कठोर बापाच्या अशक्य परीक्षेची कहाणी… लेखक- ओंकार दाभाडकर.
कठोर बापाच्या अशक्य परीक्षेची कहाणी…
लेखक- ओंकार दाभाडकर.
६ वी किंवा ७ वीत असेन. शाळेत एक नकाशा विकणारा आला होता. गोल पुठ्ठ्याचा भारताचा नकाशा, त्यावर वेगवेगळ्या खाचा असलेला अजून एक पुठ्ठा. वरचा पुठ्ठा फिरवून एक खाच कोणत्याही राज्यावर आणली की इतर खाचांमधे त्या राज्याची राजधानी, लोकसंख्या अशी भरपूर माहिती मिळणार. हरखून गेलो प्रात्यक्षिक बघून. १५ रू किंमत.
कसं बोलावं घरी?! १५ रुपये!!! अभ्यासाचीच तर गोष्ट, पण ही मागणी आगाऊ आहे, जास्तीची आहे याची बोच होती.
संध्याकाळी उशिरा भित भित बाबांना गळ घातली. बाबांनी २-४ वाक्यं घेतली आढेवेढे घ्यायला. नंतर सरळ ऑफर दिली. “तू १५ पानं (पाठ पोट, अर्थातच!) शुद्धलेखन करून दाखव. नकाशा तुझा.”
मला आजही तो क्षण आठवतो. त्या क्षणी “बाबांनी अशी अशक्य कोटीतील / अनावश्यक / किचकट अट का ठेवली? सरळ हो किंवा नाही म्हणून मोकळे का झाले नाही?” हा विचार नाही आला मनात.
पहिला होता पोटात आनंदाचा गोळा – नकाशा मिळू शकतो ही शक्यता…! हा य ला ! दुसरा विचार होता – ‘आपण किती वेडे आहोत… लवकर विचारलं असतं तर १५ पानं लिहायला वेळ अजून मिळाला असता! आता कमी वेळात करून घ्यावं लागणार!’
ती संध्याकाळ – रात्र झपाटल्यागत लिहीत सुटलो. रात्री ११:३० पर्यंत जागलो. एवढ्या उशिरा झोपणे म्हणजे गहजब होता. पण बाबांनी दुर्लक्ष केलं तिकडे.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो, उरलेलं लिहून काढलं. बाबांनी ऑफिसला जाण्याआधी तपासलं. ३-४ चुका झाल्या होत्या. मोठाले गोल केले त्यावर. प्रत्येक गोलागणिक तो गोल नकाशा अशक्यप्राय होत होता. पण बाबांनी शांतपणे वही खाली ठेवली, डोक्यावरून हात फिरवला, १५ रुपये दिले आणि ऑफिसला निघून गेले.
विजयी पताक्यागत नकाशा घरी आणला मी संध्याकाळी. पुढे कित्येक वर्षं तो नकाशा जपून ठेवला होता मी. एवढा प्रिय का होता कळत नव्हतं. पण खास होता. १५ पानांमुळे? की बाबांच्या परीक्षेत पास झाल्यामुळे? की खरंतर परीक्षेत पास झालोच नव्हतो तरी बाबांनी बक्षीस दिल्यामुळे? की डोक्यावर फिरवलेल्या हाताची आठवण म्हणून? मी बाप झाल्यावर कळालं मला.
परीक्षा १५ पानं शुद्धलेखन लिहून होण्याच्या रिझल्टची नव्हतीच. हव्या असलेल्या गोष्टीसाठी झोकून देऊन झपाटल्यागत प्रयत्न करतो की नाही – याची होती. त्यात मी मेरिटमध्ये आलो, म्हणून बाबा खुश झाले.
या प्रसंगात मला आईचं विशेष कौतुक वाटतं. बाबांनी अशी काही अट ठेवल्यावर “कशाला लेकराला लिहायला लावता? १५ रुपयांची तर मामलत आहे!” असं म्हणून बाबांना माझ्या नजरेत व्हिलन केलं नाही आईने. आईने काहीच हस्तक्षेप केला नाही. खरंतर आमच्याकडे मला शिस्त अशीच आईबाबांनी आळीपाळीने लावली आहे. आईसुद्धा कमी कठोर नव्हतीच कधी.
माझ्यात जे काही चांगलं आहे ते त्या दोघांनी अश्या लहानमोठ्या प्रसंगांत पेरलेलं. वाईट जे काही आहे ते त्यांनी पेरलेलं काहीतरी मी धड उगवू दिलं नाही म्हणून. आपली मुलं मोठी होत असताना ती १५ रुपयांच्या बक्षिसाची परीक्षा बदलेली आहे. आता कदाचित १५०० चं असेल काहीतरी. मला काळजी १५ की १५०० ची नाही.
माझ्यासारखे बाप ती कठोर, अशक्यप्राय, क्रूर परीक्षा घेण्याची छाती बाळगून आहेत का – याची मला काळजी वाटते. आमच्या मुलांची कठोर परीक्षा घेता येणं आणि आम्हाला ती घेऊ दिली जाणं – हीच आमची परीक्षा आहे.
बापाने कठोर असणं आणि कुटुंबाने त्यांचं कठोरत्व स्वीकृतच नव्हे – महत्वपूर्ण आहे – हे समजून घेणं खूप आवश्यक आहे. अख्ख्या समाजातच हा अवेअरनेस आवश्यक आहे. पुढची पिढी त्याशिवाय घडणार नाही.
कठोर बाप अन त्यांच्या दमदार पोट्ट्यांसाठी…
चिअर्स!
©®ओंकार दाभाडकर.
d.omkar1@gmail.com