लक्ष्मण रेषा श्रध्दा जहागिरदार
लक्ष्मण रेषा श्रध्दा जहागिरदार🙏🏾
सातच्या आत घरात ये, उशीर करु नकोस. अशा सुचना आज मुलींना देणं कितपत योग्य आहे. आज घराघरात मुली नोकरी करतात. त्यांच्या रात्री च्या शिफ्ट असतात, कधी ऑफिस मध्ये मिटिंग असेल तर तिला तेवढा वेळ तेथे थांबावे लागणार. मग या सुचना देणार कशा? त्या सुचनांचे पालन करायचे झाले तर स्त्री ला आज घरातच बसावे लागेल.
परवाची बदलापूरच्या चिमुरडी वर
झालेले अत्त्याचार,कोलकत्यातील बलात्कार घटना, दिल्लीचे निर्भया प्रकरण ऐकून मन विषण्ण, उदास होते. अशा घटनांवरील प्रतिक्रिया
चिंताजनकच वाटतात. काही दिवसांनी स्त्री च्या स्वातंत्यावर, मोकळेपणा वर घाला घालतील का काय याची भिती वाटते.
निसर्गाची निर्मीतीच स्त्री- पुरुष अशी आहे. त्या दोघांमधूनच अजून एक मानव जन्माला येतो. त्या दोघांना वेगळं कसं करणार? कुठेही जा पुरुष
हे असणारच. असे भयानक प्रकार करणारे मी तर म्हणते ते पुरुष नसतात मनाची घाणेरडी विकृती असणारा राक्षस असतो तो.
मुली असे कपडे घालतात, तसे कपडे घालतात त्यामुळे पुरुषांची नजर तिकडे जाते त्यामुळे अशा घटना घडतात असे पडसाद पण आज समाजात ऐकायला मिळतात. मग परवा ज्या घटना घडल्या त्यामध्ये छोट्या चिमुरड्या मुली अंगात शाळेचा ड्रेस,कोलकत्यामधील महिला डॉक्टर ने अंगभरुनच पोषाख घातलेला. या मध्ये काय बोलायचे? पुरषांनो तुमची दृष्टी बदला ना! ईश्वराने स्त्री ला घडवताना ‘सुंदरता’ हा एक दागिना दिला आहे. म्हणून पुरुषांनी त्याकडे वाईट नजरेनेच पहायचे?
यामध्ये सर्वच पुरुषांना एका मापात तोलून चालणार नाही. पुरुष हा वाईटच आहे हे लहान मुलींच्या मनावर
बिंबवले तर समाजात वावरणे कठीण
जाईल.
स्त्री- पुरुष भेद घराघरातून रुजायला नको. माणूस म्हणून एकमेकांकडे बघा.
अशा घटना घडल्यावर पेपरबाजी,
मिडिया, मोर्चे सगळं एवढ्या मोठ्या
प्रमाणात होते की असे वाटते अपराध्याला आत्ता शिक्षा होईल, त्याला फासावर लटकवले जाईल.
पण कायदा आड येतो. तो कडक नाही. लोकही काही दिवसांनी विसरतात. परत ‘ये रे माझ्या मागल्या’
आहेच.
चांगला स्पर्श, वाईट स्पर्श याची शिकवण शाळेत दिली जाते त्या बाबतीत पण मुलगी वर्षाची झाली की तिला ते ज्ञान द्यायचे का काय? असा प्रश्न आता पडत आहे.
ईश्वराने स्त्री- पुरुषाची निर्मीती करताना पुरुषाला स्त्री पेक्षा बलवान
बनवले आहे. मुलगी रात्री एकटी बाहेर
चालली तर आपण म्हणतो पुरुष माणूस सोबत असावे. पण त्याच्यापासूनच धोका निर्माण झाला आहे.
कलियुगात तर स्त्री ची काय अवस्था होईल. परवा ‘कल्की’ चित्रपट पाहिला. स्त्री चा वस्तू म्हणून वापर केला आहे. तिच्यावर Experiment!! पाहताना अंगावर शहारा आला.
बलात्काराच्या घटना घडल्या की अपराध्याला तिथल्या तेथे मारणे,फाशी देणे असा कायदा (याबाबतीत) तरी समाजानेच करावा. त्याशिवाय ही
घाणेरडी विकृती संपणार नाही.
अशा घटनांमध्ये कोर्ट साक्षी मागते. मला हे कळत नाही साक्ष मागीतलीच कशी जाते? तो नराधम सगळ्यांसमोर
हे कृत्य करणार आहे का? त्या लेकराचा जीवच घेतला तर कोण सांगायला येणार आहे? कोण साक्ष देणार!!
अशा घटनांना वेळीच आवर घातला नाही, कडक शिक्षा झाली नाही तर मला वाटते अशा घटना उघड्यावर पण होतील.
मनात विचार येतो पृथ्वी आहे तोपर्यंत स्त्री वर अत्त्याचार होतच राहणार. विचारानेच मन भितीने दाटून येते.
आत्ताच हायकोर्टाने राग व्यक्त केला ‘सातच्या आत मुलींनाच घरात का’ हा नियम मुलांना पण सांगायला पाहिजे. आणि हा नियम लहानपणापासून मुलींच्या मनावर बिंबवला जातो. घरामध्ये पण ही कामं मुलींनी करायची मुलींची कामं मुलांनी नाही करायची . त्यामुळे मुलांच्या मनात पण एक माझं वेगळं वर्चस्व घरामध्ये आहे असा विचार रुजला जातो. आणि तोच वर्चस्वपणा तो समाजात वावरताना वापरला जातो.
आता तर प्रत्येक मुलीला लैंगिक शिक्षण देण्यापेक्षा घराघरातून मुलीलास्वत:चे संरक्षण कसे करावे
( अशा घटनांपासून) याचे धडे द्यावे.
कितीही कायदे केले तरी परिस्थिती हीच राहणार आहे. स्त्री ही ‘अबला नारी’ म्हणून च जगणार आहे.
जोपर्यंत ही अराजकता थांबत नाही तोपर्यंत कितीही कायदे केले तरी ते मदतीला येणार नाहीत.
परवाची कोलकत्त्याची केस वाचल्यावर एवढा धक्का बसला, की जे आपला जीव वाचवतात त्या डॉक्टर ला हे लोक सोडत नाहीत तर ही भयाण विकृती आहे. अशा लोकांची मनोवृत्ती कधीच बदलणार नाही. त्यासाठी काय करावे हा मोठा प्रश्न सर्वांसमोर असेल.
आज पालक मुलींना एवढाले पैसे देऊन शिकवतात, त्यापण कष्ट करुन नोकरी करतात ते अशा घटना त्यांच्या वाट्याला याव्या म्हणून!! म्हणजे मुलींनी शिकायचेच नाही. घरातच बसून आपले आयुष्य काढायचे.
सर्व विचारांच्या पलीकडे आहे. डोक सुन्न होते.
एकंदरीत स्त्री च्या स्वातंत्याची लक्षमण रेषा ही कायमच राहणार
आहे.
श्रध्दा जहागिरदार🙏🏾