पोऱ्या ©️ दीपक तांबोळी 9503011250
पोऱ्या
-दीपक तांबोळी
सकाळची साडेदहाची वेळ.ऑफिस सुरु व्हायला थोडा अवकाश होता.समोरच्या हाॅटेलमध्ये चहा छान मिळतो म्हणून आम्ही त्या हाॅटेलात शिरलो.मागच्या बाजूच्या टेबलवर आम्हांला जागा मिळाली
“ए पोऱ्या पाणी आण”शेजारच्या टेबलवरुन एकजण ओरडला.
” ए पोऱ्या अरे कचोरी आण ना ”
“ए पोऱ्या दोन मिसळ आण.वरुन दही टाक”
आजुबाजूच्या टेबलवरुन ऑर्डर्स सुटत होत्या आणि हाॅटेलमधला एकमेव वेटर असलेला १३-१४ वर्षाचा तो पोरगा अक्षरशः धावत होता.प्रत्येक ग्राहकाला ताबडतोब ऑर्डर हवी होती.तोही कुणाला नाराज करत नव्हता.मी हात दाखवून त्याला दोन चहाचा इशारा केला.तसा तो समोर गेला.दोन ग्लासात कटींग चहा घेऊन आला.
तहसील कचेरीसमोरचं ते हाॅटेल नेहमीच तुडुंब भरलेलं असायचं.आमचा चहा ,नाश्ता आणि डबा नाही आणला तर जेवणही तिथंच व्हायचं.चविष्ट पदार्थ आणि उत्तम सर्व्हिस त्यामुळे त्या छोट्याशा हाॅटेलात कायम गर्दी असायची.आणि अशी सर्व्हिस देणारा तो हसतमुख चुणचुणीत मुलगा नेहमीच माझ्या उत्सुकतेचा विषय होता.सकाळी हाॅटेलमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी असायची.ग्राहक कधी कधी त्याला रागवायचे,त्याच्यावर चिडायचे,दिलेली ऑर्डर लवकर आणण्याची घाई करायचे पण याचा आवाज कधी चढलेला मी बघितला नाही.
“हो काका आता आणतो तुमचे पोहे”
“हो मावशी आणतो.फक्त दोन मिनिट,आता आली तुमची मिसळ”
” दोन मिनिट साहेब,चहा तयार झाला की आणतोच “असं सांगून तो ग्राहकांचं समाधान करायचा.त्याला बसलेला मी कधी बघितलाच नाही. कधी माणूस आला नाही तर टेबल पुसतांना,कपबशा आणि नाश्त्याच्या प्लेट्सही धुतांना तो दिसायचा.
एक दिवस दुपारच्या वेळेस हाॅटेलमध्ये फारसे ग्राहक नसतांना मी त्याला बोलावलं.
“नांव काय रे तुझं?”
“दिलीप”
“कुठला तू?”
त्यानं बावीस किमी.वरच्या गावाचं नांव सांगितलं.
“शाळेत जातोस?”
“नाही.४थी नंतर सोडली.
“का?”
“गावात दुष्काळ पडला.कामं मिळेना.अण्णांनी (त्याच्या वडिलांनी)इथं पाठवून दिलं”
“किती पगार मिळतो?”
“खाऊन पिऊन पाचशे रुपये”
“काय करतो पैशांचं?”
“गावी पाठवतो अण्णांकडे”
“पुढं शिकावसं वाटत नाही?”
“खुप वाटतं पण काय करणार?नाईलाज आहे.आईअण्णांच्या मजुरीत भागत नाही ”
तेवढ्यात ग्राहक आल्याने संवाद संपला.मी मालकाकडे चौकशी केली.दिलीप सर्वात मोठा मुलगा.एक लहान भाऊ आणि एक बहीण.आईवडील शेतमजूर.अर्थातच घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची.त्यामुळे शाळेत हुशार असुनही दिलीप शिकू शकला नाही.दिलीप हाॅटेलमध्येच झोपायचा.सकाळी पाच वाजता उठायचा.बाहेरच्या नळावर अंघोळ करायचा.हाॅटेलच्या टाक्यांमध्ये पाणी भरायचा.आचारी आला की वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी तो त्याला मदत करायचा.कांदे आणि मिरच्या चिरायचं कामही त्याच्याकडेच होतं.ग्राहक यायला लागले की वेटरच्या कामाला भिडायचा. मग रात्री दहापर्यंत त्याला फुरसत नसायची.ते छोटंसं हाॅटेल हेच त्याचं विश्व होतं.कधी दिवाळीला तर क्वचित प्रसंगी लग्नसमारंभाला तो गांवी जायचा तेवढाच काय तो त्याच्या आयुष्यातला बदल.
एकदा चार पाच दिवस तो दिसला नाही.मी मालकाकडे चौकशी केली.दिलीप गांवी गेला होता.त्याचा लहान भाऊ डेंग्यूने आजारी होता.गावात इलाज झाले नाहीत.जिल्ह्याच्या गावी नेण्याइतके पैसे नव्हते.शेवटी तो इलाजाविना तिथंच वारला.त्याच्या अंत्यविधीचा खर्चही हाॅटेलमालकाने केला.मला खुप वाईट वाटलं.अगोदर कळलं असतं तर काहीतरी मदत करता आली असती.त्या चारपाच दिवसात हाॅटेलमालकालाच वेटरचं काम करावं लागलं म्हणून हाॅटेलमालक चांगलाच वैतागला होता.
गावाहून परतल्यावर भाऊ वारल्यामुळे दिलीप गंभीर असेल अशी माझी कल्पना. पण हा पठ्ठ्या हसतमुखच! मी त्याला या बाबतीत छेडल्यावर म्हणाला
” साहेब किती दिवस दुःख करणार?गरीबाला शेवटी पोटापाण्यासाठी उभं रहावंच लागतं ”
खरंच होतं त्याचं म्हणणं.हे हाॅटेल काय सरकारी कार्यालय होतं चौदा दिवस पगारी रजा द्यायला?
त्यानंतर माझी आणि दिलीपची चांगली दोस्ती जमली.मी त्याला गोष्टीची,ज्ञानवर्धक पुस्तकं आणून द्यायचो. तोही मला इतर ग्राहकांपेक्षा थोडी जास्त मिसळ,जास्त भजी द्यायचा.आचाऱ्याला माझा चहा स्पेशल बनवायला सांगायचा.अर्थात मी दिलेली पुस्तकं वाचायला त्याला वेळ मिळत होता की नाही शंकाच होती.कदाचित रविवारी सरकारी कार्यालयं बंद असल्यामुळे ग्राहकांची वर्दळ कमी असायची तेव्हा वाचायला त्याला सवड मिळत असावी.एक मात्र खरं की मी पुस्तकं दिल्यावर त्याचा चेहरा खुलायचा.
एक दिवस माझ्या मुलाचा वाढदिवस होता.बाहेरचं विश्व काय असतं हे सतत हाॅटेलमध्ये राबणाऱ्या दिलीपने जरा तरी बघावं म्हणून मी त्यालाही बर्थडे पार्टीचं निमंत्रण दिलं.पण सायंकाळी खुप ग्राहक असतात म्हणून तो नाही म्हणाला.मी हाॅटेलमधून निघालो तसं त्याने मला थांबवलं.मालकाची परवानगी घेऊन तो बाहेर गेला आणि थोड्यावेळाने परतला तेव्हा त्याच्या हातात गिफ्टचं पार्सल होतं.
“साहेब मी तर येऊ शकत नाही पण तुमच्या मुलाला द्या माझ्याकडून गरीबाची भेट”
“अरे याची काय गरज होती दिलीप?तू आला असतास तर खुप बरं वाटलं असतं”
“असू द्या साहेब”
म्हणून त्यानं ते पार्सल माझ्या हातात कोंबलं.
रात्री वाढदिवसाची पार्टी पार पडल्यावर आम्ही सर्व गिफ्ट्स उघडली आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला.एवढ्या सगळ्या गिफ्ट्स मध्ये दिलीपचं गिफ्ट सर्वात महागडं होतं.पाचशे रुपये पगार कमवणाऱ्या त्या पोराने चक्क तीनशे रुपयाचं गिफ्ट दिलं होतं.मला एकदम गहिवरून आलं.त्या गरीबाचं मन श्रीमंतांपेक्षाही श्रीमंत होतं.दुसऱ्या दिवशी मी त्याला केक आणि कॅडबरीचं मोठं चाॅकलेट दिल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मलाच खुप समाधान वाटलं.
त्या दिवसानंतर दिलीपबद्दल माझं मन एकदम बदलून गेलं.त्याच्या बद्दल मला आत्मीयता वाटू लागली.त्याचं आयुष्य असं वेटरच्या कामात किंवा कपबशा धुण्यात जाऊ नये असं मला प्रकर्षाने वाटू लागलं.शेवटी मी निर्णय घेतला.
या घटनेला आज दोन वर्षे होऊन गेलीत.आज दिलीप पुण्यात एका चांगल्या शाळेत शिकतो आहे.खटपट करुन एका फाऊंडेशनला मी त्याच्या उच्च शिक्षणापर्यंतचा संपुर्ण खर्च उचलायला राजी केलं आहे आणि दिलीप ऐवजी त्याच्या आईवडिलांना पाचशे रुपये मी दरमहिन्याला पाठवतोय.या पाचशे रुपयात काही होत नाही हे मलाही कळतंय पण मीही काही धनाढ्य माणूस नाही. एका कारकुनाची क्षमता तरी किती असणार?त्या पाचशे रुपयाच्या बदल्यात दिलीपने चांगली नोकरी लागली की शेतमजूरांच्या शाळा सोडून दिलेल्या मुलांचं भवितव्य घडवण्यासाठी प्रयत्न करावेत असं मी त्याच्याकडून वचन घेतलंय.
©️ दीपक तांबोळी
9503011250
(ही कथा माझ्या “कथा माणुसकीच्या ” या पुस्तकातील आहे.क्रुपया कोणतेही बदल न करता लेखकाच्या नावासहितच शेअर करावी.माझ्या पुस्तकांच्या अधिक माहितीसाठी क्रुपया वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा
मस्त!