साडीची अवीट गोडी सौ. श्रध्दा जहागिरदार
साडीची अवीट गोडी
वासंतीताईंच्या धाकट्या मुलाचे आज लग्न होते. मंडपामध्ये लग्न घाई चालू होती.
“सुजाता अगं आज तरी घरामध्ये शुभकार्य आहे. निदान आज तरी तो शालू
नेस” वासंती ताई मोठ्या सुन बाईला सांगत होत्या.
“आई! झाले तुमचे सुरु, तुम्हाला माहितीये मला तो शालू आवडत नाही तरी तुम्ही मला बळजबरी तो नेसावयास सांगता”
लग्न झाल्यापासून वासंतीताई पहात होत्या, सुजाता नेहमी वेगवेगळे फॅशनचे ड्रेस घालायची पण साडी ती कधीच
नेसत नसे.
वासंतीताईंना सुजाताचे हे वागणे पटत नसे. आणि त्यांना साडी तर फार प्रिय. व तो ‘शालू’ त्यांच्या आजी सासूबाई पासून संभाळून ठेवला होता. आता पण तेच झाले सुजाता ने फटकन उत्तर दिले. वासंतीताई मुग गिळून गप्प.
लग्न मुहुर्ताची वेळ झाली. आणि समोर मंडपामध्ये वासंतीताईंना नवीन
सुनबाई ने(वरदा) ने त्यांचा ठेवणीतील शालू परिधान केला होता व धिम्या पावलाने नवीन नवरी मंडपामध्ये येत
होती. वासंतीताई आश्चर्याने पहात होत्या. त्यांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू वहात होते. त्यांची हौस, घराण्याचा रिवाज आज नवीन सुनेने पुर्ण केला होता.
स्त्री च्या अगदी जवळचा विषय म्हणजे साडी. आज सुध्दा मंडपामध्ये प्रत्येकीच्या विविध रंगांच्या साड्यांनी मंडप सजला होता.”ए तुझी साडी किती छान! आणि तुझ्यावर तर फारउठून दिसत आहे” हे वाक्य ऐकून ती बाई भरभरुन पावत होती. कारणकोणतीही नवीन साडी घेतली की त्या
बाईला समोरचीने किंवा आपल्या मैत्रिणीने त्या साडीला चांगले म्हटले तरच तिचे समाधान होते. नाहीतर
“जाऊ दे बाई माझ्या साडीला कोणीच चांगले म्हटले नाही.” म्हणून ती नाराज होते. भले ती किती का महागाची असोपण तिला कोणीतरी छान म्हटलेच पाहिजे म्हणजे ती बाई भरभरुन पावते
कोणत्याही कार्यक्रमामध्ये, समारंभामध्ये प्रत्येक स्त्री चे समोरची च्या साडीकडे लक्ष असते. स्वत:च्या अंगावरची किती छान असो, पण तिला समोरचीचीच छान वाटते. साडी घ्यायला जायचे म्हटले की बाईच्या पोटामध्ये गुदगुल्या होतात. परत कशी मिळते की हे वेगळेच टेंशन. कारण घेताना तिने विचार करुन 100 एक साड्या मधून तिला पसंत केलेले असते. ही साडी एवढी स्त्री ला का प्रिय असते? साडीच्या नेसण्याने स्त्री ला पूर्णत्व येते. स्त्री ची अदाकारी,नजाकत सुंदरता, कमनियता ही साडी मध्येच दिसून येते. कितीही भारीचा ड्रेस घातला तरी साडी पुढे तो फिकाच पडतो. कोणत्याही शुभकार्याला
आपण साडीला प्रथम प्राधान्य देतो.
देवाला नमस्कार करताना, मोठ्यांच्या पाया पडताना, ओटी भरताना आपण पटकन साडीचा पदर डोक्यावरून, खांद्यावरून घेतो. त्यामध्ये आपण मोठ्यांचा मान दर्शवतो. जगातील प्रत्येक नवरा, बायकोला साडी घेण्यासाठी सोबत जाताना पहिले नाकच मुरडतो. कसे तरी करुन बरोबर नेले तर दुकानामध्ये आपल्या-पासून कोसभर लांब बसलेला असतो.
बायको किती रुपयांना खिशाला चाट मारते ह्याचे वेगळेच टेंशन असते. कारण त्याला त्या साडीमध्ये काहीच उत्सुकता नसते. बळेच तो आलेला असतो. एखादा नवराच त्याला अपवाद असेल. वेगवेगळे दागिने, बांगड्यांची किनकिन, साड्यांचे विविध रंग, माझी साडी समोरचीला आवडली या भावनेने चेहर्यावर खुललेले हास्य या सर्वांशिवाय कोणत्याही कार्याला मजा नाही येत, त्या कार्याला परिपूर्णता आल्यासारखे वाटते.
मला तर असे वाटते ज्यावेळी देवाने स्त्री ला घडवले, तेंव्हा विनम्रता, लज्जा सुंदरता, नखरा या सोबत साडीची आवड पण त्यामध्ये दिली असेल. “साडीशिवाय नाही कोणताही साज स्त्री चे सौंदर्य खुलवते साडी खास” जग कितीही पुढे जाऊ द्या मुलगी आईला म्हणतेच
” पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, आई मला नेसव शालू नवा”
वासंतीताईंनी नवीन सुनबाईच्या गालावरुन मायेने हात फिरवला. ‘गुणाची ग माझी पोर! म्हणत शुभ आशिर्वाद दिला.
सौ. श्रध्दा जहागिरदार🙏