वैशिष्ट्यपूर्ण / फिचर

पहिला नायक गुरुदत्त ३८व्या वर्षी गेला… दुसरा संजीव कुमार ४८व्या वर्षी गेला…

दंगल मध्ये एक सुरेख संवाद आहे ज्यात आमिर आपल्या मुलीला म्हणतो “सिल्वर, ब्रॉन्झ मारशील तात्पुरतं नाव होईल. गोल्ड मारशील. कायमचं नाव कोरल जाईल लोकांच्या मनात…”

संजीव कुमारने तर दोन नॅशनल आणि कित्येक इतर अवॉर्ड्स आपल्या अभिनयासाठी मारलीयेत पण त्याचं नाव येतं का चटकन दिलीप, देव, राज, शम्मी, बच्चन, धरम, राजेशच्या पंक्तीत?

नाही… मलाही पटकन नाही स्मरत संजीव कुमार हे नाव.

आपलं दुर्दैव.

मला आठवतं – शोले बघितल्यानंतर संजीव कुमारचे इतर चित्रपट पाहिल्यावर आम्हा लहान मुलांना संजीव कुमार हा धरमेंद्र, अमिता बच्चन सारखाच एक हिरो आहे व ढिशुम ढिशुम करतो हे जेव्हा कळलं तेव्हा थोडं आश्चर्यच वाटलं होतं. लवकरच हा माणूस बाप नट आहे हे उमजत गेलं. आजूबाजूच्या सिनेमाप्रेमी लोकांच्या बोलण्यातून. लिहिण्यातून. लोक संजीव कुमारला रिस्पेक्ट करायचे. [पण तो सोलो हिरो असलेले चित्रपट मात्र कमी असायचे.] आम्हाला त्या काळात आवडलेला पिक्चर म्हणजे ‘मनचली’. संजीव कुमार उछलकूद करत गाणं म्हणतोय हे पाहणं सुखावह होतं. तसा तो सीता और गीता मधून पण स्केटिंग वगैरे करत धमाल ;हवा के साथ साथ’ म्हणत मजा आणायचा.

पण शेवटी तो होता शोलेचा ठाकूरच. दात ओठ खात आपल्या क्रोधाला कसबस थोपवत ‘मुझे गब्बर चाहिये … जिंदा’ म्हणणारा पॉवरहाऊस ठाकूर बलदेव सिंह. जोरदार वाऱ्याने शाल उडून खाली पडते आणि फ्लॅशबॅक मध्ये गब्बरने हातावर वार केलेल्या शॉट मधून डायरेक्ट आताच्या होळीनंतरच्या सिनला येताना संजीव कुमार या अचाट नटाच्या सॉरी ठाकूर बलदेवसिंगच्या चेहऱ्यावरचे भाव पहा. त्या वाराचा, अख्ख कुटुंब मारलं गेल्याच्या आघाताचा सदमा त्याला परत बसलाय. डोळे भय, राग, धक्का आणि बदल्याची आग दाखवत निखाऱ्यांसारखे फुलले आहेत. अंग ताठ झालंय. प्रेक्षकांनाही त्याचवेळेला या नृशंस घटनेबद्दल कळलेलं आहे आणि ठाकूर बलदेवच्या सूडाच्या प्रवासात जय वीरू तर सलीम जावेद मुळे सहभागी होतात पण प्रेक्षक… प्रेक्षक हे निव्वळ त्या उत्तुंग अभिनयाविष्काराने थिजून गेलेले आहेत. चला उठून घोडा घालून गब्बरला उचलून आणूया इतकं वेंधळ जनावर नाहीये ते… म्हणून ठाकूरच्या थंड सूडाग्नीमध्यें प्रेक्षक आपोआप जळू लागतात ते गब्बरचा खात्मा होईपर्यंत.

मला माहीत आहे निव्वळ ठाकूर म्हणजे संजीव कुमार नाही. पण त्या ठाकूरचा ठसा पुसून टाकणं अशक्य आहे. म्हाताऱ्याच्या रोल्समध्ये संजीव कुमारची हातोटी होती असं म्हटलं जातं. अतिशय ढोबळ विधान नाही का? तो बाप नट होता. नया दिन नयी रात मध्ये नऊ रोल्स करणारा. कुठलेही रोल्स लीलया करायचा. मिश्किल असावं तर ते संजीव कुमारने. एका पिक्चरमध्ये थिएटर मॅनेजर असलेल्या विक्रम गोखलेंना तुम्ही विक्रम गोखलेंसारखे दिसताय म्हणत बाटलीत घालण्याचा सिन असो कि पती पत्नी और वो मधला बेरकी बॉस… गरीब बाप [देवता] कि आढ्यताखोर श्रीमंत बाप [त्रिशूल]. दस्तक आणि कोशिश बद्दल तर काय लिहिणार. अनोखी रात मधला अहो रे ताल मिले गाणारा भोळा भाबडा संजीवकुमार … इतनी सी बात, खिलोना, देवता मधला, अनामिका, परिचय मधला, चरित्रहीन मधला, टक्कर, वक्त कि दिवार … कि गृह प्रवेश मधला, सिलसिला मधला, नमकीन मधला …. संजीव कुमारचे चित्रपट, त्याच्या भूमिका वाळूसारख्या आहेत.. जितक्या ओंजळीत घेऊ जास्त निसटत राहतात… शम्मी कपूर जेव्हा दिग्दर्शनात उतरला तेव्हा त्याला संजीव कुमारच लागला मनोरंजनसाठी. दिलीप, शम्मी, संजीवच्या विधाता मध्ये संजीवच्या अबुबाबाने या दोघांनाही विनासायास झाकोळलं आहे.

संजीव कुमार इतकं देखणं, स्निग्ध हसणारा दुसरा बॉलिवूडमधला माणूस म्हणजे मला वाटतं धरमच असेल. संजीवकुमारचं नशीब धरमसारखं पॉवरफुल नसावं… नायिकांच्या बाबतीत… आरोग्याच्या बाबतीत मात्र स्वतः संजीव कुमार फार जागरूक नव्हता त्याकाळातल्या नायकांप्रमाणे.. हळू हळू चाळिशीतच तो दहा वर्षे मोठा वाटू लागला.. अंगुर आणि नौकर मध्ये पहा…

पण त्याचा अभिनय?

अंगुरच्या डबल रोल मधला संशयी स्वभाव असलेला अशोक (संजीव कुमार) लग्न झालेल्या अशोक (पुन्हा संजीव कुमारच्या) घरी जातो, तेव्हा त्याच्यावर आधी रुसलेली बायको मौशुमी त्याला मस्का मारते, पेग भरून देते तेव्हा या माणसाने जी तुफान कॉमेडी केलीय… वेळ असेल तेव्हा अंगुर बघावा. फ्रेश होतं मन…

मात्र हाच संजीव कुमार मौसम मध्ये हृदयात खोलवर विरहाची जखम वावरत आपलं तारुण्य शोधत जाड़ों की नर्म धूप और आँगन में लेट कर… म्हणत भटकतो तेव्हा काळीज कुरतडत रहातो.. अगदी नमकीन मध्ये उडते पैरो के तले जब बहती हैं जमीं म्हणत ट्रक हाणत दूर निघून जातो तेव्हाही…

खूप वर्षांनी भेटलेले पती पत्नी… ती अजूनही सुंदर, तो देखणा…दोघेही करारी. तो तिला त्या जागेची खुबी सांगत असतो, दिवसा उजेडी हे इतकं छान दिसतं वगैरे. राजकारणात मोठ्या पदावर गेलेली ती खंतावून म्हणते, “दिवसा मला यायला कुठे जमणार?” तो चपापतो.. मग हजरजबाबीपणाने म्हणतो, “हा जो चंद्र आहे ना तो रात्री येतो… पण मध्येच अमावस्या येते..तसं १५ दिवसांची असते ही अमावस्या.” मग दूर कुठेतरी हरवत जात म्हणतो, “लेकीन इस बार बहोत लंबी थी…”
पत्नी रडवेली होऊन म्हणते “नौ बरस लंबी थी ना?” एपिक सीन आहे हा संजीव कुमार नावाच्या अभिनेत्याने मंतरलेला…

लव्ह अँड गॉड नावाचा सिनेमा आहे. के आसिफ यांचा.. लैला मजनू वर… एक दंतकथा अशी की के आसिफ यांना ही फिल्म करू नये असा दृष्टांत झाला होता. तरीही त्यांनी हट्टाने फिल्म सुरू ठेवली. फिल्मच्या हिरोचा एका वर्षात मृत्यू झाला म्हणून आसिफ साहेबांनी दुसरा हिरो घेऊन फिल्म बनवायला घेतली आणि आसिफ साहेब हे जग सोडून गेले.. तेही वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी…

लव्ह अँड गॉडच्या दोन्ही नायकांचा पन्नास गाठायच्या आत मृत्यू झाला…

पहिला नायक गुरुदत्त ३८व्या वर्षी गेला…

दुसरा संजीव कुमार ४८व्या वर्षी गेला…

#HappyBirthdaySanjeevKumar

You are Gold. You will always be remembered.

#CinemaGully
गुरुदत्त सोनसुरकर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}