देश विदेशमनोरंजन

‘प्रस्ताव’ —सचिन श. देशपांडे

‘प्रस्ताव’

डाॅ. आशिष भारद्वाज ने गाडी पार्किंगमध्ये लावली… आणि खाली उतरुन तो घराकडे चालू लागला. चार पावलं पुढे गेल्यावर थबकला तो, नी पुन्हा मागे वळला. गाडीचा मागचा दरवाजा उघडून ब्रीफकेस घेतली त्याने… आणि दरवाजा बंद न करताच गाडी लाॅक करु लागला. नंतर त्याचंच त्याच्या लक्षात आलं… “व्हाॅट द हेल अॅम डुईंग… हॅव आय गाॅन मॅड?”… स्वतःलाच विचारलं त्याने स्वतःबद्दल… आणि गाडीचा दरवाजा बंद करत, गाडी लाॅक केली. एका जागी उभं राहून, तोंड उघडून… दोन – तीन वेळा श्वास आत – बाहेर घेतला त्याने. “कमाॅन डाॅक… किप युअर डॅम हेड कूल… डोन्ट अॅक्ट लाईक अॅन इम्मॅच्युअर्ड फेलो”… हे स्वगत आटोपून तो पुन्हा घरी जायला वळला. जास्तित जास्त एकाग्र करुन स्वतःला, त्याने बेल वाजवली. दार त्याच्या पंधरा वर्षांच्या लेकीने… ओवीने उघडलं. त्याची ब्रीफकेस हातात घेतली तिने, आणि तोंडभरुन हसत स्वागत केलं त्याचं.

घरात शिरतांना आशिषच्या मनात आलं… “ह्या साठीच घर हे घर असतं… ते दिवसभर हाॅस्पिटलमध्ये बसायचं… ते एखाद्या गोडाला मुंग्या लागल्यासारखे, पेशंट्स येतच रहातात अंगावर… आणि डसत रहाते त्यांच्यातल्याच काहींची वेदना, ते तपासून स्वतःला निघून गेल्यावरही… रोज तेच… अॅम डॅम टायर्ड”. “बाबा पाणी”… त्याच्या लेकीच्या आवाजाने तो भानावर आला. पाण्याचा ग्लास हातात घेतला त्याने… लेकीच्या गालावर हलकसं टॅप केलं… शर्टची वरची दोन बटणं सोडली… आणि जाउन सोफ्यावर, धाडकन लोटून दिलं त्याने स्वतःला. ग्लासातून थोडसं पाणी हिंदकळून त्याच्या अंगावर सांडलं… बरं वाटलं त्याला. “आंघोळ उरकूनच चहा घ्यावा”… असा विचार करत त्याने घटघट पाणी पिऊन टाकलं, नी आवाज दिला… “अमिताsss”. आशिषची बायको अमिता, ओढणीला हात पुसतच बाहेर आली. “चहाच आणतेय आशू… भाजणीची थालीपीठं लावतेय… मग सावकाश वरण – भात जेऊया… दॅट्स द प्लॅन”… आणि हसली ती ही अगदी तोंडभरुन. आशिष पटकन बोलला… “अगं ऐक… मी आधी आंघोळ करुन घेतो आज… जामच आंबलोय… चहा – खाणं नंतर”.

एवढं बोलून तो उठला विचार करत… “किती मस्त वाटतं नै घरातल्या बायका, अशा हसतमुख असतात तेव्हा… ही शिकवण आईचीच पण… अगदी मी आणि दादा लहान असल्यापासून, आम्हाला लावलेली… आपलं माणूस जेव्हा बाहेरुन थकून – भागून येतं… तेव्हा कायम लक्षात ठेवायचं की ते बाहेर स्वतःसाठी नाही, तर आपल्यासाठी गेलंय… त्यामुळे ते जेव्हा घरी परतेल… त्याला आपण आनंदीच दिसायला हवं… त्याचा शिणवटा हसर्‍या तोंडाने हातात नेऊन दिलेल्या ग्लासाने जास्त दूर होत असतो, त्या ग्लासातील पाण्यापेक्षाही… हे तत्व आम्ही कायम पाळलं… आणि आता दादाच्या नी माझ्या घरचेही पाळतायत… अरे हो दादा – वैनीला बोलायला हवंय… वुई टुगेदर हॅव टू डिसकस धिस अॅटलीस्ट वन्स”. ह्या त्याच्या विचारांना खीळ बसली, शाॅवर बंद झाल्या झाल्या. शुभ्र मलमलचा कुर्ता, नी लेंगा घालून… डोकं पुसतच आशिष बाहेर येऊन बसला. गरमागरम थालीपीठ, वर लोण्याचा गोळा आणि डावीकडे खारवलेली मिरची… अशी डिश त्याच्या हातात दिली लेकीने आणून. आशिषने लेकीला जवळ बसवत, पहिला घास भरवला… मग त्याने घास घेतला. अमिता आतून आणिक दोन प्लेट्स घेऊन आली… “हे घे गं… घोडी अजून बाबाच्या ताटात जेवतीये”. तिघेही आता आपापल्या डिशमधून खाऊ लागले… एकमेकांशी गप्पा मारु लागले. म्हणजे बायको नी लेकच गप्पा मारत होत्या… आशिष फक्त ऐकत होता. हे अगदी रोजचच असे. रात्रीचं जेवणखाण एकत्रच व्हायला पाहिजे… अगदी एकमेकांसोबतीने. भले तुम्ही गप्पा मारु नका… नसेना का कुठला विषय बोलायला… हरकत नाही. पण त्या एकमेकांबरोबरील शांततेतही, तो न दिसणारा बंध असतो… एकमेकांना जोडून ठेवणारा. ही सुद्धा आईचीच लहानपणापासूनची शिस्त होती. भिंतीवरच्या घड्याळाकडे पाहिलं आशिषने… “अगं नऊ वाजले की… आईचं किर्तन लांबलं की काय आज?… पावणेनऊला येते ती”. “फोन केलेला त्यांनी… आज काहीतरी अवांतर पाठ आहे म्हणे… पंधरा – वीस मिनिटं उशिर होईल म्हणत होत्या… येतिलंच ईतक्यात… थालीपीठ नको फक्त गोळाभर भात जेवेन म्हणाल्यायत”.

तितक्यातच बेल वाजली… आशिषच्या लेकीने ओवीने दरवाजा उघडला. दारात असलेली आजी, आणि ओवी दोघीही हसल्या बघून एकमेकींकडे. आशिषच्या मनात आलं… “स्साला काय आहे ना पण… हे एकमेकांकडे बघून हसणंच काम करत असतं… निरोगी ठेवत असतं… मी देत असलेल्या गोळ्या थोडीच… टचवूड”. आशिषने टेबलला हात लावला आणि हाक मारली त्याने… “आईsss ये गं… थालीपीठ खायला”. अवंतिकाबाई येऊन बसल्या आशिषच्या बाजूला… आणि त्याचे आंघोळीचे अजूनही ओले असलेले केस, पदराने पुसू लागल्या त्या. आशिष म्हणाला… “आई तुप – जिर्‍याची फोडणी टाकून, आमटी कर ना आज… आणि मला कालवूनही दे भात”. अमिता लगेच बोलली… “भरवूनही नको का बाळाला?”. ओवीने टाळी दिली तिच्या आईला, नी दोघी… खरंतर तीघीही हसू लागल्या मग. पण आशिष जरासा सिरियस झाला… त्याने घसा खाकरला… आणि तो बोलू लागला पुढे…

“वेल… आय गेस धिस इज द राईट टाईम टू टेल यू व्हाॅट अॅम गोईंग थ्रू सिन्स लास्ट सिक्स मन्थ्स… माझे एक पेशंट आहेत… गेले सहा महिने येतायत माझ्याकडे… तोपर्यंत तीनवेळा भोज्ज्या करुन आलेत वरच्या दारावर… आॅलमोस्ट जगण्याची इच्छाच संपलीये त्यांची… बायको बारा वर्षांपुर्वीच गेलीये… एकच मुलगा आहे… मोठा बिझनेसमन आहे तो… पण कायम व्यस्त… सून आहे चार्टर्ड अकौटंट… स्वतःची फर्म… त्यामुळे ती ही व्यस्त… दोन नातवंड आहेत… नातू फॅमिली बिझनेसमध्येच… तर नात कुठल्याशा फाॅरेन बँकेत कामाला… त्यामुळे हे आजोबा सोडून, घरचे बाकी सगळे व्यस्त… ह्यांचं खाणं – पिणं सगळं, टेबलवर मांडून जाते सून त्यांची… दुपारचं नी रात्रीचंही… मग हे स्वतःच जमेल तसं वाढून घेतात… कधी जेवतात… कधी तसेच रहातात… सूनेला आल्यावर स्वैपाक बघून, कळतही नाही की ते जेवलेत की नाही… कारण मुळात ती स्वतः काहीच करत नाही… त्यामुळे किती केलेलं नी किती उरलंय, ह्या हिशोबापासून ती लांबच असते… बाकी त्यांच्या घरचे सगळे चांगले आहेत म्हणे… एकदा ते आजोबा बेशुद्ध पडले रस्त्यावर, तेव्हा अॅडमीट केलं त्यांच्या शेजारच्यांनी त्यांना आपल्या हाॅस्पिटलमध्ये… मी तपासलं तेव्हा मला कळलं की, किमान चार दिवस सलग तरी ते जेवले नसावेत… आणि दुर्दैव म्हणजे माझ्याकडूनच हे त्यांच्या घरच्यांना समजलं… तोपर्यंत कोणाचंही लक्षच नव्हतं त्यांच्याकडे… तर आता आठवड्यातून, दोन सिटिंग्ज असतात त्यांच्या माझ्याकडे… खूप बोलतात, गप्पा मारतात ते माझ्याशी सिटींग दरम्यान… घरच्यांबद्दल खूप चांगलं बोलतात ते नेहमीच… पण पैसा आणि प्रेम, दोन्हीपैकी एकतरी वजनाने कमी भरणारच ना… तसं काहीसं झालंय म्हणतात”.

अवंतिकाबाईंनी हे ऐकून एक दिर्घ सुस्कारा सोडला… पदराने भरुन आलेले डोळे टिपले… आणि त्या आशिषला म्हणाल्या… “जप हो त्यांना निदान तू तरी… अगदी आपल्या घरचे असल्यासारखा वाग हो त्यांच्याशी… तुला द्यायला खोर्‍याने पैसा असेल त्यांच्या मुलाकडे… पण बापाला द्यायला प्रेम नाहीये… ते तू त्यांना दे हो”. अमिता आणि ओवीनेही मान हलवून, समर्थन केलं अवंतिकाबाईंच्या बोलण्याचं. आशिषने आईला जवळ घेत, तिच्या डोक्याला आपलं डोकं टेकवलं… आणि पुढे बोलू लागला तो…

“आई… मी आत्तापर्यंत ज्या आजोबांबद्दल बोललो, त्यांचं नावही सांगतो आता… दत्तात्रेय उपाध्ये… प्रोफेसर दत्तात्रेय उपाध्ये… वय वर्ष पंच्याऐंशी… एका अतिशय प्रतिष्ठीत काॅलेजात पस्तिसहून अधिक वर्ष इकोनाॅमिक्सचे प्राध्यापक होते ते… अर्थकारणावर काॅलम्सही यायचे त्यांचे, त्या काळी इंग्रजी पेपर्समधून… गुंतवणूकी संदर्भात कन्सल्टेशनही करायचे ते… मला म्हणाले… की आयुष्यभर काम केलं… घरासाठी पैसा कमावला… पण घरच्यांचं प्रेम नाही कमावू शकलो इतक्या वर्षात… आणि तेच आता माझा मुलगा करतोय… नी तेच त्याची मुलंही… तेव्हा मला प्रकर्शाने जाणवलं आई की, तू जी शिस्त लावलीस घरच्यांना, त्यामुळेच घरपण टिकलं”. आशिषने अवंतिकाबाईंकडे पहात, हे शेवटचं वाक्य म्हंटलं. एव्हाना त्यांचे डोळे वाहू लागले होते… त्या हमसून हमसून रडू लागल्या होत्या. अमिता आणि ओवीला कळेना की, इतकं शांतपणे ऐकून झाल्यावर… अचानक असा बांध का फुटावा त्यांचा? आशिषने पुन्हा एकदा आईला जवळ घेतलं…. आणि अमिता, ओवीकडे बघून बोलू लागला तो…

“प्रोफेसर दत्तात्रेय उपाध्ये… आईला FY ते TY आणि पुढे पोस्ट ग्रॅज्युएशनलाही, इकोनाॅमिक्स शिकवायला होते… त्यांच्या अत्यंत लाडक्या विद्यार्थ्यांपैकी एक होती, अवंतिका देवचक्के… आत्ताची अवंतिका भारद्वाज… माझी आई… मी हिचा मुलगा आहे, हे जेव्हा कळलं त्यांना… आमच्यातलं डाॅक्टर – पेशंटचं फाॅर्मल नातंच गळून पडलं… मला कवटाळून घेतलं त्यांनी… आणि ओक्साबोक्शी रडले ते… स्वतःच्या मुला – नातवंडांकडून कधीच न मिळालेली, मिठी होती ती… आई, अमिता, ओवी… मी दादा – वैनीशी बोलणारच आहे, पण तुमच्या पुढ्यात आत्ताच हा ‘प्रस्ताव’ मांडतोय… मी… मी उपाध्ये आजोबांना, आपल्या घरी घेउन यायचं म्हणतोय… यापुढे त्यांना कायमचं इथेच ठेऊन घ्यायचं म्हणतोय… ते असे पर्यंत… त्यांचे शेवटचे काही दिवस तरी, रिकाम्या घरातील भिंतींच्यात नाही… तर भरल्या घरातील माणसांच्यात जावेत, ही मनापासून इच्छा आहे माझी… हे मी सांगितल्यावर, स्वतः आजोबा तयार होण्याआधीच त्यांचा मुलगा – सून तयार झाले… मग आजोबा फक्त हसले माझ्याकडे बघून… त्यांचं थोडंतरी काही आपल्याकडून होणं… हिच कदाचित गुरुदक्षिणा ठरेल, आईनी दिलेली तिच्या गुरुला… आणि एक… त्यांच्या जेवणाकडे कधीच लक्ष दिलं गेलं नाहीये, गेल्या बारा वर्षांत… त्यामुळे आपल्याकडे आल्यावर, त्यांच्या ताटात भात वाढला जाईल तो कालवलेलाच… आपल्यापैकी कोणाच्यातरी बोटांतून, त्यात जिव्हाळा उतरलेलाच… मी आत्ताच जबलपुरला फोन करुन, सांगतोय दादाला हे सगळं… आणि आई – बाबांनी ज्या पद्धतीने आम्हा दोघांना वाढवलंय… अॅम डॅम शुअर दॅट ही वूड बी अॅज हॅपी अॅज मी… रादर आॅल आॅफ अस”.

आशिषच्या खांद्यावर डोक ठेवलेलं अवंतिकाबाईंनी… अमिताने आशिषच्या दुसर्‍या बाजूला येऊन बसत, त्याच्या छातीवर डोकं ठेवलं… तर ओवीने बसूनच सरकत जवळ येऊन, डोकं टेकवलं आशिषच्या मांडीवर. त्या तीघीही वाहत्या डोळ्यांनी… आशिषच्या प्रस्तावाला, बिनविरोध अनुमोदनच देत होत्या जणूकाही… मुकपणेच.

—सचिन श. देशपांडे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}