2 जून… महाराष्ट्राचा अवलिया श्रीकांत जिचकार आज त्यांच्या स्मृती दिन…
2 जून…
महाराष्ट्राचा अवलिया श्रीकांत जिचकार आज त्यांच्या स्मृती दिन…
भारतामध्ये असा एक महाराष्ट्राचा सुपुत्र होऊन गेला, ज्याच्या नावावर भारतातील सर्वात जास्त शिकलेली व्यक्ती म्हणून लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद आहे.
जो एकच मनुष्य डॉक्टर होता, तो वकिलही होता, तो आयपीएस अधिकारी तसेच आयएएस अधिकारी होता. याशिवाय पत्रकारही होता. इतकेच नाही तो किर्तनकार, आमदार, खासदार आणि मंत्रीही होता. म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व हे विशेषण देखील त्यांच्यापुढे फिके आहे, असे अवलिया व्यक्तीमत्व म्हणजे…
श्रीकांत रामचंद्र जिचकार. २ जून त्यांचा स्मृतीदिन त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा आढावा…
शैक्षणिक क्षेत्रातील ‘महामेरू’ म्हणून संबोधता येईल, असं नाव म्हणजे…
डॉ. श्रीकांत जिचकार.
श्रीकांत जिचकार यांचा जन्म…
१४ सप्टेंबर १९५४ रोजी नागपूर जिल्ह्यातील काटोल जवळील आजानगाव येथे एका सधन शेतकरी कुटुंबात झाला. सुलोचना व रामचंद्र तुकाराम जिचकार हे त्यांचे आईवडील होत.
अवघ्या ४९ वर्षांचं जीवन, ४२ विद्यापीठं, २० पदव्या आणि २८ सुवर्णपदकं असा ज्ञानाचा खजिना या अवलियाने जिंकला.
आयएएस असो वा आयपीएस, एलएलएम असो वा एमबीबीएस, देशातील बहुतेक सर्वच पदव्यां मिळवण्याचा विक्रम श्रीकांत जिचकार यांच्या नावावर जमा आहे.
जिचकारांनी मिळवलेल्या २० पदव्यांमध्ये एमबीबीएस आणि एमडी, एलएलबी, एलएलएम, डीबीएम आणि एमबीए, जर्नालिझम एम. बी.ए., बी.जे., एम. ए. इंग्रजी, हिंदी, लोक प्रशासन, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, पुरातत्वशास्त्र, संस्कृत, प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुराण वस्तुशास्त्र, डी. लिट्. संस्कृत या पदव्यांनी तर नवा ज्ञानोपासनेचा व पदवी संपादनाचा इतिहास घडवला होता. हा इतिहास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला होता. आपणही ‘दुसरा श्रीकांत जिचकार’ व्हावे, असे शैक्षणिक स्वप्न अनेक तरुण पाहत होते.
भारतीय संस्कृती, हिंदू संस्कार, फलज्योतिष ह्या विषयांचे गाढे अभ्यासक असाही डॉ. जिचकारांचा लौकिक होता. ह्या लौकिकाचा प्रारंभही त्यांच्या विद्यार्थी दशेतूनच झालेला होता. प्रारंभीच्या काळात त्यांचा एकनाथजी रानडे यांच्या माध्यमातून विवेकानंद केंद्राशी संपर्क झाला. तद्नंतर ते स्वामी चिन्मयानंदांच्या कार्याशी जोडले गेले. चिन्मय युवा केंद्राचा अध्यक्ष या नात्याने डॉ. जिचकारांनी भारतभर प्रवास करून ही केंद्रे गावोगावी स्थापन करण्यासाठी अथक प्रयत्न केले. नंतर ते स्वामी दयानंदाच्या कार्याशी जोडले गेले. डॉ. जिचकारांच्या कार्याला विशिष्ट क्षेत्राचे कुंपण नव्हतेच. दुर्गम भागातल्या आदिवासींना सेवा सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून राष्ट्रीय समन्वयकाची भूमिका डॉ. जिचकारांनी तेवढ्याच जबाबदारीने पार पाडली. यांच्या या कार्यामुळे कांची पीठाचे शंकराचार्यही स्तिमित झाले होते. या शंकराचार्यांनी पीठारोहण सुवर्ण महोत्सवानिमित्त डॉ. जिचकरांचा विशेष गौरव केला होता. श्री श्री रविशंकर यांच्या ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ ह्या उपक्रमात तर डॉ. जिचकारांनी स्वत:ला झोकून दिले होते.
१९९२ मध्ये डॉ. जिचकारांची नियुक्ती महाराष्ट्रातल्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेकच्या कुलगुरू निवड समितीवर सदस्य म्हणून झाली. १९९३ मध्ये ते या विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू झाले. कारण त्यावेळी या पदासाठी डॉ. श्रीकांत जिचकार हा एकमेव पर्याय समितीला मान्य ठरला होता. वेदान्त हा तर डॉ. जिचकारांच्या जिव्हाळ्याचा आणि अभ्यासाचा विषय होता. वेदान्ताच्या अभ्यासकांसाठी डॉ. जिचकारांनी नागपूरजवळ ४०० एकरांच्या परिसरात ‘आर्ष विज्ञान गुरुकुलम्’ ची उभारणी सुद्धा सुरू केली होती. वेदांच्या सर्व शाखांचे जतन व्हावे, वेद सर्वसामान्यापर्यंत पोहोचावेत ही डॉ. जिचकारांची तळमळ होती.
तब्बल दहा विषयांमध्ये मिळविली मास्टर्सची पदवी…
एम.ए.(लोक प्रशासन);
एम.ए. (अर्थ शास्त्र);
एम.ए. (समाजशास्त्र);
एम.ए. (संस्कृत);
एम.ए. (इतिहास);
एम.ए. (इंग्लिश साहित्य);
एम.ए. (दर्शन साहित्य);
एम.ए. (राजनीती शास्त्र);
एम.ए. (मनोविज्ञान).
एम.ए. (प्राचीन भारतीय इतिहास,संस्कृती आणि पुरातत्व)
पदव्यांवर कोरलं नाव जिचकारांनी संस्कृतमध्ये मानाची डी.लिट ही पदवी मिळवली. जिचकारांनी मिळवलेल्या बहुतेक पदव्या या प्रथम श्रेणीतून मिळवल्या आहेत. श्रीकांत जिचकार यांची भारतातील सर्वात शिक्षित व्यक्तींच्या पक्तिंत गणती होते. या ज्ञानयोगी चैतन्याच्या झऱ्याने, ज्ञानदेवता सरस्वतीलाही अक्षरश: मोहून टाकलं. त्यामुळेच आपल्या अपार बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी एकही वर्ष वाया जाऊ न देता, बहुतेक सर्व पदव्यांवर नाव कोरलं.
दोनच वर्षांत आयएएस जिचकर यांनी १९७८ साली यूपीएससीची परीक्षा दिली. यामध्ये त्यांनी अपेक्षित यश मिळवून आयपीएस झाले. पुढे दोनच वर्षात म्हणजे १०८० साली त्यांनी आयएएसची पदवी खिशात टाकली.
तब्बल ५२ हजार पुस्तकांचा संग्रह
जिचकार यांच्या वैयक्तिक ग्रंथालयामध्ये ५२,००० पुस्तकांचा संग्रह आहे. विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी आयएएसचा राजीनामा दिला.
विधानसभेचे सर्वात तरूण सभासद या बुद्धिवंताने वयाच्या २५ व्या वर्षी पहिली सार्वत्रिक निवडणूक लढवली आणि जिंकून दाखवली. जिचकार महाराष्ट्र विधानसभेमध्ये १९८० साली वयाच्या २५ व्या वर्षी निवडून गेले. महाराष्ट्र विधानसभेत निवडून गेलेले ते सर्वांत तरुण सभासद होते.
एक दोन नव्हे तर तब्बल १४ खात्यांचा कारभार जिचकारांनी १२ वर्षे विधानसभे मध्ये काम केले. एकेकाळी त्यांच्याकडे १४ खात्यांचा कारभार होता. यानंतर त्यांनी राज्यसभेवरही धडक मारली. १९९२ साली त्यांची राज्यसभेवर निवड झाली. जिचकार १९९८ सालापर्यंत राज्यसभेचे सदस्य होते.
युनो आणि युनेस्कोसाठीही काम केले…
श्रीकांत जिचकार यांनी या काळामध्ये त्यांनी विविध समित्यांमध्ये काम केले. त्यांनी युनो आणि युनेस्को संघटनांसाठी ही काम केले.
अष्टपैलू व्यक्तीमत्व…
अष्टपैलू प्रतिभेचे धनी असलेले डॉ. जिचकर एक पेंटर, प्रोफेशनल फोटोग्राफर, स्टेज एक्टर आणि शिक्षणतज्ज्ञ पण होते. जिचकार एवढे ज्ञानी आणि प्रतिभावान व्यक्ती असून सुद्धा त्यांनी भारतालाच आपली कर्मभूमी बनवली आणि देशवासीयांची सेवा करण्याचा निर्णय घेतला होता.
श्रीकांत जिचकार यांना मलेरिया झाला होता. त्यानंतर ताप वाढल्यामुळे त्यांनी टुबरक्युलॉसीस देखील झाला. भारतात उपचार घेऊन देखील त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत नव्हती. त्यानंतर त्यांना यूएसमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर कँसर असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, तो देखील शेवटच्या स्टेजवर होता. त्यावेळी डॉक्टरांनी फक्त १५ दिवसांची मुदत दिली होती. त्याचवेळी श्रीकांत यांनी कँसरसोबत लढायचे असे ठरविले. त्यांची इच्छाशक्ती आणि वैज्ञानिक दृष्टीकोण यामुळे ते कँसरवर मात करून पूर्णपणे बरे झाले. मात्र, नियतीला काही वेगळेच मंजूर होते. श्रीकांत हे २ जून २००४ ला मित्रासोबत शेतातून घरी परतत असताना त्यांच्या कारला परिवहन महामंडळाच्या बसने धडक बसून झालेल्या भीषण अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शैक्षणिक क्षेत्रातील महामेरु, संपूर्ण महाराष्ट्राचा…
ज्ञानयोगी, कर्मयोगी, अवलीया डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या पवित्र स्मृतिस विनम्र अभिवादन त्यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम…🙏🌹