दुय्यम_स्थान … @अर्चना अनंत…….
..#दुय्यम_स्थान …. खूप सुंदर कथा 👌…..
रेवती माझी मैत्रीण घरी नागपूरला आली असं कळलं म्हणून तिला भेटायला निघाले…
दोन वर्षांपासून भेट नव्हती…. दोन वर्षांपूर्वी तिच्या नवऱ्याला हार्ट अटॅक येऊन गेला होता.. त्यामुळे दगदग नको, आणि वेळप्रसंगी कुणी जवळ असो म्हणून नवरा बायको बॅगलोरला मुलाकडे शिफ्ट झाले होते.. कुण्यातरी नातेवाईकांकडे लग्न म्हणून ती आठ दिवसासाठी नागपूरला आली होती…. विचारतच तिचं घर आलं.. मी बेल दाबताच तिने दार उघडलं..
इथल्यापेक्षा छान दिसत होती.मी म्हटलं” रेवती, बॅगलोर मानवलं तुला..एकदम छान दिसतेस”
“हॊ ना.. मस्त वातावरण आहे तिथलं…. बस हं मी चहा ठेवते..”
“चहा बिहा नको.. बस आपण गप्पा मारू…”
आम्ही गप्पा करीत बसलो.. ती मुलाचं, सुनेचं, नातवाचं फार कौतुक करीत होती…
मी म्हटलं,” नशीबवान आहेस तु.. इतकी छान सून मिळाली”
ती हसली आणि थोडं थांबून म्हणाली, “हे बघ, नशीबवान वगैरे काही नसतं..जेव्हा मी तीथे शिफ्ट व्हायचं ठरवलं तेव्हाच आपल्या मनाला बजावलं , “त्या घरात आपलं स्थान दुय्यम.. ते तिचं घर.. त्यामुळे सगळे निर्णय तिचे. अजिबात लुडबुड करायची नाही.लागली ती मदत करायची आणि आनंदी राहायचं ”
तीथे सगळ्या कामाला बाई आहे.. स्वयंपाक माझी सून घरी करते.. मी तिला सरळ सांगतिले, “तु सगळा स्वयंपाक कर. पोळ्या मी करणार..तिचं आटोपलं की मी पोळ्या करते आणि ओटा आवरते. तेवढीच तिला मदत आणि स्वयंपाकात लुडबुडही नाही.
तशा तर अनेक गोष्टी मला नाही पटत.. जसं मुलांच्या बाबतीत.. पण त्यांची मुलं. त्यांना ज्या पद्धतीने वागवायची हा त्यांचा प्रश्न…
अगं,तीन वर्षांच्या मुलीला वेगळ्या खोलीत झोपवते.सी सी टी व्ही लावलाय.. मधे मधे उठून तिच्यावर लक्ष ठेवत असते…. मी म्हटलं अगं, तिलाही भीती वाटते आणि तुझी पण नीट झोप होत नाही.. त्यापेक्षा आमच्यासोबत झोपावं तिला…तर नाही म्हणतात.तिला एकटं झोपायची सवय लावयाला हवी म्हणते .
अगं, फक्त रविवारी ती आमच्यासोबत झोपते… इतकी गळ्यात पडते ना.. म्हणते आजी, मला रोजच तुझ्यासोबत झोपायचं.. इतकं वाईट वाटतं ना..पण मनात विचार करते त्यांची मुलगी.. कसे संस्कार करायचे हा त्यांचा प्रश्न…मग मी नातीलाच समजावते.. तुला ब्रेव्ह गर्ल व्हायचं आहे ना? मग आई बाबांचं ऐकायचं…
हे एक उदाहरण झालं..अशा अनेक गोष्टी खटकतात…पण आता मी अजिबात लक्ष देत नाही…
आमच्याशी दोघेही छानच वागतात.सून अगदी आपलेपणाने, प्रेमाने वागते.मग आपल्याला आणखी काय हवं?
खरंय गं.. त्यांचा संसार.. आपल्याला काय करायचं.. असं मी म्हटलं आणि मला रेवतीचे तिचं लग्न झाले तेव्हाचे बोलणे आठवले. ती सासुसासऱ्यांसोबत राहत असे .. तेव्हा असच बोलतांना म्हणाली होती, “या घरात माझं दुय्यम स्थान.. प्रथम स्थान सासूबाईचं..त्यांच्या संसारात मी प्रवेश केला.. त्यांच्या घरात राहते तेव्हा त्यांच्या कलाने घ्यावं लागतं”
माझं लक्ष नाही पाहून रेवती म्हणाली, काय गं, काय झालं?
“काही नाही… हे असं दुय्यम स्थान असणारी आपली शेवटची पिढी असणार….आधी सासू अग्रस्थानी आता सून ”
ती हसत म्हणाली, घरातल्या स्थानाचं काय घेऊन बसलीस हृदयातील स्थान अग्रस्थानी असावं. मी सासूबाईच्या हृदयात अग्रस्थानी होते आणि आता सुनेच्याही हृदयात अग्रस्थानी आहे…. आणखी काय हवे!
खरंच.. रेवती दुय्यम स्थान पण किती आनंदाने एन्जॉय करीत होती.. असं वागणं सगळ्यांच जमलं तर?
C & P…… लेखन…..@अर्चना अनंत…….