मंथन (विचार)

•मिरूग• कथालेखन– विजय जयसिंगपुरे ९८५०४४७६१९

•मिरूग•

मीरगाचं पाणी पडलं होतं.रातभर धोधो पाऊस बरसत होता.नदया नाल्या ओंसडून वाहत होत्या. घरावरचे कवलं ,पाखे,पार संततधार पावसानं धुवुन टाकलं होतं.काहीची त घरं अभिषेक केल्या सारखी टपकत होती. घरातली सर्व भांडीकुंडी,भदाळं याच कामी लावली होती. भांडयात पाणी पडल्यावर त्याचा टणनटणन आवाज रातभर कानात घुमत होता. काहीनी तर आधीच छावण्या,भारके भीताडाले लावले होते. दाठठयात व घरात पाणी धसु नये म्हणुन झाडांच्या बेपाटया तोडुन त्यावर पराटया व बजारातुन आणलेला मीटरदोनमीटर मेनकापड आथरला होता. इंधनकाडी, व कडबाकुटाराचीही झाकझुक केली होती. ढोरं वासरं मंदीराच्या भीताडापाशी आंगचोरुन ऊभी होती. मोकाट कुत्र्याचे ही हाल होत होते.तेही कोणाच्या गरम ओटयावर ग्रामपंचायती च्या माग नाही तर मंदिरांच्या ओटयावर मुरकडी घालुन बसली होती. चार दोन म्हातारीकोतारी अंगावर पोतयाच्या घोंगड्या घेउन पारावरून पावसाची गमंत पाहत होती.या वर्षी चांगल पाणी दिसते गडया, पीकपाणी व ढोरावासरालेही चांगला चारा होते.अशा गप्पा गोष्ठी करत होती. काहीनी तर मस्त दुपट्ट आथरुन तीथीच फरशीवर ताणुन दिली होती. शामरावनं पहिल्याच पाण्यात कवलाच घर फेरुन काढलं होतं. त्याचही घर भदभद गयलं होतं. बायको धुरपदीनं ही त्याले मदत केली.मारे पराटयाची भारे बांधून ती वरते दात मनगटं खाऊन फेकत होती. तोही वरच्यावर चेंडु सारखे भारे झेलायचा . दोघच नवरा बायको. मजुरीवर सारा खेळ .एकच पोरगी होती. तीही गुणाची, शाळा करुन घरादारापासून झाडझुडीपासून,चुलीतल्या राखीपासुन त शेणपवटा, ईधनकाडी परयंत सारं कसं चकाचक करून ठेवे. पोरीचं नाव गंगी होतं. तीचही गेल्या सालीच लगन उरकुन चार कोसावरच देली होती. खाऊन पीऊन बरी होती. पण जवाई जरा ईप्पतरच होता.लोकं मस्त हातात तुते घेऊन डवराले, निंदाले कामाले जात.हा गडी बस स्टँडवर पानठेलयावर पुळया खाऊन पचपचं थुकत बसलेला येणाऱया जाणाऱयांच्या चिकोरया करत बसे. शामरावनन त्याले समजावलं होतं आपण गरीब माणसं मस्त मजुरीले जायचं मस्त खायचं .तुमच्या सारखाले असे धंदे सोबत नाही. पण कुत्राचं शेपुट हेकोड ते हेकोडंच. शामरावनंही काही कमी केलं नव्हतं लोकाच्या वावरात काम करून कमवून आणलेलं दाणापाणी लेकीलेही पुरवायचा. हौस करायचा. दीवायीले कपडा लतता घयायचा. पाऊस कमी झाल्यावर लोंकाची पेरणया पाण्याची गरबळ सुरु झाली. दोघं नवरा बायकोले काम लागलेलंच राये. करणाऱ्या ले काय कामाचा तोटा.लोकाईच्या वावरात धाऊधाऊ त त्याईनं संसार सांभाळला होता. धुरपदीनंही भाकरीचे पालू साजरे साबणाने धुन ठेवले आणि रंधानात जाउन भाकरीसाठी गरम पाणी आंदन ठेवलं. भाजीसाठी डब्यात ठेवलेल्या वांग्याच्या उसरया काढल्या. व साजरा तिखटाचा, संभाराचा गोया पाटयावर वाटला.कारण गावात हपत्या वारीच बजार भरे .बजारात भाजीपाला ,मीरच्या, भातकयाची दुकानं असत. बाकी दिवस घरचाच दायदाणा भाजीले असे. शेजारच्या सखुनं धुरपदीले, झालं नाही काय वं अशी मोठयाने आरोयी देली.तीनंही बस एवढं धोतर लुगडं पीवलं की आलीच. म्हणुन मोठयाने आवाज ‌दिला.आज मारवाडयाची पराटी टोपणं होतं. मस्त बाया कामाले लागल्या. दुपार झाली ऊन चांगलच तपत होत. आकोल्याची दोनची एसटी गेली ना वं. असं एकीनं म्हटलं म्हणुन सगळयाच सडकीकडे पाहत होत्या. तसा त्यायचा जेवायचा वखद झालाच होता. निंबाच्या झाडाखाली सगळे बसले. आज धुरपदीचं जेवणात मन लागत नव्हतं.काटयाच्या फांजरीवर पाय ठेवल्या सारखं दुखरं झालं होतं. तरी सगं आणलेली कोरभर भाकर व लालभडक निंबर वरण, वावरातली खुडलेली शेपुची भाजी जबरदस्तीनं पोटात घातली. व ईवा हातात घेऊन वटीत बी घेतलं. कामाले सूरू झाली. शामराव दुपारचयाला मुक्कामी पोरीच्या घरी गेला होताच मागं झालेली कलागत निस्तारयासाठी.जवायानंही सासरयाचं निमुटपणे ऐकुन घेतलं आपल्या सारखया फाटक्या माणसाले खरच असे चिल्लर शेवकं शोभत नाही. हे त्याला ही पटलं होतं मस्त कामधंदा करुन आपला प्रपंच सांभाळायचा असं वाटलं आपला सासरा एवढा म्हतारा असुनही काम करुन स्वताच संभाळुन, आपल्यालाही पुरवतो. याची मनोमन लाज वाटली. आळस झटकुन त्यालाही कामाची ऊभारी आली.काम करुन घरात त्यानें बजारहाट आणालेही सुरूवात केली. लेकीचा संसार सावराले गेलेला शामराव मोहीम फत्ते करुनच घरी आला. घरी आल्या वर धुरपदीनं सारी खळणीभुत चौकशी केली. गंगी महणजे आपली लेक पोटूशी असल्याचं ही समजलं मगं त तीच्या आंनदाले नुपर नव्हती. मारूती बुवा पावला म्हणुन तीन घरूणच दिसत असलेल्या मंदीराच्या कयसाले हात जोडले. लेक दोन महिण्यानं घरी येणार म्हणुन दररोज मजुरीले जाउ जाऊ लचपचं खाऊन ऐन वक्तावर कुठीसा पवाव म्हणून घरात असलं नसलं सारं धान्य, दायदाणा भरुन घेतला.आता तिच्या डोकश्या वरचं ओझं कमी झालं होतं. एकुलत्या एक पोरीचा संसार तालावर आला होता. सारया जन्माचा शीण निघुन गेला होता. परमेश्वरच पाठीराखा आहे व बाई म्हणत, घरात देवरयाजवळ व तुयशीपाशी दिवा लावून हात जोडले.
पावसानं गच्च कायश्शार अभाय भरुन आलं होतं.जोराच्या सुटलेल्या वारयात सारा धुळळा गावभरं पसरला होता.कडाकड विजेच्या आवाजामुळे बिथरलेली पाखरं आपल घर जवळ करत होती.नदीच्या पात्रात पोहायला गेलेली लेकरं ही चडडया नेसुन घराकडे भो पयत आली.पेरलेलं सारं हिरवागार शिवार वारयासगं मस्त डूलत होतं. मजुराची घरधन्याची नुसती पयापय होती.मजूरीही जोरात सुरू होती.एखादया दिवसी दुपारुनच मधात पाणी आलं की वावरातुन घरी वापस याव लागल्यानं अर्धीच मजूरी भेटे.घरधन्याले पाण्या पावसाचा अंदाज काढूनच पुढच गणीत ठरवा लागे.डोलत असलेल्या हिरव्यागार पीकाबरोबर घरधन्याचही मन आनंदाने डोले.
रातच्या ला गावाखेडयाचं वातावरण एकदम सामसुम होऊन जाई.माणसं थकुन भागून घरी आल्या वर जेवणं झाली की घडीभर हवेशीर ओटयावर तडव टाकुन गप्पागोष्टी साठी बसत.अमक्याची पराटी चांगली तमक्या चं वावर कस पडीत पडलं, याची चर्चा निघे. कोणाच्या बैलगाडी वर वा ओट्यावर हा जत्था जमे.वातावरण एकदम कूण, गरम. बैलाच्या गळयातील घंटयाच्या आवाजात बैल मस्त रवंथ करीत.गोठयातील लटकवलेला कंदीलाचा अंधुक धूसर प्रकाश, नदीच्या पाण्याचा खडखड आवाज,डबक्यातील बेडकाचे बेसुर ओरडणं, रातकीडयाची कीरकीर,झाडावरील घूबडाचा घूघू घूतकार यामुळे अधीकच भयाणकता जाणवे.एखाद लहान पोरगं मधातच जोरजोरान बेंबीच्या देठापासुन ईलावे. काही मोजक्याच लोकाच्या घरी इलेक्टरीक होती. सिन्नी कंपनीचे चे ईकडून तिकडे तोंड फिरवणारे काळये पंखे फिरतांना दिसत. हे पंखे हवा कमी आवाजच जास्तं करत. ज्याच्याकडे लाईन नव्हती, ते हवेशीर सपरीत नाही, त बैलगाड्यात बाहेर झोपत.
आज धुरपदी झाकटीतच ऊठली.चांगल सडासारोन केल.चूल पेटून च्या मांडला. ईधनाचा कवटा ऊनात वाळवायला टाकला. भांडे ईसावून दोनतीन मीसयच्या भाकरी व तुरीच्या दायीच्या कनोराचं मोकयं बेसन केलं. तीलेही शहादेव बुढयाच्या वावरात नींदाले जायच होतं. शामरावलेही महादेव बुढयाच्या वावरात डवरयाचा होका होतां. दोघाचीही तीन शिदोरी बांधली.नीघाव त तेवढयात तीची नजर ईधनाकडे गेली. पाण्यान ओल होऊ नये म्हणुन तीन कवटा जमा केला.व रंधानात ठेवला.तेवढयात बकरयावाला बुढा “बकरया सोडा हो”. म्हणत मोठयाने आरोयी देत फिरत होता.तीने बकरयाच्या अगळळया सोडुन नदीपर्यंत हकालत नेल्या.व वावराचा रसता धरला.
लवकरचं नागपंचमी रो रो करत आली.नागपंचमीच्या झडीन नाकात दम करुन ठेवला.अभाय फाटल्या सारख पाणी पडत होतं. आठ दिवस सारखी झड लागुन होती.घरात बसुन लोक कटायले होते.वावराचे कामधंदेही ठप्प होते.लेकरबाकरं सयपाकखोलीत तुरीच्या गरम घुघरया व भाकरीचे पोपडे तेल,मीठ टाकुन चुलीत भाजून खात होती.खीडकीत बसुन झडीची मजा पाहत होती.काही पोटटे मंदीराच्या पाईपातुन येत असलेल्या धारीखाली भीजत होती.जंगलात गावात चीखलच चीखल.महादेव बुडा पायटीच पोतं घेऊन वावरात गेला.तीकडुन खबरबात घेऊन आलयावर मानमोडी च्या नाल्या ले कसा पूर गेला.. कोणाची पराटी पीवयी पडली. है सांगत होता. बुढा एकप्रकारचा वार्ताहरच होता. ज्याच्या जवळ ढोरासाठी कडबाकूटार होते त्यायच बर होतं. ज्याचया कडे नाही ते झडीत सडकीन ढोर झडीत चरायला घेउन जात होते . दिवसभर थंडीत ओल्या आंगानं कूडकूडत बसावं लागे. जंगलात थंडगार वारंही चांगलच वाहे.पण काही ईलाज नव्हता.
धुरपदीनं शामरावले गंगीला सातवा महिना लागल्याचं सांगीतलेलं व आता झडीच्यान रिकामपण आहे त घरी घेऊन यायला सांगीतलं.शामराव पायटच्या सातच्या एसटीनं गेला. व दिवस डुबायचया आत चारच्या एसटीनं घरी आला.गंगीला पाहून धूरपदीचा आनंद गगनात मावत नव्हता.कीती तरी दिवसानं मायलेकराची भेट झाली होती.. थोडयाच दिवसानी गंगीले दवाखान्यात भरती केलं गंगीला मस्त मुलगी झाली होती.. आपल्याले नात झाली याचा आनंद दोघांनाही झाला होता. सुट्टी झाल्या वर तो एसटीनं घरी आला. पावसाची पीरपीर चालूच होती‌. एसटी स्टॅन्डवर उतरतांना त्यानं फास्फेट च्या पोत्याचं घोंगडं गंगीच्या आंगावर देलं होतं. घरी आल्यावर धुरपदीनं गरम च्या केला. व वावरातुन आणलेलया अंबाडीच्या भाजीच्या चूलीवर गरम भाकरी व हिरव्या मीरचीचा ठेचा केला. व गंगीले गव्हाची मस्त सोजी करुन दिली. सारे चुलीजवळ बसुन जेवले.
दुसऱ्याच दिवशी वानोश्याचा गुरूवारचा बजार असल्यामुळें शामरावनं महादेव बुढयाले चारपाचशे रुपये उसने मागीतले. व थैली घेऊन बजारात गेला.गंगीसाठी बायतपणा च्या लाडवाचे सामान घेतले व खिशात पैसै दयायला हात घातला. खिशात पैसे नव्हतें. हाताले काहीच लागलं नाही. मग त्यान थैली एक दोनदा झटकुन पायली..मग मात्र आपला खीसा कापल्याच त्याच्या लक्षात आल. दोन पन्नास च्या नोटा धोतराच्या घोयात पुरचुंडी करुन ठेवल्यानं त्या होत्या. दुकानदाराला त्यानें समजावुन सांगीतल पण तूम्हाले मी ओळखत नसल्यानं नकार देला. इतक्यात तयाले आपल्या गावचा शंकर कृषी केंद्रात काम करते म्हणुन आठवल. व त्याले घेऊन आला. दुकानदारानै शंकरले ओयखल. व त्याच्या भरोशयावर सामान देलं घरी आल्या वर त्यान हा किस्सा बायकोले सांगीतला. “बापा झोपी गीपीत होते की काय? एवढा घोयंद्रखोऱ्या माणूस म्या तं आजून पायला नाही वं मायं”म्हणुन धुरपदीनं म्हटल. शामरावनं “धूत तीच्या मायची आफत तं अवं आयकशीन की आपलीच टपर टपर लावशीन” जरा रागानंच म्हटलं. तीनंही जरा आवरतंच घेतलं व “आता जाऊ दया, कष्टाचा पैसा कितीक दिवस पूरीन त्या दुषमानाले “. म्हणून् जेवाले बलावलं. भाकर खाल्यावर शामरावनं आमासक वाकई वर आंग टाकलं. मंदीरातून तयाचे कानावर भजनाचा अवाज येत होता.झडीचा पाऊस हलका पडला होता.तसा त्यानं दुपट्टं खांद्यावर टाकुन मंदीराची वाट धरली. रातदिवस सारखी झडी चालू असल्यामुळें पावसाचं पाणी मुरुन शामरावच्या घराची भित पडली होती.बायेतीन झालेल्या पोरीची खाट ही त्याच कोपर्यात होती. जीवावरचं मोठं संकट टयलं होतं. शामरावनं हातोहात माती बाजुला करून पराटयाचा कूळ घेऊन टाकला.व झडी उघडायची वाट पाहत बसला.
कथालेखन– विजय जयसिंगपुरे ९८५०४४७६१९

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}