या चिमण्यांनो परत फिरा रे!
या चिमण्यांनो परत फिरा रे!
माझे यजमान आयपीएस ऑफिसर असल्यामुळे आमच्या सतत बदल्या होत राहत असत. आमची मुंबईहून सांग 97 मध्ये पुण्याला बदली झाली तेव्हा माझी मुलगी आर्किटेक्चरच्या दुसऱ्या वर्षाला होती. तिला मुंबईमध्येच सोडायचा निर्णय आम्ही घेतला. आधी पीजी (paying guest) आणि नंतर जागा मिळेल तेव्हा सावित्रीबाई फुले हॉस्टेलमध्ये ठेवायचं असं ठरलं.
सगळी पॅकिंग आवरून आम्ही गाडीत बसलो तेव्हाचा तिचा हिरमुसलेला चेहरा मला अजून आठवतोय. तिला मुंबईत राहणं अगदीच आवडत नव्हतं. तिथल्या धकाधकीला ती वैतागाईची आणि मुंबईच्या हवेत तिला सारखी एलर्जी व्हायची. आज तो प्रसंग आठवला की माझ्या काळजात कसं तरी होतं..
एखादी वीज चमकून जावी तसे मला माझ्या आईचे, खूप वर्षांपूर्वीचे शब्द आठवले. मला जेव्हा आमच्या गावाकडून पुण्याला कॉलेजच्या शिक्षणासाठी ती सोडायला आली, तेव्हा तिच्या मैत्रिणीला म्हणाली होती,”आता ही आमच्या हातून गेली ती गेलीच. शिक्षण पूर्ण होईपर्यंत लग्न होईल. जे काही थोडे दिवस सुट्ट्यांमध्ये येईल तेवढेच”.
माझ्या बाबतीत तसंच घडलं होतं. मी तो विचार बाजूला सारला. मला वाटलं कदाचित आमची पुन्हा मुंबईला बदली होईल व आम्हाला एकत्र राहायला मिळेल. मात्र तसं झालं नाही.
तिची मला अधून मधून पत्र यायची. त्यात ती तिचा वैताग ओतून काढत असे. पत्र लिहून झाल्यावर ती दोन चेहऱ्यांचं चित्र काढी. एक लिहिण्यापूर्वीचा वैतागलेला चेहरा व एक लिहिल्यानंतरचा तृप्त चेहरा. आज वाटतं मी ती पत्र जपली असती तर!
वर्षा मागून वर्षे गेली. ती आर्किटेक्ट झाली आणि तिने पुढच्या अभ्यासासाठी अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला. माझ्या काळजात धस्स झालं. ती त्या तयारीच लागली. तिचा प्रत्येक दिवस खूप भरगच्च असे. त्या दरम्यान आमची पुण्याहून नाशिकला बदली झाली. त्यात माझ्या मुलालाही आम्हाला पुण्याला सोडावं लागलं…. त्याच्या एमबीए साठी म्हणून. नाशिकला येऊन पाच-सहा महिने होतात न होतात तोच नागपूरला बदली झाली आणि मग माझ्या मुलीचा अमेरिकेला जाण्याचा दिवस उजाडला.
आम्ही आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभे होतो. यावेळी मात्र तिचा चेहरा हिरमुसलेला नव्हता. तिच्या डोळ्यात भविष्याची सोनेरी स्वप्न होती, अन माझ्या डोळ्यातून कित्येक दिवसापासून अश्रुधारा थांबत नव्हत्या. ती गेली. आम्ही मुंबईहून परतलो. दोघच.
चार बेडरूम व प्रत्येक बेडरूम बरोबर दोन दोन अँटेरूम्स असलेलं प्रचंड घर. एकेका बेडरूम बरोबर दोन दोन बाथरूम्स. माझं मन भूतकाळात शिरलं. वेगवेगळ्या पोस्टिंग मधल्या आठवणी डोकावू लागल्या. माझ्या लहानग्या मुलांचे आवाज कानात घुमू लागले. त्यात माझाही आवाज मिसळला.
“आई! बघ यांना माझ्या युनिफॉर्मवर ओला टावेल अडकवला!”माझी मुलगी वैतागून सांगत होती.
“आई बघ तिने बाथरूम मध्ये किती केस गोळा केलेत! शी! तिला काढायला सांग!”माझा मुलगा ओरडला.
“मला कोणाचं काहीही ऐकायचं नाही. त्याला आटपा लवकर. पाचच मिनिटे राहिली तर बस यायला!”मी पुन्हा त्यांच्या मागे लागले.
“आई माझी मौजे सापडत नाहीत!”इती मुलगा.
“तुला मी कितीदा सांगते की रात्री सगळं काढून ठेवत जा. बस आता शोधत.”
“आई प्लीज शोधू लाग ना!’तो केविलवाणा झाला.
कशीतरी वॉटर बॉटल भरली गेली. टिफिन बॉक्स स्कूल बॅग मध्ये कोंबले गेले. दोघं एकदाची शाळेत गेली आणि हुश्श केलं. आता निवांत चहा घेता येईल. त्यांची आपापसातील भांडणे, पलंगावरचा पसारा, डेस्क वरची असता व्यस्त पुस्तके… कपाटात घड्याळ न करता कोंबलेले कपडे… देवा! यांना कधी अक्कल येणार? मी नेहमी जाहिरातीतली घर बघायची अन मला असूया वाटायची! किती नीट नेटकी सुंदर मुलांची खोली!
आज मी अगदी नीटनेटक्या, आवरलेल्या अन अगदी निर्जीव दिसणाऱ्या रूममध्ये उभी होते… माझ्या मुलाची रूम… चादरीवर कुठे सुरकुती नाही… फेकलेले कपडे नाहीत… कपाटे आवरलेली. डेस्क वर पुस्तके नाहीत… नेलकटर सापडत नाही म्हणून शोधा शोधा नाही! माझे डोळे भरून आले… “घे ही तुझी जाहिरातीतील खोली!”
मला वेडीला कसं समजलं नाही की, मुलं मोठी झाली म्हणजे घरट्यातूनच उडून जातील! मी त्यावेळेस त्यांना पंखात घेऊ पाहीन… त्यांना मात्र पंख फुटलेले असतील, आकाशात भरारी घेण्यासाठी! मला लोक नेहमी पक्ष्यांचे उदाहरण देत… त्यांची पिल्लं नाही का उडून जात? मला ते उदाहरण अर्धवट वाटतं.. पक्षी पुन्हा पुन्हा अंडी देतात, त्यांना पिल्लं होतात… त्यांचं सत्र चालू राहतं. माझी मात्र ही दोनच पिल्लं आहेत.. त्यांचं लांब उडून जाणं माझ्या जिव्हारी लागणारच.
मन पुन्हा भूतकाळात शिरलं. त्यावेळेस माझा मुलगा दोन अडीच वर्षांचा असेल! बोबडे बोलायचा… एके रात्री माझ्या मागे लागला,”आई मला गोष्ट छांग!”
माझ्या सासूबाई एकीकडे मला हाक मारीत होत्या त्यांना वाढण्यासाठी म्हणून.
“तू झोप बरं आता. मला वेळ नाही! आजीला वाढायचं आहे ना!”मी उत्तर दिले.
“छोटी गोष्ट छाग”. तो केविलवाना होत बोलला.
मला सासूबाईंनी पुन्हा हाक मारली.
“हे बघ तो वी विंकी काय करतो माहित आहे ना? जी मुलं आईचं ऐकत नाहीत ना त्यांच्या आईलाच तो नेतो? मुलांना मागेच सोडतो!”मी म्हटलं.
“छोरी छोरी! आई त्याला म्हण, मी झोपतो! आणि त्याने घट्ट डोळे मिटून घेतले!
खुदा मी कामात असले की स्वतः च स्वतःला गोष्ट सांगत झोपायचा. आता वाटतं मी सगळं सोडून अधून मधून त्याला गोष्टी सांगितल्या असत्या तर?
अनायासे माझे पुन्हा डोळे भरून आले.
अजून एक प्रसंग माझ्या डोळ्यांसमोरून सरकला . हा तेव्हाही दोन अडीच वर्षांचा होता. सारखा अंगठा चोखायचा. सगळेजण मला सांगायचे की ही सवय मी मोडावी. मी ज्यानं ज्यानं जे जे सांगितलं ते करून पाहिलं पण कुठेही यश आलं नाही. एकदा मी त्याला जवळ घेऊन बसले आणि सांगू लागले,” हे बघ मी अंगठा चोखत नाही तुझे बाबा चोखत नाहीत….” इत्यादी इत्यादी मला ज्यांची ज्यांची नावं सुचली मी सांगितली.
त्याने तोंडातून अंगठा काढला. मला वाटलं त्याच्या लक्षात आलंय… पुढच्याच क्षणी माझ्या कुशीत येत तो उत्तरला,” त्या छगळ्यांना छांग्, अंगठा चोखायला…”आणि पुन्हा अंगठा तोंडात! हा एकेकाळी अंगठा चोखणारा माझा छकुला, अगदी बीकॉम च्या शेवटच्या वर्षापर्यंत रात्री झोपायला जायच्या आधी एकदा तरी माझ्या मांडीवर डोकं टेकवण्यासाठी येणारा माझा मुलगा, आज परदेशात वास्तव्य करण्याची भाषा बोलेल… अन् मी त्याच्या एका ओळीच्या ई-मेलची (पत्र तर सोडाच), एखाद्या फोनची सतत वाट बघेन असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं!
त्याच्या खोलीतून मी माझ्या मुलीच्या खोलीत आले. पोर्टफोलिओ, एप्लीकेशन फॉर्म, इत्यादींसाठी डेस्कवर पसरलेली कागदपत्रे नव्हती, अर्धवट भरलेल्या सूट केसेस नव्हत्या… सगळी एकदम टापटीप! कुठे फेकलेला दुपट्टा नाही…. भिरकावलेल्या चपला नाहीत.. हो कोपऱ्यात मागे सोडलेल्या दोन कोल्हापुरी चपला मात्र होत्या! रिकामा ड्रेसिंग टेबल, रिकामा कंप्युटर, कम्प्युटरवर भांडणारी दोघेही नाहीत! शांत टीव्ही! कोणता चॅनल बघायचा यावर वाद नाही. शेवटी कोणालाच काही बघून देणार नाही अशी ओरडणारी मी गप्प एकटीच उभी!
मला माझी मुलगी नुकतीच शाळेत जायला लागली तेव्हाचा एक दिवस आठवला. आम्ही तेव्हाही मुंबईला होतो. तिच्यासाठी स्कूल बस लावली होती. एकदा तिच्या शाळेतून मला फोन आला, स्कूल बस चुकून तिला न घेता निघून गेली होती. मी धावतच शाळेत गेले. तिला ऑफिसमध्ये बसवलेले होते. तिच्या एका गालावर एक अश्रू ओघळलेला होता… मी तिला जवळ घेत तो अलगद पुसला तेव्हा ती म्हणाली,”तू लवकर येणार नाहीस असं मला वाटलं तेव्हा कुठून तरी हा थेंब माझ्या गालावर आला”! मागे वळून बघताना मला वाटतं, तो थेंब म्हणजे तिनं मला दिलेली एक अमूल्य भेट होती! मोती म्हणून तो थेंब मला एखाद्या डबीत जपून ठेवता आला असता तर किती बरं झालं असतं!
आम्ही ठाण्याला असतानाचा अजून एक प्रसंग आठवला. तिला कसलंसं भयानक इन्फेक्शन झालं होतं…. बरेच दिवस 104 ताप येत होता… ती अगदी शांत पडून राहायची… फक्त उलटी वगैरे होत असल्यास मला हाक मारायची… तिच्या कुठल्याही दुखण्यात तिने माझ्याजवळ बस, असा हट्ट कधीच केला नाही. असो. त्या दुखण्यातून ती जरा बरी झाल्यावर तिने अगदी आपण होऊन माझ्याकडून एक कागद पेन्सिल मागितली आणि माझ्यावर एक छोटासा निबंध लिहिला. ती केवळ सहा वर्षांची होती. तिने लिहिले,”मला बरं वाटल्यावर आईने माझ्या केसांना तेल लावून हळुवारपणे गुंता काढला, गरम पाण्याने छान आंघोळ घातली, सुवासिक पावडर लावली. मी आजारी असताना ती अगदी मला पांचट जेवण द्यायची. मला तिचा खूप राग यायचा, पण त्यामुळेच तर मी बरी झाले.”
एका चिमुकलीने आपल्या आईला दिलेले ते एक सुरेख रशस्तीपत्रक होते… ट्रिब्यूट होते! मी मुर्खा सारखी त्याची कॉपी न काढता तिच्या टीचरला वाचायला दिले… ते मला परत मिळालेच नाही!
आम्ही नाशिकला असतानाचा एक प्रसंग. माझा मुलगा सात आठ वर्षांचा असेल. दिवाळीच्या सुमारास खरंतर त्याला खर्चायला मी थोडेसे पैसे दिले. हा बाजारात गेला व कुठल्याशा ठेल्यावरून एक पितळी हार घेऊन आला आणि मोठ्या खुशीत मला म्हणाला,”हे बघ! मी तुझ्यासाठी काय आणलंय? सोन्याचा हार! दिवाळीच्या दिवशी तू घाल!”
दिवाळीच्या दिवशी रांगोळी काढताना दोन मिनिटे घालून मी त्याला दाखवून दिला. नंतर कोणाला तरी देऊन टाकला.. एक दोनदा त्याने त्याबद्दल विचारलंही. पण मी तो हार बँकेत लोकर मध्ये ठेवलाय म्हणून टाळलं! किती मूर्ख होते मी ! तो हार खरंच जपला असता तर! आज त्याचे मूल्य मला कितीतरी पटीने अधिक वाटतय! तो हार त्याला मी दाखवला असता, त्यानं केलेल्या प्रत्येक गोष्टीचे मला मूल्य आहे हे त्याला पटले असते! सततच्या बदल्या व सामानाची अडगळ वाटून कितीतरी अमूल्य गोष्टी काळाच्या ओघात अशा हरवल्या!
आज माझी दोन्ही मुलं परदेशात नोकरी करण्याची भाषा बोलतात. मुलगी तर तिथेच आहे. जीवनमूल्य झपाट्याने बदलत आहेत. भौगोलिक सीमा रेषा नगण्य ठरत आहेत… तरीही माझ्या चिमण्यांनो, आमच्या जीवनाच्या संध्याकाळी तरी परत फिरा अशी माझी आर्त हाक आहे. ही माती तुमची आहे. तुमच्यावर माय भूमीचे ऋण आहेत. माझी तुमच्या पासून काहीही अपेक्षा नाही. फक्त या देशात या! मग मात्र कुठेही असा! माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत आणि डोळे तुमच्या परतीच्या मार्गावर! कधीतरी जो हात धरून तुम्ही पहिलं पाऊल टाकलं तो हात थरथरेल तेव्हा त्याला आपल्या हातात धरा, सुरकुतलेल्या कपाळावरून हात फिरवा… गगनचुंबी प्रसाद व आईची मोडकी झोपडी यांचीही टक्कर आहे!
CP
छान, मनाला स्पर्श करणारी कथा