Classified

स्वान्त सुखाय…. @सौ विदुला जोगळेकर

स्वान्त सुखाय….
खाऊचे डबे सगळे रिकामे झाले…इतके दिवस मुलांसाठी,घरातील वयस्कर लोकांसाठी करतो ही मनातली तीव्र भावना…पण मुलांची आपापल्या दिशेने पांगापांग होऊन ही आता दोन चार वर्षे लोटलीत,वयस्कर मंडळी सगळ्याच्या पल्याड गेलेली आहेत…तरीही..ठराविक वेळेत डबे रिकामे होण्याचा क्रम काही चुकला नाही…मनात दबलेलं हसु हळुच ओठांवर आलं…मुलानांच कशाला…आपल्यालाही लागतच की काहीतरी येताजाता तोंडात टाकायला…फक्त इतके दिवस मुलांच्या नावाखाली लपत होतं…आता उघड उघड मान्य करावं झालं…! आपले सुद्धा,
डबे खाऊने भरुन ठेवण्यात अनेक स्व-अर्थ दडलेले असतात.शेवटी एकच खरं…
स्वान्त सुखाय…!
चिवडा फोडणीस टाकायला घेतलाच…सकाळचा माँर्निग वाँक घेऊन सोसायटीतल्या डॉक्टर काकू घरावरुन जात होत्या…मला किचन खिडकीत बघून त्यांनी हाक मारली…बाहेर ये…बघ मी काय केलय…तुला दाखवायचय ….हँड एब्राँडयरी केलेला काँटन कुर्ता त्यांनी मला उलघडून दाखवला…वाँव …किती सुंदर वर्क काकू..!मी त्या एंब्राँडयरीवरुन हात फिरवत म्हणाले….आवडलं ना?…छान झालय ना ग?…
अर्थातच काकू…किती नाजुक काम आहे हे…फार सुरेख…कलर काँंबिनेशन ही परफेक्ट…!माझ्या नकळत…पावती देउन ही झाली.
मैत्रीणी साठी करतेय…तिला सरप्राईज देणार आहे…आणि ती जेंव्हा बघेल तेंव्हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मी अनुभवणार आहे…शरीराने दुसऱ्यासाठी करत असतो ग आपण…पण त्यातला खरा आनंद आपणच घेत असतो…हो ना…मी म्हटलं हो…स्वांत सुखाय…!
काकू मुलगा झाला मला…तुम्ही आठवणीने गरम गरम तुप मोदक आणुन खाऊ घातलेत मला प्रेग्नसीत…!आठवतय काकू?
माझ्यासमोर लहानाची मोठी झालेली जयु आनंदाने सांगत होती…गणपती बाप्पाच आलेत…!तिच्या आवाजातला आनंद मला सुखावून गेला…
माझं हे करणं म्हणजे तरी काय, मोदक करुन खाऊ घालण्यातला आनंद मीच अनुभवणं…म्हणजेच तर…
स्वान्त सुखाय!
नव्वदी पार केलेले आजोबा…मंदिर परिसर नित्यनेमाने स्वच्छ झाडत असतात…क्षीण झालेली त्यांची क्रयशक्ती …मीच एकदा त्यांना म्हणलं..कशाला आजोबा या वयात झाडता ?…मला आनंद मिळतो बाळा…उगाच का कोण करेल…?
माणुस फार लबाड,स्वतः च्या सुखासाठी करत राहतो,पण आव मात्र दुसऱ्याला आनंद दिल्याचा आणतो…
त्यापेक्षा सरळ मान्य करावं…
स्वान्त सुखाय..
मला आजकाल हा स्वान्त सुखाय
चा मंत्रा फार पटला,रुचला आणि पचनी देखील पडला.
जिथे आपल्या शुल्लक अस्तित्वाने…जगतकार्यात तसूभर देखील फरक पडणार नाही…तिथे…माझं कर्म कुणासाठी का असणार…?ते फक्त आणि फक्त मला हवं असतं…त्यात माझा आनंद, सुख समाविष्ट झालेलं असतं…म्हणुन आपण करत असतो.अहंकाराचे,अट्टाहासाचे कवच इतके जाड असते की…त्या कर्मातून मिळालेला आनंद आपल्यापर्यंत पोहचतच नाही…’मी केल्याचा’ काटा… ते सुख…तो आनंद आपल्याला उपभोगू देत नाही. राग,अपेक्षाभंग, वैताग,दंभ या खाली सुखाच्या आनंदाच्या जाणीवाच बोथट होऊन जातात.
परवा …आईला आंघोळ घालताना..मी तिच्या भोवती पाणी ओवाळत..तिला म्हणलं..झाली बरं ग तुझी चिमणीची आंघोळ…चला आता…पावडर गंध लावायच ना तुला….आजाराने शिणलेला तिचा चेहरा…खुदुकन हसला,आणि म्हणाली…तुम्हां पोरींचे लहानपण आठवलं ग…!
मी म्हणलं…आता तू लहान झालीस…होय ना..?
तिचा ओला हात माझ्या चेहऱ्यावरुन फिरला….
तिचं हसणं…तिचा तो ओला स्पर्श…!
सुखाची भाषा…याहून काय वेगळी असणार….
स्वान्त सुखाय …चा हा किती देखणा अविष्कार!
माऊली म्हणतात…सत् चित आनंद…
म्हणजे …आत्म्याचे मुळ स्वरुप चिरंतन सुख आहे…तो सदैव सुख असतो….विकार जडलेले आहेत ते देह इंद्रियांना! परमेश्वरापासुन सुखापर्य़ंत…सारं सारं आपल्यातच तर आहे…बस्स् आपण थोडा बहिर्मुख ते अंतर्मुख प्रवास करायला हवाय…इतकच तर!

@सौ विदुला जोगळेकर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}