बाप आहे म्हणून (कॉपी पेस्ट) Writer Unknown
बाप आहे म्हणून (कॉपी पेस्ट)
काही दिवसापूर्वी मी पुण्यात असताना एका महत्वाच्या मिटिंग बसलो होतो.माझ्या सोबत चारजण क्लासवन दर्जाचे अधिकारी बसलेले होते.तर काही उद्योजक आणि समाजसेवक ही होते.एका मोठ्या कार्यक्रमाच्या संदर्भात आमचं बोलण सुरु झालेलंच होतं. आणि तेवढ्यात माझा फोन व्हायब्रेट व्हायला लागला..
फोन समोरच असल्यामुळे माझं लक्ष स्क्रिनवर गेलं.फोन माझ्या वडिलांचा होता.मी सर्वाना चेहऱ्याने खूणवून विनंती केली आणि फोन उचलला.
आणि मी एकदम मोठ्या आवाजात म्हणलं “बोला अण्णा काय म्हणताय..”तर पलीकडून अण्णा म्हणले “कुठ हाईस..? “
मी म्हणलं,पुण्यात आहे.अण्णा जरा मीटिंग मध्ये आहे.अण्णा म्हणाले “ते असू दे, काय खाल्लास का बाबा पोटाला..?
मी होय म्हणलं..अण्णांनी फोन ठेवला.. आमचं बोलणं पुन्हा सुरू झालं.. आणि लगेच पाच मिनिटांनी पुन्हा अण्णांचा फोन आला..
*मी पुन्हा सगळ्यांना थांबवलं आणि फोन घेतला…पलीकडून आण्णा म्हणाले “ हे बघ येताना किलोभर बोंबील आणि सुकट घेऊन ये. तुझ्या त्या खडकीच्या दोस्ताकडणं
..मी बरं अण्णा म्हणलं…परत फोन ठेवला…मीटिंग सुरू झाली..आणि परत लगेच दोन मिनिटांनी अण्णांचा परत फोन आला..*
मी शांतपणे पुन्हा फोन घेतला..पलीकडून अण्णा म्हणाले, आरं टिव्हीचा रिचार्ज संपलाय तेवढं बॅलन्स मार त्यावर लगेच…” मी होय आण्णा म्हणून फोन ठेवला आणि ताबडतोब बॅलन्स टाकला..
तर लगेच परत फोन आला..अण्णा परत म्हणले “ हम्म आलाय आलाय बॅलन्स चालू झालं..” मी बर अण्णा म्हणून फोन ठेवला..
सगळ्यांना सॉरी म्हणून मी बोलायला सुरू होणार तेवढ्यात परत फोन आला…मी परत फोन घेतला आणि अण्णांनी विचारलं “ आरं ती भारताची मॅच कवा हाय..साऊथ आफ्रिका सोबत हाय नव्हं आता..त्यावेळी वल्डकप सुरू होता..अण्णांना क्रिकेटचा जरा नाद आहे.
मी बाजूच्या एकाला विचारलं, “सर कधी आहे ओ साऊथ आफ्रिके सोबत आपली मॅच..??? त्याने तर तोंडावरचा राग लपवत सांगितलं की उद्या आहे मॅच म्हणून….मी तसंच अण्णांना सांगितलं…मग अण्णांनी परत फोन कट केला…
चार पाच वेळा एका दमात फोन झाल्याशिवाय आण्णा शांत बसत नाहीत ही सवय मला माहित होती.आता दोन तास तरी त्यांचा फोन येणार नाही याची खात्री मला झाली.आणि मी पुन्हा सर्वांना बोललो सर आता करा सुरू…
माझ्या त्या फोनमुळे वातावरण जरा बदलले होते याची जाणीव मला झाली होती..पण मी काय लै लोड घेतला न्हाय..मीटिंग संपली..
मीटिंग संपल्यावर नाष्टा आला..नाष्टा करताना सगळेजण त्यांच्या फोनवर आलेले मिसकॉल पाहत होते.आणि मला ते समजावे म्हणून एकमेकांना कॉल आलेले दाखवत होते.
माझ्या ही फोनवर सात ते आठ अनोळखी नंबर वरून आलेले मिस कॉल दिसत होते…मी मात्र त्याकडे दुर्लक्ष करून नाष्टा पोटात ढकलू पाहत होतो..
त्यातला एकजण मला म्हणाला, दादा एक बोलू का..? रागावू नका पण मीटिंग सुरू असताना फोनवर लै बोलला तुम्ही..आणि वडिलांचाच तर फोन होता आणि एवढं काय महत्वाचं ही नव्हतं.. तुम्ही मिटिंग संपल्यावर ही बोलू शकला असता त्यांना.? त्याच्या सुरात सगळ्यांनी सुर मिसळला आणि शांतपणे ते सर्वजण माझ्यावर राग व्यक्त करू लागले. त्या सगळ्यांचं बोलण झाल्यावर मी फक्त इतकंच म्हणलं…
आज बापाचा आपल्याला दिवसातून दहा वेळा कॉल येतोय यासारखी सुंदर गोष्ट जगात दूसरी कुठलीच नाही साहेब …
आणि साहेब मी जर फोन उचलला नसता ना तर किमान दोन तास तरी माझा बाप माझ्या काळजीत तडफडला असता..
साहेब आज बापाचा फोन येतोय उद्या भविष्यात बाप निघून गेल्यावर या नंबर वरून कॉल येणार नाही..हा काळजी असणारा आवाज कानावर पडणार नाही..
आणि साहेब मिटिंग,कार्यक्रम वैगेरे होतच राहतील…माझं बोलणं सुरू होतंच तेवढ्यात अण्णांचा परत फोन आला…मी पटकन उचलला आणि स्पिकरवर टाकला…अण्णा जोरात बोलत म्हणाले,
“ आर बोंबील घेताना खारा मासा बी जर चांगला भेटला तर किलोभर घेऊन ये..तोंडाला चव येईना लका…मी शांतपणे होय म्हणल्यावर फोन ठेवला…
त्यावेळी अचानक समोरच्या खुर्चीत बसलेले परांजपे सर एकदम लहान मुलासारखे रडू लागले…
सगळेजण शांत झाले…डोळे पुसत ते म्हणाले, चंदनशिवे खरं आहे तुमचं…
मी आयुष्यात काय गमावून बसलोय याची आज तुम्ही मला जाणीव करून दिली..
पण आता वेळ निघून गेली ओ.. आता नाही येत फोन माझ्या वडिलांचा. कारण वडीलच गेले ओ निघून.. पार पार दूर निघून गेले. रेंजच्या बाहेर गेले.सर्वांचे डोळे पाणावले. आणि गंमत म्हणजे ज्यांचे वडील रेंज मध्ये आहेत त्यांनी त्यांनी आपापल्या वडिलांना फोन करायला सुरवात केली.*
का कुणास ठाऊक पण सर्वजण अगदी लहान मुलासारखे बापाशी बोलू लागले. मात्र परांजपे सरांचा हंबरडा आतल्या आत बापाच्या आठवणीत हंबरत राहिला.
आम्ही बाहेर पडलो.सगळेजण त्यांच्या त्यांच्या गाडीतून निघून गेले. आणि मी माझ्या खडकीच्या मित्राला म्हंजे रुपेशला फोन केला..
पलीकडून रूप्या शिवी देतच म्हणाला काय रे नालायक माणसा आज आठवण आली का तुला..??.
मी पण तसाच शब्द फिरवत म्हणलं, नालायका कोथरूडला ये ना बोंबील, सुकट आणि खारा मासा घेऊन..
आण्णाने घेऊन यायला लावलं आहे. तसा रुप्या हसत म्हणाला मी तुला फोन करणारच होतो.. कारण अण्णांचा मला फोन आला होता मघाशीच.. येतो घेऊन थांब तिथंच…तासाभराने रुप्या सगळं घेऊन आला..
मी मात्र त्या बोंबलाच्या दरवळनाऱ्या वासात अण्णांचा हसरा चेहरा शोधू लागलो..
मित्रहो, बापाचा फोन येतोय ना..
येतोय ना..!! तर दुनिया गेली उडत..
बापाचा फोन उचलायचा आधी..!!
तुमची मिटिंग,तुमचं ऑफिस कुठेही पळून जाणार नाहीय. दुनिया जिथं आहे तिथंच असणार आहे..!!
पण केव्हा ना केव्हा तरी बाप जाणार आहे रेंजच्या बाहेर. तिथून बाप फोन करू शकणार नाहीय. त्यावेळी कितीही तडफडून वाट बघितली ना तरी स्क्रिनवर हा नंबर येणार नाहीय..
म्हणून दोस्ता दुनियेला जरा वाळत घालायचं आणि बापाच्या प्रेमात ओलं होऊन जायचं.. बस्स इतकंच सांगायचं होतं..!!
वाचून झालं असेल तर…
पहा वडिलांचा मिस कॉल पडलाय का..?
चला लावा बरं फोन आपल्या बापाला वाट पाहतोय ना तो तुमच्या फोनची
Speechless!