भेटवस्तू आणली आहे. तिचा स्वीकार तुम्ही केलाच पाहिजे !’
वर्तमानपत्राच्या एका कागदात बांधलेलं ते पुडकं मी स्वीकारलं. घरी जाऊन मी मोठ्या उत्सुकतेनं ते उघडलं. तो एक जुनापुराणा असा चांदीचा ट्रे होता… बरेच दिवस ठेवल्यानं, त्याच्यावर पिवळे-पिवळे डागही पडलेले होते… पण श्रीमती दुभाष यांच्या माझ्यावरील प्रेमाची चमक मात्र त्यातूनही दिसत होती.
@@@@@
‘गार्गी फक्त दहा वर्षांची आहे…’ तिची आई मला सांगत होती. तिच्या मांडीचं हे दुखणं कधीपासून सुरू आहे, मी प्रश्न केला. गार्गी एका चित्रपटात काम करीत होती आणि एका नृत्यदृश्याच्या वेळी तिला वेदना असह्य होऊ लागल्यानं ते स्टुडिओतनंच थेट माझ्याकडे आले होते. दोन-चार आठवड्यांपासून गार्गीला त्रास होतच होता. तिची क्ष-किरण छायाचित्रंही काढण्यात आल्याचं सांगून तिच्या वडिलांनी ती माझ्यापुढे ठेवली … गार्गीला कर्करोगाची बाधा झालेली असावी, अशी शंका मला येऊ लागली होती… मी गार्गीला बाहेर जायला सांगितलं आणि तिच्या आई-वडिलांपुढे सारी परिस्थिती ठेवली. अशा प्रकारचं निदान जेव्हा डॉक्टर लहान मुलांच्या आई-वडिलांपुढं करतो, तेव्हा तो असंख्य मरणं अनुभवत असतो … आताही तेच झालं होतं.
गार्गीची मात्र कमाल होती. ती अगदी शांत होती आणि विचारत होती : ‘डॉक्टर, मग शस्त्रक्रिया कधी करायची मला माझ्या नाचाच्या बाईना सांगायला हवं.’ आम्ही गार्गीची बायोप्सी केली. माझ्या निदानावर शिक्कामोर्तब झालं होतं. पुन्हा एकदा मृत्यूचा अनुभव तिच्या आई-वडिलांना आला होता. पण त्यांच्याकडे पैसा होता. त्यांनी तिला तातडीनं अमेरिकेला न्यायचं ठरवलं. काही आठवड्यांतच गार्गी अमेरिकेहून परतली. तिचं मांडीचं हाड काढून तिथं धातूची सळई बसविण्यात आली होती. सततच्या केमोथेरपीमुळे तिचे केसही पूर्ण गळून पडले होते …
पण तिच्या वेदना मात्र कमी झालेल्या नव्हत्या. तरीही तिला कोणती शक्ती प्राप्त झाली होती, देव जाणे! तीच उलट तिच्या आईला धीर देत असे … गार्गी पुन्हा उपचारासाठी माझ्याकडे येऊ लागली… रोगानं तिच्या साऱ्या शरीराची पूर्ण नासाडी करून टाकली होती… मांडीपासनं तिचा पाय कापून टाकणं, एवढाच उपाय शिल्लक होता आणि गार्गीच्याही ते लक्षात आलं होतं. तिनं मला द्यायला म्हणून एक शुभेच्छापत्र तयार केलं होतं त्यात मी सर्वशक्तिमान परमेश्वराच्या रूपानं, सैतानाचा कर्करोगाचा तिच्या पायाचा नाश करताना तिनं दाखवलं होतं.
शस्त्रक्रिया पार पडली आणि तिच्या वेदनाही कमी झाल्या … आता ती तिच्या लहान भावाशी खेळायची, आजी-आजोबांशी गप्पा मारायची. मी जेव्हा तिच्या घरी जायचो तेव्हा ती अगदी मनापासून माझं स्वागतही करायची … पण हे सारं तरी किती दिवस चालणार होतं? अगदी कौतुकास्पद आणि आदर्श वाटावं, असंच तिचं वागणं होतं. अखेर तिला शांतपणे मृत्यू आला. मृत्यूनंतर मी ज्याच्या घरी गेलो, अशी ती माझी एकमेव पेशंट होती. एका धीरोदात्त व्यक्तिमत्त्वास मला श्रद्धांजली अर्पण करायची होती.
तिच्या या साऱ्या जीवनप्रवासाची कहाणी सांगणारं एक पुस्तकही कोणीतरी लिहिलं आहे. मी ते वाचलं नाही. मला त्याची गरजही नाही, कारण तिचा सारा जीवनप्रवास मी प्रत्यक्ष अनुभवला आहे…
@@@@@
नासर महमद हा एक चांगला धट्टाकट्टा आणि अंगानं उंचापुरा अशा प्रकृतीचा इसम होता. पण आपल्या दोन-तीन जवळच्या मित्रांना घेऊन तो माझ्याकडे आला, तेव्हा त्याला चालताना बराच त्रास होत होता… आपल्या उपजीविकेसाठी तो काय करतो, ते त्यानं मला सांगितलंच नाही. पण मांडीला झालेल्या संसर्गामुळे चालताना खूपच वेदना होतात आणि बरीच वर्ष औषधोपचार घेऊन त्यात फरक पडलेला नाही, एवढंच त्यानं मला सांगितलं. मी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली. प्रदीर्घ काळ चालणारी, अत्यंत अवघड अशी ती शस्त्रक्रिया होती. शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि कृतज्ञतेच्या पोटी नासरनं कुठंही आणि केव्हाही माझे पायच धरायला सुरुवात केली… अशा प्रकारे खुशामतगिरी करणं आपल्याला मुळीच आवडत नसल्याचं मी त्याला सांगून टाकलं. मग आपल्या मोहल्ल्यात माझ्या सत्काराचा एक बेत त्यानं रचला. त्यासही मी नकार दिला, तेव्हा तो माझ्याकडे आला आणि म्हणाला : ‘डॉक्टर साहेब, तुम्ही मला केव्हाही आवाज द्या आणि कसलंही काम सांगा, मी तुमच्या सेवेस तयार आहे!’- हे सांगताना त्यानं स्वतःच्याच मानेवरून अगदी ‘सराईत आणि धंदेवाईक’ पद्धतीनं बोट फिरवलं आणि तो निघून गेला. त्यानंतर आजतागायत मी नासरचं तोंडही बघितलेलं नाही…
@@@@@
अनेकदा आपण पडद्यावर डॉक्टर किंवा पेशंट यांचं जे जीवन बघतो, त्यात वास्तवाचा कवडीइतकाही अंश नसतो. पण चित्रपटातील दृश्यांमुळे वास्तवात कसा परिणाम घडून येतो, ते मात्र मला एकदा प्रत्यक्षच बघायला मिळालं. एका पेशंटची बहीण नेहमी माझ्याकडे यायची. आपल्या नैराश्यानं ग्रासलेल्या बहिणीची तो पेशंटच उलट काळजी घ्यायचा. त्या पेशंटला फुफ्फुसांचा कर्करोग झालेला होता. अवघ्या तिशीतल्या त्या युवकानं तेव्हा राजेश खन्नाचा एक चित्रपट बघितला … आणि त्याचं सारं वागणंच बदललं. राजेश खन्नानंही त्या चित्रपटात कर्करोगानं मृत्युपंथास लागलेल्या तरुणाचीच भूमिका केली होती. माझ्या पेशंटनं, त्या सिनेमातल्या राजेश खन्नाप्रमाणेच आपल्या दुखण्यातून आनंद निर्माण करून जगायचं ठरवलं. राजेश खन्नालाही हे कळलं आणि शेवटी तर प्रत्यक्ष राजेन खन्नानंच त्याला धीर दिला… हा अगदी दुर्मिळ असाच अनुभव होता…
@@@@@
श्रीमती निगम माझ्याकडे आल्या त्या केवळ श्रद्धेपोटी. त्याच्यामागे कोणतीही कारणमीमांसा नव्हती. त्यांची नस एकदा आखडली असताना मी दहा मिनिटांची मामुली शस्त्रक्रिया करून त्यांना बरं केलं होतं. आता त्या पुन्हा माझ्याकडे आल्या होत्या, कारण त्यांच्या पतीच्या मानेतली मज्जारज्जूतली नस आखडली होती. ही शस्त्रक्रिया किमान दहा तासांची होती. श्रीमती निगम यांची श्रद्धा अस्थानी नव्हती, पण माझ्या छोटेखानी कर्तृत्वामुळे मला ही दाद मिळाली होती. श्रीमती निगम या अगदी अचूक निर्णय घेण्याबद्दल प्रसिद्ध होत्या. एकदा भल्या पहाटे पिस्तूल घेऊन त्यांच्या घरात शिरलेल्या दरोडेखोराचे सारे ‘प्लॅन’ त्यांनी पिस्तुलाच्या नळीत आपलं बोट घालून उधळून लावले होते. आता निगम दांपत्य दरवर्षी माझ्याकडे येतं. श्रीयुत निगम यांच्यावरील यशस्वी शस्त्रक्रियेच्या वर्धापनदिनी …
@@@@@
भारतीय डॉक्टरकडे बघितलं जातं ते भक्तिभावाने. वैद्यकीय क्षेत्रातील त्याच्या गुणवत्तेचा व्हायला हवा तेवढा विचारही केला जात नाही. अत्यंत गुंतागुंतीच्या, दुर्लभ आणि अवघड शस्त्रक्रियांचाही हवा तेवढा आदर केला जात नाही … आम्हा वैद्यकीय क्षेत्रातल्या मंडळींच्या दृष्टीनं विचार केला, तर ही अभिमानाची बाब खचितच नाही… ‘डॉक्टर, आमची तुमच्यावर पूर्ण श्रद्धा आहे, तुमच्यावरच आम्ही सारा भरोसा ठेवला आहे,’ अशी सुरवात करणारे पेशंट चुकून जरी काही गुंतागुंत झाली, तरी त्या डॉक्टरच्या पाठीमागे संताप व्यक्त करू लागतात. डॉक्टरच्या हातून कधीही चूक व्हायला नको, अशीच सर्वांची अपेक्षा असते … त्याचं एखादं साधं निदान जरी चुकलं, तरी त्याची संपूर्ण तपश्चर्या धुळीला मिळते. कन्सल्टिंग रूममध्ये तर पेशंटना एक क्षणाचाही विलंब झालेला चालत नाही. कारण? त्या पेशंटनं कित्येक आठवड्यांपूर्वी डॉक्टरची ‘अपॉईमेंट’ घेतलेली असते … डॉक्टरनं दिवसाचे किती तास काम करायचं असतं ?…. मला तरी ते माहीत नाही.
@@@@@
एक चार महिन्यांचं बाळ. बाळाची आई आणि अत्यंत उतावळे आजी- आजोबा. ‘काय झालंय?’ माझा प्रश्न. ‘डॉक्टर, तुम्ही बाळाचे पाय बघा. त्यावर शस्त्रक्रिया करायला लागेल, असं आम्हाला सांगण्यात आलंय.’ उत्तर.
‘मी काही करू शकेन, असं मला वाटत नाही. खरं म्हणजे या बाळावर कोणीच शस्त्रक्रिया करू शकणार नाही.’
तिघांचेही चेहरे एकदम भकास. आईच्या आणि आजीच्या डोळ्यांत अश्रू. ‘कोणीही शस्त्रक्रिया करूं शकणार नाही, असं मी म्हणतोय कारण बाळाच्या पायांना काहीच झालेलं नाही.’ माझी शांत प्रतिक्रिया आणि सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू उमलतं आई आणि आजीच्या डोळ्यांतल्या पाण्याचं रूपांतर आनंदाश्रूत होतं … मीही क्रूर विनोदाच्या आधारे का होईना, एका मोठ्या अनुभवातनं गेलेलो असतो एक दिवस पार पडलेला असतो. … …
जोपर्यंत मी अशा प्रसंगांना सहजतेनं तोंड देऊ शकतो, तोपर्यंत मी डॉक्टर म्हणून काम करीतच राहीन. खरं म्हणजे त्यासाठीच तर मी डॉक्टर झालोय.
समाप्त