देव © दीपक तांबोळी … 9503011250
देव
-दीपक तांबोळी
फाटकाचा आवाज आला तसं मी दार उघडून पाहीलं तर एक म्हातारा माणूस बाहेर उभा होता.
“फुलं घेऊ का?” मी काही बोलण्याआधीच त्यानं विचारलं.
“हो घ्या ना….. ”
तो फुलं तोडू लागला. तसा मी सुटीच्या दिवशी इतक्या सकाळी झोप मोडल्याबद्दल चरफडत घरात शिरलो.
मला नुकतीच नाशिकमध्ये नोकरी मिळाली होती. नशिबाने मला रुमही चांगली आणि पटकन मिळाली. रुमच्या बाहेरच अंगणात चांदणीचं झाड होतं. कायम पांढऱ्या फुलांनी लगडलेलं. मला या फुलांचा काहीच उपयोग नव्हता. कारण माझ्याकडे देव नव्हते. गावाहून येतांना आईने मला श्रीगुरुदत्तांचा फोटो घेऊन जायचा खुप आग्रह केला.सकाळी कामावर निघतांना देवाला नमस्कार करुन निघालं की दिवस चांगला जातो असं तिचं म्हणणं.पण मी पडलो एक नंबरचा नास्तिक. आपलं भविष्य आपणच घडवतो असं वाटणारा!त्यात देवाचा किंवा दैवाचा काहिही हात नसतो असं मानणारा.
” माणसाच्या आयुष्यात संघर्ष नसला,सगळ्या गोष्टी सहजगत्या घडत गेल्या की त्याला देवबीव या कल्पना खोट्या वाटायला लागतात,तो स्वतःलाच भाग्यविधाता समजू लागतो.पण ते खरं नसतं ” असं तिने मला समजावून सांगितलं.पण मला ते पटलं नाही. अर्थातच मी तो फोटो आणायचं टाळलं.
तो म्हातारा माणूस रोज फुलं घ्यायला यायचा. आता तो परवानगी विचारायचा नाही. माझी किंवा घरमालकांचीही त्याला हरकत नव्हती.कारण फुलंच इतकी असायची की कितीही तोडली तरी ते झाड फुलांनी भरलेलंच दिसायचं.
एक दिवस घरमालकांना त्याच्याबद्दल विचारलं. त्यांनी जे सांगितलं ते ऐकून खुप दुःख झालं.
त्या म्हाताऱ्या माणसाचं नांव एकनाथ होतं. त्याच्या बायकोचा आणि मुलाचा बाईक वरुन जातांना अपघाती मृत्यु झाला होता. मुलीचं लग्न होऊन ती आफ्रिकेत स्थायिक झाली होती. आई आणि भावाच्या मृत्युनंतर वडीलांना घेऊन ती आफ्रिकेत गेली होती, पण जावयाच्या घरी रहाणं एकनाथ काकांना पटलं नाही. थोड्याच दिवसात ते भारतात परतले आणि आता एकटेच रहात होते.
एक दिवस ते आले तेव्हा मी बाहेरच उभा होतो. त्यांच्या हातातल्या परडीत खुप वेगवेगळी फुलं होती. मी त्यांना विचारलं, “काका तुमच्याकडे खुप देव आहेत का?”
“नाही तर, मोजकेच आहेत. का?”
“मग इतकी फुलं का?”
“अरे, भरपुर फुलं असली की देव कसे प्रसन्न दिसतात. आणि ते प्रसन्न दिसले की आपला दिवसही खुप उत्साहात जातो….”
“काका तुमच्याबद्दल मी खुप काही ऐकलंय. एवढे वाईट प्रसंग तुमच्या आयुष्यात घडूनसुध्दा तुमचा देवावर विश्वास आहे…..??”
“बेटा, जे प्रारब्धात आहे ते देवांनासुध्दा चुकलं नाही. श्रीराम, कृष्ण यांनासुद्धा आयुष्यात प्रचंड संघर्ष करावा लागला आणि शेवटी त्यांनाही मृत्यू आलाच की !अशी कितीतरी उदाहरणं आहेत. माझ्या मुलाचं आणि बायकोचं आयुष्य तेवढंच होतं, त्याला देव तरी काय करणार?शेवटी नियती जे ठरवते ते घडल्याशिवाय रहात नाही हेच खरं ”
“पण आता या उतरत्या वयात देव देव करुन काय मिळणार?”
” काहीतरी मिळवण्यासाठीच, स्वार्थासाठीच देवाची पुजा करायची नसते बेटा. देवावरच्या प्रेमासाठीसुध्दा पुजा केली पाहीजे…..”
मी हसलो. मला ते पटलं नाही. म्हणालो, “आपल्या देशात मला नाही वाटत कुणी स्वार्थाशिवाय देवाला नमस्कार सुध्दा करत असेल ”
“का नाही?ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव,एकनाथ, समर्थ रामदास अशी कितीतरी उदाहरणं आहेत की ज्यांनी नेहमी मानव कल्याणासाठी देवावर प्रेम केलं. स्वतःचा स्वार्थ कधी बघितला नाही.आणि आता आमच्यासारखी निव्रुत्त झालेली,आयुष्यात काहीही घडायचं बाकी न राहिलेली माणसं देवदेव करतात ती काही स्वार्थासाठी किंवा काही मिळवण्यासाठी नाही तर फक्त आनंद आणि समाधानासाठी ”
मी चुप बसलो.त्यांना काय उत्तर द्यावं मला कळेना.फक्त आनंद आणि समाधानासाठी देवाची पुजा करायची ही कल्पनाच माझ्या तत्वात बसत नव्हती.माझी संभ्रमावस्था बघून त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि हसून म्हणाले, “एकदा पुजा करुन बघ बेटा. बघ दिवसभर कसं प्रसन्न वाटतं ते. माझ्या एकाकी, निरस आयुष्यात या भगवंतामुळेच रंगत आहे. तूही तो अनुभव घे……!!”
ते निघून गेले आणि मी विचारात पडलो.फक्त दर्शनासाठी मंदिराबाहेर उन्हातान्हात तासनतास रांगेत उभी रहाणारी माणसं,पंढरपुरच्या वारीत हाल अपेष्टा सहन करुन शेकडो मैल चालणारे वारकरी माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले.वाटलं,एकदा देवाची पुजा करुन बघायला काय हरकत आहे? नाही काही वाटलं तर सोडून देऊ.
त्या दिवशी संध्याकाळी ऑफिसमधून येतांना मी दत्तगुरुंची फोटोफ्रेम आणि पुजेचं साहित्य घेऊन आलो.
दुसऱ्या दिवशी गुरुवार होता. मी सकाळीच लवकर उठलो. अंघोळ करुन दत्तात्रेयांची फोटोफ्रेम टेबलवर ठेवली. गंध लावून हार घातला. फुलं वाहिली. निरांजन लावलं.अगरबत्ती लावताच रुममध्ये प्रसन्न वातावरण तयार झालं.रोज मनाला येणारी मरगळ नाहिशी झाली.इच्छा नसतानाही मी दत्तगुरुंना नमस्कार केला. अंगावर शहारे आले.
त्या पूर्ण दिवसात एकनाथ काका म्हणत होते तसं खरोखरच मला प्रसन्न वाटत होतं.मनाच्या कोपऱ्यात कुठंतरी समाधानाची भावना जाणवत होती.
मग मी रोजच दत्ताची पुजा करु लागलो.पुजा केल्यानंतर एक वेगळ्याच प्रकारचं मानसिक बळ मिळतंय याचा अनुभव मला येऊ लागला.पण अजुनही देव आपलं भाग्य बदलू शकत नाही या माझ्या मतावर मी ठाम होतो.माझ्या मनातला नास्तिकपणा अजुनही तितकासा कमी झाला नव्हता.
मध्यंतरी मी गांवी गेलो.मी रोज दत्तात्रयांची पुजा करुन ऑफिसला जातो असं आईला सांगितलं.तिला खुप आनंद झाला.
” तू म्हणालीस म्हणून मी पुजा सुरु केलीये.पण अजुनही माझा देवावर विश्वास नाही ” मी तिला म्हणालो.
” तो बसणार नाहीच .याचं कारण तुझं आतापर्यंतचं आयुष्य खुप सुखात गेलंय.मी आणि तुझ्या वडिलांनी स्वतः काटकसरीत दिवस काढून तुम्हां भावंडांच्या सगळ्या गरजा पुर्ण केल्या.तुम्हांला कोणत्याही गोष्टींची कमतरता भासू दिली नाही. त्यामुळे तुम्हांला संकटं,हाल अपेष्टा,दुःखं काय असतात याची कल्पना नाही. अर्थातच देवाला मनापासून साकडं घालण्याची,त्याची मनोभावे प्रार्थना करण्याची तुम्हांला कधी गरजच भासली नाही”
” पण आई जगात इतकी गरीबी आहे.देव त्यांना मदत करुन श्रीमंत का नाही करत?ते जाऊ दे.भुकंप येतो,एखादं विमान कोसळतं तेव्हा हजारो लोक मरतात.तेव्हा हा देव कुठं असतो?”
” हा प्रश्न प्रत्येक धर्मातील लोकांना पडायला पाहिजे.कारण भुकंप होतो किंवा विमान कोसळतं तेव्हा फक्त हिंदूच मरत नाहीत.पण इतर धर्मातले लोक कधीही हा प्रश्न विचारत नाहीत.याचं कारण ते देव आणि नियती याची गल्लत करत नाहीत. देव या संकल्पनेची चिरफाड बहुतेक वेळा हिंदू आणि तेही सधन घरातले किंवा तुझ्यासारखे कोणतीही दुःखं न पाहिलेले हिंदूच जास्त करतात.नियती किंवा विधी लिखित ही अशी गोष्ट आहे की जी देवांनाही चुकलेली नाही.आणि काय रे !अशा भुकंपात ढिगाऱ्याखाली सातसात दिवस दबलेले राहूनसुध्दा बरेच जण जिवंत रहातात,विमान दुर्घटनेत इतक्या उंचीवरुन पडूनही काहीजण जिवंत रहातात तेव्हा काळ आला होता पण वेळ आली नव्हती असं आपण म्हणतोच ना?अशा दुर्घटनांमध्ये कोणताही स्वार्थ मनात न ठेवता मदतीला धावून जाणाऱ्यांमागेही ईश्वरी प्रेरणाच असते हे तुम्ही का नाही समजून घेत?माणसातल्या देवत्वाला जागवणाराही देवच असतो हे तुम्ही लक्षात घेत नाही. मी मगाशीच म्हंटलं की तुमच्यावर कधी संकटं नाही आली कारण ती तुमच्यापर्यंत पोहचण्याअगोदरच आम्ही ती आमच्या अंगावर घेत होतो.आमच्या आयुष्यात अनेक असे प्रसंग आले की वाटायचं की संपलं सगळं.पण अचानक एखादा हात पुढे यायचा आणि आम्हांला साभाळून घ्यायचा.तो हात माणसाचाच असायचा पण तो पुढे येण्यामागे प्रेरणा देवाचीच असायची हे नक्की”
तिचं म्हणणं मनाला पटत होतं त्यामुळे बराच वेळ मला काहिच बोलता आलं नाही. मग मी धीर धरुन म्हणालो.
” ठिक आहे देव आहे असं तत्वतः मान्य करतो.पण आई देवपुजा करणं म्हणजे वेळेचा अपव्ययच नाही का?”
” मुसलमान दिवसातून पाच वेळा नमाज पढायला मशीदीत जातात.त्यांना तो वेळेचा अपव्यय वाटत नाही. ख्रिश्चन दर रविवारी वेळात वेळ काढून चर्चमध्ये प्रेयर करायला जातात,जगातले जेवढेही इतर धर्म आहेत त्यांना देवाची प्रार्थना करणं हा वेळेचा अपव्यय आहे असं वाटतं नाही .उलट त्या प्रार्थनेमुळे आपल्याला नैतिक आणि आत्मिक बळ मिळतं अशी त्यांची भावना असते.मग दोन मिनिट दिवा ,अगरबत्ती लावून देवाला नमस्कार करण्यात हिंदूंना वेळेचा अपव्यय का वाटावा?तासनतास तुम्ही मोबाईलवर चॅटिंग करत असता,दिवसदिवस क्रिकेटची मॅच बघण्यात किंवा सिरियल्स बघण्यात तुम्ही घालवता,तो तुम्हाला वेळेचा अपव्यय नाही का वाटत?”
आई पोटतिडकीने बोलतेय आणि ते खरंही आहे हे मला कळत होतं पण वळत नव्हतं.
आता माझी आणि एकनाथ काकांची नेहमी गाठभेट व्हायची.कधीकधी ते मला मंदिरात चलायचा आग्रह करायचे.मीही मग त्यांना बाईकवर बसवून मंदिरात घेऊन जायचो.मंदिरातला तो घंटेचा आवाज,गाभाऱ्यातला तो समईचा उजेड,देवांच्या त्या प्रसन्न चेहऱ्याच्या मुर्ती,मंद सुरात सुरु असलेली भक्तिगीतं यामुळे मलाही भारावून गेल्यासारखं व्हायचं.
एक दिवस मी काकांना म्हणालो
“काका देव तर आपल्या घरीही असतात मग या मंदिरात येऊन देव दर्शन करण्याचा काय उपयोग?”
“तुझं म्हणणं एका दृष्टीने बरोबर आहे.देव तर सगळीकडेच आहे मग देवळं बांधून त्यात देवाच्या मुर्ती ठेवण्याची गरजच काय? असं बघ.देव या संकल्पनेला सर्वच धर्मात मान्यता आहे.आणि या श्रध्देची निर्मितीस्थळं म्हणजेच ही प्रार्थनास्थळं होत.मग ती हिंदुंची मंदिरं असोत,मुसलमानांच्या मशीदी असोत,शिखांचे गुरुद्वारा असोत की बुध्दांचे विहार.आपली मंदिरं तर फक्त धार्मिक सेवेचीच नव्हे तर सामाजिक सेवेचेही स्थळं आहेत.पुढेमागे जेव्हा तू भारतात फिरशील आणि या मंदिरावरची अप्रतिम शिल्पकला बघशील तेव्हा तुझ्या लक्षात येईल की ही मंदिरं आपल्या संस्कृतीची उत्तम निदर्शक आहेत.तसंच संसाराच्या व्यापातून दोन घटका वेळ काढून याच मंदिरात आल्याने माणसांच्या मनाला शांतता मिळायची.याच मंदिरात होणाऱ्या भजन,किर्तनांनी माणसांवर चांगले संस्कार व्हायचे.प्राचीनकाळी या मंदिरांचा उपयोग प्रवाशांच्या निवासासाठी,लग्न वगैरे कार्यासाठी व्हायचा.आजही तो होतोच आहे.आता आणखी एक प्रश्न म्हणजे घरातल्या देवघरात दत्ताचा फोटो किंवा मुर्ती आहे मग दत्त मंदिरात जाण्याची गरजच काय?आता मला सांग.मुसलमान घरीही नमाज पढू शकतात त्यांना त्यासाठी मशीदीत जायची गरजच काय?ख्रिश्चनांच्या घरातही येशूच्या मुर्त्या किंवा फोटो असतात मग तरीही ते प्रेयरसाठी चर्चमध्ये का जातात?याचं कारण म्हणजे ही सामुहिक प्रार्थनेची श्रद्धास्थळं आहेत.त्या निमित्ताने माणसं एकमेकांना भेटतात.वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतात.अर्थातच समाजाला एकत्र आणण्यासाठी ही धार्मिक स्थळं आवश्यकच असतात ”
काकांच्या सहवासात माझ्या अनेक शंकांचं निरसन होत होतं.माझ्या ज्ञानातही भर पडत होती.
काकांबद्दल आता मला आत्मीयता वाटू लागली होती.काकांना भारतातली धार्मिक स्थळं बघण्याची खुप इच्छा होती.कुणीतरी आपल्याला तिथे घेऊन जावं असं त्यांना वाटत होतं.पण मुलाच्या अकाली जाण्याने आपली ती इच्छा अपुर्ण राहणार अशी त्यांना भिती वाटत होती. मग मी ठरवलं की माझ्या आईवडिलांसोबत काकांनाही फिरवून आणायचं.म्हणून मग मी माझ्या आई-वडिलांसोबत एकनाथ काकांनाही चारधाम यात्रा, बारा ज्योतीर्लिंग, नर्मदा परिक्रमा घडवून आणली. महाराष्ट्रातल्या अनेक तीर्थक्षेत्रीही त्यांना घेऊन गेलो.
काका कधी बोलले नाहीत, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान आणि माझ्याबद्दलची कृतज्ञता दिसून यायची.काकांच्या इच्छा पुर्ण करुन मी एक सत्कर्म केल्याचं माझ्या आईवडिलांनाही समाधान वाटत होतं.
एकनाथ काका आता मला आपला मुलगाच मानू लागले होते.ते माझ्या कंपनीतल्या कामाची चौकशी करायचे.माझ्या वाढदिवसाला आवर्जून फोन करुन मला शुभेच्छा द्यायचे.ते स्वतः फारसं काही खायचे नाहीत पण मला संध्याकाळी हाॅटेलमध्ये स्वखर्चाने जेवू घालायचे.मीही त्यांना बरं वाटलं नाही की दवाखान्यात घेऊन जायचो.गरज पडेल तेव्हा त्यांना औषधं आणून द्यायचो.
एक दिवस ते म्हणाले
“आता माझ्या सगळ्या इच्छा पुर्ण झाल्या.आणि त्या पुर्ण व्हाव्या म्हणून देवानेच तुझी,माझी भेट घालून दिली.एक मुलगा नियतीने हिसकावून नेला पण देवाने तुझ्या रुपाने मला दुसरा मुलगा दिला बघ.आता मला देवाने केव्हाही उचलावं मी तयार आहे.तुला मी माझ्या मुलीचा आणि इतर नातेवाईकांचे फोन नंबर देऊन ठेवतो.माझं काही बरंवाईट झालं तर त्यांना कळव.आणि हो.मला मुलगा नाही. माझे अंत्यसंस्कार तुच करावेस अशी माझी तुला विनंती आहे ”
माझे डोळे भरुन आले.मी त्यांना म्हणालो
” काका तुम्ही काही इतक्यात जात नाही. आणि काळजी करु नका मी सगळं व्यवस्थित करेन ”
शेवटी काकांची इच्छा देवाने पुर्ण केली.त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यावर मी त्यांना हाॅस्पिटलमध्ये ॲडमीट केलं.मी त्यांच्या मुलीला आणि नातेवाईकांना फोन करुन याची माहिती दिली.पण ते येण्यापूर्वीच काकांनी माझ्या हातून शेवटचं पाणी घेत प्राण सोडले.
काकांच्या अंत्यविधीला त्यांची आफ्रिकेतली मुलगी-कविता,जावई आणि गोड चेहऱ्याची नणंद-सोनाली आले होते. काकांचं क्रियाकर्म त्यांच्या इच्छेनुसार मीच केलं. काकांनी माझ्याबद्दल त्यांच्या मुलीला आणि जावयाला काय सांगितलं होतं माहित नाही पण दोघंही माझ्याशी खुप आदराने वागत होते.या तेरा चौदा दिवसात माझे आणि सोनालीचे सुर कसे कुणास ठाऊक जुळून आले.मी सोनालीच्या प्रेमात पडल्याची मला जाणीव झाली.सोनालीच्या एकंदरीत वागण्यावरुन तिलाही मी आवडू लागलोय असा मला अंदाज येऊ लागला होता.
सहा महिन्यांनी कवितेच्या नवऱ्याने मला आफ्रिकेत नोकरीची ऑफर दिली.पगार गलेलठ्ठ असल्याने मी ती ऑफर नाकारण्याचा प्रश्नच नव्हता. त्यानंतरच्या सहा महिन्यात मी आणि कवितेची नणंद-सोनाली एकमेकांच्या खुप जवळ आलो.आणि शेवटी माझं आणि सोनालीचं,आमची जात वेगवेगळी असूनही, बिनविरोध लग्न झालं.एका छोट्या गावातल्या मुलाला परदेशातली बायको मिळाली याचा माझ्या आईवडिलांना खुप आनंद झाला.
आयुष्याला मिळालेली ही अकस्मात वळणं पाहून माझा देवावरचा विश्वास आता अधिकच दृढ झालाय.आज आफ्रिकेतल्या माझ्या बंगल्यात मी मोठं देवघर बनवून घेतलंय.खुप फुलं वाहून देवपुजा केल्याशिवाय मी आता घराच्या बाहेर पडत नाही.
कधीकाळी मी नास्तिक होतो यावर आता माझा स्वतःचाच विश्वास बसत नाही…..!!
🌸🌸🌼🌼🌸🌸
© दीपक तांबोळी
9503011250
( ही कथा माझ्या ” कथा माणुसकीच्या ” या पुस्तकातील आहे.कृपया शेअर करतांना लेखकाच्या नावासह शेअर करावी ही विनंती.माझ्या पुस्तकांच्या अधिक माहितीसाठी क्रुपया वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा )