मनोरंजन

लोणचं -दीपक तांबोळी

लोणचं

-दीपक तांबोळी

आपली अँक्टिव्हा पार्किगच्या जागेत लावून अनघा भाजी बाजारात शिरली.आज बाजारात खुप कैऱ्या आलेल्या दिसत होत्या.जागोजागी ढिग रचलेले दिसत होते.लोणच्यासाठी कैऱ्यांची खरेदी करण्यासाठी बायकांची एकच गर्दी झाली होती.
“ताई एक नंबर कैरी आहे.एकदम खोबरं.फक्त चाळीस रुपये किलो” ती एका कैरीच्या ढिगाकडे बघत असतांना कैरीवाला म्हणाला.त्या कैऱ्या पाहून तिला आईच्या हातच्या लोणच्याची आठवण झाली.खरं तर लोणचं हा अनघाचा विक पाँईंट.त्यात आईच्या हातचं लोणचं म्हणजे अहाहा! त्या लोणच्याच्या आठवणीने अनघाच्या तोंडाला पाणी सुटलं .दोन वर्षांपूर्वी तिने स्वतः लोणचं टाकलं होतं.ते कुणालाच आवडलं नव्हतं म्हणून मागच्या वर्षी तिने एका मैत्रिणीला आपलं लोणचं टाकायला सांगितलं होतं पण तेही कुणाला आवडलं नाही.एक लोणचं खराब झालं म्हणून फेकून दिलं होतं.तर दुसरं लोणचं तसंच पडून होतं.घरातलं कुणीच त्या लोणच्यांना हात लावत नव्हतं.तीच कधीतरी एखादी फोड खायची पण फक्त ते संपवायचं म्हणून. आईच्या हातच्या लोणच्याची सर त्या लोणच्याला नाही हे तिलाही कळून चुकलं होतं.तीन वर्षांपूर्वी तिची आई वारली आणि माहेराहून येणारं लोणचं बंद झालं होतं.तिच्या वहिनीला लोणच्यासाठी कराव्या लागणाऱ्या खटाटोपाचा मोठा कंटाळा. अर्थात तिने करुन पाठवलं असतं तरी अनघाला ते कितपत आवडलं असतं याबद्दल शंकाच होती.तिने बाजारातली लोणचीही आणून पाहिली होती पण ती तर तिला अजिबातच आवडली नव्हती.
काय करावं हे तिला ठरवता येत नव्हतं.कैऱ्या घेण्यासाठी तिची घालमेल चालली होती पण घरात पडलेलं लोणचं तिला तसं करु देत नव्हतं.
“घ्या ना ताई.बघा किती पांढरीशुभ्र कडक कैरी आहे” एक कैरीवाली तिला म्हणत होती
“नको नको.घरी मागच्या वर्षीचंच लोणचं पडलंय”
“अहो तेही राहू द्या.या नवीन कैरीचं बनवून बघा.एकदम बेश्ट लोणचं होणार ताई”
कैरी खरंच छान होती.पण शेवटी
अनघाने हातानेच तिला नाही सांगितलं आणि ती तिथून सटकली.भाज्या घेऊन घरी आली.पण पुर्ण रस्ताभर तिला वाटत होतं की गाडी वळवावी आणि कमीतकमी दोन किलो तरी कैरी घेऊन यावी.

ती घरात शिरली आणि घरातला कचरा बघून थबकली
” सोनल ए सोनल” तिने लेकीला हाक मारली.ती धावत आली
“काय गं सोनल नंदा मावशी आली नाही का?”
” नाही. तिचा फोनही आला नाही”
ते ऐकून अनघाचं डोकं सरकलं
“मेली कालही आली नव्हती.नुसते खाडे करत असते.बरं फोन करुन सांगतही नाही”
“तिच्याकडे फोन कुठे आहे आई”
” अगं शेजारपाजाऱ्याचा फोन घेऊन तर सांगू शकते?थांब येऊ दे मेलीला चांगली खरडपट्टीच काढते”
” तू तिला काढून का नाही टाकत आई?दुसरी झाडूवाली का नाही लावून घेत?”
” शहाणीच आहेस गं!दुसऱ्या बायका अशा सहजासहजी मिळतात का?आणि ही सातशे रुपयात घर झाडते,पुसते.बाकीच्या दिड आणि दोन हजार मागतात”
सोनलला आईची मोठी गंमत वाटली.या कारणासाठीच आई तिचे खाडे सहन करते हे तिच्या लक्षात आलं.अनघाने भाजीची पिशवी किचनमध्ये ठेवली.कुंचा घेऊन ती स्वतः घर झाडायला लागणार तोच दारावरची बेल वाजली.अनघाचा छोटा मुलगा संदीप दार उघडायला गेला.
“आई नंदा मावशी आली गं”
तो ओरडला तशी अनघा घाईने बाहेर आली.
“काय गं नंदा इतका उशीर?बारा वाजलेत.ही काय वेळ आहे येण्याची?आणि कालही तू आली नाहीस.साधा फोन करता आला नाही का तुला?”
अनघाची तोफ सुरु झाली
” अवं ताई काय सांगू!काल इकडं यायला निघाली तर आई दरवाजाला धडपडून पडली.कंबरेला मार लागला.सगळे म्हणायला लागले डाँक्टरकडे घेऊन जा.फ्रँक्चर असेल म्हणून तीला सरकारी दवाखान्यात घेऊन गेलती.तिकडेच दोन वाजून गेले मग कवा येऊ?”
“जेव्हा बघावं तुझे आईचेच बहाणे असतात.आईला हे झालं,आईला ते झालं”
“काय करु ताई?तिला एकतर दिसत नाही आणि काम करायला जाते.मी कामावर जाते पण लई जीवाला घोर लागतो बघा ”
” तो तुझा भाऊ मध्य प्रदेशमध्ये रहातो त्याच्याकडे का नाही पाठवून देत तू तिला?”
“भाऊ नाही म्हणतो ना तिला ठेवून घ्यायला.चार लेकरं हायेत त्याची.खुप पैसा लागतो ना पोरांना शिकवायला”
“कमाल आहे!जिने जन्म दिला तीच जड झाली वाटतं त्याला?आणि तू काय लखपती लागून गेलीस का गं?”
” वैनी म्हणती तू काय सडिफटिंग.तुला ना नवरा ना पोरबाळ तुच सांभाळ तुह्या मायला ”
असं म्हणून नंदाने पदर डोळ्याला लावला.मुलाबाळांचा विषय निघाला की नंदाला असंच रडू यायचं.मुलबाळ होत नाही म्हणून तिला तिच्या नवऱ्याने सोडून दिलं होतं.दुसऱ्या बाईशी लग्न करुन तो गावातच दुसऱ्या झोपडपट्टीत रहात होता.आता त्याला तीन पोरं होती आणि नंदाकडे तो ढुंकूनही पहात नव्हता.तिला फुटकी कवडीही खर्चासाठी देत नव्हता.नंदा चारपाच घरात धुणीभांडी करुन कसंबसं आपलं जीवन चालवत होती.भावाने तिच्या आईला हाकलून दिलं तेव्हा ती आईला घरी घेऊन आली.एक विधवा आणि दुसरी नवऱ्याने सोडलेली अशा दोन्ही निराधार बायका एकमेकींच्या साथीने मरण येत नाही म्हणून कसेबसे दिवस ढकलत होत्या.दोघींच्या आयुष्यात काही राम राहिला नव्हता.त्यात नंदाच्या आईच्या दोन्ही डोळ्यात मोतीबिंदू झालेला.तिला एकदम अंधुक दिसायचं.पैसे नाहीत आणि शासनाच्या योजना माहित नाहीत त्यामुळे आँपरेशन करायचंही दोघी टाळत होत्या.अनघाला ही गोष्ट माहित होती.त्यामुळे नंदा रडायला लागताच अनघा नरमली.
” बरं बरं नको रडू.असं तुझ्या भावासारखं सांभाळणार नसतील तर मुलबाळ असूनही काय उपयोग?चल जाऊ दे.तू झाड लवकर.जेवायची वेळ झालीये”
नंदा कुंचा घेऊन घर झाडू लागली.किचनमध्ये येताच तिला भाजीच्या पिशव्या दिसल्या.त्या पाहून तिने विचारलं
“ताई कैऱ्या पण आणल्या का लोणचं टाकायला?”
“नाही गं बाई.मागच्या वर्षीचंच लोणचं पडलंय तेच कुणी खात नाही”
“आवडत नाही का सायबांना?”
“आवडतं.पण मला चांगलं जमत नाही म्हणून खात नाही. आई होती तेव्हा माझ्या माहेरहून पाच किलो कैरीचं लोणचं पाठवायची.पण सहा महिन्यात संपून जायचं बघ”
” ताई आईची माया असती त्यात.मलाबी इतकं खास जमत नाही पण माह्यीआई लई झकास लोणचं करती”
” हो का?”
” एखादी वाटी आणून देऊ का?पण मागल्या वर्षीचं हाये आणि झोपडपट्टीतलं लोणचं चालीन का तुमाला?”
ही गोष्ट विचार करण्यासारखी होती.कसं केलं असेलं लोणचं?तेल,मसाले ,कैऱ्या कसे वापरले असतील देव जाणे?शिवाय स्वच्छता तरी आहे का तिच्या झोपडीत कुणास ठाऊक?आजपर्यंत कधी नंदाच्या घरचं काही खाल्लं नाही आता लोणचं खाणं योग्य राहिल का?एका सेकंदात शेकडो प्रश्न अनघाच्या मनात गर्दी करुन गेले.
” चालेल ना.घेऊन येशील उद्या ” अखेरीस तिच्या तोंडातून निघूनच गेलं.चवदार लोणच्यासाठी तिचं मन आसुसलं होतं त्यामुळे आपल्या मनातील प्रश्नांना उत्तर न देताच ती बोलून गेली.
दुसऱ्या दिवशी नंदा एका छोट्या डब्यात लोणचं घेऊन आली.ती काम करुन जाईपर्यंत अनघाने काही तो डबा उघडला नाही.ती गेली आणि तिने त्याचं झाकण उघडलं तसा एकदम मस्त सुगंध आला.मागच्या वर्षीचं लोणचं.तरी छान दिसत होतं.तिने एक छोटी फोड घेऊन चाखली.अहाहा.काय मस्त चव होती.येस!अगदी आईच्या हातच्या लोणच्यासारखी चव.तिने आणखी फोड घेऊन ती खाल्ली.हो तीच चव.थोडंसं जास्त तिखट होतं लोणचं पण नवीन कैऱ्यांचं टाकलं तर तिखट कमी करता आलं असतं.अनघाने दोन्ही मुलांना हाक मारली.
“पोरांनो बघा रे कसं लागतं हे लोणचं?”
“आई वास तर खुप छान येतोय” सोनल म्हणाली
“आई मला पोळी दे ना.मला पण खाऊन बघायचंय” छोटा संदीप ताटली घेऊन बसला.
अनघाने दोघांना एकेक पोळी ताटलीत दिली.दोघांनी अर्ध लोणचं फस्त करुन टाकलं.अनघानेही थोडी पोळी त्यासोबत खाल्ली.
“आई खुप मस्त आहे लोणचं.नंदा मावशीला सांग ना आपल्याला करुन द्यायला”
“बरं बरं सांगते उद्या”
दुसऱ्या दिवशी नंदा आली तशी अनघा तिला म्हणाली
” नंदा छान आहे गं लोणचं.मला तीन किलो कैरीचं टाकून देशील का?पण तुझ्या आईला दिसत नाही म्हणतेस.मग कसं जमेल?”
” थोडंसं दिसतं तिला.बाकी अंदाजाने करते ती.मी पण करते तिला मदत पण सगळं प्रमाण तिच घेते.आमचंही टाकायचं आहेच.त्यासोबत तुमचंबी करुन घेऊ”
” तुला काय काय सामान आणून देऊ?”
“तुम्ही फक्त पाचशे रुपये द्या मला.मी सगळं करुन घेईन.आमच्याकडे एक ओळखीचा कैरीवाला येतो.छान असतात त्याच्याकडच्या कैऱ्या.आणि बाजुलाच किराणा दुकान आहे तिथे सगळं सामान मिळून जाईल.तोही गरीब माणूस आहे त्याला तेवढीच मदत”
अनघाच्या मनात संशय निर्माण झाला. पाचशे रुपये घेऊन ही बया पसार झाली तर?ना हिचं घर आपल्याला माहित ना हिच्याकडे मोबाईल. त्यातून हिच्याकडे अगोदरचेच हजार रुपये अडकलेले.संपर्क तरी कसा करणार?नंदाचं काम झालं तसं तिने विचारलं
” देताय ना ताई पैसे”
” नंदा उद्या देते तुला.संध्याकाळी हे आले की घेऊन ठेवते त्यांच्याकडून”
“बरं” ती बाहेरचं दार उघडून निघाली.तशी सोनल अनघाला म्हणाली
“आई तुझ्या पर्समध्ये तर भरपूर पैसे आहेत.देऊन टाक ना तिला.कशाला उद्यावर ढकलतेय”
” अगं पण…”
“काही पैसे घेऊन पळून जाणार नाही ती.आणि गेली तरी काही लाखो घेऊन जात नाहिये की त्याच्यामुळे आपण लगेच भिकारी होऊन जाऊ”
अनघाला तिचं म्हणणं पटलं
” असं म्हणतेस?मग घे पैसे आणि देऊन ये तिला लवकर .अजून लिफ्टमध्येच असेल ती”

पाच दिवसांनी नंदाने एका स्टिलच्या डब्यात लोणचं आणलं.तोपर्यंत अनघाचा जीव टांगणीला लागला होता.तीनचार वेळा ती नंदाला लोणच्याबद्दल विचारुन चुकली होती.डब्याचं झाकण उघडलं तसा लोणच्याचा घमघमाट सगळीकडे पसरला.
“कमी तिखट केलंय ना?”तिने नंदाला विचारलं
“हो.तुमी खाऊन तर बघा” नंदा म्हणाली
अनघाने वाटीत घेऊन ते चाटून बघितलं.खुपच चवदार होतं.शिवाय ताजं असल्याने फारच छान लागत होतं.अगदी आई करत होती तसंच.अनघाला खुप आनंद झाला
” हे घ्या ताई उरलेले पंचवीस रुपये आणि हा हिशेबाचा कागद”
टेबलवर पैसे आणि कागद ठेवत नंदा म्हणाली.तिच्या इमानदारीचं अनघाला मोठं कौतुक वाटलं.
“अगं राहू दिले असते”अनघा म्हंटली खरी पण तिने ते पैसे उचलून डब्यात टाकले. तसं शेजारीच उभ्या असलेल्या सोनलला हसू आलं
“छान झालंय लोणचं नंदा.तुझ्या आईला माझे धन्यवाद सांग.आणि बैस मी चहा ठेवते”
अनघाने केलेला चहा नंदा घेऊ लागली
“कमालच म्हंटली पाहिजे तुझ्या आईची.दिसत नसुनही किती छान लोणचं केलंय”
” ती भाज्याबी लय मस्त करती.पण ताई बगा ना देवाने काय आजार दिलाय.”
“तू आँपरेशन का नाही करत तिच्या डोळ्यांचं?”
“ताई लई पैसा लागतो.सत्तर ऐंशी हजार लागतात म्हणे.कुठून आणू इतके पैसे?”
अचानक अनघाला कल्पना सुचली.तिने नवऱ्याला फोन लावला.तिचा नवरा,निलेश महानगरपालिकेत मोठा अधिकारी होता.
“अहो या नंदाच्या आईच्या मोतीबिंदूबद्दल मागे आपलं बोलणं झालं होतं.तुम्ही म्हणत होता की एक चँरीटेबल ट्रस्टचं हाँस्पिटल आहे…..”
“हो आहे ना!मी तुला मागेही त्याबद्दल सांगितलं होतं पण तेव्हा तू म्हंटली होतीस की जाऊ द्या या लोकांसाठी कितीही करा त्यांना काही किंमत नसते.आता अचानक तुला कसा तिचा पुळका आलाय?” त्याने थोडं रागातच विचारलं.नंदाने ते बोलणं ऐकलं तर नाही याची अनघाने खात्री केली.नंदा आपल्याच तंद्रीत चहा पित होती.अनघा तिथून उठून बेडरुममध्ये आली.
“पुळका आला असं नाही. आता मला लोणचं मिळालंय”
” लोणचं मिळालंय?म्हणजे?”
अनघा एकदम हसत सुटली.मग हसू आवरत म्हणाली
” तुम्ही घरी आलात की सांगते.बरं सांगा ना आता तिचं आँपरेशन कमी खर्चात करायचं असेल तर काय करावं लागेल?”
“तिच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे का?”
“थांबा तिला विचारते” तिने बाहेर येऊन नंदाला विचारलं.नंदा नाही म्हंटली.अनघाने निलेशला तसं सांगितलं.
” मतदार ओळखपत्र तरी आहे का?”
तिने परत नंदाला विचारलं नंदा हो म्हणाली
” बरं बरं .आपण उद्या तिच्या आईला दवाखान्यात घेऊन जाऊ.तिच्या काही टेस्ट कराव्या लागतील.त्या ओके आल्या की एका डोळ्याचं आँपरेशन होईल.मग एक महिन्याने दुसऱ्या डोळ्याचं करता येईल”
तिने नंदाला तसं सांगितलं.
“पण ताई पैसे किती लागतीन?”नंदाने काळजीने विचारलं.अनघाने विचारल्यावर निलेश म्हणाला
“काहीच नाही. शासनाची महात्मा फुले जीवनदायी योजना आहे त्यात सगळं फुकट होईल.त्यासाठी खरं तर पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड लागतं.ठिक आहे बघतो मी काय करता येईल ते.उद्या तिच्या आईला आपल्याकडे घेऊन यायला सांग.मी घेऊन जाईन गाडीतून दोघींना”
अनघाला ते ऐकून आनंद झाला.मग अनघाने नंदाला ते सांगितलं तेव्हा तिला अनघाच्या दुप्पट आनंद झाला.
संध्याकाळी निलेश घरी आला.त्यालाही ते लोणचं खुप आवडलं.नंदाच्या आईच्या डोळ्यांचा विषय निघाला तसा तो म्हणाला
“अनू मागेच मनावर घेतलं असतं तर तिचं आँपरेशन होऊन एव्हाना तिला छान दिसायला लागलं असतं.बिचाऱ्यांकडे एकतर एवढे पैसे नसतात.आणि शासनाच्या खुप चांगल्या योजना असल्या तरी त्या यांच्यापर्यंत पोहचतच नाहीत.खरंतर नगरसेवक,आमदार अशा शस्त्रक्रियांची शिबिरं आयोजित करु शकतात.पण पाच वर्षांनी निवडणुका येतात तेव्हाचं त्यांना गरीब लोकांची आठवण येते.तेव्हाही काय पाचशे हजार रुपये फुलीप्रमाणे ते यांची मतं विकत घेतात.नंतर त्यांना विसरून जातात.तेच आपल्यासारखे सुशिक्षित लोक ज्यांना या योजनांची माहिती असते तेसुद्धा यांच्याकडे गरीब म्हणून दुर्लक्ष करतात.खरंतर आपल्याला एक रुपयाचासुध्दा खर्च नसतो.पण आपल्या या उदासिनतेमुळे ते आयुष्यभर आजार सहन करतात आणि तसेच मरुन जातात.ठिक आहे आता परत काहीतरी फुसकं कारण सांगून मला चांगल्या कामापासून परावृत्त करु नकोस”
अनघा चुप बसली.तिची चुक तिला कळली होती.

दुसऱ्या दिवशी सकाळीच नंदा तिच्या आईला हाताला धरुन घेऊन आली.तिला बसवून मग तिने घर झाडण्याचं आणि फरशी पुसण्याचं काम करुन टाकलं.अनघाने तिच्या आईच्या डोळ्यातले पांढरे,पिवळे मोतीबिंदू पाहिले तेव्हा तिला कसंतरीच झालं.इतके वर्ष कसं काय म्हातारी तशा डोळ्यांनी वावरत होती कोण जाणे?निलेश बाहेर आला.म्हातारीचे डोळे पाहून तिला म्हणाला
“काय मावशी किती वर्षांपासून हे मोतीबिंदू आहेत?मुलाकडे होत्या तेव्हाच का नाही आँपरेशन करुन घेतलंत?”
“लई दिस झाले दादा.अन् पोरांचं काय सांगू दादा?त्याले दारु प्यायले पैसा पुरायचा नाही त्यो काय करीन माह्यं आँपरेशन?आपण काय कामाचे ना धामाचे!कशाला ठेविन सुनबी मग आपल्याले?दिलं हाकलून मले.लई दुनिया बेकार हाये बाप्पा.आमच्या झोपडपट्टीत तं लई पापं होतात.बघून बी काय करता या पापी दुनियाले?डोळ्यांनी नाय दिसत तेच बरं हाये”
तिचं ते तत्वज्ञान पाहून निलेशचे डोळे पाणावले.शेवटी गरीबांच्या दुःखाची आपल्याला कल्पनाच येऊ शकत नाही हे त्याला पटलं.नंदाला सहज त्याने विचारलं
“नंदाताई तुमचा नवरा तुम्हांला काही खावटी वगैरे देतो का?”
नवऱ्याचा विषय निघाला की नंदा एकदम कावरीबावरी व्हायची कारण त्या विषयात तिझ्या वांझपणाचा मुद्दा निघायचा जो तिला अजिबात आवडत नव्हता.आताही तिला तसंच झालं पण निलेशला उत्तर देणं भाग होतं
” नाही सायेब”
“रितसर फारकत नव्हती ना झाली?”
“नाही सायेब.मले न सांगता त्याने त्या चुडैलशी पाट लावला”
“ठिक आहे.तुमचं तेही प्रकरण आपण मार्गी लावू.तुम्हांला महिन्याला काहीतरी रक्कम मिळण्याची व्यवस्था करु”
” लई मोठा गुंडा हाये साहेब तो.बधणार नाही तुम्हांले ”
” काही काळजी करु नका.पोलिस कमीशनर माझे मित्रच आहेत.बरोबर सरळ करतील त्याला.मावशींचं आँपरेशन होऊन जाऊ द्या.मग लागू त्याच्या मागे”
” लई उपकार होतीन सायेब” ती आनंदून म्हणाली.
नंदाच्या आईचं आँपरेशन यशस्वीरीत्या पार पडलं.तीन दिवसांनी डोळ्यावरची पट्टी निघाली आणि पहिल्यापेक्षा खुप छान दिसायला लागलं तेव्हा तिला आणि नंदाला खुप आनंद झाला. तरी एक महिना डोळ्यावरचा गाँगल न काढायची डाँक्टरांनी ताकीद दिली.एका महिन्याने परत दुसऱ्या डोळ्याचं आँपरेशन झालं.आता म्हातारीला स्वच्छ दिसत होतं.

आँपरेशननंतर अनघाला नंदाच्या आईला भेटण्याची इच्छा झाली.तसं तिने नंदाला सांगितलं.नंदा म्हणाली
“ठिक आहे ताई.मी घेऊन येती तिला”
“अगं राहू दे.कशाला तिला बिचारीला पायपीट.मीच येते तिला भेटायला. त्या निमित्ताने तुझं घरंही पहाण्यात येईल”
नंदा हसली
” ताई ते काय घर आहे?गरीबांचं कुठे घर असतं ताई?दिवसा जेवायची आणि रात्री झोपायची जागा आहे फक्त”
“असू दे.मला काय फक्त तुझ्या आईला भेटायचं,दोन शब्द बोलायचे आणि परत यायचंय.उद्या तुझं काम झालं की आपण दोघी माझ्या गाडीवर जाऊ”
दुसऱ्या दिवशी ती नंदाला घेऊन झोपडपट्टीत गेली.तिला आश्चर्य वाटलं की तिच्या काँलनीत चांगले रस्ते नव्हते पण झोपडपट्टीत पक्के सिमेंटचे रोड होते.एका पत्र्याच्या शेडजवळ नंदाने गाडी उभी करायला सांगितली.
“कुठाय तुझं घर?”अनघाने विचारलं
“हे काय!समोरच आहे” नंदाने बोट दाखवलं.त्या सडक्या पत्र्यांच्या छोट्या झोपडीकडे पाहून अनघाला धक्काच बसला.नंदा खरंच म्हणत होती त्याला घर म्हणताच येत नव्हतं.पत्र्याचंच दार दुर करुन दोघी आत शिरल्या.एका मोडक्या खाटेवर झोपलेली नंदाची आई अनघाला पहाताच उठून बसली.नंदाने एक जीर्ण झालेलं प्लास्टिकचं स्टुल अनघाला बसायला दिलं.
” काय मावशी ठिक आहात ना?आता व्यवस्थित दिसतंय ना?”
” हाव बेटा.लई मेहेरबानी झाली तुह्यी अन तुह्मां नवऱ्याची.नंदे चहा कर वं माय ताईले”
“नको नको राहू दे नंदा.आता जेवायची वेळ झालीये” तिने सगळीकडे नजर फिरवली.झोपडी तशी स्वच्छ होती.एका कोपऱ्यात चुल मांडली होती.त्या दहा बाय दहाच्या खोलीत सगळा संसार मांडला होता.तिथेच स्वयंपाक, तिथेच जेवण आणि तिथेच झोपणं.अनघाच्या अंगावर काटा आला.पत्र्याच्या खोलीत खुप गरम होत होतं.तिने धुराने काळ्या झालेल्या छताकडे नजर टाकली तिथे पंखा नव्हता.एक बल्ब मात्र कसा तरी अडकवलेला होता.छताला पडलेल्या छिद्रातून ऊन्हाची तिरीप येत होती.पावसाळ्यात या फाटक्या छतातून पाणी गळून झोपडीत पाणी व्हायचं.मग नंदा उशीरा कामाला यायची आणि अनघाची बोलणी खायची.बाहेरच्या बाजुला एक कुडाचं न्हाणीघर होतं.संडास कुठेच दिसत नव्हता.शौचाला जायचं तर भल्या पहाटे उठून अंधारात दुरवर जावं लागतं असं मागे नंदा म्हणाल्याचं तिला आठवलं.कसं आयुष्य काढत असतील या मायलेकी या विचाराने अनघा शहारली, अस्वस्थ झाली.नंदाच्या आईशी थोडंफार बोलून ती बाहेर आली.
“ताई चहा तरी घेतला असता थोडा गरीबाच्या घरचा”
नंदा म्हणाली.तिचं मन अनघाला मोडवेना पण त्या झोपडीत एवढ्या गर्मीत आपल्याला चहा घेणं शक्यच नाही हे तिच्या लक्षात आलं.
ती घरी आली पण नंदाची ती झोपडी तिच्या मनातून काही जाईना.

संध्याकाळी निलेश घरी आल्यावर त्याला नंदाची गोष्ट सांगून ती म्हणाली
“आपण किती सुखात आहोत.आपल्या प्रत्येक रुममध्ये ए.सी.आहे.प्रत्येक बेडरुमला अटँच्ड टाँयलेट्स आहेत.तरीसुध्दा थोडीही गैरसोय आपल्याला सहन होत नाही. हे गरीब लोक कसे आयुष्य काढत असतील देव जाणे?”
“बरं झालं तू या निमित्ताने झोपडपट्टीत जाऊन आलीस.दुसऱ्याचं दुःख पाहूनच आपण किती सुखात आहोत याची माणसाला जाणीव होते.आणि बरी आठवण दिलीस.आपली महानगरपालिका झोपडपट्टी निर्मूलन योजनेखाली या गरीब लोकांना पक्की घरं बाधून देणार आहे तीही एकदम स्वस्तात. नंदाला त्यासाठी अर्ज करायला सांग.किंवा माझ्या आँफिसमध्ये पाठवून दे.घाई करायला सांग नाहीतर नगरसेवक आणि झोपडपट्टीचे दादाच ती घरं बळकावून बसतील.अशा घरकुलांचा फार मोठा काळाबाजार चालत असतो”
“बरं उद्याच पाठवते तिला.बरं होईल बाई त्या नरकातून तिची सुटका तरी होईल.पण का हो नंदाला घर मिळालं की ती इथून निघून जाईल.मग परत मला दुसरी बाई शोधावी लागेल.जाऊ द्या तिला या घरकुलाचं मी काही सांगत नाही.”अनघा नाराजीने म्हणाली
“कमाल करतेस अनू!तुला दुसरी बाई मिळून जाईल पण तिला असं घर जन्मात कधी मिळणार नाही”
सोनलला आईच्या बोलण्याचं हसू आलं
“आई एरवी तू तिला शिव्या देत असतेस.जाऊ दे तिला. बघू आपण दुसरी”
“आता तूही बापाचीच बाजू घे”अनघा फणकाऱ्याने म्हणाली
“बरं तुम्ही तिला तिच्या नवऱ्याकडून काही पैसे मिळवून देणार होतात ना?”
“अरे हो!कामाकामात असा विसर पडतो बघ.एक काम कर ना.तुमच्या महिला मंडळाची उपाध्यक्ष वैशाली चोपडे वकीलच आहे.तिला सांग ना नंदाची केस बघायला.असंही तुमचं मंडळ किटी पार्टीज,सदस्यांचे वाढदिवस, सहली आणि फार तर महिला दिन साजरा करणं याशिवाय करतंच काय?”
“खरंय म्हणा.पण ती वैशाली महाशहाणी आहे.तिला फक्त मोठमोठ्या लोकांसमोर पुढेपुढे करायला पाहिजे.प्रेस फोटोग्राफर आणि चँनेलवाले आले की त्यांच्यासमोर मिरवायला पाहीजे.ते गेले की ही चालली घरी.मला नाही वाटत ती नंदाला मदत करेल”
“ठिक आहे.तू विचारुन तर बघ.नाही म्हंटली तर माझ्या वकील मित्राला विचारुन बघतो”
दोन दिवसांनी अनघाने वैशालीला फोन करुन नंदाबद्दल सांगितलं.अपेक्षेप्रमाणेच वैशाली नाही म्हणाली.उलट तिने नंदालाच दोष दिला.’ आतापर्यंत ती झोपली होती का?आणि हिला मुलबाळ होत नाही तर त्यात तिच्या नवऱ्याची काय चुक?’असा प्रश्न तिने अनघाला केला.मग ‘माझ्याकडे आधीच्याच खुप केसेस आहेत’ असं सांगून तिने दुसऱ्या महिला वकिलाचा नंबर दिला.अनघा तिला भेटायला गेली पण तिलाही नंदाच्या केसमध्ये इंटरेस्ट नव्हता.दर तारखेला वकिलाची फी कोण देईल हा तिचा पहिला प्रश्न होता त्याचं उत्तर अनघाकडे नव्हतं.शेवटी संध्याकाळी तिने निलेशला हे संगळं सांगितलं.तो विषादाने हसून म्हणाला
“बघ एका महिलेवर झालेल्या अन्यायाविरुद्ध बोलायची,तिला न्याय मिळवून देण्याची महिलांचीच इच्छा नाही. बंद करुन टाका तुमचं ते महिला मंडळ.ते महिलांच्या प्रश्नांसाठी आहे की फक्त एंजाँयमेंटसाठी?”
मग त्याने त्याच्या वकीलमित्राला फोन लावला.नंदाची केस सांगितली.स्वतः काही फी देण्याची तयारी दाखवली.मित्र तयार झाला.वकीलाच्या सांगण्यावरुन मग नंदाने पोलिसात तक्रार दिली.अगोदरचीच बायको असतांना तिला रितसर घटस्फोट न देता दुसरं लग्न केल्याबद्दल पोलिसांनी तिच्या नवऱ्याला अटक केली.त्याला अटक झाल्यामुळे बिथरलेल्या त्याच्या दुसऱ्या बायकोने नंदाच्या घरी येऊन तमाशा केला.तिला घाणेरड्या शिव्या दिल्या.सुदैवाने झोपडपट्टीतल्या एका रिकामटेकड्या पोराने आपल्या मोबाईलमध्ये तो तमाशा शुट केला आणि नंदाला दाखवला.नंदाने तो व्हिडीओ वकीलाला पाठवला.प्रकरण पोलिसांकडे आणि मग कोर्टात गेलं.एक वर्षाने त्याचा निकाल लागला.नंदाला नवऱ्याकडून तीन लाख रुपये तर मिळालेच शिवाय दर महिन्याला तीन हजार पोटगी मिळू लागली.

दिड वर्षात घरकुलाच्या एका टप्प्याचं काम पुर्ण होऊन नंदाला त्यात एक घरंही मिळालं.नंदा आणि तिच्या आईच्या आनंदाला पारावार उरला नाही.
त्या आनंदाप्रित्यर्थ एके दिवशी संध्याकाळी नंदा आईसह पेढे घेऊन अनघाच्या घरी आली.योगायोगाने निलेशही घरीच होता.
” साहेब तुमच्यामुळे माह्या आयुष्याचं कल्याण झालं.सपनातबी माह्यं घर हुईन असं मला वाटत नव्हतं” निलेशच्या हातात पेढा देतादेता नंदा गहिवरली.
“हे सगळं तुमच्या लोणच्यामुळे घडलं बरं का नंदाताई. तुमच्या आईने केलेलं लोणचं अगदी तुमच्या अनघाताईच्या आईच्या लोणच्यासारखं झालं म्हणून तुमच्या अनघाताईंना तुमची मदत करावीशी वाटली.आम्ही तर काय बायकोचे गुलाम.ती जसं सांगेल तसं करणार” निलेश हसतहसत म्हणाला.
” चला काहितरीच काय म्हणताय?” अनघा लटक्या रागाने म्हणाली
“खरं सांगू का अनघा.समाजसेवा करायला बाहेरच जायला पाहिजे किंवा एखाद्या संस्थेतच जायला पाहिजे असं काही नाही. आपल्या आजुबाजुला असे अनेक घटक असतात ज्यांना आपल्या मदतीची गरज असते.आपल्या घरात काम करणाऱ्या बायका,दारावर येणारे भिकारी,भाजीवाले, आपल्या अपार्टमेंटचे वाँचमन अशा कायम दुर्लक्षित लोकांच्या अडचणींमध्ये आपण धोडासासुध्दा इंटरेस्ट दाखवला तरी त्यांच्या बऱ्याच समस्या कमी होऊ शकतात.बघ तुमच्या महिला मंडळाला जे जमलं नाही ते काम तू घरबसल्या करुन दाखवलं”
“अहो सगळं तर तुम्हीच केलंत.मी काय केलं?”अनघा हसून म्हणाली
” बरोबर आहे तुझं म्हणणं पण नंदाताईंची कामं मला सांगून नंतर माझ्या मागे लागून तूच तर पुर्ण करवून घेतलीस.प्रत्येक ग्रुहिणीने असं जर मनावर घेतलं तर किती बरं होईल”
” तेही आहेच म्हणा” अनघा म्हणाली मग अचानक नंदाकडे वळून म्हणाली
” नंदा तू आता दुर रहायला जाशील तर माझं झाडू फरशी पुसायचं काम कोण करेल?”
“काही काळजी करु नका ताई.मी एका बाईला सांगून ठेवलंये.ती येईल पुढल्या महिन्यापासून तुमच्याकडे”
अनघाला आनंद झाला.
” पण काहो नंदाताई. नवीन घरी गेल्यावरही हीच कामं तिथं करणार का?”निलेशने विचारलं
” मग काय करता सायेब.दुसरं आपल्याला काय येतं?”
अनघाला एकदम एक कल्पना सुचली.ती नंदाला म्हणाली
” नंदा तुझ्या आईच्या हाताला चव आहे.तिला इतर लोणचीही येत असतील ना?”
“हांव.लिंबाचं येतं,मिरचीचं येतं,भोकराचंबी येतं” म्हातारी मध्येच म्हणाली.ते ऐकून अनघा एकदम खुष होऊन म्हणाली
” पुढच्या महिन्यात आपल्या शहरातील सर्व महिला संघटना महिला महोत्सव आयोजित करताहेत.त्यात महिला उद्योजकांना आपले स्टाँल मांडता येणार आहेत.तू आणि तुझी आई वेगवेगळ्या लोणच्यांचा स्टाँल मांड ”
नंदा गोंधळली
“ताई ते समदं ठिक आहे पण लोणचं तयार करायलबी पैसा लागीन ना?आणि मला तर स्टाँल बिलचं तर काहिच माहित नाही”
” नंदा तुला नवऱ्याकडून तीन लाख मिळालेत ना ते वापर की.आणि तुझ्या लोणच्यांना गिऱ्हाईक मिळून द्यायची जबाबदारी माझी.सगळ्या महिला मंडळाला कामाला लावते.”
“चालेल ताई.फक्त नुकसान नका होऊ द्या माह्यं”
“काही काळजी करु नको.माझी गँरंटी आहे.आणि यदाकदाचित नाहीच काही फायदा झाला तर तो मी भरुन देईन.मग तर ठिक?काय हो मी बरोबर म्हणतेय ना?”नवऱ्याकडे बघून तिने विचारलं.निलेशला हसू आलं पण ते आवरुन तो म्हणाला
“तुझ्या आज्ञेच्या बाहेर आहे का मी?आणि बायको समाजसेवेला लागलीये म्हंटल्यावर मी तरी का मागे रहावं.नंदाताई काही घाबरु नका.आमच्या महानगरपालिकेतला कर्मचारी वर्ग तुमचंच लोणचं घेईल याची मी खात्री देतो.तुम्ही बिनधास्त लोणची बनवायला लागा”
” हो नंदा मावशी मी पण माझ्या मैत्रिणींना तुझं लोणचं घ्यायला सांगेन” सोनल उत्साहाने म्हणाली
नंदाचे डोळे आनंदाने भरुन आले.
” ताई,साहेब तुमचे लई उपकार…”तिला पुढे बोलवेना
अनघाने पुढे होऊन तिला जवळ घेतलं.एका साध्या लोणच्याने एका गरीब बाईच्या आयुष्यात झालेला प्रचंड बदल तिला सुखावून गेला.

© दीपक तांबोळी
9503011250
(ही कथा माझ्या “अशी माणसं अशा गोष्टी “या पुस्तकातील आहे.कोणताही बदल न करता शेअर करण्यास हरकत नाही.माझ्या पुस्तकांबद्दलच्या अधिक माहितीसाठी क्रुपया वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}