Classified

डॉक्टरांच्या कथा आणि व्यथा – जितंजागतं पाठ्यपुस्तक – डॉ. अरविंद वि. बावडेकर

डॉक्टरांच्या कथा आणि व्यथा
———————————
जितंजागतं पाठ्यपुस्तक
– डॉ. अरविंद वि. बावडेकर
———————————

आजारी माणसांची सेवा करायला मला खूप आवडतं. मला तो अगदी नादच लागला आहे, असंच म्हणा ना आणि ते कामही मी अगदी मिशनरी वृत्तीनं करीत असतो. माझे पेशंट कोण आहेत, याचा विचार न करता मी त्यांचं मनोधैर्य कसं उंचावता येईल, त्यांच्यात मनानं गुंतून गेलेलो असतानाही त्यांच्या आजाराचं अचूक निदान कसं करता येईल, याचा विचार करीत राहतो. आणि हे सर्व करीत असताना मला हे निश्चित ठाऊक असतं की, मी काही सर्वशक्तिमान परमेश्वर नाही. मी केवळ ‘सेवा-शुश्रूषा’ करतो, पेशंटला ‘बरा’ करणारी शक्ती कोणती तरी वेगळी आहे, हे मी पूर्णपणे जाणून आहे. माझ्या या व्यवसायात मला यश आणि अपयश अशा दोन्ही गोष्टींना सामोरं जावं लागलं. यशानं मी आनंदून जातो यात शंकाच नाही, पण अपयश आलं, गुंतागुंत झाली तरी त्यामुळे मी गोंधळून जात नाही माझा प्रत्येक रुग्ण हा माझ्यासाठी एक जितंजागतं पाठ्यपुस्तक बनूनच माझ्यापुढे येत असतो, अशी माझी श्रद्धा आहे आणि त्या भावनेनंच मी माझी रोजची कामं करीत असतो.
बाबुभाई या मध्यमवयीन गुजराती गृहस्थाला त्याच्या फॅमिली डॉक्टरांनी माझ्याकडे पाठवलं, ती तारीख होती १० एप्रिल १९६०. त्याला छातीच्या हाडाचा क्षयरोग झाला होता आणि ते संसर्ग झालेलं हाड कापून काढणं भाग होतं. मी स्वतःचा दवाखाना सुरू केल्यानंतर आलेला तो पहिला पेशंट होता. त्यामुळे मला खूप उत्साह तर आलेलाच होता आणि त्या पेशंटची मी तेवढीच काळजीही घेत होतो.

अखेरीस त्या पेशंटवर शस्त्रक्रिया करायचा निर्णय मी घेतला. ज्या डॉक्टरच्या नर्सिंग होममध्ये मी ही शस्त्रक्रिया करणार होतो, तो डॉक्टरही एक चांगला शस्त्रक्रिया तज्ञच होता. त्यानं मला छातीच्या शस्त्रक्रियेतले धोके, नाना प्रकारच्या सूचना देत समजावून सांगायला सुरुवात केली. तिथं उपस्थित असलेला बधिरीकरण तज्ज्ञ आणि मी, दोघांनाही अगदी गोंधळून जायला झालं. अखेर माझ्या अंतःकरणातली प्रेरणा जागृत झाली आणि मीच मला स्वतःला बजावलं तुला जर उत्तम शस्त्रक्रिया करायच्या असतील, तर असं वागून चालणार नाही. तुला अत्यंत धैर्यानं वागावं लागेल आणि मन खंबीर ठेवावं लागेल. कितीही कठीण प्रसंग आला, तरी तुलाच त्यातून मार्ग काढावा लागेल !

त्यानंतर माझ्या मनावरचा भार एकदम उतरला आणि मी निश्चिंत झालो. शस्त्रक्रिया सुरू झाली आणि पुढं सारं काही ठरल्याप्रमाणं होत राहिलं. त्यानंतर मी अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया केल्या. त्या प्रत्येक वेळी मी स्वतः अशाच प्रकारे अंतर्मुख होऊन माझ्या हातातल्या कामावर सारं लक्ष केंद्रित करत गेलो. मी नियमितपणे ईश्वराची आराधना करतो आणि माझी अशी गाढ श्रद्धा आहे की, या प्रार्थनेमुळेच मी अनेक कठीण प्रसंगांतून बाहेर पडलो आहे.

@@@@@

आनंदवनातल्या एका वार्षिक मित्रमेळाव्याच्या वेळी बाबा आमट्यांची आणि माझी पहिली भेट झाली. त्या वेळेस त्यांची प्रकृती फारशी बरी नव्हती. नुकतेच ते पाय घसरून पडले होते आणि चाकाच्या खुर्चीवरूनच त्यांना फिरावं लागत होतं. मी त्यांना तपासलं तेव्हा माझ्या ताबडतोब लक्षात आलं की, त्यांना पाठीच्या कण्याचा विकार झाला आहे आणि त्यावर शस्त्रक्रिया हाच एकमेव उपाय आहे.

शस्त्रक्रियेसाठी बाबांना मुंबईला यावं लागणार होतं. ठरल्याप्रमाणे ते आले आणि माझ्या नर्सिंग होममध्ये दाखलही झाले. बाबांचं व्यक्तिमत्त्व तर फारच मोठं होतं आणि मी तेव्हा अगदी सुरवातीच्या काळातला धडपडणारा डॉक्टर होतो. माझं नर्सिंग होमही तेव्हा अगदी प्राथमिक अवस्थेत होतं. पण मी बाबांवर शस्त्रक्रिया करणार आहे, ही बातमी जशी पसरली तेव्हा अनेक हितचिंतकांनी त्यांना सांगायला सुरवात केली की आणखी एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरचा सल्ला घ्या आणि आधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा नर्सिंग होममध्ये दाखल व्हा. पण बाबांनी मात्र मला त्यांच्याजवळ बोलावून सांगितलं : डॉक्टर, मी जेव्हा एखाद्या व्यक्तीवर विश्वास टाकतो, तेव्हा त्यात कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही. तुम्हाला जर माझ्यावर शस्त्रक्रिया करायची नसेल, तर तुम्ही मला तसं सांगून टाका. पण मी काही दुसऱ्या डॉक्टरकडे जाणार नाही, मी थेट आनंदवनात परत निघून जाईन.

अखेर शस्त्रक्रिया पार पडली आणि यशस्वीही झाली. बाबांनी एकदा एखाद्यावर विश्वास टाकला की, तो अखेरचा असतो. या दृढ श्रद्धेमुळेच बाबा आज ज्या काही स्थानावर आहेत, तिथपर्यंत जाऊन पोचले आहेत. नंतर बाबांशी माझी खूपच जवळीक निर्माण झाली. त्यांचं कुटुंब आणि आनंदवन यांचा मी एक अविभाज्य घटकच बनून गेलो आहे. काही वर्षांनी बेळगावचे सुप्रसिद्ध उद्योगपती बा. म. तथा रावसाहेब गोगटे यांच्यावर शस्त्रक्रिया करायची होती. तेव्हाही त्यांनी माझ्यावर असाच विश्वास दाखविला होता.

@@@@@

योगाविषयीचं माझं प्रेम हे सर्वश्रुतच आहे. योगाभ्यासाच्या विविध संस्थांशीही माझा निकटचा संबंध आहे. एके दिवशी मला लोणावळ्याच्या ‘कैवल्यधाम’ या संस्थेतून फोन आला. त्या संस्थेचे प्रमुख संचालक, स्वामी दिगंबरजी यांची प्रकृती तपासण्यासाठी मला पाचारण करण्यात आलं होतं.

योगाभ्यासाचे विविध प्रयोग करताना झालेल्या एका अपघातामुळे स्वामीजीच्या पाठीवर क्ष-किरणांचा जादा मारा केला गेला होता आणि त्यामुळे त्यांच्या पाठीवर ‘अल्सर ‘सारखी व्याधी अधूनमधून डोकं वर काढीत असे. माझ्यापुढे हे एक आव्हानच होतं.

मी स्वामीजींना भेटलो तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वानं मला भारूनच टाकलं. या अधिभौतिक नश्वर जगातील कोणत्याही गोष्टीविषयी त्यांना आकर्षण नव्हतं. ते सहसा दुसऱ्या माणसाच्या जीवनात हस्तक्षेप करीत नसत. पण कोणी विचारलं, तर मात्र अत्यंत शहाणपणाचा सल्ला देत. आपल्या व्याधीविषयी ते चुकूनही कधी शब्द उच्चारीत नसत. पण त्यांच्या अल्सरचं खरं म्हणजे माझ्याच मनावर खूप दडपण आलं होतं. ‘बायोप्सी’ करायला हवी, असं मी त्यांना सुचवलं, तेव्हा त्यांचा प्रश्न होता, नंतर काय? हा ‘अल्सर’ कर्करोगाच्या दिशेनं वाट चालू शकतो, असं मी त्यांना सांगितलं. ते माझं बोलणं नुसतं ऐकून घेत होते. त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

पण एके दिवशी त्यांचा जीवनातला सारा रसच निघून गेला. ते आमच्याशी नीट वागत असत, पण त्यांनी जेवणखाण औषधं सारं बंद करून ‘प्रायोपवेशन’ सुरू केलं. हळूहळू त्यांची प्रकृती खालावली आणि दहा दिवसांत अत्यंत शांतपणाने त्यांना मृत्यू आला. एका साध्या पंचावर ते शांतपणे पहुडले होते. त्यांचे डोळे उघडे होते आणि गीता व वेद यांचं पठण सभोवतालचा शिष्यगण करीत होता. हे एक अत्यंत धीरोदात्त असं मरण होतं.

स्वामीजींशी निर्माण झालेल्या नात्यामुळे मला खूपच शिकायला मिळालं. ते माझे आध्यात्मिक गुरू होते. तर मी त्यांच्या शारीरिक व्याधीवर एक डॉक्टर म्हणून उपचार करीत होतो.

@@@@@

असाच आणखी एक प्रसंग.

ती रविवारची संध्याकाळ होती. महिना मे आणि साल १९६६. मी माझ्या कुटुंबीयांबरोबर बाहेर कुठेतरी फिरायला जाण्याच्या मनःस्थितीत होतो. तेवढ्यात शिरीषताई अत्रे यांचा फोन आला. ‘पप्पा पाय घसरून पडले आहेत आणि त्यांना उठताही येत नाहीए…’

पप्पा म्हणजे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. मी ताबडतोब त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली. त्यांच्या मांडीचं हाड फॅक्चर झालं होतं. त्यांना तातडीनं माझ्या दवाखान्यात एक्स रे आणि अन्य तपासण्यांसाठी दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणं आवश्यक झालं होतं.

पण लोक ओळखीचे आणि अनोळखीही – सतत त्यांच्या प्रकृतीची चौकशी करत होते. माझा फोन सारखा घणघणत होता. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. लोकांचं म्हणणं एवढंच होतं, की आणखी एखाद्या डॉक्टरचा सल्ला का घेत नाही? त्यांना बॉम्बे इस्पितळासारख्या एखाद्या सुसज्ज रुग्णालयात का हलवत नाही ? माझे शिक्षक असलेल्या अत्यंत ज्येष्ठ ऑर्थोपेडिक सर्जनचं तर म्हणणं होतं की, आचार्य अत्र्यांना त्यांच्याच शुश्रूषागृहात हलवायला हवं. अत्र्यांशी अगदी घनिष्ठ मैत्री असलेल्या एका ज्येष्ठ डॉक्टरनं अनाहूत सल्ला दिला की, ही जबाबदारी मी (डॉ. बावडेकर) कशासाठी घेतोय? कारण अत्र्यांच्या प्रकृतीत काही घोटाळे झाले, तर त्याचा संपूर्ण परिणाम माझ्या कारकिर्दीवर होईल ! – तर अत्र्यांशी काही नातं असलेले माझे एक शिक्षक डॉ. एम. व्ही. संत याचं म्हणणं होतं की, मी अत्र्यांवर शस्त्रक्रिया करू नये! उलट पारंपारिक पद्धतीनेच त्यांच्यावर उपचार चालू ठेवावेत.

मी अत्र्यांवर उपचार सुरूच ठेवले. पण शस्त्रक्रिया करायची की नाही, याबाबतचा निर्णय मात्र स्वतः अत्रे आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यावर सोपविला. अत्रे यांनी अगदी ताबडतोब आणि त्यांच्या नेहमीच्या ठामपणानं सांगून टाकलं की, मी दुसऱ्या कोणत्याही डॉक्टरकडे जाणार नाही! डॉक्टर बावडेकर माझं जे काय करतील, ते मला चालेल. अत्र्यांच्या निधनानंच खंडित झालेल्या आमच्या घनिष्ठ मैत्रीचा हा प्रारंभ होता. दरम्यान, त्यांच्यावरील शस्त्रक्रियाही यशस्वीरित्या पार पडली आणि त्यांनी आपलं दैनंदिन जीवन पुन्हा त्याच जोमानं सुरू केलं. अत्रे कुटुंबीयांशी माझं इतकचं जवळचं नातं जोडलं गेलं की, शिरीषताईनी तर मला भाऊच मानलं आहे.

एस. एम. तथा अण्णा जोशी यांची आणि माझी भेटगाठ दोन-चार वेळा सभा-समारंभांतून झालेली होती. समाजवादी चळवळीतील नेते म्हणून त्यांचं स्थान फार मोठं होतं, तरी पण त्याचं वागणं-बोलणं-राहणं अगदी साधं होतं. त्यांचं वयही ऐंशीच्या घरात होतं. दोन आठवड्यांपासून पाठीच्या दुखण्यामुळे त्रस्त होऊन पुण्याहून ते थेट माझ्याकडे आले होते. क्ष-किरण तपासणी झाली तेव्हा त्यांच्या माकडहाडाच्या वरच्या भागात काही व्याधी निष्पन्न झाल्याचं आढळून आलं. आता बायोप्सी करणंच भाग होतं. तीही करण्यात आली. अण्णांना ‘बोन कॅन्सर’ झाला होता. त्यांना टाटा इस्पितळात हलविण्यात आलं.

आमची मैत्री मात्र वाढतच गेली. ते केव्हाही माझ्याकडे यायचे आणि उपचारांबाबत चर्चा करायचे. खरं म्हणजे त्यांना कर्करोग असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर, एक डॉक्टर म्हणून त्यांनी माझ्याशी विचारविनिमय करण्याचं काहीच कारण नव्हतं. तरीही अण्णा माझ्याशी चर्चा करायचे. या काळात त्यांना फारच जवळून बघण्याची संधी मला मिळाली.

त्यांनी कधीही आपल्या आजारपणाचा जरुरीपेक्षा जास्त बाऊ केला नाही आणि नेहमीच्या मिश्किल स्वभावात बदलही होऊ दिला नाही. ते एक आदर्श पेशंट होते. डॉक्टरांच्या सर्व सूचना ते तंतोतंतपणे आणि कसोशीने पाळण्याचा प्रयत्न करीत. आपल्या आजाराकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोनही अगदी शास्त्रीय स्वरूपाचा असायचा. कर्करोग शरीरात प्रवेश कसा करतो, तो पसरत कसा काय जातो, औषधे, रेडिएशन आणि केमोथेरपी यांचा त्यावर नेमका काय परिणाम होतो… असे अनेक प्रश्न ते विचारीत राहायचे. आपल्या नित्यक्रमामध्येही त्यांनी बराच बदल केला होता. संगीत-चित्रपट यांना ते बराच वेळ द्यायचे. त्यावर ते चर्चाही करायचे. त्याच वेळी राजकीय आणि सामाजिक चळवळींमधलं त्यांचं लक्ष कमी झालेलं नव्हतं. सभा-समारंभांनाही ते जायचे. लहान मुलांशी खेळायलाही त्यांना खूप आवडायचं…

हे सगळं सुरू असतानाच केमोथेरपीमुळे त्यांना खूपच त्रास होऊ लागला आणि त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांना अतीव-दक्षता विभागात हलविण्यात आलं. एक महिनाभर त्यांना तिथंच रहावं लागलं. ते आता या
व्याधीतून बाहेर येतील, असं मला मुळीच वाटत नव्हतं. पण माझं निदान चुकीचं ठरलं. एक डॉक्टर म्हणून कोणाच्याही आयुष्यमानाविषयी आपण कोणतेच आडाखे बांधू नयेत, हा धडा मी शिकलो होतो. कारण एसेम अण्णा त्यानंतर वर्षभर आपल्यात होते आणि अखेर त्यांना मृत्यू आला, तोही अगदी शांतपणे.

@@@@@

भालजी पेंढारकरांची आणि माझी जवळीक निर्माण झाली, ती माझ्या पत्नीमुळे. तिच्या माहेरचा पेंढारकर कुटुंबीयांशी निकटचा संबंध होता. सुमारे १५ वर्षांपूर्वी ‘ग्लॉकोमा ‘च्या त्रासामुळे त्यांना एकदम कमी दिसायला लागलं आणि कोल्हापूरहून पेंढारकर माझ्याकडे आले. मी त्यांना घेऊन एका मोठ्या, डोळ्यांच्या डॉक्टरकडे गेलो. त्यानं तपासताक्षणीच निदान केलं जगातली कोणतीही शक्ती भालजींना परत दृष्टी आणून देऊ शकणार नाही. तेव्हा त्यांनी आता कोल्हापूरला परतावं, हेच बरं. नंतर मी नेत्रविकारांचे आणखी एक तज्ज्ञ डॉ. उर्सेकर यांच्याकडे भालजींना नेलं. डॉ. उर्सेकर हे माझे अगदी चांगले मित्र होते. त्यांनाही यशाची पूर्ण खात्री नव्हतीच, तरी पण शक्य ते सर्व प्रयत्न करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.

बाबांनी – भालजीनी- निर्णय घेण्याचं काम माझ्यावरच सोपवलं होतं.

शस्त्रक्रिया पार पडली आणि बाबांना संपूर्ण नव्हे, पण निदान कामापुरतं तरी दिसू लागलं. तेव्हापासून त्यांचे आणि माझे संबंध अधिकच घनिष्ठ झाले अलीकडेच त्यांना आतड्यांचा काही विकार झाला. तेव्हाही त्यांनी सारी जबाबदारी माझ्यावरच टाकली आणि मीही तातडीने माझ्या एका सर्जन मित्राला पाचारण केलं. माझ्याच शुश्रूषागृहात त्यांच्यावर त्यानं शस्त्रक्रिया केली. आता तर मी त्यांच्या घरातलाच एक झालो आहे. सर्वच महत्त्वाच्या घटनांच्या वेळी भालजी माझ्याशी विचारविनिमय करतात. माझं त्यांच्याशी नातंही अगदी पिता-पुत्राचं झालं
आहे.

@@@@@

डॉ. मुकेश हा राजस्थानातील २४ वर्षांचा डॉक्टर. गणेश हा अवघा १६ वर्षांचा एक शाळकरी मुलगा. श्री. वखारिया हे ७८ वर्षांचे वृद्ध अशा किती तरी रुग्णांच्या किती तरी आठवणी आज माझ्या मनात उचंबळून येत आहेत. केवळ त्यांचा आजार बरा व्हावा, म्हणूनच नव्हे, तर त्यांचं मानसिक पातळीवर पुनर्वसन व्हावं, त्यांच्या आयुष्याची घडी नीट बसावी, म्हणूनही मी प्रयत्न केले. यशानं मला काही वेळा पाठही दाखवली. तर अनेकदा माझ्या हातांना यशही दिलं… पण त्या यशाचेही अनेक वाटेकरी होते, याची मला पूर्ण जाणीव आहे.

भाऊ हे माझे दूरचे काका. वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांना कावीळ झाली आणि तपासण्यांसाठी त्यांना पुण्याच्या ससून इस्पितळात दाखल करण्यात आलं. स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळंच ही कावीळ झाल्याचं निष्पन्न झालं आणि एकूण परिस्थिती बघता शस्त्रक्रिया न करणंच योग्य असा निष्कर्षही काढण्यात आला. भाऊंना इस्पितळातून परत घरीही हलवलं गेलं. मी त्यांच्या तपासण्यांचे सारे अहवाल मुंबईतल्या काही तज्ज्ञांनाही दाखवले. तेव्हा उलट पुण्यातल्याच डॉक्टरांच्या निदानावर शिक्कामोर्तब झालं.

दरम्यान, कोणी तरी पुण्याजवळच्या पुरंदर किल्ल्याखाली रहात असलेल्या सोनबा धनगराचं नाव पुढं आणलं. जडीबुटीची औषधं देण्यात तो पारंगत होता असं सांगितलं जायचं. ब्रिटिश राजवटीत एका ब्रिटिश डॉक्टरकडे तो कामाला होता. तळहातावरच्या रेषा बघून भविष्य सांगण्याऐवजी जडीबुटीचे उपाय सांगण्याची कला सोनबानं त्या ब्रिटिश डॉक्टरकडूनच आत्मसात केली असावी. भाऊंच्या जवळच्या नातेवाइकांनी त्यांना सोनबाकडे नेण्याची इच्छा प्रदर्शित केली. माझ्या मनात काही फारसं अनुकूल मत नव्हतं. पण भाऊंवर सोनबानं उपचार सुरू केले आणि त्यांची प्रकृती झपाट्यानं सुधारत गेली. त्यांची टोकाला पोचलेली कावीळ पूर्णपणे बरी झाली. त्यानंतर आपली ठणठणीत प्रकृती घेऊन भाऊंनी नऊ वर्ष आमच्यात काढली.

मी सोनबाला कधीच भेटलेलो नाही. पण पुणे आणि पुणे परिसरात त्याचं फारच नाव आहे. भाऊंना सोनबानं बरं केल्यानं माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. पण मला कधीही त्यांची समाधानकारक उत्तरं मिळू शकली नाहीत. भाऊंना कर्करोग झाला आहे, हे निदान चुकीचं होतं का? सोनबानं त्यांना काही गूढ मार्गाचा वापर करून बरं केलं का? भाऊंच्या सोनबावरील अतूट श्रद्धेमुळे ते बरे झाले का? – मला एवढंच ठाऊक आहे की, आजारातून बरं होणं ही एक शास्त्रीय प्रक्रिया आहे. मग भले आपल्याला त्याची कारणमीमांसा करता न येवो !

@@@@@

माझे बहुतेक पेशंट माझ्यावर अगदी मनापासून प्रेम करतात. माझं निदान काहीही असो-अगदी शस्त्रक्रियेचंदेखील ते वाद न घालता मान्य करतात. जीवनाच्या सर्व स्तरांतून माझ्याकडे पेशंट येतात. नामवंत बुद्धिमंतांपासून, विविध क्षेत्रांतील मान्यवरांपासून, खेड्यापाड्यातल्या अडाणी निरक्षर पेशंटची रांग माझ्याकडे लागलेली असते. मी काही फार मोठा नामवंत डॉक्टर आहे, असं नाही. पण निदान मी ज्या जबाबदारीनं काम करतो, ते पेशंटना मान्य असतं. अनेक साधेभोळे पेशंट माझ्याकडे येतात आणि शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यावर आपल्या भावना या ना त्या प्रकारानं व्यक्त करतात. एका रॉड्रिग्ज नावाच्या पेशंटचा पाय माझ्या शस्त्रक्रियेमुळे, वाचला, तर त्याने आपल्या मुलाला माझं नाव दिलं आहे. मोटर अपघातात जबर जखमी झालेले राम कर्णिक तर, मीच त्यांना पुनर्जन्म दिला असं समजून माझं आडनाव, त्यांच्या आडनावानंतर लावतात. या अशा घटनांकडे कृतज्ञतेचं प्रतीक म्हणूनच मी बघतो. पण त्याच वेळी काही काही पेशंटवर उपचार करताना मला अपयशही आलेलं आहे, हेच माझ्या डोळ्यांपुढं येत राहतं.

समाप्त

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}