मंथन (विचार)

Lekh Nandakumar Sapre

________
||◆|| नंदकुमार सप्रे ||◆||
================

मध्यंतरी एका अंत्यविधी साठी
अमरधाम मध्ये गेलो होतो. जवळचे नातेवाईक आणि
मृताच्या घरचे लोक चितेच्या ओट्याजवळ तयारी करत होते. इतर जे परिचित हजेरी लावण्या साठो आले होते, ते नेहमी प्रमाणे समोरच्या पायऱ्यांवर
एकमेकांची ख्याली खुशाली विचारत हास्य विनोदात
दंग होते. सर्व विधी पूर्ण झाल्यावर एक गृहस्थ तिथे
आले. त्यांच्या हातात एक पिशवी होती. त्या पिशवीत
दोन तीन पाण्याच्या बाटल्या आणि एक थर्मास होता.
मृताच्या घरच्या लोकांना त्याने पाणी पिण्यास दिलं
आणि नंतर पेपर कपमध्ये चहा प्यायला दिला.
कोणी नातेवाईक असावेत असं मला वाटलं.
या घटने नंतर बऱ्याच दिवसांनी मी नोबल हॉस्पिटलमध्ये कोणालातरी भेटायला गेलो होतो.
ऑपरेशन थिएटरच्या बाहेर बरेच लोक बसले होते.
बहुधा त्यांच्या कोणा नातेवाईकांचं आत ऑपरेशन चालू असावं. आणि अचानक बघितलं तर त्या दिवशी
अमरधाम मध्ये दिसलेले ते गृहस्थ इथं देखील त्या
बसलेल्या लोकांना चहा देत होते. आता माझी उत्सुकता वाढली.
थोड्या वेळाने सर्वांना चहा देऊन ते थोडे
बाजूला आले, मी ताबडतोब त्यांच्या जवळ गेलो.
” नमस्कार!” मी म्हंटल. त्यांना हे अपेक्षित नसावं
ते कावरे बावरे होऊन माझ्याकडं बघू लागले. मी
पुन्हा नमस्कार केला, या वेळी त्यांनी फक्त मान
हलवली. ” आपलं नाव काय?” मी विचारलं. त्यांचा
पुन्हा प्रश्नार्थक चेहरा. यावेळी कपाळावर आठया देखील. “तुमचं नाव सांगा.” त्यांनी तुटकपणे
मलाच उलटा प्रश्न केला. आता मी त्यांच्या जवळ
गेलो, त्यांचे दोन्ही हात हातात घेतले आणि म्हणालो
” अहो महाराज, माझं नाव प्रशांत कदम. मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं म्हणून नाव विचारलं.
आपण दोन मिनिटं बोलू शकता का?”
“नाही.” समोरून फटकन उत्तर आलं. आता मला
धक्के पचवायची सवय झाली होती.
“नाही म्हणजे आत्ता नाही कारण आत्ता मला आणखी
बऱ्याच ठिकाणी जायचंय. आपण नंतर कधीतरी
भेटू. आणि माझं नाव नंदू… म्हणजे नंदकुमार सप्रे.”
एवढं बोलून ते तरा तरा चालायला लागले. मी
त्यांच्या पाठमोऱ्या छबी कडे बघतच राहिलो.
साधारण साडेपाच फूट उंची, मध्यम किंवा त्यापेक्षा
बारीक शरीरयष्टी, अंगात पांढरा शर्ट आणि पायजमा,
पायात चपला. अहो हा माणूस बोलायला तयार नाही.
पण एक गोष्ट लक्षात आली. याला कुठंतरी काहीतरी
दुःख आहे, वेदना आहेत. आणि त्या दिवसापासून
माझा त्याच्यातील इंटरेस्ट वाढू लागला. आता याला
पुन्हा एकदा भेटलं पाहिजे.

आणि तो दिवस लौकरच आला. मी
कुठंतरी चाललो होतो आणि हे महाराज रस्त्याच्या
कडेला सायकल हातात धरून उभे होते. बहुधा
कोणाची तरी वाट पहात असावेत. मी ड्रायव्हरला
गाडी बाजूला घ्यायला संगितली आणि पटकन
खाली उतरून सप्रेच्या समोर जाऊन उभा राह्यलो.
“सप्रे कोणाची वाट बघताय?” मी.
“नाही वाट नाही बघत, सायकल पंक्चर झालीय.”
“अरेच्चा, थांबा आपण पंक्चर काढायची व्यवस्था
करू.” मी ड्रायव्हरला बोलावून सायकल पंक्चर
काढायला पाठवलं.
“अहो तुम्ही कशाला त्रास घेता, मी आणली असती
करून.” सप्रे कसनुसा चेहरा करून म्हणाले.
“असू द्या हो सप्रे, चला आपण तो पर्यंत गाडीत बसून
बोलू.” सप्रे अक्षरशः बळजबरीने गाडीत येऊन बसले.
अतिशय अस्वस्थ झाले होते. मी बोलायला सुरुवात
केली, “सप्रे ही चहाची काय भानगड आहे? जरा सांगता का? सप्रे गप्प. मला कळेना हा माणूस
असा का वागतोय, धड बोलत देखील नाही.
आणि माझं लक्ष्य त्यांच्या चेहऱ्याकडे गेलं, अहो
हा माणूस रडत होता. त्याच्या दोन्ही डोळ्यातून
अश्रूच्या धारा वहात होत्या. मला एकदम अपराधी
असल्या सारखं वाटलं. मी दोन्ही हातांनी सप्रेना धरलं
“सप्रे मला माफ करा. तुम्हाला दुखवायचा माझा हेतू
नव्हता. जाऊ द्या, मला काही सांगू नका पण
कृपा करून तुम्ही शांत व्हा. पुन्हा मी तुम्हाला
असले प्रश्न विचारणार नाही. I am sorry.”
दोन तीन मिनिटांनी सप्रे शांत झाले आणि त्यांनी
बोलायला सुरुवात केली. “प्रशांतजी, आज पर्यंत
या विषयावर मी कोणाशी बोललो नाही पण आज
मी तुम्हाला सगळं सांगणार, याचं कारण अस आहे की, फक्त तुम्ही एकट्यानेच हा प्रश्न मला विचारला.
मी आणि माझी पत्नी दोघेही सरकारी अधिकारी.
मुलगा आणि सून दोघेही अमेरिकेत. तीन वर्षांपूर्वी
पत्नीचे कोविड मध्ये निधन झाले. आम्ही दोघेही
बाधित होतो. मला हॉस्पिटल मिळालं, तिला खाजगी
हॉस्पिटल मिळालं नाही म्हणून सरकारी दवाखान्यात
ऍडमिट केलं आणि चौथ्या दिवशी ती गेली.
इथं मी कोणालाही दोष देऊ इच्छित नाही, कारण
परमेश्वरावर माझा पूर्ण विश्वास आहे. तिची वेळ
भरली होती, त्यामुळे ती गेली, एवढंच सत्य आहे.
आणि मुळातच एकदा माणूस गेल्यावर त्याची
कारणमीमांसा तपासत बसू नये असं मला वाटतं.
तिला चहा फार आवडायचा, दिवसातून चार
पाच वेळा तरी ती चहा घेत असे. दुर्दैवाचा भाग असा
की तिला हॉस्पिटलमध्ये चार दिवसात एकदाही
चहा मिळाला नाही. आणि या गोष्टीचं मला
सगळ्यात जास्त वाईट वाटलं आणि त्याच वेळी
मी ठरवलं की आपण काहीतरी करायचं.
माणूस गेल्यानंतर त्याचे जवळचे नातेवाईक
जास्त दुःखी असतात. आणि त्यांना काही हवंय
का? हे देखील कुणी विचारत नाही. म्हणून मी थेट
स्मशानभूमीत जाऊन ही सेवा देतो. त्यांच्या
समाधानी चेहऱ्यात मला माझ्या पत्नीचा चेहरा
दिसतो. हॉस्पिटल मध्ये गंभीर पेशंटचे नातेवाईक
अतिशय तणावात असतात. त्यांना मी जाऊन भेटतो.
चहा देतो, चौकशी करतो आणि दिलासा देतो.
थोडा वेळ का होईना पण त्यांना बरं वाटतं.
मी रिटायर असल्याने माझ्याकडे भरपूर वेळ आहे.
सुदैवाने आर्थिक परिस्थिती चांगली आहे. मोठा
बंगला आहे आणि मी एकटाच आहे. म्हणून तिथं
पंधरा अनाथ विद्यार्थ्यांची राहण्याची सोय केलीय.”
मी प्रचंड भारावून गेलो होतो. काय बोलावे हे
देखील मला कळत नव्हते. “सप्रे तुम्ही फार मोठं
काम करताय, You are great.” एवढंच मी बोलू
शकलो. सप्रेची सायकल तयार होऊन आली होती.
सप्रे गाडीतून उतरले, मला त्यांचं व्हिजिटिंग कार्ड
दिलं आणि ते निघून गेले. त्यांच्या पाठमोऱ्या
आकृतीकडे बघत मी फक्त नतमस्तक झालो.
त्यानंतर सप्रेची आणि माझी गाठ भेट नाही.
एक दिवस कोणीतरी सप्रे गेले अस सांगितलं.
मी सप्रेच्या घरी गेलो. बंगल्याच्या गेटवर मोठा बोर्ड
होता “मालती सप्रे मेमोरियल ट्रस्ट” आत एक जोशी
नावाचे मॅनेजर होते. त्यांनी सांगितलं इथं राहणारे
विद्यार्थीच आता सप्रेचं काम करतात.
मला आनंद चित्रपटातला शेवटचा प्रसंग आठवला.
राजेश खन्ना मरतो आणि नंतर अमिताभ तिथं
येतो. त्यावेळी तो दोन वाक्य बोलतो.
“आनंद मरा नहीं, आनंद मरते नहीं।

सुनील होरणे
९८२२११६६३६
E-mail : horanesunil@gmail.com
🚩🚩🚩 सुप्रभातम् 🚩🚩🚩

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}