कालौघात झालेले बदल….११ पोस्टकार्ड मोहन वराडपांडे

©️/®️ Mohan Varadpande.
9422865897
——————
कालौघात झालेले बदल….११
पोस्टकार्ड
तुम्ही कोणी गेल्या काही वर्षात पोस्टकार्ड पाहिलयं कां पोस्टकार्ड? नाही ना? बरं कोणी आंतर्देशिय पत्र पाहिलयं? इनलॅन्ड लेटर? नाही ना? कारण या बाबी आता कालबाह्य झाल्या आहेत.. अभी तो मोबाईल का जमाना है.. मोबाईल का..
पण पूर्वी पोस्टकार्ड ला पर्यायच नव्हता.. फोन सोपी नव्हता.. मोबाईल तर स्वप्नातही नव्हता.. मग बाहेर गावी असणाऱ्या आप्तांशी संपर्क ठेवण्याचं एकमेव आणि स्वस्त.. फक्त १५ पैशात असलेले माध्यम म्हणजे पोस्टकार्ड .. मॅटर जास्त असेल तर इनलॅन्ड.. आंतर्देशिय पत्र..
१९७८ मध्ये नोकरीला लागलो अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्यात.. तेव्हा माझे वडिल मला पोस्टकार्ड वर पत्र पाठवित.. ते सरासरी पांच दिवसांनी मिळायचे.. मग आपण त्याचे उत्तर द्यायचे.. ते पुन्हा पांच दिवसांनी घरी पोहचायचे.. म्हणजे बाहेर गावी असलेल्या आप्तांची ख्याली खुशाली दहा दिवसांनी समजे.. आणि हा कालावधी पालकांना वाजवी वाटत असे.. उलट पोस्टकार्ड आलं, म्हणजे काही तरी महत्वाचं काम आहे.. पत्रच आलं नाही, म्हणजे सर्व आलबेल आहे, असाच समज होता.. पालक आज सारखे पॅनिक अजिबात होत नसत..
आज तर अमेरिकेत असलेल्या मुलाचा चोवीस तासांत फोन आला नाही म्हणून आई वडील कासावीस होतात .. ट्युशनला गेलेल्या मुलाला थोडा उशीर झाला, तरी पॅनिक होतात .. तेव्हा पालकही बिनधास्त .. आणि मुलंही..
बरं पोस्टकार्ड म्हणजे, सगळा खुल्लम् खुल्ला मामला.. प्रायव्हसी वगैरे चं कोणालाच कौतुक नव्हतं.. अगदी खुले पुस्तक.. पण त्याचे ही कोणाला काही वाटत नसे.. फक्त पंधरा पैशात कळतेयं ना ख्याली खुशाली? मग?
आणि खूपच काळजी वाटली, तर एक रिप्लाय पेड पोस्टकार्ड ची सोय होती..म्हणजे एकमेकांना चिटकलेली जुळी पोस्टकार्ड .. एका पोस्टकार्ड वर बाबा पत्र लिहायचे.. व दुसर्या कोर्या पोस्टकार्ड वर त्यांचा सेल्फ अॅड्रेस असायचा… की बाबारे.. तुला पोस्टकार्ड विकत घ्यायला जमत नसेल, वेळ मिळत नसेल, तर या सोबतच्या पोस्टकार्ड वर लिही .. पत्ता मी अगोदरच लिहिला आहे.. आता फक्त तु ते टाक पत्रपेटीत..
इंग्रजांनी काढलं टपाल खातं.. मला कौतुक याचं वाटतं, की ही सिस्टीम संपूर्ण विश्वासावर आधारित आहे.. त्यांची त्यावेळची नैतिकताच म्हणावी लागेल.. तुम्ही पोस्टकार्ड पत्रपेटीत टाकलं, याचा काही पुरावा आहे तुमच्या कडे?.. नाही.. समोरच्याला मिळालच असेल, याचा काही पुरावा? .. नाही..
त्या पोस्टमन् ने दहा पंधरा पोस्टकार्डस् घरी जाळून टाकले, तरी कोणी सिध्द करु शकत नाही.. पोहचवले, तरी त्याला कोणी साधे धन्यवाद देत नाही.. तरी तो प्रामाणिकपणे आपली ड्युटी करतो.. कारण ही व्यवस्थाच मुळी विश्वासावर आधारित आहे.. कौतुक वाटतं मला या व्यवस्थेचं..
आता तर आठवण आली तेव्हा बोलता येतं .. मग पत्र वगैरे कशाला? आउट डेटेड झालयं पत्र वगैरे.. तेव्हा शाळेतही पत्र लेखन हा विषय असायचा.. मायना म्हणजे काय .. मजकूर म्हणजे काय.. ताजा कलम म्हणजे काय.. आता नवीन पिढीला ताजा कलम माहित आहे कां, शंकाच आहे..
आताच्या पिढीस एखादं पत्र लिहायला सांगा.. कोणालाही लिही म्हणावं.. आणि बघा त्याची गंमत..
आताही टपाल खातं आहे.. त्यांची बॅन्किंग सर्व्हिस पण आहे.. पत्र पेटी ही आहे.. पण पोस्टकार्ड नाही.. आता पत्रपेटीतून येणारं टपाल, म्हणजे तुमचे शेयर्स् असलेल्या बॅन्कांचे अहवाल, तुमचे म्युचियल फन्डस् ची कागदं, लग्न पत्रिका.. वगैरे वगैरे …
पण कुटुंब सदस्यांनी आप्तांना कळविलेली ख्यालीखुशालीची पत्रे, पोस्टकार्डस्, ईन्लॅन्डस् हे मात्र कालौघात हरवलयं…
होय ना?
मोहन वराडपांडे
9422865897.