मंथन (विचार)

विठाई लेखक – प्रदीप केळूसकर 9422381299 / 9307521152

विठाई
लेखक -प्रदीप केळूसकर
9422381299/9307521152

कोकणातला धुवाधार पाऊस, मी जेवण करण्याच्या गडबडीत होते, मुलगा रवी सकाळी सातलाच शाळेत गेलेला, हे बँकेसाठी साडेनऊला निघत, जाताना यांना डबा द्यायला लागे. माझे दोन्ही स्टो पेटत होते. एका स्टो वर भाजी शिजत होती, दुसऱ्यावर तवा ठेवून मी चपाती लाटून भाजत होते. एवढ्यात यांचा बाहेरून आवाज आला ” अगं ये ये, आत ये ‘. मी बाहेरचा कानोसा घेतला. यांनी दरवाजा उघडला होता आणि कुणाला तरी आत बोलवत होते. मग माझ्याकडे वळून म्हणाले ” हिच्यासाठी चहा टाक थोडा ‘. माझी जेवणाची घाई, त्यात यांचे म्हणणे चहा टाक ” आत्ता मी चहा टाकणार नाही माझी जेवणाची घाई चालली आहे ‘.
” अग ती पावसात पूर्ण भिजली आहे कुडकुडते बिचारी ‘.
” कोण असं म्हणत मी बाहेर आले. पाहते तर एक झाडू घेतलेली म्हातारी बाई बाहेर कुडकुडत होती. त्या कुडकुडणाऱ्या बाईला पाहून मला पण तिची दया आली.
” भिजलीस ग बाई तू, ये आत ये, चहा टाकते तुझ्यासाठी ‘ म्हणून मी स्वयंपाक घरात आले आणि चहाचे आधन ठेवले. चहा तयार केला आणि बरोबर एक कप बशी घेऊन मी बाहेर आले. चहा कपात ओतला आणि तिला द्यायला गेले.
” वहिनीनू, दुसरो फुटको कप देवा, तुमच्या कपातून माका देव नको, मी खालच्या जातीचा गे माय,’
मी म्हंटल ” अगं असं आम्ही काही मानत नाही, वरची जात खालची जात असं काही नसतं. घे तू चहा ‘
” नको वैनीबाय, तुमच्या शेरात चलता आसात, आमच्या गावांनी असला चालचा नाय, तू आपलो फुटको कप हाड बघू ‘
” आता तुझ्यासाठी फुटका कप कुठून आणू?
हे म्हणेपर्यंत ती कुठून तरी एक करवंटी घेऊन आली.
“ह्याच्यात घाला चाय ‘ती म्हणाली. मी तिच्या कपात चहा ओतला आणि बरोबर दोन बटर खायला दिले.
” एवढ्या पावसात इकडे काय करतेस ग, भिजली आहे संपूर्ण ‘
मी म्हणाले.
“रस्ते, पानांदी झाडायचं काम माझा, गेली वीस वरसा करतय, तेंच माका थोडे पैसे गावातत ‘.
” बरं बरं, आत्ता माझी घाई आहे, उद्या ये अशीच चहा घ्यायला ‘. असं म्हणून मी घरात गेले.
दुसऱ्या दिवशी पुन्हा रस्ता झाडायचा आवाज आला, मी अंदाजाने ओळखले आता ती कालची बाई परत येणार, मी स्टो वर चहा ठेवला, आमच्याकडे फुटक्या कानाचा कप नव्हता, आणि ती आमच्या कपातून चहा घेणार नव्हती, म्हणून मी एक चांगल्या कपाचा कान फोडला आणि तसा कप तयार ठेवला.
दारावर टकटक झाली तसे मी दार उघडले. काल ओळख झालेलीच होती. मुलगा रवी सकाळी शाळेत गेला होता. नवरा बँकेत गेला होता, आता मी गप्पा मारायला मोकळी होते.
मी फुटक्या कानाच्या कपातून गरम गरम चहा ओतला आणि अर्धी भाकरी सोबत दिला. तिने पटपट चहा प्यायला आणि भाकरी पदराला बांधून घेतली.
” भाकरी बांधून घेतलीस कुणासाठी ग?
“माजी नात आसा पाच वर्षाचा, तेका ‘.” घरी कोण कोण असतं ग तुझ्या?
“माझो झील आणि नात ‘
“आणि सून ‘
सून मेली गेल्या साली, झिलाचो काय उपेग नाय, ढोल वाजवता देवळात पन आखों दिवस दारू, दारू पिऊन माका आणि नातीक मारता ‘.
” अरेरे, काय नाव नातीचं? मी विचारलं.
” राधे, असा पाच सहा वर्षाचा .
” आणि तुझं नाव काय ग मी विचारायलाच विसरले ‘
“माका इठा म्हणटत ‘
हा म्हणजे विठा असणार ‘ मी म्हणाले
” तुझ्या नातीला घेऊन ये एकदा, विठाई ‘.
“काय झ्याक हाक मारल्यात माका, विठाई. अशी हाक कोणीच मारुक नाय ‘
आणि विठाई रोज येऊ लागली, रस्ता झाडता झाडता आमच्या पानंदीत आली की माझा नवरा मला सांगायचा “तुझी विठाई येतेय, चहा तयार ठेव ‘.
एकदा मी घरात शेंगदाणे भाजत होते, तेव्हाच विठाई चहासाठी आली होती. मी तिला चहा आणि बटर घेऊन गेले. तर म्हणाली” वैनी बाय, वास बरो येता, काय भाजतंस? माका थोडे दी गे खाऊक ‘
मी तिला भाजलेले शेंगदाणे दिले, तिने ते पदराच्या शेवटला बांधून घेतले.
“वैनीवाय, आता रस्तो झाडताना एक एक दानो तोंडात टाकीन ‘.विठाई मला म्हणायची वैनी बाय, माझ्या नवऱ्यला दादा आणि माझ्या मुलाला नातू किंवा नातवा.
काजूचा मोसम सुरू झाला की विठाई माझ्या मुलासाठी ओले काजूगर आणायची, ते काजूगरसोलताना तिचे हात कुजून जायचे. मी तिला म्हणायचे ” विठाई, काजू सोलून तुझे हात कुजून गेले, तू असे सोडू नकोस त्याऐवजी मी सुरीने ते कापते,’
विठाई म्हणायची ” वैनी बाय, काजूची फका सूर्यन कापूची नसतत, ती हातानं चिरुची असतांत ‘
रोज घरी येणारी विठाई दोन दिवस आली नाही, रस्ता झाडायला तिच्या ऐवजी एक दुसरीच बाई दिसली, तिच्याकडे मी विठाईची चौकशी केली. ती म्हणाली विठाईला ताप येतोय, घरी झोपून आहें.’
हे बँकेत निघताच मी भर उन्हात आंबेडकर नगरच्या दिशेने चालू लागले. अंदाजे दोन किलोमीटर चालल्या नंतर आंबेडकर नगर लागले. मी विठाईची चौकशी केली आणि तिच्या झोपडीत पोहोचले. तिच्या बाजूला तिची नात बसून होती. मी राधेला विचारलं ” केव्हापासून येतोय ग ताप?
” चार दिवस झाले बाई, थंडी वाजून ताप येतोय, दोन दिवस अंगावर काढले, कालपासून अगदी जमीना तेव्हा झोपली आहे ‘
मी विठाईच्या अंगाला हात लावून पाहिले, शरीर तापले होते. मी राधेला बरोबर घेतले आणि तिथून जवळच असणारे आमचे ओळखीचे डॉक्टर नाडकर्णी यांच्या दवाखान्यात गेले. डॉक्टर ना विनंती केली की तुम्ही आंबेडकर नगर मध्ये येऊन विठाईला तपासावे. डॉक्टर माझ्या नवऱ्याचे मित्रच. मी दवाखान्यात गेले म्हटल्यावर ते त्वरित माझ्याबरोबर आले. त्यानी विठाईला तपासले आणि मलेरियाचा संशय व्यक्त केला. आपल्या जवळील थोडी औषधे दिली दुकानातून आणायला लिहून दिली. मी राधेला घेऊन तळ्यापलीकडे असलेल्या औषध दुकानात चालत चालत गेले. तेथे ती औषधे विकत घेतली आणि परत आंबेडकर नगर मध्ये आले. राधेला औषधे कशी द्यायची हे व्यवस्थित समजावले. डॉक्टर नाडकर्णी रोज येऊन एक इंजेक्शन देणार होते.
चार दिवसांनी विठाई पुन्हा रस्ता झाडण्याच्या कामावर हजर झाली. आमच्या घराजवळ आल्यावर घराच्या पायरीवर बसली आणि मला बाहेर बोलावून माझ्या पायावर डोकं ठेवू पाहत होती.
” काय हे विठाई, लहान व्यक्तीच्या पायावर डोकं ठेवणं शोभून दिसतं का?
“वैनीवाय, तुमी माका परत हाडलात, नायतर मी वर गेललंय यमाच्या राज्यात ‘
“अस बोलू नकोस विठाई, एकमेकांसाठी करावंच लागतं ‘ तू माझ्यासाठी एक कर, उद्या राधेला येताना घेऊन ये तिला मी शाळेत घालणार ‘
” होय वहिनी बाय तेवढा तर जरा करा, आमच्या सारख्या अडाणी रवाने नको तेका ‘.
मी राधेचं नाव जिल्हा परिषदेच्या शाळेत घातलं. राधेला दोन फ्रॉक, पेटीकोट, पुस्तके, वही घेतली, राधा शिकू लागली.
आमच्या तिघांच्या सुखी आनंदी संसाराला दृष्ट लागायची वेळ होती. खूप दिवसापासून माझे पती पोटात दुखण्याची तक्रार सांगत होते. त्या काळात छोट्या गावात मोठे डॉक्टर नव्हते. आधुनिक सोयी नव्हत्या. डॉक्टर पोटदुखीच्या गोळ्या देत होते, त्या गोळ्या हे घेत होते. एक दिवस सकाळी हे उठले तो त्यांना रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या. मी घाबरले, मुलगा माझा लहान. मी त्याला डॉक्टर नाडकर्णी कडे पाठविले, डॉक्टर आले, त्यांनी यांची परिस्थिती बघून सिव्हिल हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करण्याचे ठरवले. सिव्हिल सर्जनी अंदाज घेऊन तातडीने ऑपरेशन करायचे ठरवले. त्यांच्या अंदाजाने आठ ते 10 रक्ताच्या बाटल्यांची गरज होती. छोट्या शहरांमध्ये रक्ताच्या बाटल्या मिळणे अशक्य होते. फक्त ओळखीच्या माणसांकडून रक्तदान करून बाटल्या जमवणे एवढेच शक्य होत, माझ्या नवऱ्याचा रक्तगट क्वचित मिळणारा होता. मग त्या रक्तगटाची रक्त मिळवायला धडपड सुरू झाली. त्यांच्या बँकेतले सर्व कर्मचारी इकडे तिकडे धावत होते. कशीबशी दोन-तीन बाटल्यांची सोय झाली. अजूनही रक्ताची गरज होती. माझा रक्तगट पॉझिटिव्ह, तर यांचा निगेटिव्ह.
दोन दिवस चाललेली माझी धावपळ विठाई पाहत होती. एकदा मी हॉस्पिटलमध्ये गेलेली असताना ती दारात बसूनच राहिली. मी घरी आल्यावर ती मला विचारायला लागली ” दादाक काय झाला?’
“त्यांना रक्ताची गरज आहे, योग्य रक्त मिळालं की मग ऑपरेशन करायचं आहे ‘
पन रक्त गावातला खय?
” असं मिळत नाही कुणाच्यातरी अंगातून रक्त काढावे लागत ‘
” मग माझ्या अंगातून रक्त काढा ना, नायतर तेचो काय उपयोग आसा माका, माजो दादा बरो होऊक हवंयो ‘
” पण रक्तगट जमावा लागतो ना,’
” मग जमून टाका, पन बघा हा मजा रक्त तुमका चालत तर, मी खालच्या जातीचा ‘
“नाही ग विठाई, जातीचा वगैरे काही प्रश्न नाही. पण रक्तगट जमायला पाहिजे ना ‘
माझ्या मनात आले बघावा प्रयत्न करून. मी तिला सिव्हिल मध्ये घेऊन गेले. तिचा रक्तगट तपासला आणि आश्चर्य म्हणजे माझ्या नवऱ्याचाच रक्तगट तो होता. मी विठाईला म्हणाले ” तुझं रक्त तुझ्या दादांना चालेल, तुझं रक्त थोडं घेतलं तर चालेल का?
ह्या काय इचारतास वैनीवाय, माजो जीव व्हयो तरी मी देन दादासाठी ‘
मी आवेगाने तिचा हात पकडला, “नको ग विठाई, तुझा जीव नको फक्त थोडा रक्त हवं ‘.
डॉक्टरनी तिच्या शरीरातून तीन चार बाटल्या काढल्या आणि त्या माझ्या नवऱ्याला चढवल्या. आपल्या शरीरातून रक्त काढत असताना विठाई मोठ्या कौतुकाने बघत होती. आणि त्या बाटल्या आपल्या दादासाठी म्हणून तिला मोठा आनंद झाला.
राधे शाळेत जात होती, आपल्या आजीकडे पण लक्ष देत होती. विठाईचेरस्ता झाडणे सुरु होते.
माझ्या नवऱ्याची मग कोल्हापूरला बदली झाली. मी तिला आम्ही आता कोल्हापुरात जाणार असे सांगितले.
“जावा वैनीवाय, नातवाचो मोठो अभ्यास असतलो, भायर गेल्या शिवाय दादा मोठो होऊचो नाय ‘ डोळे पुसत विठाई बोलत होती.
आम्ही जाणार त्या दिवशी विठाई पहाटेपासून हजर होती, आमच्या ट्रक चा रस्ता परत परत झाडत होती
कोणी विचारले तर म्हणत होती “माजी वैनीवाय, दादा आणि नातू या रस्त्याने जातले, तेंच्या साठी झाडून ठेवताय ‘. शेवटी आम्ही निघालोच, रस्त्याच्या पलीकडे विठाई पदराने डोळे पुसत उभी होती, राधे उभी होती. मी तिच्याकडे गेले आणि तिला मिठीच मारली, ” विठाई, तुला विसरण शक्य नाही, मी परत येईन तेव्हा तुला आमच्याकडे घेऊन जाईल ‘ आमचा ट्रक सुटला, लांब लांब हात हलवणारी विठाई लहान लहान होत गेली.
आम्ही कोल्हापुरात आलो, रवीचं कॉलेज सुरू झालं, यांना बँकेत प्रमोशन मिळालं, आता जास्त जबाबदारी आल्या. मी विठाईला परत येईल म्हटलं तरी मला ते शक्य झालं नाही. पण आता राधे पत्र लिहीत होती. मी पण तिला कार्ड लिहून विठाईची चवकशी करत होते.
राधे एसएससी झाली आणि तिने डीएड ला ऍडमिशन घेतल्याचे कळले, परत विठाई एकटी झाली, दिवस भराभर जात होते, आमचा रवी ग्रॅज्युएट होऊन इन्शुरन्स कंपनीत नोकरीला लागला. त्याच्या ऑफिसमधल्या मुलीशी त्याने लग्न ठरवलं.
आमची लग्नाची घाई सुरू झाली, या लग्नाला मात्र विठाईला आणायचेच असे मी मनोमन ठरबिले. पत्रिका छापून झाल्या, मी यांना म्हटले एकदा जाऊन विठाई ला घेऊन या.
हे गाडी घेऊन मुद्दाम विठाई ला आणायला गेले, एक रात्र आपल्या मित्राकडे राहून दुसऱ्या दिवशी परत आले. मी विठाईची वाट बघत होते . पण हे एकटेच आले. मी विठाईची चौकशी केली तेंव्हा हें म्हणाले “ती फार आजारी आहें, अंथरुणाला खिळून आहें, राधी अधून मधून येते, पण तिचे शेवटचे दिवस राहिलेत. तशाही अवस्थेत तिने मला ओळखले आणि हें माझ्या हातावर ठेवले ” माझ्या नातवा साठी ‘अस म्हणून रडू लागली, मी त्या वस्तूकडे पाहिले, ते चांदीचे निरंजन होते, हें तिला कोणी दिले, हें मला कळेना.
मी ठरवले, लग्न झाले की जाऊन यायचे, शेवटचं डोळे भरून विठाई ला पाहयचे.
लग्न झाले, पाठोपाठ सत्यनारायण झाला, मग रवी आणि कविता पांचगणीला गेले, ते शनिवारी येणार होते, मी यांना सांगितलं होत, रवी आला म्हणजे आपण त्याला आणि कविताला घेऊन विठाई ला नमस्कार करून येऊया.
शनिवारी राधेचे कार्ड आले, विठाई गेली, नातवंच्या लग्नाची तारीख विचारत होती, लग्न झाले असणार ते तिला कळले आणि दुसऱ्या दिवशी ती गेली.
आमच्या संस्थान च्या राजाने लग्नाच्या पंचवीस वर्षे झाली म्हणून सर्व आंबेडकर नगर मध्ये चांदीचा रुपया वाटलं होता, विठाईने मला पाठवून त्याचे निरंजन करुंन ठेवले, नातवंच्या ( रवी ) च्या लग्नासाठी. तेंच निरंजन दादा आले तेंव्हा तिने रवी साठी पाठविले ‘
माझ्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागलंय होत्या, शेवटी माझी विठाई मला भेटली नाहीच, मी माझ्या संसारात एवढी मग्न झाले की माझ्या नवऱ्यला रक्त देणाऱ्या विठाईला विसरले.
खूप दिवसांनी मी सावरले. आता रोज संध्याकाळी ते चांदीचे निरंजन मी देवाकडे लावते, तेव्हा विठाई मला भेटल्याचे समाधान मिळते
प्रदीप केळूसकर 9422381299

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}