वैशिष्ट्यपूर्ण / फिचर

जे पिंडी तेच तर ब्रम्हांडी.. मंतरलेला ऋतू… @सौ विदुला जोगळेकर

मंतरलेला ऋतू…
@सौ विदुला जोगळेकर

निराकाराला आकारात बांधणं…कालौघास क्षणमात्र खंडित करणं…आणि हे अनंत ब्रम्हांड पिंडातून अनुभवणं…. जीवाचा शिवाशी असलेला बंध पुनःपुन्हा घट्ट होत जाणं…क्षणैक त्या अनुभूतीशी तादात्म्य पावणे म्हणजेच तर मंतरणं!
मंतरणं…एकत्वाला अनेकत्वाने भोगणं…त्या भोगाचा आस्वाद आपल्या पंचेंद्रियांनी घेणं…आणि आपल्या या ज्ञानेंद्रियांवर त्या भोगाचं/आस्वादाच गारुड काही काळ टिकून राहणं…म्हणजे मंतरणं.
निसर्गातील सहा ऋतूंचे, सहा अविष्कार जीवास असेच नित्यनव्याने मंतरुन टाकत असतात.कारण शेवटी जे जे पिंडी ते ते ब्रम्हांडी हे तत्त्व मनुष्यमात्रास अखंड प्रचितीस येत असतं!
..ज्येष्ठाचे सावळे मेघ हलकेच निळाईवर तरंगू लागतात अन् मावळतीच्या पश्चिम क्षितीजावर त्यांचे विविधरंगी विभ्रम आकाशात केशर गुलाल उधळत रंगपंचमी खेळू लागतात.दिवस मावळल्यानंतर ही दिशा क्षितीजावर रेंगाळू लागतात.तेजाच्या दाहात तापलेले चराचर हलकेच निवत जाते.
मृगाचा सांगावा घेऊन आलेले काजवे,आपल्या पाठीवरच्या चिमुकल्या पणत्या तेववून तुळशीवृंदावन निमिषमात्र उजळवत राहतात. झाड पानातून त्यांची लगबग आता सभोवार उतरुन आलेली असते.गुढ अंधाराला क्षणमात्र छेडणारे ते किंचित जीव देखील प्रकाशाचे मोल जाणतात.आपल्या परीने प्रकाश पेरतात …
निसर्गाची ही अद्भुत किमया मंत्रमुग्ध करुन टाकते.
ओला अंधार शोधणारे रातकिडे दबक्या आवाजात चुकचुक करत पावसाळी हवेचे साम्राज्य पसरवू लागतात.वैशाख वणव्यात भेगाळलेली माती, आता शुष्क झालेली असते…आतल्या ओलीवर तग धरुन असलेल्या,कीड मुंग्यांना ती आता बाहेर पडण्यास भाग पाडते.वसंताचा साज आता फिकटसा होत जातो.लख्ख प्रकाशमान चराचर हलकेच गडद सावळेपणात वेढलं जात.जणू साऱ्या चराचरास सावळबाधा झाल्यासारखं !
कोकीळेच्या कुंजनातील मधूरता लोप पावत आता तिथं आर्तता आलेली असते.वसंताला निरोप देणारा तिचा सूर,वियोगाच्या आळवणीत ताल सोडून गुंजायला लागतो.
त्याचं बरसणं तरी कुठं लगेच होतं.तो आधी अवकाळी बनून येतो…मग कधीतरी हूल देत…मेघ पांगवून निघून ही जातो…!
तिचं तरसणं कधी त्याला वळीव थेंबात ओढून आणतं.दोघांच्या प्रणय आराधनेतला गंध चराचरात मुक्त उधळत तो नाहीसा होतो.
तिला वाट पहायला लावल्याशिवाय त्याचं येणं होतंच नाही.कारण तो शेवटी पुरुष आहे,हट्टी अहंकारी आणि बेभरवसा हा तर त्याचा स्थायीभाव आहे.
पण ती विविध भावात त्याला मनवत राहते.तिच्या कोरड्या देहावरचे विखुरलेले वसंतोत्सव त्याला खुणावू लागतात.भुरळ पाडू लागतात. चराचर ही पाऊस धरतीच्या सृजन सोहळ्यास हातभार लावू लागतं.
वारा झाड पानांच्या कानाशी सळसळू लागतो,आता तुला भिजायचं…काही तुझ्यात रुजायचय …फळ फुलांचा वसंत चराचरास दान करुन,रिकामं झालेलं निसर्ग गोकुळ शुचिर्भूत होण्यासाठी,पाऊसधारांच्या प्रतिक्षेत उभं असतं.नव्या सृजनासाठी आता धरणीस एकांत हवा असतो. त्यांच्या ओलेत्या प्रणयोत्सवाला नवे कोंब फुटण्यासाठी सारी सृष्टी आवरासावर करुन चिडीचूप बसण्याच्या मार्गावर असते.
मृगाची शिंपण तो तिच्यावर करुन जातो.नव्या नवेल्या अभिसारिकेसारखी ती ही आसक्त होत समर्पणासाठी आतूर होते.
आणि तो ही येतो मग….थोडा टेचात,कुर्रेबाजपणे ..ढगांचे ढोलताशे वाजवत,विद्युलतेचे दिवे माळत…टपोर थेंबांच्या ओलेत्या माळा लेऊन…तिच्यावर बरसत जातो …तिच्या देहकणात झिरपत जातो ‌..तिचे तृप्त हुंकार…असेच हळूहळू चराचरात उमटू लागतात.वर्षाॠतूचे सोहळे हलकेच रंगू लागतात. पुरुष प्रकृतीच्या मिलनाचे हे अनोखे साम्य अनुभवताना सारी सृष्टी उत्कट उत्फुल्ल होऊन जाते!
कारण शेवटी ….
जे पिंडी तेच तर ब्रम्हांडी….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}